Home > मॅक्स ब्लॉग्ज > पोलीस भरती - असंवेदनशीलतेचा अंत

पोलीस भरती - असंवेदनशीलतेचा अंत

पोलीस भरती - असंवेदनशीलतेचा अंत
X

एप्रिल महिन्याचे उन दिसामाजी कडाडत आहे. हल्ली तर सकाळी ९ वाजताच सूर्य आग ओकायला लागतो. घराबाहेर पडणे मुश्कील होते. मी रोज साधारण १०च्या सुमारास ठाण्याहून मुंबईकडे यायला निघते. गाडीतला एसी सुद्धा नागपूरला असल्यासारखा गरम हवा फेकत राहतो. गेल्या आठवड्यापासून तर रोज हवामान खाते लोकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये असे सांगते आहे. जास्तीतजास्त पाणी प्या असाही सल्ला रोज दिला जातोय. आणि नेमक्या ह्याच वेळी इथे मात्र मुलुंडजवळच्या भर रस्त्यावर दिवसभर उन्हात पोलीसभरती सुरू आहे. अख्ख्या राज्यातील दुरदुरच्या गावाकडून शेकडो तरुण मुले पोलीस भरतीसाठी ठाण्यात आली आहेत. भर उन्हात ते इकडेतिकडे धावत असतात. बरेच जण तर त्यांची परीक्षेच्या वेळेची वाट बघत रस्त्यातल्या उदास निष्पर्ण झाड्याच्या तुटपुंज्या सावलीत पथारी लावताना दिसतात.

आता प्रश्न असा पडतो की गेली दोन तीन वर्षे तरी या भरतीत मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या बातम्या वृत्तपत्रातून नियमितपणे आलेल्या आहेत. सारा महाराष्ट्र त्यावर हळहळेला होता हे सर्वांना माहीत आहे. मग याहीवेळी त्या खात्याने हीच वेळ का निवडली असेल ? दरवर्षी पोलीस भरती करण्याचा कायर्क्रम ठरलेला असतो? त्यात बदल केला तर कुठून वरून मेमो येईल का? दरवर्षी मार्च आणि एप्रिल मध्येच ही भरती का होते? नेमका तेंव्हा कडक उन्हाळा सुरू झालेला असतो हे कुणीतरी लक्षात घ्यायला नको? मुख्यालयाच्या वातानुकुलीत दालनात किंवा अंबर दिव्याच्या गाडीत बसणाऱ्या उच्चपदस्थ आय. पी. एस. अधिकाऱ्यांना आणि मंत्रालयाच्या हस्तिदंती मनोऱ्यात ठाण मांडून बसलेल्या कलुषा कब्जींच्या डोक्यात कधी हा विषय येत नसेल का? माध्यमात बातमी आल्यावर डॅमेज कंट्रोल करणाऱ्या आणि असली मीडिया मॅनेजमेंट करताना आपलेच हसू करून घेताना कधी थोडे नियोजनबद्धपणे कार्यक्रमाची आखणी करायला हवी हा साधा विचारही मनाला शिवत नसेल का? की सरकारमध्ये जे लोक काम करतात त्यांची संवेदनाच जणू हरवून गेली आहे? त्यांना कधी असे वाटत नाही का की उन्हामध्ये जीवाच्या आकांताने जे तरुण धावत आहेत त्यात आपलाही कुणी असू शकेल!

एक फार सुंदर जाहिरात मला नेहमी आठवते. “कॅन्सर नेहमी दुसऱ्यालाच होतो असे नाही ......” जोपर्यंत आपल्या घराला आग लागत नाही तोपर्यंत शेजारचे घर जळते ते जळू द्या, ही वृत्ती फोफावते आहे. मध्यमामध्ये खूप आरडाओरड झाल्यावरही कागदी घोडे नाचवत नियमात तुटपुंजे बदल करणारे हे लोक कधी सुधारणार आहेत? त्यांना अजून किती नरबळी हवे आहेत? शेतकऱ्यांमधले बळी, पोलीसभरतीमधील नरबळी, पूल कोसळतात त्यातले बळी ! रेल्वेच्या गर्दीमुळे लोकलला लटकून पडतात ते बळी ! पोलीस अधिकारी तर द्या सोडून पण महाराष्ट्राचे गृहमंत्री तरी कृपया इकडे लक्ष देतील का ?

“जन पळभर म्हणतील, हाय हाय.

मी जाता राहील कार्य काय?”

या कविवर्य भा. रा. तांबे यांनी लिहिलेल्या अजरामर काव्य पंक्तीप्रमाणे लोकांची आठवण फार क्षीण असते. त्यामुळे आज वृत्तपत्रांमध्ये आलेली बातमी वाचली म्हणून हे लिहावेसे वाटले खरे पण लोक पुढचा पोलीसभरती बळी जाईपर्यंत हे विसरलतीलही. परंतु नियती मात्र कधीच आणि काहीच विसरत नाही, म्हणून तर गरिबांची हाय लागली तर अचानक सिंहासने डळमळीत होत असतात, सरकारे बदलत असतात आणि एखादा शायर लिहून जातो,

“चढता सुरज धीरे धीरे ढलता हैं, ढल जायेगा !”

-श्रद्धा बेलसरे खारकर

Updated : 7 April 2017 2:05 PM GMT
Next Story
Share it
Top