Home > मॅक्स ब्लॉग्ज > फ्रान्सची लक्षवेधी निवडणूक

फ्रान्सची लक्षवेधी निवडणूक

फ्रान्सची लक्षवेधी निवडणूक
X

फ्रान्स मधील या वेळेच्या अध्यक्षीय निवडणुकिकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून होते. त्यामागचे मुख्य कारण इमॅन्युअल मॅक्रोन हे नव्हते तर मरिन ली पेन या होत्या . फ्रान्समध्ये पहिल्या फेरीत कोणत्याही उमेदवारास पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतदान न मिळाल्यास पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या उमेदवारांमध्ये दुसरी अंतिम फेरी होते. अतिउजव्या असणाऱ्या नॅशनल फ्रंट पक्षाच्या प्रमुख मरिन ली पेन यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला होता. 2002 नंतर प्रथमच अतिउजव्या पक्षाला असे यश मिळाले. (2002 मध्ये मरिन ली पेन च्या वडिलांनी असा दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला होता. पण जॅक शिराक यांनी त्यांचा पराभव केला होता) या यशाची पार्श्वभूमी पाहिल्यास या निवडणुकीचे महत्व लक्षात येते.

काय आहे हे ही पार्श्वभूमी ?

2008 च्या मंदीचा युरोपमधील अर्थव्यवस्थांना जोरदार फटका बसला. अजूनही युरोप त्यातुन पूर्णतः बाहेर पडलेला नाही. बेरोजगारीचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यात लिबियावरील हल्ला, सिरियातील अरिष्ट यामुळे या भागांमधून मोठ्या प्रमाणात निर्वासितांनी युरोपची वाट धरली. इसिस च्या दहशतवादी वाटेवर अनेक युरोपियन मुस्लिम धर्मीय नागरिक गेले/जात आहेत. दहशतवादी वादी हल्ले (लोन उल्फ प्रकारचे) वाढले आहेत. परिणामी जागतिकीकरणविषयक द्वेष, निर्वासितांचा द्वेष आणि इस्लामद्वेष युरोपभर पसरत गेला. या पार्श्वभूमीवर आक्रमक राष्ट्रवाद मांडणाऱ्या अतिउजव्या शक्तींना अवकाश मिळत गेले. दृश्यरूपात याचा पहिला परिणाम ब्रिटन च्या युरोपिअन युनियन मधून बाहेर पडण्याने (ब्रेक्झिट) दिसला. त्यामुळे इतर युरोपियन राष्ट्रांतील अतिउजव्या शक्तींचा आत्मविश्वास वाढला. त्यात फ्रान्स मध्ये आलटून पालटून अध्यक्षपद भूषविणाऱ्या प्रस्थापित सोशालिस्ट पार्टी आणि रिपब्लिकन पार्टीविषयी मतदारांमध्ये असंतोष होता. परिणामी मरीन ली पेन यांना राष्ट्राध्यक्ष होण्याची स्वप्नं पडू लागली. त्यांना राष्ट्राध्यक्ष झाल्यावर 'ब्रेक्झिट' प्रमाणे फ्रान्स ला 'युरोपियन युनियन' मध्ये बाहेर काढायचे होते. इस्लाम, निर्वासित , परदेशातुन फ्रान्स मध्ये स्थायिक झालेले नागरिक ( इमिग्रंट्स) यांचाविषयीचा द्वेष त्यांच्या नसानसात आहे. त्यांच्यामुळे फ्रान्स ची संस्कृती धोक्यात आली अशी पेन यांची धारणा आहे. त्यामुळे पेन निवडून आल्या असत्या तर फ्रान्स मधील 'उदारमतवादी लोकशाही ' धोक्यात आली असती.

दुसऱ्या बाजूला इमॅन्युअल मॅक्रोन होते. हे राजकारणात अगदीच नवखे. मागचे राष्ट्राध्यक्ष ओलांदे यांच्या मंत्रिमंडळात ते 2 वर्षे मंत्री होते. मागच्या वर्षीच त्यांनी पदाचा राजीनामा देऊन 'एन मार्च' हा पक्ष सुरू केला. 'मी सोशालिस्ट नाही' 'मी डावाही नाही आणि उजवाही नाही' अशी भूमिका घेत आपण प्रस्थापितांपैकी नाहीत हे त्यांना अधोरेखित करता आले. त्यांची एकूण भूमिका मात्र 'मध्यममार्गी'(सेन्ट्रीस्ट) प्रकारची आहे. युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्यास त्यांचा विरोध आहे. फ्रान्स च्या बहुसांस्कृतीकतेवर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच इस्लाम किंवा निर्वासित विषयक त्यांची भूमिका सौहार्दाची आहे. उत्तर आफ्रिकेतील 'अल्जेरिया' या देशावर फ्रान्स चे वसाहतवादी नियंत्रण होते. 'अल्जेरिया' ची फ्रान्स ने माफी मागायला हवी अशी भूमिका मॅक्रोन यांनी घेतली आहे.

त्यामुळे अंतिम फेरीतील दोन्ही उमेदवार हे प्रस्थापितविरोधी (अँटी-एस्टॅब्लिशमेन्ट)होते. दोघेही मुख्य प्रवाहातील राजकारणाला फटकून होते. दोघांच्या दृष्टिकोनात मात्र मूलभूत फरक होता. मतदारांनी मॅक्रोन यांना 66% मते देत फ्रान्स च्या उदारमतवादी(लिबरल) परंपरेला कौल दिला आहे. आता मॅक्रोन समोरील आव्हान सोपे नाही. एक तर नॅशनल असेम्बलीत त्यांच्या पक्षाला बहुमत मिळायला हवे.ते न मिळाल्यास त्यांना त्यांच्या धोरणांची मुक्तपणे अंमलबजावणी करता येणार नाही. दुसरीकडे दुसऱ्या फेरीत मरीन ली पेन यांना 34%( 11 दशलक्ष ) मते मिळाली आहेत. त्यांच्या वडिलांना 2002 मध्ये 18% मते मिळाली होती. यावरून अतिउजव्या शक्तींना मिळत असलेला वाढता पाठिंबा लक्षात यावा. हा वाढता पाठिंबा चिंताजनक आहे. त्यामुळे एका बाजूला या अतिउजव्या शक्ती आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक समस्या व वाढता इस्लामिक दहशतवाद यामधून मॅक्रोन यांना वाट काढावी लागेल.

Updated : 13 May 2017 1:57 PM GMT
Next Story
Share it
Top