Home > मॅक्स ब्लॉग्ज > नक्षलवाद संपवायचा असेल तर विकासाचा भूसुरुंग पेरावा लागेल ! 

नक्षलवाद संपवायचा असेल तर विकासाचा भूसुरुंग पेरावा लागेल ! 

नक्षलवाद संपवायचा असेल तर विकासाचा भूसुरुंग पेरावा लागेल ! 
X

नक्षलवाद हे भारतासमोरील महत्वाच्या आव्हानांपैकी एक आहे. हे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी नक्षली भागामध्ये वेगवेगळ्या फोर्सेस काम करत आहेत. यामध्ये सी.आर.पी.एफ., एस.आर.पी.एफ. सी सिक्स्टी, महाराष्ट्र पोलीस, यांसारखे विभाग वेगवेगळ्या पातळीवर काम करत आहेत. नक्षलव्याप्त प्रदेशात पोलिसांचे नेटवर्क मजबूत होत आहे. यामुळे नक्षली कारवायांमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. तरीदेखील या भागामध्ये नक्षल विरोधी अभियान राबवताना पोलिसांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

नक्षल चळवळ समूळ नष्ट करायची असेल तर सर्वप्रथम नक्षलवाद्यांच्या बलस्थानांचा अभ्यास करावा लागेल आणि नक्षली चळवळीचे सर्वात मोठे बलस्थान आहे या चळवळीला स्थानिक लोकांचा मोठा पाठींबा असणे. अनेक गावांमधून या लोकांना सहकार्य मिळते ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक पाहता नक्षलवाद्यांचे ठिकाण हे संपूर्णपणे जंगलात असते. जंगलात जीवनोपयोगी वस्तू मिळणे देखील कठीण असते. तरी या लोकांना सर्व आवश्यक वस्तू मिळतात. सामान्य लोक या नक्षलींना आजही सहकार्य का करतात याची कारणे शोधणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

या अगोदर लोक कशा प्रकारे मदत करतात हे पाहू ?

  1. गावातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत पोहोचवणे अथवा वेळेनुसार आवश्यक मदत करणे.
  2. प्रत्यक्ष नक्षली कारवायांमध्ये सदस्य होऊन सक्रीय सहभागी होणे.

वास्तविक पाहता असुरक्षित जीवन कुणालाच नको असते. तरी देखील सर्व धोके पत्करून सामान्य लोक नक्षलींना का सहकार्य करतात याची कारणे शोधणे महत्वाचे आहे. वरील पहिल्या प्रकारच्या मदतीमध्ये बहुतेकदा लोकांच्या डोक्याला बंदुक दाखवून त्यांच्याकडून कामं करून घेतले जातात. जीवाच्या भीतीने लोक मदत करतात. लोक फक्त भीतीने मदत करतात असेही नाही. काही वर्षांपूर्वी जेव्हा पोलीस आतपर्यंत पोहचत नव्हते, त्यावेळी न्यायदानाचे काम करणे, एखादा जावई बायकोला नांदवत नसेल तर त्याची तक्रार जंगलावाल्यांकडे केली जात असे. जंगलवाल्यांनी धमकावाल्यावर तो घाबरून बायकोला नांदवत असत. गावातल्या अन्यायाविरूद्ध जंगलावाल्यांकडे दाद मागितली जाई. या सगळ्यांमुळे त्यांच्याविषयी सहानुभूती असणारा एक मोठा वर्ग गावागावात तयार झालेला आहे. अनेक गावांत या चळवळीला नैतिक अधिष्टान प्राप्त झालेले आहे.

वरील दुसऱ्या प्रकारच्या मदतीमध्ये गावागावातले तरुण स्वतः या चळवळीमध्ये सक्रीय सदस्य म्हणून सहभागी होतात. नक्षली चळवळ टिकून राहण्यामागे हे सर्वात महत्वाचे कारण दिसून येते. नक्षली चळवळीला खऱ्या अर्थाने रक्त पुरवठा या मदतीमुळे होतो. बरेच तरुण मुले बंदूक उचलून नक्षलवादी बनण्याचा मार्ग अवलंबतात याची कारणे नक्षली चळवळ संपवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतील.

लोकांमध्ये असंतोष आहे आणि त्याची काही गंभीर कारणे आहेत. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या अनुषंगाने आपण पाहीलं तर या जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत. या बारा तालुक्यांमध्ये एकूण सोळाशे गावे आहेत. बारा तालुक्यांपैकी एकूण आठ तालुके हे आदिवासी तालुके आहेत. अंदाजे बाराशे गावे ही आदिवासी गावं आहेत जी संपूर्णपणे जंगल दऱ्याखोऱ्यात वसलेली आहेत. जंगलातील गावात रहाणाऱ्या माणसांचं आयुष्य हे एखाद्या जंगली प्राण्याप्रमाणेच आहे. लोकांची उपजीविका धानशेती, जंगलातल्या वस्तू, शिकार यावरच अवलंबून आहे. प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठीही लोकांना जीवघेणा संघर्ष करावा लागतो. आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत. रोजगार उपलब्ध नाही. या परिस्थितीशी जीवघेणा संघर्ष करत ही लोक जगत आहेत याचे कुणाला काही देणे घेणे नाही.

शिक्षणाच्या सुविधा, आरोग्याच्या सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. उलट या लोकांनी या परिस्थितीवर मात करत स्वतःची एक जगण्याची व्यवस्था निर्माण केली आहे. लोक झाडपाल्याचे उपचार करतात, नद्यांवर लाकडी पूल बनवतात, प्रकाशासाठी रॉकेलचे दिवे वापरतात, विहिरीतून पाणी काढण्यासाठी रहाट वापरतात. वहातुकीसाठी बैलगाडी वापरतात, सायकली वापरतात. धान्य दळायला जात्यााचा वापर केला जातो. लाकडी अवजाराने शेती करतात. स्वतःचे श्रम आणि कला याचा वापर करून या लोकांनी स्वतः त्यांच्या जगण्याची व्यवस्था निर्माण केली आहे. याउलट अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजासुद्धा न पुरावणाऱ्या सरकारला ही लोक ज्या जंगलावर राहतात ते जंगल काबीज करायचं आहे. या जंगलात असणारी खनिजे खोदायची आहेत. जे जंगल या लोकांनी जतन करून ठेवलेले आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये खायला अन्न नसताना केवळ जंगलातील टेंबरे, चारे, मोहाची फुले खाऊन यांच्या पूर्वजांनी दिवस काढले परंतु हे जंगल सोडले नाही. परिणामी आज जंगलावर खनिजावर हक्क सांगाणाऱ्या सरकारच्या या भूमिकेला स्थानिक आदिवासींचा तीव्र विरोध आहे. या सगळ्यांमध्ये लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे. आणि हा असंतोष त्याना बंदुकीच्या मार्गाला घेऊन जातो.

या भागात समस्या आहेत म्हणून नक्षलवाद निर्माण झाला आणि आज नक्षलवाद आहे म्हणून अनेक समस्या निर्माण झाल्या ही वस्तुस्थिती आहे. तरीदेखील बंदुकीला फक्त बंदूक संपवू शकणार नाही. सरकारला या भागात विकासाचा भूसुरुंग पेरावा लागेल. केवळ नक्षलवाद या भागातील अधोगतीस कारणीभूत आहे असं भासवलं जातं. नक्षलवाद्यांचा आरोग्य व शिक्षणाच्या कामाला फारसा विरोध नाही. अनेक जंगल भागात डॉक्टर तसेच शिक्षक सेवा पुरवतात. नक्षलवादी त्यांना त्रास देत नाहीत. मग आपण शंभर टक्के आरोग्य आणि शिक्षणाचा विकास करण्यास यशस्वी ठरलो का? नक्षलवादाचा फारसा प्रभाव हा तालुक्यांच्या गावात दिसून येत नाही. मग या शहरांचा विकास झाला का? या प्रश्नांची उत्तरे येथील राज्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने स्वतःला विचारावी. केवळ बंदुकीने आपण काही नक्षलावाद्यांना मारू शकू. पण या भागामध्ये सरकारने विकासाचे हत्यार उपसलं तर या चळवळींची सहानुभूती कमी होईल व या चळवळींना खऱ्या अर्थाने हादरा बसेल. अन्यथा नक्षली कारवायांमध्ये मरणारा आणि मारणाराही आदिवासी हे समीकरण कदापि बदलणार नाही.

Updated : 27 July 2017 6:59 PM GMT
Next Story
Share it
Top