Home > मॅक्स ब्लॉग्ज > प्रशांत कांबळे...पत्रकारितेवर पोलिसांचा वरवंटा

प्रशांत कांबळे...पत्रकारितेवर पोलिसांचा वरवंटा

प्रशांत कांबळे...पत्रकारितेवर पोलिसांचा वरवंटा
X

तो पत्रकारितेत आला, सत्य शोधण्यासाठी, सत्य समाजापुढे मांडण्यासाठी... अतिशय उत्साही, बातमी काढण्यासाठी कायम धडपडणारा पत्रकार म्हणून त्याने अल्पावधीत ओळख निर्माण केली. मात्र तोच पत्रकार आज पोलीस स्टेशनच्या चार भिंतीमध्ये बंद आहे. मुख्य आरोपीच्या भूमिकेत पोलिसांनी त्याचा आवाज बंद केलाय. मुंबईतल्या सफाई कामगारांच्या समस्या संवेदनशिलपणे मांडल्यामुळे याच युवा पत्रकाराला मुख्यमंत्र्यांच्या हातून राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता.. तोच प्रशांत कांबळे , त्याच्या गावातल्या एका मुलीच्या आत्महत्येनंतर यंत्रणेला प्रश्न विचारायला गेला, बातमी करायला गेला आणि आता आरोपी ठरलाय.. दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली मुख्य आरोपी करण्यात आलेय... त्याचा गुन्हा एवढाच की तो पत्रकारिता जगत होता. पत्रकारितेच्या पुढं जाऊन काम करत होता.

प्रशांतच्या गावातल्या एका मुलीनं आत्महत्या केली, उभ्या गावाला कुणामुळं त्या मुलीनं आत्महत्या केली हे माहिती होत, जबाबदार मुलाला अटक करण्याची मागणी गावकऱ्यांची होती आणि या घटनेचं वृत्तसंकलन प्रशांत करत होता. बातमी मांडण्याचा प्रयत्न केला. संवेदनशील घटना आहे, मात्र पोलीस काही करत नाही हे चित्र पुढे येताच गावकऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला, पोलीस लाठीचार्ज झाला, दगडफेक झाली आणि त्यात बळी गेला तो रिपोर्टींग करत असलेल्या प्रशांतचा आणि त्याच्या धडपड्या पत्रकारितेचा. पोलीस प्रशासनाला कायम प्रशांतच्या बातमीदारीचा जाच होताचं. लोकांच्या समस्या तो पत्रकारितेच्या चाकोरीबाहेर जाऊन सोडवायचा. त्याने अनेक स्टिंग ऑपरेशन केली, ती गाजली. अनेक लोक उघडे पडले. त्याने मंध्यतरी जिल्ह्यातल्या बोगस डॉक्टरसंदर्भात एक मोहीम सुरू केली, त्यासाठी स्टिंग ऑपेशन केली, यंत्रणेच्या नाकात दम आणला आणि रुग्णाच्या जीवाशी खेळ करणारे कित्येक बोगस डॉक्टर जेलमध्ये गेले. या प्रकरणामुळे अनेकांचे हितसंबंध दुखावले गेले.. पोलिसांच्या हप्तेवसुलीविरोधात आणि काळ्या धंद्याविरोधात त्याने आवाज उठवला होता. त्यामुळे या सर्व यंत्रणा प्रशांतवर डूख धरून होत्याचं. त्यामुळे पोलिसांबरोबर झालेल्या बाचाबाचीचे निमित्त काढत प्रशांतवर थेट दंगलीचे गुन्हे दाखल केले गेले..

प्रशांत कांबळे आणि अभिजित तिवारी या दोन पत्रकारांना अमरावती पोलिसांनी या खोट्या गुन्ह्यात फसवलं. पोलीस ठाण्यात त्यांचा छळ केला, दरोडेखोरांसारखी, सराईत गुन्हेगारांसारखी वागणूक देत, त्यांना बेड्या घालून फिरवलं. प्रशांत कांबळे काही मामुली पत्रकार नव्हता. मुंबईसारख्या शहरात त्याने पत्रकारिता केली. उत्कृष्ट पत्रकारितेसाठी राज्य शासनाचा 1 लाख रुपयांचा पुरस्कार प्रशांतला मुख्यमंत्र्यांच्या हातून मिळाला. नागपूर विधिमंडळ अधिवेशनाचे वार्तांकन त्याने दोनदा केलंय. एवढं सगळं सोडून प्रशांत आपल्या गृहजिल्ह्यात पत्रकारिता करायला गेला. कारण त्याला ग्रामीण भागात पत्रकारिता करायची होती. गरीबांना न्याय मिळवून द्यायचा होता... त्याचा हाच मोठा गुन्हा झाला, कारण मुंबईत एखाद्या पत्रकारांना मारहाण झाली, शिवीगाळ जरी झाली तरी त्याची दखल घेतली जाते. सर्व पत्रकार एकत्र जमतात. मोर्चे काढले जातात, टीव्हीवर बातम्या झळकतात.. शहरातील न्युज ग्लॅमर बघता सर्व पुढारी एकत्र येऊन निषेध करतात, कारवाईची मागणी करतात, सरकारदेखील तातडीने त्याची दखल घेतात..

प्रशांत मात्र मुंबईत नव्हे तर चांदुर बाजार सारख्या ग्रामीण भागात पत्रकारिता करत होता. (पुणे, मुंबई, ठाणे, नाशिकबाहेरच्या बातम्यांना तशीही TRP च्या दृष्टीने किंमत नाही. कधी काळी नागपूरलाही नव्हती, मात्र मुख्यमंत्री आणि महत्वाचे मंत्री विदर्भातील असल्यामुळे आता मीडियाच्या दृष्टीने नागपूरची किमंत वाढली आहे). प्रशांतला अटक झाली, तेव्हा अमरावतीत एक दोघांना सोडलं तर कुणालाच या घटनेचा पत्ता नव्हता. सोशल माध्यमावरून जेव्हा प्रशांत संदर्भातील बातम्या, लेख वायरल झाले, त्यावेळी राज्यात इतर पत्रकारांना प्रशांतच्या अटकेबद्दल कळलं, त्यानंतर सर्वत्र पत्रकारांनी आपापल्या परीने या घटनेचा निषेध केला. अगदी बुलढाण्यापासून ते बेळगावपर्यंत निषेध नोंदवण्यात आला.. रुग्णालयात हातकड्या घालून उपचार घेत असलेल्या प्रशांतचे फोटो सर्वत्र वायरल झाले. मुख्यमंत्र्याकडून पुरस्कार घेतानाचा प्रशांतचा फोटो , बेड्यामध्ये जखडलेला प्रशांत...या छायाचित्रांनी अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं. स्थानिक वृत्तपत्रांनी प्रशांतची बाजू लावून धरली, निवेदनं दिली मात्र निष्ठूर पोलीस प्रशासन काही बधलं नाही.

अमरावती ग्रामिणचे पोलीस अधिक्षक आणि पत्रकारांनीच दिलेल्या तथाकथित सिंघमच बिरुद लाऊन फिरणारे अविनाश कुमार यांना अनेक जेष्ठ पत्रकार भेटले. त्यांना समजावून सांगाण्याचा प्रयत्न केला. मात्र अविनाश कुमार यांच्या डोक्यात एकचं विचार " म्हणे प्रशांत पत्रकारच नाही, तो कुठे काम करतो ". अहो अविनाश कुमार मग प्रशांतला मिळालेला पुरस्कार, त्याने केलेलं जय महाराष्ट्र चॅनेलसाठीच काम हे सर्व खोट आहे?... प्रशांतने काही महिन्यांपूर्वी जय महाराष्ट्र हे चॅनेल सोडलं, मात्र तो आता काही दिल्ली आणि मुंबईतल्या पब्लिकेशनसाठी काम करतो, फ्रिलांन्स पत्रकार म्हणून काही वृत्तवाहिन्यांसाठी बातम्या करतो. एवढं समजावून सांगूनही अविनाश कुमार समजून घेत नाही. खर तर दोन महिने अविनाश कुमार जर रजेवर गेले तर त्या कालावधीत ते पोलीस अधिकारी असणार नाहीत का? एवढं साधं सोप उत्तर त्याच्या प्रश्नाचं आहे. मात्र ते कधीच मान्य करणार नाही ...कारण एकदा का ते मान्य केलं तर पोलिसांनी केलेल्या पाशवी अत्याचारावर, दडपशाहीवर, दंडुकेशाहीवर पांघरून घालणार कसं? त्यामुळे प्रशांत पत्रकार आहे हे मान्य करायचं नाही एवढी साधी सोपी स्ट्रेटीजी पोलिसांची आहे. कदाचित उद्या पोलीस प्रशांतचा मुखमंत्र्यांच्या हातून घेतलेला पुरस्काराचा फोटोही बनावट आहे असही म्हणतील.

प्रशांतवरच्या पोलिसी अत्याचाराची कहाणी इथंच संपत नाही. तीन दिवस बेड्या ठोकून रुग्णालयात ठेवल्यानंतर बुधवारी पोलिसांनी प्रशांतला कोर्टात हजर केलं. कोर्टानं प्रशांत आणि अभिजीतला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली. पोलीस कोठडीत आम्ही प्रशांतला मारहाण करणार नाही असा शब्द पोलिसांनी उपस्थित पत्रकारांना दिला मात्र तो पाळला नाही. गुरुवारी मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास तिवसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बोरकर अचानक चांदुर रेल्वे पोलीस ठाण्यात आले आणि पोलीस कोठडीत शिरले..त्यांनी सिने स्टाईलने प्रशांतला मारहाण करण्यास सुरुवात केली. " मी बोरकर आहे, हा माझा बॅच बघ, तू पत्रकार आहेस ना , बघ तुझी गर्मीच उतरवतो. हिंमत असेल तर मला मारुन दाखव" असं म्हणत या पोलीस अधिकाऱ्याने प्रशांत आणि अभिजितला लाथाबुक्यांनी अमानुष मारहाण केली. प्रशांत गयावया करत होता मात्र जवळपास 50 मिनिटे प्रशांतला ही मारहाण सुरूच होती. नियमानुसार ज्या पोलीस ठाण्यात पोलीस कोठडी दिली जाते, त्या ठाण्याचा पोलीस चौकशी अधिकारी या संशयित आरोपींची चौकशी करू शकतात (तो देखील मारहाण करू शकत नाही) मात्र इथं अमरावती पोलिसांनी पत्रकारांना त्यांची औकात दाखवण्याचा अफझलखानी विडा उचलला आहे. त्यामुळे तुम्ही कितीही दबाव टाका, मोर्चे काढा, निवेदनं द्या. मात्र आम्ही तुम्हाला जुमानत, मोजत नाही. आम्ही कायदा वाटेल तसा वापरू..तुमचा मानवाधिकार गेला चुलीत असाच पवित्रा अमरावती पोलिसांनी घेतला आहे.

संबंध राज्याच लक्ष वेधून घेतलेल्या या संवेदनशील प्रकरणात पोलीस एवढी मस्ती, दडपशाही करत असतील तर सामान्य माणसासोबत ते कसे वागत असतील याची कल्पनाच करवत नाही. मात्र एक प्रश्न पडतो, "अमरावती पोलिसांमध्ये एवढी मस्ती आली कुठून? आमदार, लोक प्रतिनिधी काय करतायेत? एरवी छोट्या मोठ्या गोष्टींना ट्विटर ने उत्तर देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत हि बाब पोहोचलीच नाही का ? राज्यात ठेवलेले दोन गृहराज्यमंत्री करतात काय?". मुख्यमंत्री कार्यालयाला अनेकांनी ट्विटरद्वारे या प्रकाराची माहिती दिली तरी सर्व थंडच. "मुख्यमंत्री साहेब, एका हातून पुरस्कार दुसऱ्या हातून असले अत्याचार तुमचं गृह खात करत असतील तर तुमचा तो पत्रकार सरंक्षण कायदा चुलखंडात टाका ".

तुम्ही कितीही आक्रोश करा, आरडाओरडा करा..आम्ही प्रशांतची पत्रकारिता उध्वस्त केलीच आहे. आता आम्ही प्रशांतलाही उध्वस्त करू असं थेट आव्हान अमरावती पोलिसांनी आम्हा पत्रकारांना दिलय. सध्यातरी प्रशांत खचलाय, निराश झालाय..मात्र पराभूत झालेला नाही आणि कुठल्याही परिस्थितीत प्रशांतला आणि त्याच्या पत्रकारितेला आम्ही संपवू देणार नाही , पराभूत होऊ देणार नाही. अमरावती पोलिसांचं आव्हान आम्ही सर्वांनी स्विकारलय..कारण आज प्रशांत आहे..उद्या आपल्यापैकी अजून कुणी दुसरा प्रशांत असेल... ही वेळ शांत बसण्याची नाही .. पोलिसी अत्याचाराविरोधात आणि अमानुषतेविरोधात पेटून उठण्याची आहे .. या लढ्याला तुमची साथ हवी आहे ...

(पत्रकार प्रशांत कांबळेेला, अभिजित तिवारीला साथ द्या..कुठल्याही परिस्थिती त्यांना पराभूत होऊ देऊ नका)

-- अॅड. विवेक ठाकरे

8888878202

Updated : 23 Jun 2017 8:56 AM GMT
Next Story
Share it
Top