Home > मॅक्स ब्लॉग्ज > महायुद्धाला तोंड फुटणार?

महायुद्धाला तोंड फुटणार?

महायुद्धाला तोंड फुटणार?
X

उत्तर कोरियाच्या अणुचाचण्यांनी जगाला हदरवून सोडलंय. उत्तर कोरिया आता तिसऱ्या महायुद्धाला तोंड फोडणार असं चित्र आहे. जपान आणि दक्षिण कोरियानं मोठ्या राष्ट्रांकडे मदतीचं आवाहन केलंय. या सर्व प्रकारात चीनची देखील डोकेदुखी वाढलीय. परिसरातील सर्वात जुना भागिदारच हाता बाहेर गेल्याची चिन्हं चीनला अस्वस्थ करत आहे. त्याच बरोबर बेजिंग आता उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आलं असल्यानं चीनची झोपच उडाली आहे. उत्तर कोरियाला रोखण्यात चीन पुढाकार घेईल का, की अमेरिका आपल्या स्फोटक वक्तव्याच्या माध्यमातून जगावर युद्ध लादेल?

चीन व उत्तर कोरियाची मैत्री सर्वश्रुत आहे. अनेक वर्षांपासून चीननं उत्तर कोरियाला आपल्या पंखांखाली आश्रय दिलाय. या दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या व्यापाराच्या माध्यमातून उत्तर कोरियाला बरीच आर्थिक मदत मिळत गेली. अलिकडच्या काळात उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम यांनी मात्र स्वतंत्र चूल थाटली आहे. ते कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. चीननं वारंवार समजावल्यानंतरही त्यांच्या चाचण्यांच्या वेळापत्रकात बदल झाला नाही. परिणामी चीन धास्तावला.

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रचाचण्यांमध्ये अधुनिक हायड्रोजन बॉम्ब चाचणीचा समावेश होता. या चाचणीनंतर अनेक राष्ट्रांचं धाबं दणाणलं. ही चाचणी होण्यापूर्वीच चीननं उत्तर कोरियाला नमवण्याकरिता व्यापारी निर्बंध लादले होते. उत्तर कोरियातून होणारी कोळशाची आयात चीननं थांबवली. या आयातीच्या माध्यमातून उत्तर कोरियाला चांगला महसूल प्राप्त होत होता. ते बंद झाल्यानंतर उत्तर कोरियाच्या वागणुकीत बदल होईल, अशी चीनला अशा होती. मात्र तसं काहीच झालं नाही. उलटपक्षी उत्तर कोरियानं हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली. यामुळे उत्तर कोरियाला रोखावं कसं, हा प्रश्न सर्वच राष्ट्रांना पडला आहे.

उत्तर कोरियाचं नेमकं काय बिनसलंय? ही परिस्थिती हाताबाहेर जाण्यास कारणीभूत कोण आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. उत्तर कोरियाची वर्तणूक चुकीची आहे. किम जगाला चिथवण्याचं काम करत आहेत. या चिथवण्यामुळे युद्धाची ठिणगी पडल्यास संपूर्ण जगाचा कोळसा होण्यास वेळ लागणार नाही. सर्वांच्या नजरा आता चीनकडे लागल्या आहेत. चीनच उत्तर कोरियावर दबाव टाकून या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो असा पाश्चात्य देशांचा समज झाला आहे.

चीनला देखील आपला शेजारीच आपल्या जिवावर उठला असल्याच्या परिस्थितीला सामारं जावं लागत आहे. ब्रिक्स परिषदेपूर्वी हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेऊन चीनला त्यांनी बुचकळ्यात पाडलं आहे. चीन उत्तर कोरियाला तीन मार्गानं रोखू शकतो. सर्वप्रथम कपड्यांच्या निर्यातीवर बंदी आणता येईल. सध्या कपड्यांच्या निर्यातीवर बंदी नाहीय. उत्तर कोरियाला या कापड निर्यातीच्या माध्यमातून महसूल मिळत आहे. दुसरी बाब म्हणजे चीनला त्यांच्या कामगारवर्गावर बंधनं लादता येतील. सध्या अनेक कामगार परदेशात रोजगाराकरिता जातात. या कामगारांवर बंदी आणल्यास कोरिया गुडघे टेकेल अशी अपेक्षा आहे.

तिसरा आणि सर्वात जास्त परिणामकारक म्हणजे उत्तर कोरियाचा इंधनपुरवठा बंद करणे. इंधनपुरवठा बंद केल्यास संपूर्ण उत्तर कोरियावर कुऱ्हाड कोसळेल. त्यांना शरण येण्याशिवाय मार्गच शिल्लक राहाणार नाही. पण चीनच्या अंतर्गत राजकारणामुळे शी जिनपिंग यांना तेलपुरवठा बंद करण्याचं पाऊल उचलता येणार नाही हेही तितकंच खरं आहे.

प्रादेशिक शांतता भंग होत असल्यानं चीन सध्या दक्षिण कोरिया आणि जपानला उपदेश देणं पसंत करेल पण उत्तर कोरियाच्या वाट्याला तो फारसा जाईल असं वाटत नाही. या संबंधी पावलं उचलण्यास चीननं सुरुवात केली देखील आहे. ‘दक्षिण कोरिया आणि अमेरिकेनं थाड क्षेपणास्त्र तैनात करून परिस्थिती अधिक प्रमाणात चिघळवू नये’ असं आवाहन केलंय.

दरम्यान अमेरिका देखील आपली हेकेखोर वृत्ती सोडण्यास तयार नाहीय. उत्तर कोरियाला रोखण्याकरिता मर्यादित युद्धाची आश्यकता भासल्यास आपण तसं पाऊल उचलू असं विधान अमेरिकेनं केलंय. बहुधा रिपब्लिकन पक्षाच्या रक्तात युद्ध असावं. रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी २१व्या शतकाच्या पहिल्या दशकात इराक युद्ध करून आपला इगो शांत केला.

इराणबरोबरही युद्ध करण्याची त्यांची तेव्हा तयारी होती. रिपब्लिकन पक्षातील काही तज्ज्ञ इराण युद्धाबाबत विधानंही करीत होते. २००८च्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा विजय झाला असता तर अमेरिकेनं इराणमध्येही युद्ध केलं असतं असं आता वाटू लागलंय. त्याचप्रमाणे आता अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील युद्धाच्या माध्यमातून पुन्हा अमेरिकेची दहशत विस्तारण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत आहे.

उत्तर कोरियाला युद्ध करायचं आहे, असा समज अमेरिकेनंच करुन घेतल्याचं दिसत आहे. प्रथम आपल्या चिथावणीखोर विधानांनी एखाद्या राष्ट्राला डिवचायचं आणि नंतर त्यानं प्रत्युत्तर दिलं की त्या राष्ट्राच्या नेतृत्वाविरोधात “बॅड बॉय” असा कांगावा करायचा ही अमेरिकेची जुनी सवयच आहे. पण यामुळे उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम अगदी चांगले आहेत असा समज करून घेणं हे देखील चुकीचं ठरेल. उत्तर कोरियाच्या अभ्यासकांपैकी कोणीच युद्ध अटळ आहे, असं विधान कोरियाच्या चाचण्यानंतर केलं नाहीय.

बेजबाबदार विधानांनी अमेरिका आपलं मूढयत्न सिद्ध करत आहे काय असं वाटू लागलंय. उत्तर कोरिया आजमितीस अप्रतिबंधित धोका आहे हे मान्य करून पुढे चालावं लागणार आहे. त्याकरिता दबाव, निर्बंधांच्या माध्यमातून फारसं काही साधता येईल अशी स्थिती दिसत नाही. राजकीय आणि डिप्लोमॅटिक स्तरावर चर्चा करून शांतता प्रस्थापित करता येऊ शकते. संयुक्त राष्ट्रांत मतदान घेऊन उत्तर कोरियाला एकटं पाडणंही योग्य ठरणार नाही. त्या देशावर अनेक निर्बंध आहेत अशात आणखी निर्बंध घालून फार काही साधता येऊ शकणार नाही. उलटपक्षी त्यांना चर्चेत गुंतवल्यास काही तोडगा निघू शकेल.

या संदर्भात चर्चा करताना एका प्रश्न मात्र पडतो तो असा की, पाकिस्तानसारख्या धर्मांध, जिहादनं पोखरलेल्या राष्ट्राकडे असलेल्या अण्वस्त्रांबाबत वाच्यता होत नाही. त्या राष्ट्रात आजपर्यंत कुठल्याही प्रकारची समाजव्यवस्था– लोकशाही किंवा हुकुमशाही – कायम राहू शकलेली नाही. अशा राष्ट्राच्या हातातली अण्वस्त्रं अमेरिकेला सलत नाही. त्यांच्याशी चर्चेच्या माध्यमातून तो प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली जात. त्याचबरोबर लाखो डॉलरची मदतही पाकिस्तानला दिली जाते. हा दुटप्पीपणा का? केवळ पाकिस्तान अमेरिकेचा हुजरा आहे म्हणून?

-कौस्तुभ कुलकर्णी

Updated : 8 Sep 2017 10:16 AM GMT
Next Story
Share it
Top