Home > मॅक्स ब्लॉग्ज > युरोप पाठोपाठ आग्नेय आशियात आयसीसचा शिरकाव!

युरोप पाठोपाठ आग्नेय आशियात आयसीसचा शिरकाव!

युरोप पाठोपाठ आग्नेय आशियात आयसीसचा शिरकाव!
X

दहशतवादाच्या चिंतेनं आग्नेय आशियाला चांगलंच ग्रासलं आहे. इंडोनेशियानं आपल्या उत्तरी सिमा अधिक सुरक्षित करण्यास सुरुवात केली आहे. आय.एस.आय.एस कडून प्ररणा घेऊन या भागामध्ये अनेक लहान दहशतवादी संघटना निर्माण झाल्या आहेत. यामुळे आग्नेय आशियात सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय.

याच आठवड्यात आय.एस.आय.एस दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या सुमारे 300 दहशतवाद्यांनी सैन्याबरोबर चकमक करत दक्षिण फिलिपान्समधील एका शाळेत शिरुन अनेक फिलिपिनो नागरिकांना ओलीस ठेवल्याची घटना घडली होती. पण फिलिपाईन्स सैन्याच्या जोरदार हल्ल्यांनं दहशतवाद्यांना त्या शाळेतून पळ काढावा लागला. सुदैवानं या सर्व प्रकारात नागरिकांचा बळी गेला नाही. फिलिपान्समधील मारावी हे शहर दहशतवाद्यांना ताब्यात घ्यावयाचं आहे. त्याकरिता सुमारे पाच आठवड्यांपासून सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु आहेत.

अग्नेय आशियामध्ये मूलतत्ववाद्यांनी अशा छोट्या मोठ्या कारवाया करत दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. फिलिपाईन्सच्या मिंदानाओ प्रांतातील अब्दुल्ला आणि ओमरखय्याम रोमातो या दोन भावांनी आय.एस कडून प्रेरणा घेत खलिफा स्थापन करुन अतिरेकी कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. खलिफा इस्लामिया मिंदानाओ असं त्यांनी त्या खलिफाचं नामकरण करत स्वत:कडे त्याचं प्रमुख पद घेतलं आहे. हा खलिफा त्यांनी 2012 मध्ये स्थापन केला आणि 2015मध्ये आपण आय.एसशी संलग्न असल्याचं जाहीर केलं. याच देशात अन्सार अल्-खलिफा फिलिपाईन्स नावाचा दुसरा खलिफा देखील आहे. हे दोन्ही गट आय.एस शी संलग्न असल्याचा दावा करतात.

फिलिपाईन्समध्ये अशा प्रकारच्या एकूण चार दहशतवादी संघटना असल्याचं बोललं जातं. अब्दुल्ला आणि ओमर खय्याम रोमातो यांच्या गटाला मौते गट असे देखील म्हटले जाते. या दोन मौते बंधुंनी शिक्षणाकरिता बरच काळ जॉर्डन आणि इजिप्मध्ये घालवला आहे. त्याच ठिकाणी त्यांच्यातल्या मूलतत्ववादाला प्रोत्साहन मिळालं असण्याची शक्यता आहे. उत्तर आफ्रिका आणि आखाती प्रदेशात मूलत्तत्ववादाला खत पाणी घालणार अनेक व्हाईट कॉलर मंडळं आहेत. यामुळे आतंकवाद आता संपूर्ण जगात पसरत चालला आहे. त्यातून इस्लाम धर्मात अनेक सुधारणा अद्याप झाल्या नसल्यानं बहुतांश तरुण मंडळी धर्माचा आधार घेत इतर सर्व धर्मांना नष्ट करण्याची भावना मनात बाळगून दहशतवादाकडे ढले जातात.

अशाच प्रकारे हे दोघेही मोते बंधु क्षुद्र गुन्हेगारी करताकरता अतिरेकी बनले. ओमरखय्यामची पत्नी इंडोनेशियन नागरिका आहे. तिच्या घरात देखील मूलतत्ववादी गुणांचा उदो उदो केला जातो. यामुळेच फिलिपाईन्समध्ये वाढणाऱ्या दहशतवादावरुन इंडोनेशियात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.

फिलिपाईन्सप्रमाणे इंडोनेशियामध्ये मात्र अशा स्वरुपात दहशतवाद पसरण्याची शक्यता नाही. मिदानाओ या प्रांतात कायद्याची अंमलबजावणी फारच कमकूवत असल्याचं बोललं जातं. यामुळे या प्रांतात अधुनिक हत्यारं सहजपणे उपलब्ध आहेत. इंडोनेशियामध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे. हत्यारं प्राप्त करणं कठीण आहे. त्याचबरोबर इंडोनेशियाच्या सैन्यानं गेल्या दोन वर्षात हत्या तस्करीचे प्रयत्न हाणून पाडण्यात यश मिळवलं आहे. त्याचबरोबर सैन्य आणि इंडोनेशियातील पोलिसांनी सुलावेसीच्या जंगलातून होणाऱ्या इस्लामिक घुसखोरी कारवाया हाणून पाडल्यानं अंतर्गत घुसखोरीवर ताबा मिळवला आहे.

मारावीमध्ये दहशतवाद वाढत असल्यानं अग्नेय आशियामध्ये धोक्याची घंटा वाजली आहे. मुख्य म्हणजे फिलिपाईन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते याच मिदानाओ प्रांताचं प्रतिनिधित्व करतात. दुतेर्ते या मूलतत्ववाद्यांना हिंसेच्या मार्गावरन परत आणण्यास यशस्वी होतीअसं मानलं जात होतं. मात्र आतपर्यंत त्यांना यश आलं नाहीय. अध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी अवलंबिलेली काही धोरणं अयशस्वीच ठरली आहे. फिलिफाईन्समध्ये अशप्रकारे दहशतवाद मळ धरेल या गोष्टीकडे दुतेर्ते यांच्या प्रशासनानं पूर्णपणे द्लक्ष्य केलं होतं असंच आता म्हणावं लागेल. फिलिपाईन्सच गुप्तहेर खातं देखील आपल्याच भूमीवर होत असलेल्या या जमवाजमवी विषयी अनभिज्ञ होतं काय? असा प्रश्नही निर्माण होतो. 2016च्या अखेरीसच दहशतवादी गटांनी लानाओ तलावाच्या दक्षिणेस असलेल्या शहराचा ताबा मिळवला होता. मारावीचा ताबा या दहशतवादी गटांना मिळाल्यास दक्षिण फिलिपाईन्समध्ये 1974 च्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मारावीचा ताबा मिळवण्याकरिता देशातील चारही दहशतवादी गट प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे. या दहशतवादी गटांमध्ये केवळ फिलिपिनो लोक आहेत असं नाही तर मलेशिया आणि इंडोनेशियातील काही कट्टर मलतत्ववादी लोकंही फिलिपाईन्सच्या दहशतवादी गटांमध्ये सामिल झाले असल्याचं बोललं जात आहे. जकार्तावरील हल्ल्यानंतर इंडोनेशियातील अनेक दहशतवाद्यांवर सरकारनं विजय मिळवला आहे. त्याचबरोबर जमाह अन्शारुत दपल्हा या दहशतवादी गटाच्या मोऱ्हक्याला जेरबंद करण्यातही इंडोनेशियाच्या पोलिसांना यश आलं. पण याच गटातील काही इतर दहशतवाद्यांनी देशातून पळ काढत सिरियामध्ये आश्रय घेतल्यानं चिंतेचं वातारण कायम आहे.

फिलिपाईन्सच्या मारावी शहरात दहशतवादी गटांनी शस्त्रास्त्रांचा चांगलाच साठा करुन ठेवला आहे. तस्करीच्या माध्यमातून अधुनिक शस्त्रांचा संचय केलाय. यामुळे शेजारी राष्ट्रांची चिंता वाढली आहे. मारावीचा ताबा मिळवण्यात दहशतवाद्यांना यश मिळाल्यास इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये हा दहशतवाद पसरण्याचा मार्ग मोकळा होण्यची शक्यता आहे. ही जोखीम समुळ नष्ट करण्याकरिता आखेर या तीन देशांनी सुलू समुद्रातील गस्त वाढवली आहे. याच सुलू समुद्रातून दहशतवाद्यांनी शस्त्र संपादन केली असण्याची दाट शक्यता आहे.

आय.एस.आय.एसचा प्रभाव कमी करण्याकरिता आता जगातील सर्व देशांना एकत्र येऊन या आव्हानाला तोंड देण्याची वेळ आली आहे. त्याच बरोबर सैनिकी उद्योग प्रधान देशांना शस्त्र विक्री विषयी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. समाजकंटकांच्या हाती (अधुनिक) शस्त्र पडतातच कशी याचा देखील शोध घेऊन तो मार्ग रोखण्याची गरज आहे. दहशतवाद रोखण्याकरिता सुलू समुद्रात वाढवलेल्या सुरक्षेमुळे फिलिपाईन्स, इंडोनेशिया आणि मलेशियाला कितपत यश मिळतंय हे पहावं लागेल.

कौस्तुभ कुलकर्णी.

Updated : 23 Jun 2017 9:08 AM GMT
Next Story
Share it
Top