Home > मॅक्स ब्लॉग्ज > फॉर्ब्सकडून यादीत पहिल्यांदाच गर्भश्रीमंतांची नोंद !

फॉर्ब्सकडून यादीत पहिल्यांदाच गर्भश्रीमंतांची नोंद !

फॉर्ब्सकडून यादीत पहिल्यांदाच गर्भश्रीमंतांची नोंद !
X

अंक पहिला :

कोणी कितीही म्हणो, नाटकात काम म्हणजे भिकारडी लक्षणे असा सत्तरीतला एक समज अजूनही जिवंत आहे.. नाटकात उतरणे म्हणजे कमी प्रतिष्ठा , चुकलेली आर्थिक गणित, विस्कटलेली प्रतिष्ठा या सगळ्या टीकेला दूर ठेवत पुन्हा तोंडाला रंग फासला जातो. नानासाहेबांच्या भाषेत फूटलाईटच्या प्रकाशात इंद्रधनुष्य अवतरते.. आणि सरकणाऱ्या मखमली पडद्याबरोबर समोरच्या प्रेक्षकाला एक भरजरीपण देते..मला वाटते या सगळ्या दिमाखाला आज नव्याने कर्टन कॉल आलाय. आणि आजची ही गोष्ट खूप मोठी आहे..

अंक दुसरा :

आमचे गाववाले मित्र प्रसाद मच्छिन्द्र कांबळी यांचे देवबाभळी नाटक रंगभूमीवर गाजतेय. या सौभाग्यश्रीमंतीला अवघ्या रसिकजनाने कुंकवाची बोटे उमटवून दाद दिली. पण याच भाळात आता अस्सल हळदीच्या कुंकूवासारखे सारखे भरजरी बनवलंय.. आणि याला निमित्त ठरलंय ते फॉर्ब्ज मासिकाने घेतलेली दखल !

आतापर्यंत तब्बल ३७ पुरस्कारांवर नाव कोरलेल्या 'संगीत देवभाबळी' या नाटकाच्या शिरपेचात हा अजून एक मानाचा तुरा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर 'फोर्ब्ज' या मासिकाच्या यादीत झळकण्याची संधी या नाटकाला मिळाली आहे. 'फोर्ब्ज' मासिक आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत शास्त्रीय पद्धतीने सर्वच क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती आणि गोष्टींची निवड करतात. त्यांच्या लिस्ट मध्ये नाव येणे हे खूप मानाचे समजले जाते. आणि जगात मराठी नाटकापेक्षा काहीच श्रीमंत नाही. आज फक्त देवबाभळीने श्रीमंत पंगत समृद्ध केलीय. विचार करा बालगंधर्वांच्या काळात नाटक पहिली असती तर फॉर्ब्ज मध्ये फक्त श्रीमंत मराठी नाटक अशीच दर महिन्याला यादी आली असती

मुळात आवली, रूकमाई आणि त्यांच्या अनुबंधातील संसारमाऊली या गोष्टी एवढ्या श्रीमंत होत्या की त्याची दखल फक्त फॉर्ब्ज घेऊ शकते..आणि कोणाकोणाची दखल घेतलीय या पेक्षा त्या यादीत प्रसाद, प्राजक्त आणि भद्रकालीचे देवबाभळी आहे हे महत्त्वाचे आहे.

पण या निमित्ताने एक वर्तुळ पूर्ण झालंय. ज्या बाबूजीनी लंडनला मालवणी बोलीचे नाटक आणि त्याची दखल तिकडच्या पेपरने घेतली होती म्हणे.. आज 360 अंशात प्रसादच्या नाटकाची दखल फॉर्ब्जने घेतलीय. रिबिनीचा पडदा ते संसार श्रीमंतीचा प्रासाद असा हा प्रवास आहे..

तिसरा अंक :

काही दिवसांपूर्वी प्रसाद तूच भांडत होतास ना, कॉर्पोरेटवाले आले आम्ही कसे व्यवसाय करणार ? बघ आता पडदा पडायची वेळ आलीय. फॉर्ब्ज मध्ये तुझे नाव आलय ना ? आता नक्की तुझे भांडण मिटले असेल ना.. असं असते नाटक राजा, असे असते नाटक राजा !!

भैरवी

ज्याच्या सुरुवात भद्रकाली या नावानं होते तिथे सर्वच सर्वमांगल्यमांगलेच होणार की.. प्रसाद तुझ्या वैभवशाली प्रवासाला शुभेच्छा !!

ऋषी देसाई

Updated : 27 Aug 2018 2:53 PM GMT
Next Story
Share it
Top