Home > मॅक्स ब्लॉग्ज > ये दिवार कब टुटेगी?

ये दिवार कब टुटेगी?

ये दिवार कब टुटेगी?
X

सध्या नांदेडमधील एक भिंत सर्वत्र चर्चेचा विषय बनलीय. राज्यामध्ये विविध ठिकाणी माणुसकीची भिंत उभारण्याचे प्रयोग सुरू आहेत, अशा वेळी नांदेडमधील एका भिंतींने सर्वांना हादरवून टाकलंय. माणूसकीच्या मध्ये उभारण्यात आलेल्या या भिंतींने पाहून जो तो एकच प्रश्न विचारतोय की "आखिर ये दिवार कब टुटेगी?"

रामनवमीच्या निमित्ताने नांदेड मध्ये तीस फुट उंचीची भिंत पोलीस प्रशासनातर्फे उभारण्यात आली. चायना वॉल ची आठवण करून देणारी ही भिंत शहरात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून उभारण्यात आली होती. या भागातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये रामनवमीच्या किंवा इतर धार्मिक सणांच्या निमित्ताने नेहमीच तेढ निर्माण होत असते. या वेळी तशी तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलीसांनी हिंदू आणि मुस्लीम वस्तीच्या मध्ये भिंतच उभारली, आणि या दोन्ही वस्त्यांचा संपर्क तोडला.

मुंबईतील साकीनाका परिसरातील रामनवमीची मिरवणूक

एकीकडे माणुसकीची भिंत सारखे प्रयत्न केले जात आहेत तर दुसरीकडे नांदेडमध्ये लोकांना विभागणारी भिंत उभी केली गेली हे धक्कादायकच होतं. अशाच तणावाची पार्श्वभूमी असलेल्या मुंबईतल्या साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र मुस्लीम वस्तीत रामनवमी धामधूमीत साजरी करण्यात आली. तिथे पोलीसांनी दोन्ही धर्मातील लोकांशी समन्वय साधून वातावरण मोकळं करण्याचा प्रयत्न केला. तर नांदेडमध्ये पोलीसांनी भिंत उभी केली.

याबाबत मॅक्समहाराष्ट्र च्या टीम ने नांदेड मधील दोन्ही धर्माच्या प्रतिनिधींशी विचारणा करण्याचा प्रयत्न केला. ही परिस्थिती बदलण्यासाठी ते पुढाकार घेणार आहेत का? हे जाणून घेण्याचा आमच्या टीम ने प्रयत्न केला

भिंत पाहून मनाला वेदना - एम.ए.हफीज़, नांदेड

नांदेडच्या शिवाजी नगर भागात मस्जिद-ए-आबेदीन परिसरात स्थानिक प्रशासन तर्फे अंदाजे 1 कि.मी.पर्यंत 30/40 फूट ऊंच बॅरेक उभारण्यात आले होते. कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनाच कर्तव्य आहे हे मान्य करावच लागेल. कारण असामाजिक तत्व नेहमी उपलब्ध संधीचा गैरफायदा घेण्यात पटाईत असतात. म्हणून पोलीसांकडून जी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावच लागेल.

परंतू स्वतंत्र भारताचे एक जागरूक नागरिक या नात्याने ती भिंत पाहून मनात खूप वेदना झाल्या. आम्ही एक धर्मनिरपेक्ष राष्ट्राचं संविधान लागू केलं आणि प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांना सामान अधिकाराची ग्वाही दिली. परंतू आपला राजकीय स्वार्थ साधण्याकरीता राजकीय नेते विनाकारण समाजात तेढ निर्माण करतात. खरंतर आज प्रत्येक शहरात प्रत्येक धर्माची वेगळी वस्ती पाहावयास मिळते. मागील 30 वर्षांपासून हा प्रकार जास्त वाढला आहे. त्यामुळे तरुण वर्ग एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर करीत नाही आणि वेळ प्रसंगी एकमेका विरुद्ध उभे राहून भारतीय संस्कृतीचे वाटोळं करीत आहेत.

साध्य बिघडत असलेली परिस्तिथी काबूत ठेवण्याकरिता शक्य तितके लवकर समिती गठीत करून भविष्यात या प्रकारची पुनरावृत्ती टाळावी लागेल. तरच आम्ही प्रगतीचा शिखर गाठू शकू

एवढ्या वर्षात पहिल्यांदा एक सामान्य माणूस देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झाल आहे. त्यामुळे लोकांनी इतर फालतु विषयांकडे लक्ष न देता विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केलं तर अधिक चांगल होईल. नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकास या वाक्याला सत्यात उतरवण्यासाठी उपयुक्त वातावरण निर्मिती करायला हावी

अशा प्रकारचा मजकूर लिहीलेले फोटो सध्या व्हॉट्स ऍपवर व्हायरल आहेत.

आपण बुद्धी असलेल्या माणसाचे हैवान झालो - विवेक ताटे

बाबरी मशिदीच्या पतनानंतर आणि मुंबई दंगलीनंतर हिंदू-मुस्लिम धर्मीयांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वासाची भावना निर्माण झाली. काळाच्या ओघात ती दरी मिटत येऊ लागली असताना या भिंतीमुळे विश्वासाला कुठेतरी तडा जाण्याची भिती आज दोन्ही समाजमनांमध्ये वाटू लागली आहे. असे एकंदरीत चित्र संपूर्ण शहरभर पाहायला मिळते आहे. या विषयावरून 'वाट्स अप' वर चुकीचे आणि समाज विघातक संदेश एकमेकांना पाठवले जात आहेत. एकंदरीत हा सर्व भयानक प्रकार असून यामुळे दोन्ही समाजातील तरूणांवर वाईट परिणाम घडून येतील अशी परिस्थिती या भिंतीने निर्माण केली आहे. हे जे घडले ते चुकीचं आहे. श्रीराम सत्यवचनी, मर्यादा पुरूषोत्तम आदर्श राजे म्हणून संपूर्ण भारतीय उपखंडात त्यांची किर्ती आहे. आजही सरकारे कशी असावीत तर रामराज्यासारखी असावीत असे म्हटले जाते. एखाद्या आदर्श राजाच्या जन्मोत्सवात पवित्र मशिदी समोर २५-३० फुट भिंत उभी करावी लागते हे कशाचे द्योतक आहे? एक नांदेडकर म्हणून आज माझी मान शरमेने खाली झुकते आहे. बचैन होतो आहे. आज मशिदीपुढे भिंत उभी केली गेली उद्या गुरूद्वारा आणि मंदिरांपुढे भिंती उभ्या करणार का? या अशा भिंतीतून काय साध्य होणार? आदर्श राजाची मिरवणूक येत असेल तर तिचे मशिदीपुढे स्वागत होईल असे सामाजिक एकोप्याचे वातावरण आम्ही निर्माण करू शकलो नाही, उलट दोन धर्मांमध्ये आम्ही अविश्वसनाची मोठी भिंत निर्माण करून माणूसकीला काळीमा लावला आणि बुद्धी असलेल्या माणसाचे हैवान झालो !

हे टाळताही आले असते जर नांदेड शहरातील दोन्ही बाजूची चिंतनशील व्यक्तीमत्व, राजकीय पुढाऱ्यांनी आणि प्रशासनानं पुढे येऊन आपली राष्ट्रीय एकात्मतेची कर्तव्यपुर्ती केली असती. परंतू प्रत्येकवेळी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या लोकांनी आणि प्रशासनानेच आपली कर्तव्य पार पाडावीत आणि लोकांनी फक्त बघत राहावे, हेही कितपत योग्य?

आमच्या शिक्षणाचा व विकासाचा काय फायदा? कुठलाही धर्म खराब नाही फक्त माणूस खराब आहे. तोच फक्त स्वताःच्या स्वार्थासाठी धर्म आणि एकंदर समाजव्यवस्थेला कलंक लावतो. असो आता ही भिंत घडून गेली. परंतू यापुढे ही भिंत उभी राहणार नाही यादृष्टीने जबाबदार आणि संवेदनशील नांदेडकरांना काम करावे लागेल.

सण आणि उत्सव हे समाजात एकमेकांची मनं जवळ आणण्यासाठी साजरे करायचे असतात. अशा भिंती उभ्या करण्यासाठी साजरे करायचे नसतात. मला वाटते, या उभ्या राहिलेल्या भिंतीच्या निमित्ताने सर्व नांदेडकरांनी आपल्या ह्रदयात डोकावून पाहावे आणि आपण खरचं कुठे जातो आहोत? याचा गांभीर्याने विचार करावा...!!

Updated : 5 April 2017 12:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top