Home > मॅक्स ब्लॉग्ज > ‘मरा’ठवाड्यात फडणवीशी दुकानदारी ?

‘मरा’ठवाड्यात फडणवीशी दुकानदारी ?

‘मरा’ठवाड्यात फडणवीशी दुकानदारी ?
X

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पत्रकारांच्या बातमीदारीला पत्रकारांचे दुकान असे जाहीर सभेत संबोधून त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. त्यांनी उच्चारलेला हा शब्द खरे तर पत्रकारांसाठी शिवीपेक्षा वाईट आहे. कारण पत्रकार हा बातमी करीत असतो ते त्याचे काम आहे. विशेषतः पांढ-या कापडावरील काळा ठिपका उठून दिसतो किंवा तोच आधी पाहण्याची सामाजिक प्रवृत्ती आहे. देवेंद्रजी, पत्रकारही याच समाजाच्या भाग आहे. तुमच्या हजारी सभेला किती आणि कसे लोक होते. त्यांनी किती शांतचित्ताने सभा ऐकली यापेक्षा तुम्हाला म्हणजे प्रस्तुत व्यवस्थेला विरोध करण्याचे धाडस कुणी दाखवले, याची बातमी केली तर पत्रकारांना दुकानदार ठरवण्याचे तुमचे कसब आणि मनोवृत्ती कोणत्या पठडीतली आहे हे स्पष्ट होते. देशात मोदी सरकार आल्यापासून पत्रकारांची गळचेपी होते आहे, अशा प्रकारची चर्चा आणि दबक्या आवाजातील नाराजी समस्त पत्रकारांमध्ये( अगदी मोदीभक्तांच्या वर्तुळातील माध्यमांमध्येही) रंगली आहे.

एनडीटीव्ही सारख्या चॅनेलवर एक दिवसाची बंदी आणण्यापासून विरोधात लिहीणा-या आणि बोलणा-या पत्रकारांना कसे निशस्त्र करायचे. त्यांच्या मालकांना कसे कोंडीत पकडायचे किंवा मांडलिक बनवायचे ही अगाध शैली आपण आणि आपल्या पक्षाने अंगिकारली आहेच. त्यामुळे रास्ता रोकोला किती लोक होते, रेल रोकोला किती लोक होते. सरकारविरोधातील आंदोलनाला किती लोक होते, या तुमच्या सांख्यिकी प्रश्नांनी त्या आंदोलनाचा उद्देश आणि तीव्रता कमी होत नाही. उलट आंदोलने कशी मॅनेज करायची हे तुमच्या पक्षाइतके अऩ्य कुठल्या पक्षाला जमेल अथवा जमवताना आम्ही पाहिलेले नाही. आपला पक्ष सत्तेवर नसताना आपले मुंबईतील एक जेष्ठ ( घोटाळा संशोधक फेम) नेते कशी आंदोलने करायची त्याला किती लोक असायचे आणि तरीही पत्रकार इमाने इतबारे त्या बातम्या कसे दाखवायचे हे आपण सोयीस्करपणे विसरलेले दिसता आहात.

पेट्ोल महागाईविरोधात आंदोलन करताना आपल्या मुंबईतील पक्ष कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हिंदुस्तान पेट्ोलियमच्या कार्यालयावरही आपण मोर्चा नेला नाहीत. अगदी आपल्या पक्षाच्या कार्यालयासमोरच दोन चार घोषणांनंतर आपले चार कार्यकर्ते कसे स्वतःहून पोलीसांच्या गाडीत बसले, तर हे नेते पोलिसांना विनंती करून ‘मला खेचून न्या’, कसे म्हणाले, याचे आम्ही साक्षीदार आहोत. तरीही याच कॅमे-यावाल्यांनी कशी जोरदार बातमी दिली होती ते आपण कदाचित विसरला असाल, असो. देवेंद्रजी हा केवळ एक दाखला असे अनेक प्रसंग आम्ही पाहिले आहेत, इतकेच काय हातात कोरे कागद घेवून ते सभागृहात फडकावून विरोधकांच्या भ्रष्टाचाराचे हे घ्या पुरावे म्हणून ओरडताना सर्व माध्यमांनी ( कॅमे-यावाल्यांनी) पाहूनही आपण कसे जोरदार आक्रमकपणे विरोधकांवर तुटून पडला असे याच कथित दुकानदारांनी बातम्या दिल्याचेही कदाचित आपल्याला स्मरण नसेल.

आता जरा ख-या दुकानदारीकडे येवू, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील औरंगाबाद येथे सुप्रसिद्ध नवोदित गायिका अमृता फडणवीस यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे पासेस चक्क एकावन्न हजार रूपयांना विकले गेले. बरं किती पासेसची विक्री झाली तर दिड हजार.. मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या वाट्याला शेतकरी कर्जमाफीतही इतके पैसै आले नसतील एवढे म्हणजे तब्बल सात कोटी 65 लाख रूपये एका दिवसांत या कार्यक्रमाला जमा झाले. वाह ! काय फडणवीशी दुकान आहे. शेतक-यांच्या आत्महत्यांमुळे मराठवाड्याचा गेल्या काही वर्षांत ‘’मरा’’ठवाडा झाला आहे. कापसाचे चुकारे मिळवताना शेतक-याच्या नाकीनऊ येताहेत. सोयाबीन आणि तूर शेतक-यांच्या घरात धूर काढीत असताना त्यांच्या टाळूवरच हा कार्यक्रम झाला.

कापसाला आणि सोयाबीनला भाव नाही म्हणून शेतकरी मरत असताना केवळ दोन तासांच्या कार्यक्रमासाठी एकावन्न हजार रूपये मोजले जातात ही शेतक-यांची क्रुर थट्टा वाटत नाही का ? हा कार्यक्रम पोलीसांच्या कल्याणासाठी आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी आयोजित करण्यात आला होता. उद्देश नक्कीच चांगला होता. पण या कार्यक्रमाचे देणगी पासेस कुणी घेतले याची यादी सरकार प्रसिद्ध करणार का, वीस हजार रूपयांपेक्षा जास्त देणगीमूल्य देणा-या देणगीदारांचे पॅन कार्ड आणि आधारकार्ड तपासले का ? वीस हजार रूपयांपेक्षा जास्त देणगीमूल्य रोखीच्या स्वरूपात पोलिसांनी स्विकारले का ? स्वीकारले असेल तर पोलीसांनी सरकारच्या कॅशलेसच्या उद्देशाला हरताळ फासला का ? हे देणगीमूल्य देणा-या देणगीदारांची पार्श्वभूमी (दुकानं) गुन्हेगारी स्वरूपाची नाही ना हे तपासले आहे का? या साध्या आणि ढोबळ मानाने निर्माण होणा-या प्रश्नांची उत्तरे हे पारदर्शक आणि राखठोक सरकार देणार आहे का? की ही दुकानदारी या सरकारला अभिप्रेत आणि अपेक्षीतच आहे. तसंच अशा दुकानदारांना अभय आणि प्रोत्साहन देण्यातच हे सरकार धन्यता मानणार आहे का ?

Updated : 17 Aug 2017 1:57 PM GMT
Next Story
Share it
Top