Home > मॅक्स ब्लॉग्ज > भिडे गुरुजींचा राष्ट्रधर्म

भिडे गुरुजींचा राष्ट्रधर्म

भिडे गुरुजींचा राष्ट्रधर्म
X

भिडे गुरुजी गेले काही वर्ष “त्यांच्या” हिंदूधर्माचा म्हणजे चातुर्वण्यावर व विषमतेवर आधारलेल्या मनुवादी धर्माचा प्रचार व प्रसार करत असतात. व हाच धर्म या देशाचा राष्ट्रधर्म झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. ही त्यांची विचारसरणी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच (आर.एस.एसचीच) मूळ वैचारिक बैठक आहे, हे वेगळ सांगण्याची गरज नाही. किंबहुना ते आर.एस. एसचे प्रचारक आहेत, हे सिद्ध झालेले आहे. धर्मांध शक्ती मग त्या हिंदूधर्मातील आर.एस.एसवाले असोत व मुसलमान धर्मातील आय.एस.आयवाले असोत हे मूलतत्ववादी, पोथीनिष्ठ, परंपरानिष्ठ व सनातनी असतात व त्यांचे गुणधर्म सारखेच असतात. ते आपले बुद्धी बंद ठेवतात. वरिष्ठांचा आदेश हाच त्यांचा धर्म असतो व त्याप्रमाणे वागणे हेच त्यांच्या जिविताचे इतिकर्तव्य असते. स्वतंत्र विचार ही त्यांच्या दृष्टीने अनिष्ट आपत्ती असते. त्यांच्याबरोबर वादविवाद करणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे असते.

या देशात इतर अनेक धर्म आहेत व पारसी धर्मीय सोडले, तर इतर सर्व धर्मीय पूर्वीचे हिंदूच आहेत, याची त्यांना जाणीव नसते आणि असली तरी, इतर धर्मीय त्यांना अडगळ वाटतात. केवळ इतर धर्मीयच नव्हे, तर हिंदुधर्मातील उच्च वर्गीय सोडल्यास इतरांचीही त्यांना अडचण वाटते कारण त्यांचा एकमेव उद्देश या देशात हिंदुधर्माचे म्हणजे फक्त मनुवाद्यांचे राज्य आणणे हा आहे - या हेतू पोटीच ते जसा इतर धर्मियांविरुद्ध विषारी प्रचार करत असतात, तसाच हिंदू धर्मातील जाती जातीत एकमेकांविरुद्ध विद्वेष पसरवून फूट पाडत असतात. भीमा-कोरेगाव प्रकरणातील हिंसाचार हा त्याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. ही घटना घडवून आणण्यासाठी, ते गेले कित्येक दिवस राबत होते.

भिडेगुरुजींच्या अलिकडच्या या घटनेवरील वक्तव्यावरूनही ते स्पष्टपणे दिसून आले; त्यांना जेव्हा या देशातील जातीजातील व धर्माधर्मातील वैमनस्यबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर देण्याचे त्यांनी चातुर्याने टाळले व संतांच्या वचनांचा जप केला. संतवचने ही केवळ पाठ करण्याकरता नसतात. त्यातून पाठ घ्यायचा असतो.

भिडे यांना आम्हाला एकच विनंती करायची आहे. निदान या वयात तरी त्यांनी आपले धर्मांध व जात्यंध बाल विचार बदलून मानवतावादी प्रौढ विचारांची कांस धरावी. ते जे विचार आज पसरवित आहेत, ते देशविघातक आहेत. त्यांनीच आजवर या देशावर अनेक संकट आणली आहेत व देशाची फाळणीही घडवली आहे. ते ज्या देशावर प्रेम करताहेत, त्याच जर आणखी नुकसान व्हायच नसेल व त्याचा उत्कर्ष साधावयाचा असेल, तर त्यांनी आपल्या विचारात व कृतीत हा बदल जरूर घडवावा आम्ही अशी आमची त्यांना विनंती आहे ही विनंती करत असतांना आम्हाला याची जरूर जाणीव आहे की ते संघनिष्ठ विचारांच्या मुझीत तयार झाले असल्यामुळे, ती पालथ्या घागरीवरील पाणी ठरेल. तरीही देशकाऱ्यासाठी त्यांची झाल्यास मदत होईल, निदान या वयात तरी या आशेने, हा प्रपंच केला आहे.

Updated : 9 Jan 2018 10:37 AM GMT
Next Story
Share it
Top