Home > मॅक्स ब्लॉग्ज > मतदान, एक सामुदायिक उन्माद...!

मतदान, एक सामुदायिक उन्माद...!

मतदान, एक सामुदायिक उन्माद...!
X

काल मतदान संपलं. शेवटच्या दोन दिवसात मतदान करा हे आवाहन, विनोद, आग्रह, अट्टाहास आणि काही वेळेला धमकीसुद्धा देणारे फेसबुक पोस्ट्स, व्हाट्सअँप फॉर्वर्डस यांना ऊत आलेला होता. मतदान नावाचा 'हक्क' ही कशी तुमची 'जबाबदारी' आहे (!), ते प्रत्येकजण एकमेकांना प्रेमाने दरडावून सांगत होता. मतदान न करणं हा मर्डर करण्यापेक्षा गंभीर गुन्हा आहे याची सगळ्यांना खात्री पातळी होती आणि ते बाकी सगळ्यांना मोठ्या उच्चारवात सांगितलं जात होतं. या सगळ्या जल्लोषाची उत्तरपूजा मग काळपट बोटाचे फोटो नाचवत एका तृप्त नैतिक ढेकरेने बहुतेकांनी बांधली...!

अर्थात या सगळ्या 'मत द्या, समाज बदला'च्या झुंड उन्मादात एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष झालंय. मतदान ही लोकशाहीत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, मान्य...! पण एकच महत्त्वाची गोष्ट नाही, कदाचित सर्वात महत्त्वाचीही नाही. लोकशाहीच्या प्रक्रियेचा निर्णायक टप्पा हा मतदान आहे. पण त्या प्रक्रियेत इतर अनेक टप्पे आणि जबाबदाऱ्या येतात. त्या न पार पाडता जर आपण थेट मतदानाचा अट्टाहास बाळगायला लागलो, तर त्यातून घडणारा बदल उलट नकारात्मकही असू शकतो आणि याचीच आपल्या बहुतेकांना जाणीव उरलेली नाही. भूकंप/पूर वगैरेंच्या वेळी दानधर्म करायला निघालेल्या मध्यमवर्गीयाला जसं घरचे जुने कपडे दान केले कि आपत्तीचा सामनाच जणू आपण यशस्वीपणे केलाय असं वाटायला लागतं तसं दिवसभर सुट्टी असताना अर्धा तास रांगेत राहून बोटावर काळी शाई फासली कि जणू आपण क्रान्तीचे शिलेदार आहोत म्हणून पाठ थोपटायला आपण मोकळे होऊन जातो. ही एक अगदी सोप्पी गोष्ट पार पाडली कि सीमेच्या संरक्षणापासून ते रस्त्यातल्या खड्ड्यांपर्यंत सग्गळ्या समस्या आपणच सोडवल्या अश्या आविर्भावात आपण ताठ मानेने फिरतो...!

मात्र समाज बदलातल्या इतर अनेक गोष्टीत आपला सहभाग खरंतर हवा आहे. कित्येकदा सरकारने उचललेल्या पावलात आपला सहभाग आणि सहकार्य लागतं. आपण काही कुठे निर्मनुष्य बेटावर राहात नाही. त्यामुळे आपल्या सोबत असणाऱ्या, तुलनेत थोडी कमी संधी मिळालेल्या, कमी संसाधन असलेल्या आपल्या इतर नागरिकांच्या अडचणीत सोडवताना आपला सहभाग मिळणं हे अर्थव्यवस्थेच्या वाढ आणि विकासासाठीसुद्धा अतिशय उपयुक्त आहे. राष्ट्र उभारणीच्या कामात कित्येकदा ज्यांच्याकडे बहुमताची ताकद नाही त्यांचंहि म्हणणं मोलाचं ठरतं. आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या सगळ्याच गोष्टींशी आपण सहमत व्हायची गरज नाही. किंबहुना सकारात्मक आणि प्रसंगी संघर्षात्मक विरोध ही देशाची गरजच असते. हे सगळं करण्यासाठी आपण किती ऊर्जा, वेळ आणि प्रत्यक्ष सहभाग देतो हा प्रश्नही समाजासाठी महत्त्वाचा आहे आणि कदाचित मतदानापेक्षा जास्त... आपल्या राजकीय वातावरणाबद्दलची जागृती ही मतदानाच्या दिवसाइतकीच आपल्याला उरलेली चार वर्ष आणि तीनशे चौसष्ठ दिवस महत्त्वाची आहे. सत्यासत्यता जाणून न घेता काही खोटेनाटे आणि द्वेषवादी मजकूर तर सोशल मीडियावर नेत नाही ना इथपासून ही जागृती दिसायला हवी.

'मतदान करत नसाल तर तुम्हाला तुमचे नागरी हक्कच नाहीत', असली लोकशाही मूल्यांची भयाण कुचेष्टा करणारे मात्र या सगळ्या प्रक्रियेपासून नामानिराळे असतात. ते एकतर नियमित सहभाग देण्याएव्हढे बांधील नसतात अगर मध्यमवर्गीयांची दिशाभूल या विशिष्ठ उद्देशातून ते हा पवित्र घेत असतात. "आता निवडून दिलंय ना सरकार आता काय टीका नको, ती मतदानाच्या दिवशीच करा", असला अत्यंत पक्षपाती आणि लोकशाहीचा खून पाडणारा पवित्रा ही लोकं शहाजोगपणे घेताना दिसतात. "मी निवडणुकीला उभा राहणार नाही आणि जे आहेत ते सगळे नालायक आहेत", असलं तद्दन नकारात्मक विधान 'नोटा'च्या माध्यमातून करण्यावर दुर्दैवाने मतदानाचे डोहाळे लागलेल्यांचाच विश्वास असतो. या सर्वातूनच मतदान हे प्रश्न सोडवण्याऐवजी नवे निर्माण करायला लागण्याची भीती असते.

मतदान हे आवश्यक आहे आणि ते करावं, त्याचा आग्रहही धरावा, पण पाच वर्षातून एकदा दाबलेलं बटण ही काही चिरकालिक अनास्थेची भरपाई असू शकत नाही. आपलं 'मत' अभ्यासपूर्ण, सकारात्मक, नियमित आणि निर्भयपणे मांडत राहणं, हे खरं 'मतदान' आहे...!!

Updated : 22 Feb 2017 2:19 PM GMT
Next Story
Share it
Top