मोदी 'चरखा'र

मोदी चरखार
X

२०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून दिलेल्या वचनांच रुपांतर जुमल्यांमध्ये झालंय. सरकारची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे झाली. त्याचा कळस नथूराम गोडसेचं समर्थन करताना शांततेनं आणि अहिंसेच्या मार्गाने विरोध प्रदर्शन करणार्‍या लोकांवर प्रत्यक्ष गोळ्या चालवण्याची धमकी देण्यापर्यंत झाला; जणू दुसरे जालियनवालाबागंच नागपुरात घडवून आणायचे होते; आणि पोलीस प्रशासनानं त्यांच्या मालकांकडून आलेल्या आदेशामुळे परिस्थिती अशी करुन टाकली की जणू भारतात अजूनही ब्रिटिशांचे राज्य आहे आणि दिल्लीच्या तख्तावर १२५ कोटी जनतेने निवडून दिलेले पंतप्रधान नाही तर जनरल डायर बसले आहेत अशी शंका यायला जागा आहे. ‘अभी तो यह सिर्फ झलक है, पुरी पिक्चर अभी बाकी है’ या प्रवृत्तीला जर वेळीच आटोक्यात आणले नाही तर प्रत्यक्षात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही, याचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. मोदीप्रणीत भाजपाच्या अडीच वर्षाच्या कालखंडाचा आढावा घेतला तर असेच म्हणावे लागते.

राजा किंवा राष्ट्रप्रमुख कसा नसावा याचे परिपूर्ण उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी! भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा विचार केला तर अनेक महत्त्वाच्या गोष्टींची दखल घेणे भाग आहे. पण तूर्तास आज सर्वत्र जो चर्चेच्या विषय आहे त्या अनुषंगाने जाता महात्मा गांधींनी दिलेला स्वदेशीचा नारा आणि त्यांचा चरखा याला अनन्यसाधरण महत्त्व आहे, प्रतिकात्मकही आणि प्रत्यक्षही. चरख्याच्या माध्यमातून महात्मा गांधीजींनी केवळ स्वदेशीचाच नारा दिला होता असे नाही तर मँचेस्टरमधील मोठमोठ्या यांत्रिक, औद्योगिक साम्राज्यवादालाही धक्का दिला होता. तो लढा केवळ आर्थिक स्वावलंबनाचा नव्हता तर प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्यलढ्यात आपले योगदान देऊन त्यामध्ये राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेऊन, राजकीय निर्णय क्षमता निर्माण करण्याचा होता. ते एक प्रकारे आर्थिक, सामाजिक, राजकीय स्वावलंबन होते. म्हणून चरखा आणि गांधी हे स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक झाले होते. त्यामुळे राष्ट्रध्वजाइतकीच चरख्यावरही आणि गांधीजींवरही प्रत्येक भारतीयाची नितांत श्रद्धा आहे. अशी प्रतिके कुठल्याही राष्ट्रासाठी श्रद्धास्थानं असतात. याचे कारण म्हणजे त्यांनी त्या त्या काळात महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली असते.

इतकी पार्श्वभूमी मांडण्याचे कारण म्हणजे आज खादी ग्रामोद्योग विभागाच्या कॅलेंडरवरुन महात्मा गांधीजींचा फोटो बाजूला सारुन नरेंद्र मोदींनी स्वतःचा फोटो तिथे लावला आहे. ही कृती म्हणजे, जोहान्सबर्गच्या पीटरमारीट्झबर्ग रेल्वे स्टेशनवर एका इंग्रज रेल्वे अधिकार्‍याने अपमनास्पदरीत्या गांधीजींना रेल्वेतून खाली उतरवले त्यापेक्षा मोठा अपमान आहे. स्वकीयाने असे करावे यापेक्षा दैवदुर्विलास आणि मोठा अपमान कोणता? आज समस्त भारतीयांची हीच भावना आहे.

एखादी व्यक्ती इतकी प्रसिद्धिलोलुप होते की ‘आय, मी, मायसेल्फ’ यापलीकडे तिला काही दिसत नाही; मी म्हणजे सर्वकाही अशी नार्सिस्ट व्हायला लागते तेव्हा तिला राष्ट्राभिमानाचे भान रहात नाही. मी म्हणजेच राष्ट्र, मी म्हणजेच राष्ट्राचा अभिमान, मी करतो तीच राष्ट्रभक्ती आणि शेवटी मी म्हणेन तीच पूर्व दिशा अशा आविर्भावात असते त्यावेळी आपण कुठेतरी चुकतो आहोत याची किंचतही जाणीव नसते.

एका जुमल्यातून दुसर्‍या जुमल्यात, वेगवेगळ्या योजनांची नावे बदलून सरकारमधील तब्ब्ल अडीच वर्षांनंतर आपण काहीच करु शकलो नाही आणि त्यामुळे आपण असे काहीतरी विलक्षण करायला हवे की ज्यामुळे प्रदीर्घकाळ आपले नाव सन्मानाने घेतले जावे अशी तीव्र भावना निर्माण झाली. ज्यांच्या मदतीने आपण सत्तेवर आलो त्यांना सुद्धा फायदा व्हावा, ‘साप भी मरे और लाठी भी न टूटे’ अशा आविर्भावात, कुठल्याही तज्ज्ञाचे न ऐकता, सहकार्‍यांना विश्वासात न घेता, माझेच खरे या नादात घेतलेला निर्णय म्हणजे नोटाबंदी. सर्व पसे परत बँकिंग व्यवस्थेत येत असल्याचे दिसल्यावर काळा पैसा, दहशतवाद, खोट्या नोटा हे उदात्त हेतू सुद्धा पूर्ण होत नाही म्हणून ‘कॅशलेस’, ‘लेस कॅश’कडे वळवण्याचा प्रयत्न झाला. त्यातूनही उद्देश साध्य होत नाही असे दिसताच आपले अपयश लपवण्यासाठी थेट गांधींना बाजूला सारुन चरख्यावरच जाऊन बसले. या सर्व कृती राष्ट्रप्रमुख कसा नसावा याचेच उदाहरण आहे.

एखाद्या राष्ट्रप्रमुखाचे स्वतःच्या इतके प्रेमात रममाण होणे हे त्या देशासाठी अतिशय घातक ठरु शकते; लोकशाहीसारख्या प्रणालीलासुद्धा हुकूमशाहीकडे नेण्याइतपत धोकादायक ठरू शकते. आपण देशाचे प्रमुख आहोत आणि आपण निवडणुकांत दिलेल्या आश्वासनांवर देशाच्या प्रगतीसाठी देशतील तरुणाईने आपल्याला निवडून दिले आहे याचा मोदींना विसर पडतो आहे.

देशाला ‘अच्छे दिन’ दाखण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. मात्र राष्ट्रपित्यालाच बाजूला सारावे?ज्यांना आपण आदर्श मानतो, समस्त जग ज्यांच्याकडे खर्‍या अर्थाने महात्मा म्हणून पाहते त्यांना बाजूला सारुन ‘अच्छे दिन’ येणार आहेत? आपण कोणते उदाहरण लोकांसमोर ठेवतो आहे याची जाणीव कदाचित मोदींना नाही. हे पचण्यासारखे आणि स्विकारण्यासारखे खचितच नाही. म्हणूनच, या अपमानाचा निषेध म्हणून खादी ग्रामोद्योग विभागातील कर्मचार्‍यांनी काळी फित लावून काम केले. आपली नोकरी धोक्यात आहे याचे भान असतानादेखील त्यांनी ही कृती केली. हे गांधी विचारांचे बळ मोदींनी लक्षात घ्यावे.

प्रत्येक व्यक्तीला आपण प्रसिद्ध व्हावे, आपली स्तुती व्हावी असे वाटणे स्वाभाविक आहे. पण त्या नादात देशभक्तीचा उन्माद निर्माण करत असताना राष्ट्राच्या प्रतिकांपेक्षा आपण मोठे आहोत इथपर्यंत आपली समज जाणे म्हणजे ‘टाळूवरचे लोणी खाणे’ नव्हे तर काय आहे?

खरे पाहता, चरख्यावरील गांधींची जागा घेण्याऐवजी ‘स्वदेशी खादी ते दूरदेशी खादी’ असे जागतिकीकरणाला शोभेल असे बहुराष्ट्रीयत्व प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न झाला असता तर ते अधिक शोभून दिसले असते. त्यासाठी आवश्यक असलेली दूरदृष्टी, हवामानाप्रमाणे तंत्रज्ञानात्मक बदल करुन युरोप व अमेरिकेत जीन्सच्या कापडाला आव्हान देऊ शकण्याची क्षमता तंत्रज्ञानात्मक बदल करुन त्यानुरुप खादीद्वारे युरोप व अमेरिकेतील मोठी बाजारपेठ कशी मिळवता येईल असा जर प्रयत्न केला असता तर स्वात्रंत्र्यलढ्यात ज्या पद्धतीने या चरख्याने प्रगत तंत्रज्ञानाला आव्हान देऊन भारतातील खेड्यांमधून जी आर्थिक स्वयत्ता व स्वावलंबन निर्माण केले होते त्याची पुढची कडी ठरुन गांधींच्या आर्थिक विचारांना चालना देण्याचे काम ठरले असते. आज जगामध्ये जागतिकीकरणाचे चक्र उलटे फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेसारखा बलाढ्य, पूंजीवादी देश संरक्षणात्मक (इकॉनॉमिक प्रोटेक्शनिझम) मुद्दा पुढे करुन समग्र जागतिक अर्थव्यवस्थेची चक्रे उलट फ्रवण्याचा प्रयत्न करतो आहे की काय अशी शंका जागतिक अर्थतज्‍ज्ञांना यायला लागली आहे. अशा परिस्थितीत, शांतता, अहिंस व परस्पर सहयोगातून विकास हे बुद्ध, महावीर व गांधी यांनी दिलेली तत्त्वे जागतिक शांती निर्माण करुन जगामध्ये स्थैर्य प्राप्त करुन देऊ शकले असते; ज्यामुळे श्रीमंत व गरीब यामध्ये वाढत चाललेली दरी, दहशतवाद अशा मुद्द्यांना उत्तर शोधण्यासाठी जग भारताकडे मोठ्या आशेने बघत असताना, मोदींनी स्वप्रतिमेच्या प्रतिमेतून बाहेर पडून हा ठेवा जगाला पुढे नेण्याच्या अनुषंगाने विचार केला असता तर ते अधिक सयुक्तिक ठरले असते. न पेक्षा किमान टीकेचे धनी तरी व्हावे लागल नसते.

अतुल लोंढे

( लेखक काँग्रेसचे नेते आहेत )

Updated : 28 Jan 2017 10:09 AM GMT
Next Story
Share it
Top