मी मराठी (?)

२७ फेब्रुवरीला ‘मराठी दिनाच्या’ सगळ्यांकडून व्हॉट्सपला भरभरून शुभेच्या मिळाल्या. पण खरंच आज येत का हो कुणाला शास्त्रशुद्ध मराठी बोलायला? तसे बरेच किस्से आठवतात आज मला. २०१४ मधला ऑक्टोबर असेल कदाचित. मी तेव्हा एका कॉम्पुटर इन्स्टीटूटमध्ये टॅली, एम.एस.सी.आई.टी., बी.एफ.एस.आई.चे वर्ग घ्यायची. अर्थात इन्क्वायरी, अॅडमिशन ह्याही गोष्टी होत्या हातात. एक गृहस्थ इन्क्वायरीसाठी आले. विरळ केस, उंच, डोळ्याला चष्मा, जुनाट प्लेन शर्ट-पॅन्ट, पायात बूट, वय असेल सुमार ३५. पण स्वारी सायकलवर स्वार होती. रहाणीमान तसं टापटीप दिसत होतं. पाहून वाटलं हे गृहस्थ आपल्या मुलाच्या अॅडमिशन करता आले असावेत. बूट केबिनच्या बाहेर काढून ठेवत गृहस्थांनी विचारलं, ”मी आत येऊ शकतो का?”

“हो. यांना सर, बसा.” मी म्हणाले,

“मला संगणकाच्या अभ्यासक्रमाविषयी थोडी माहिती हवी होती परंतु त्याआधी कृपया तुमचे हे वातानुकुलीत यंत्र बंद कराल का?” गृहस्थ म्हणाले.

दोन मिनिटे विचार केल्यावर मी एसी बंद केला आणि विचारलं. ”कुणाला कॉम्पुटर कोर्स करायचा आहे?”

“मला. टॅली ह्या संगणकातील अभ्यासक्रमाबद्दल माहिती हवी आहे.” गृहस्थ म्हणाले

“तुमचे शिक्षण की झाले आहे?” माझा प्रश्न.

“मी वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.” गृहस्थांचे उत्तर.

“कुठे काम करता तुम्ही?” मी म्हणाले,

“मी इमारत बांधणाऱ्या माणसाच्या कार्यालयात लेखापाल आहे.” गृहस्थ म्हणाले,

मी त्यांना कोर्स बद्दलचा सगळा तपशील म्हणजेच फी, सिलॅबस, व्यवस्थित समजावून सांगितला. अर्थात कॉकटेल मराठीतूनच, पण त्यांना तो कळला.

पुढे गृहस्थ म्हणाले “मला आजच प्रवेश घ्यायचा आहे. पण मला रोख रक्कम देता येणार नाही. तुम्ही धनादेश स्वीकारालं का? आमच्या कार्यालयात माझ्या वरिष्ठांना मला तसा सबळ पुरावा द्यावा लागेल. तरच आमचे वरिष्ठ मला अभ्यासक्रमाचे शुल्क परत करतील.”

“नाही, आम्ही चेक घेत नाही.” थोडासा विचार करत मी म्हणाले.

“मग मला रोख रक्कम भरल्याची पावती मिळेल का?” गृहस्थांची शंका.

“हो ते आम्ही देणारच. मग आता फॉर्म भरुया.” माझं उत्तर

“हो” गृहस्थ.

“तुमचा मोबाईल नंबर?” माझा प्रश्न

“मी भ्रमणध्वनी वापरत नाही. घरी आहे पत्नीकडे, तो नंबर देऊ का?” गृहस्थांचं अनपेक्षित उत्तर.

“हो द्या “ मी मान हलवत सांगितलं.

“आठ नऊ सात पूज्य पूज्य पाच पूज्य दोन तीन पूज्य.” गृहस्थ.

“कृपया तुम्हीच फॉम भराल का? म्हणजे की स्पेलिंग मिस्टेक होणार नाही.” माझी विनंती.

गृहस्थांनी फॉम भरला आणि तोही चक्क इंग्रजीमध्ये. कुतूहलाने मी विचारलं “तुम्ही एम. कॉम. कुठल्या युनिवार्सीटीतून केले आहे.”

“मुंबई विद्यापीठातून. सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद! निघतो आता उशीर होईल आणि मग वरिष्ठ रागावतील. उद्या किती वाजता यायचं आहे शिकवणीला. माझा सकाळी आठ ते साडे नऊ हा वेळ रिकामा असतो. दहा वाजता मला कार्यालयात हजार राहावे लागते.” गृहस्थ म्हणाले

“ठीक आहे. तुम्ही या तुमच्या सवडीनुसार. मीच शिकवणार आहे तुम्हाला.” मी म्हणाले.

गृहस्थ गेले. जीवात जीव आला. पण उद्यापासून कोण कोणाला शिकवणार ह्यावर मोठं प्रश्न चिन्ह होतं.

नेहमीप्रमाणे वॉचमन शटर उघडत होता, तेवढ्यात सायकलवरून स्वारी आली. मी वॉचमनशी बोलत असताना पाठून आवाज आला “शुभ प्रभात सौ. निकम”,

“शुभप्रभात” मी म्हणाले,

“हे या व्यवस्थापनेचे पहारेकरी का?” गृहस्थ म्हणाले,

“हो. आत या. लेक्चर स्टार्ट करूया” मी म्हणाले,

“सौ. निकम हा संगणक चालू नाही. ह्याची विद्युत कळ कुठे आहे?” गृहस्थ म्हणाले,

मी पीसी चालू करून दिला. मात्र सगळे विद्यार्थी त्या गृहस्थाकडे बघत होते. तेवढ्यात पुन्हा समोरून गृहस्थांची रिक्वेस्ट “सौ. निकम कृपया तुमचा वर्गातील वातानुकुलीत यंत्र बंद करणार का? ”मी एसी बंद केला आणि म्हणाले” आज आपण थेअरी करूया, मग चार दिवसांनी सॉफ्टवेअरकडे वळू. तुम्ही नोटबुक वगैरे काही आणले आहे का?”

“हो मी वही, खोडरबर, निळ्याशाहीची लेखणी सगळं आणलं आहे.” गृहस्थांनी असे बोलता बोलता बॅगमधून कंम्पॉस काढला. थोडसं रिफ्रेशमेंट म्हणून मी विचारलं, ”तुम्ही कसे येता जुईनगरवरून सिवूड्सला?”

“माझ्या दुचाकीने. मला इंधन वाया घालायला आवडत नाही” गृहस्थ म्हणाले,

“कोण कोण असते तुमच्या घरी?” मी विचारलं

मी, माझी पत्नी, माझा मुलगा, माझे आई-वडील आणि इतर नातेवाईक” गृहस्थांचं उत्तर.

तेवढ्यात आमच्या कोऑर्डीनेटर वर्गात आल्या आणि मला विचारलं ”विदया मॅडम, बाहेर शूज कोणाचे आहेत?”

गृहस्थ मध्येच बोलले “ही वहाने माझी आहेत. सकाळपासून पायात घातल्यामुळे दुर्गंध येतो. तात्पर्य मला ते बाहेर काढणेच योग्य वाटले. तरीही माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमस्व. आज्ञा असेल तर एक विचारू का बाईसाहेब?” को-ऑरडीनेटर माझ्याकडे बघतच राहिल्या.

गृहस्थ पुढे म्हणाले ”समोरील वृक्षाबद्दल तुम्हाला काही माहित आहे का? हे फक्त प्रदर्शनार्थ वृक्ष नसून हे औषधासाठी खूप उपयोगी वृक्ष आहे” बघता बघता गृहस्थांनी त्या झाडाबद्दल सगळी माहिती आम्हाला सांगितली.

दिवस असेच चालले होते. गृहस्थांचे नाव “मराठी माणूस” असे पडले होते. ‘जुदाई’ मधल्या परेश रावलला बघून जसे सगळे पळायचे, तसे ‘मराठी माणसाला’ बघून क्लासचे विद्यार्थी, वॉचमन, टीचर्स आणि इतर स्टाफ पळू लागले. मी मात्र बी. कॉम.चा सगळा आभ्यासक्रम सहा महिन्यात मराठीतून पुन्हा शिकले. ’मराठी माणसामुळे’ माझी मराठी डिक्श्नरी वाढतच गेली. डेबिट-क्रेडीट (धन-ऋण), सॅलेरी (वेतन), डेप्रिसिएशन (घट) असे अनेक शब्द मात्र वाढतच गेले.

असाच एकदा रेशन कार्ड ऑफिसला गेले होते. गुजराथमधील रेशन कार्डातील नाव कमी केलेले सर्टीफीकेट माझ्याकडे होते. इथल्या रेशन कार्डवर हे नाव अँड करायचे होते. ऑफिसरने सांगितले की, हे सर्टीफीकेट तुम्ही मराठीतून अनुवादित करून आणि मग वकिलाकडून अटिस्टेड करून आणा. अख्खं मार्केट फिरले पण गुजराथी काही कोणाला मराठीतून टाईप करता येईना. शेवटी एक डी.टी.पी. ऑपरेटर म्हणाला, तुम्हाला ट्रांसलेट करता येत असेल तर सांगा, मी टाईप करेन. मी सांगितल्याप्रमाणे त्याने टाईप केले आणि लीगल पेपरवर प्रिंट दिली. मी विचारले “कित्ती पैसे झाले भाऊ?”

“ तीनशे रुपये”

“ इतके! सगळतर मीच ट्रांसलेट केल..”

“हाच रेट आहे इथे.” तो म्हणाला. मी गप्प पैसे दिले आणि विचारलं,” अटिस्टेड करून हवंय”

तो म्हणाला, “बाजूच्या गल्लीत वकील आहेत त्यांच्याकडून करून घ्या.” वकील सापडला. मग त्यांच्याकडून २० रुपयात अटिस्टेड करून घेतलं. मग सरळ मी रेशनिंग ऑफिसला गेले सगळं घेऊन. आँफिसर बोलले “ताई एका कागदावर तुम्ही तुमच्या हस्ताक्षराने जरी अनुवादित करून दिले असते तरी चालाल असत. ”म्हणजेच ह्या सगळ्या गोंधळात मी “अनुवाद” ह्या शब्दाचा अर्थ “ट्रांसलेट” असा होतो हे पूर्णता विसरलेले. रेशानिंग ऑफिसच्या बाहेर मात्र अजूनही भरपूर लोक मराठीतून फॉर्म भरून घेण्याकरता पैसे देत होते. आज महाराष्ट्रात जास्तीत जास्त सरकारी कामे मराठीतूनच होतात. एवढंच काय एम.पी.एस.सी.चा पेपर सुद्धा मराठीतूनच असतो. मग असे का होते? मराठी माध्यमातून शिकणारी आम्ही पोंर अभिमानानं इंग्रजी भाषेला आपलंस करतो. पण मग इंग्रजी भाषेत शिकणारी आमचीच पोरं मराठी विषयात फक्त पास ही होऊ शकत नाही? परप्रांतीयांची भाषा येत असल्याचा अभिमान तर हवाच, पण मग मायबोलीचा स्वाभिमान जपू नये का आपण? आज मराठी भाषेचं फ्युजन केलं आहे आपण. इंग्रजी शाळेकडून, समाजाकडून, परप्रांतीयांकडून, टी.व्ही.वरून “गुड माँर्नीग”, “हाय”, “हँलो”, “माँम”, “डँड” हे तर मुलं शिकातीलच. पण “शुभ प्रभात”, “नमस्कार”, “आई-बाबा” हे फक्त “मायच” शिकवू शकते.

विदया निकम कुवळेकर

Updated : 10 March 2017 6:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top