Home > मॅक्स ब्लॉग्ज > युद्धाच्या उंबरठ्यावर पूर्व आशिया

युद्धाच्या उंबरठ्यावर पूर्व आशिया

युद्धाच्या उंबरठ्यावर पूर्व आशिया
X

जगानं युद्धाचा अनुभव घेतलाय, शीत युद्ध संपून अडीच दशक उलटलं असलं तरी कुरापतींचा अनुभव आपण रोजच घेत आहोत. त्यात आता आशियामध्ये अमेरिकेच्या शक्ति प्रदर्शनामुळे तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी आशियात पडणार का? अशी शंका उत्पन्न झाली आहे. आशिया खंडात विविध राष्ट्रांमध्ये सुरु असलेल्या शस्त्रास्त्र स्पर्ध, वर्चस्वाची स्पर्धा, भू-संपादन स्पर्धांमुळे या खंडातही शीत युद्ध सुरु झालं आहे, असं म्हणावं लागेल.

आशिया प्रशांत भागात अमेरिका देखील शक्ति प्रदर्शन करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेनं देखील या भागात शक्तप्रदर्शन सुरु केलं आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी अवलंबिलेल्या आशियाई अक्ष धोरणाची री ओठण्याचं काम ट्रम्प प्रशासनानं सुरु केलंय. या आशियातील शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे 1962 सालच्या क्यूबा क्षेपणास्त्र समस्येची आठवण होते. ही समस्या डोकं वर काढयच्या आगोदरच ठेचणं गरजेचं आहे. दोन बाबींमुळे आशिया खंडातील शस्त्रास्त्र स्पर्धेच्या ठिणगीला फुंकर घातली गेली आहे. पहिली बाब म्हणजे चीनचं कट्टर राष्ट्रीयत्व आणि विस्तारवादी धोरण आणि दुसरी म्हणजे चीनच्या विस्तारवादाला उत्तर देण्याकरिता अमेरिकेनं आखलेलं आशियायी अक्ष धोरण.

चीनची भूमिका

दोन शतकांच्या जगाकडून मिळालेल्या मानहानीकारक वागणुकीनंतर चीननं गेल्या काही वर्षात आपलं डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. प्रबळ राष्ट्रीयत्वाची भावना चीनमध्ये जागृत झाली आहे. त्यानुसारच चीन आता विविध प्रदेशांवर आपलं वर्चस्व पुन: प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकत आहे. यामुळे इंडो-आशिया-प्रशांत प्रदेशात शस्त्रास्त्र स्पर्धा अधिक जोर धर लागली आहे. त्यातच उत्तर कोरिया सारख्या देशानं अलिकडच्या काळात चाचण्यां मागून चाचण्या करत कहर केला आहे. या सर्व परिस्थितीमुळे या प्रदेशात अशांत वातावरण निर्माण झालं आहे. अमेरिकेनं आपले माजी अध्यक्ष ओबामांच्या प्रशासनानं आखलेल्या आशियाई अक्ष धोरणानुसार पुन्हा पूर्व आशियात आपल्या लष्करी कवायती सुरु केल्यानं उत्तर कोरिया आणि चीन चवताळले आहेत.

२१व्या शतकात आर्थिक संपन्नता प्राप्त केल्यानंतर चीननं नैसर्गिक साधन संपत्तीवर वर्चस्व मिळवण्याच्या हेतूनं आशियातील अनेक देशांमध्ये आर्थिक मदत आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यास सुरुवात केली. त्याच बरोबर अनेक भागांवर त्यांनी आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली. दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रातील अनेक बेटांवर त्यांनी आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली. यामुळे जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम सारख्या देशांशी चांनचे शाब्दिक चकमकी सुरु झाल्या. याच दरम्यान या सर्व देशांनी आपल्या सैन्यावरील खर्चात वाढ केली. याच दरम्यान उत्तर कोरियामध्ये अण्वस्त्र विकास कार्यक्रम वेगानं सुरु होता.

उत्तर कोरिया हा पूर्णत: चीनच्या प्रभाव क्षेत्रातील एक महत्वाचा देश आहे. चीन प्रमाणेच या देशांतही अमेरिका विरोधी वातावरण आहे. या देशांनं गेल्या काही वर्षात लांब पल्याच्या क्षेपणास्त्रांचा विकास केला आहे. त्याच बरोबर चीनकडे देखील अशा प्रकारची अण्वस्त्र उपलब्ध आहेत. अमेरिकेच्या शक्ति पुढे न नमणारे हे देश असल्यानं अमेरिका देखील उत्तर कोरियावर डूक धरुन आहे. अमेरिकेने या देशावर अनेक निर्बंध लादली आहेत. यामुळे या देशाला चीनवर अवलंबून रहावं लागतं. लोकशाही पद्धत न मानणाऱ्या आणि अमेरिकेला धुडकावून लावणाऱ्या देशांना आणि त्यांच्या नेत्यांना अमेरिकेनं आतापर्यंत चांगलाच धडा शिकवला आहे. उदाहरणंच द्यायची झाली तर सद्दाम हुसेन, मुअम्मर गद्दाफी ही काही ताजी उदाहरणं आहेत.

गद्दाफी देखील लिबियामध्ये अण्वस्त्र विकास कार्यक्रम राबवण्याच्या तयारित होते. अमेरिकेनं तो प्रकल्प येन केन प्रकारे हाणून पाडला. हा प्रकल्प हाणून पाडल्याच्या आठ वर्षानंतर अमेरिकेनं गद्दाफी यांनाच या भूतलावरुन नष्ट करुन टाकलं. सद्दाम हुसेन यांच्या बाबत तर फारसं काही सांगण्याची आवश्यकता नाही.

उत्तर कोरियाचं अमेरिकी चित्रण

अमेरिकेनं अलिकडेच दक्षिण कोरियामध्ये आपलं थाड क्षेपणास्त्र तैनात केलं आहे. इंडो-आशिया-प्रशांत प्रदेशातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांच्या सुरक्षेकरिता हे पाऊल उचलण्यात आल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं होतं. अमेरिकाच्या वक्तव्यानुसार हे क्षेपणास्त्र उत्तर कोरियाला रोखण्याकरिता तैनात करण्यात आलं आहे. या एका कृतीनं अमेरिकेनं दोन पक्षी मारले होते. दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रातील चीनच्या मक्तेदारीला अमेरिकेच्या थाड क्षेपणास्त्रानं आव्हान निर्माण केलं. यामुळे चीनलाही जबर धक्का बसला. अमेरिकेचा या हस्तक्षेपमुळे चीनचा पारा चांगलाच चढला आहे. आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये भारतासारख्या देशाला चीन जिथे तिऱ्हाईत म्हणून संबोधतो तिथे अमेरिकेची काय गोष्ट. आशियामध्ये हस्तक्षेप करुन अमेरिका या खंडातील समतोल बिघडवत आहे, त्याचबरोबर प्रदेशाची सुरक्षा जोखमीत टाकत आहे.

शीत युद्धानंतर निर्माण झालेल्या बहुध्रुवीय वातावरणात अमेरिका आपला प्रभाव कमी होऊ न देण्याकडे लक्ष्य केंद्रित करतांना दिसत आहे. ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशीप ट्रम्प प्रशासनानं रद्द केली. पण, त्याचा परिणाम आशिया अक्ष धोरणार झाला नाही. अक्ष धोरण ट्रम्प प्रशासनानं कायम राखलं आणि आता त्याचा प्रयोग सुरु केलाय. या अक्ष धोरणामुळे निर्माण झालेल्या या शस्त्रास्त्र स्पर्धेमुळेच क्यूबा मिसाईल क्रायसिसची आठवून होऊन अनेक राजकीय अभ्यासकांच्या छातीत धडकी भरली आहे.

जगातल्या सर्व महत्वाकांक्षी देशांना आपल्या टाचेखाली ठेवण्याच्या हेतून अमेरिकेनं उत्तर कोरियाचं खलनायकी चित्रण सुरु केलं आहे. या माध्यमातून मोक्याच्य ठिकाणी आपली क्षपणास्त्र तैनात करुन देशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण करण्याचं काम अमेरिका करत आहे. पेन्टगॉन ही अमेरिकी सुरक्षा संस्था अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खांद्याव बंदूक ठेवून कार्य करत आहे. मेरिकी प्रशासनातले एक माजी अधिकारी पॉल रॉबर्ट्स यांनी अलिकडेच एका लेखातून अमेरिकी प्रशासनाच्या या खेळीवर प्रकाश टाकलाय. उत्तर कोरियानं 1950 ते 1953 याकाळात य़ुद्ध केलं आहे. त्यानंतर गेल्या 64 वर्षात उत्तर कोरियानं कुठल्याही देशावर हल्ला केला नाही किंवा काबीज करण्याचा प्रयत्नही केला नाहीय, असं रॉबर्ट यांनी आपल्या लेखात म्हटलंय. त्याचबरोबर जपान किंवा दक्षिण कोरियाशी युद्ध करण्याची आपली क्षमता नसल्याची जाणीवही उत्तर कोरियाला असल्याचं उल्लेख रॉबर्ट यांनी आपल्या लेखात करुन अमेरिकाच या प्रदेशांतील शस्त्रास्त्र स्पर्धेस जबाबदार असल्याचा आरोपही केलाय.

लष्करी औद्योगिक संकुलं आणि अमेरिकी नेतृत्व

अमेरिकी नेतृत्व पेन्टॉगॉन आणि लष्करी औद्योगिक संकुलांच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही. अमेरिकी अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर या लष्करी औद्योगिक संकुलांवर आधारलेली आहे. यामुळेच अमेरिकी अध्यक्ष या महसूल निर्माण करणाऱ्या समुहाच्या विरोधात गेल्यास त्या नेत्याला चांगलीच किंमत मोजावी लागते. जॉन एफ केनेडींची हत्या अशाच प्रकारे झाली असं अमेरिकी साहित्यिक जेम्स डग्लसनं आपल्या जे.एफ.के दी अनस्कीकेबल: व्हाय ही डीड ऍण्ड व्हाय इट मॅटर्स या आपल्या पुस्तकाद्वारे सांगितलं आहे.

अध्यक्ष केनेडी यांनी क्युबा मिसाईल क्रायसिस दरम्यान रशियाबरोबर युद्ध टाळलं आणि अण्वस्त्र अंशात्मक चाचणी बंदी करार केला. केनेडींनी युद्ध टाळत शांततामयरित्या बरंच काही साध्य केलं होतं. जगाला युद्धाच्या खाईत जाण्यापासून त्यानं वाचवलं होतं. अण्विक युद्धापासून जगाचा बचाव केला होता. मात्र केनेडी यांच्या या कृतीनं आनंदित होण्याऐवजी पेन्टॉगॉन आणि लष्करी औद्योगिक संकुलांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं होतं. नाराजी होती ती अमेरिकेचं अबाधित वर्चस्व निर्माण करण्याची संधी केनेडींनी गमावल्याची. त्याच बरोबर व्हिएतनाममधून सैन्य मागे बोलवण्याची दुसरी चूक केनेडींच्या हातून घडली होती. यामुळे नाराज झालेल्या पेन्टॅगॉन आणि लष्करी औद्योगिक संकुलांतील बड्या धेंडांनी केनेडी यांचा जीव घेतला असं डग्लस यांनी निष्कर्ष काढला आहे.

अमेरिकेनं वर्चस्व निर्माण करतांना अनेक देशातील शांतता भंग केली आहे. युरोपमधून रशियावर वचक ठेवण्याकरिता सोविएत संघातून फुटलेल्या अनेक देशांना आपल्या बाजुनं वळवण्यात अमेरिकेला यश आलं आहे. त्याचबरोबर त्या देशांमध्ये क्षेपणास्त्र तैनात करून रशियाची कोंडी केली आहे. पूर्व आशिया भागात रशिया सक्रिय झाल्यानंतर चीन, रशियाला रोखण्यासाठी उत्तर कोरियाचं खलनायकी चित्रण करुन या भागातही क्षेपणास्त्र सज्ज केली आहेत. उत्तर कोरियाबाबत पूर्व आशियाई आणि इंडो चायना प्रदेशात संभ्रम निर्माण करण्यात अमेरिकेला चांगलंच यश आलं आहे. जपान आणि दक्षिण कोरियानं आपल्या बाह्या सरसावल्या आहेत. त्याचबरोबर व्हिएतनाम सारख्या लहान देशानं देखील चीन विरुद्ध दंड थोपटले आहेत. हे तीनही देश अण्वस्त्र निर्माण करण्याची क्षमता ठेवतात.

शीत युद्धाच्या काळात शत्रुला युद्धापासून परावृत्त करण्याकरिता अण्वस्त्र सज्जता राखली जात होती. पूर्व आशियात मात्र याची स्पर्धा सुरु होऊन जगाचा अंत होईल की काय असं चित्र निर्माण झालं आहे. यामुळे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जगतिक युद्धांचा अनुभल जगानं घेतलाय, कुरापतींचा अनुभवही पाठीशी आहे. मग अनुभव नाही तो फक्त शांततेचा. मानवतेला वाचवण्याच्या दृष्टीनं शांततामय मार्गानं हे तंटे सोडवता येणार नाहीत काय?

कौस्तुभ कुलकर्णी

Updated : 26 May 2017 6:08 AM GMT
Next Story
Share it
Top