Home > मॅक्स ब्लॉग्ज > दलित आंदोलनाची पुढची दिशा  

दलित आंदोलनाची पुढची दिशा  

दलित आंदोलनाची पुढची दिशा  
X

भारतीय राजकारणात दोन रंगात समस्यांकडे बघण्याची लोकांना सवय लागली आहे. सवर्ण-दलित, हिंदू- मुस्लिम, काँग्रेस-भाजपा, डावे-उजवे, समाजवादी-भांडवलदार असे दुरंगी रुप राजकारणाला नेहमी दिले जाते. भीमा-कोरेगावच्या घडामोंडींनतर ते दलित विरुध्द मराठा, आंबेडकर विरुध्द आठवले असे दुरंगी वळण घेतल्याचे दिसते आहे. गतवर्षीच्या मराठा आरक्षण मोर्चांच्या मागण्यामध्ये अट्रोसिटी कायदा रद्द करावा असे म्हटले गेले आणि दलित विरुध्द मराठा त्यातही नवबौध्द विरुध्द मराठा असे दोनरंगी रुप या राजकारणाला मिळाले. पण केवळ फक्त दोन समुदाय समोरासमोर आल्याने बाकीच्या समुदायांची जणू काही जबाबदारीच नाही असे वागणे बरोबर नाही. ब्राम्हण आणि ओबीसी यांचाही संबंध एक जानेवारीच्या घडामोडींशी अत्यंत जवळून आहे. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी झाली म्हणून ब्राम्हणीं संताप व्यक्त केला किंवा राहुल फटांगडे याचा मृत्यू झाला म्हणून मराठा जातीचे लोक चिडले असे समजण्याचे कारण नाही. पुरोगामी महाराष्ट्राला असे दुरंगी राजकारण झेपणारे नाही.

बाबासाहेब आंबेडकरांना जाणिवपुर्वक समुदायबध्द करणे म्हणजे महाराष्ट्र अजूनही लघुदृष्टी आहे असे मानल्यासारखे होईल. म्हणून मोठ्या व्यापकदृष्टीने एक जानेवारीची घडामोड का झाली त्याची कारणमिमांसा करावी लागेल. कोरेगावच्या स्मारकाचे दर्शन घ्यायला येणाऱ्या आंबेडकरवाद्यांमध्ये वर्षागणिक वाढ होत चालली म्हणून स्थानिक लोक रागावलेत अशी एक वार्ता आहे. त्याचबरोबर स्थानिक नागरीक त्या स्मारकाकडे दुर्लक्ष करीत असत अश्याही तक्रारी आहेत. आता गम्मत अशी की आंबेडकरांचे पुतळे आणि मुंबई व नागपूर येथिल स्मारके वगळता आंबेडकरी जनतेला ब्रिटिशांनी बांधलेले एक स्मारक पुज्य वाटावे यात मराठी समाजाचाच पराभव आहे. या स्मारकाचा गौरव डॉ. आंबेडकर यांनी 1927 ला केला तेव्हढे खरे असले तरी त्याचे वलय मात्र त्यांनी वाढू दिले नाही. उलट ब्रिटीशांची बाजू आपण घेत असल्याचा संशय आपल्यावर घेतला जाईल म्हणून बाबासाहेबांनी त्या स्मारकाला लांबच ठेवले होते.

आंनंद तेलतुंबडे म्हणतात त्याप्रमाणे या स्मारकाचे महत्त्व एका लढाई पुरतेच आहे. ना इंग्रजांनी विषमतेविरुध्द पेशव्यांवर चढाई केली ना पेशव्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सामना केला. त्यामुळं महार जातीचे योध्दे पेशवाई संपविण्याला कारणीभूत ठरले हे सामाजिकदृष्ट्या योग्य नाही. त्या लढाईला सामाजिक परिमाण नव्हते. तरी सुध्दा महार जातीच्या शौर्याचे स्मरण म्हणून तिथे कुणी जात असेल तर त्यांना अडवता येणार नाही. स्थानिक नागरीक आणि दर्शनार्थी यांच्यात धुसफुस सुरु होती असेही आता बोलले जात आहे. पण असे आरोप आता बिनबुडाचे वाटतात.

प्रश्न मराठा मोर्चाच्या मुळातच शोधला पाहिजे. आरक्षण व सवलती यांचे लाभ घेऊन दलित जातींनी प्रगती केली आणि मराठा जातीला जागतिकीकरणाच्या विकासात स्वार्थ साधणे जमले नाही म्हणून एकमेकांविरुध्द गैरसमज आणि असुया पसरविण्याचे प्रयत्न सुरुच होते. अर्थात हा गेल्या 50 वर्षांमधला दृश्य परिणाम आहे. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दलित जातींनी प्रगती केली असली तरी राजकिय सत्ता मात्र त्यांच्या हातून गेली आहे. ती अजूनही सवर्ण जातींच्या आणि अन्य मागासवर्गीयांच्या हातात एकवटली आहे. म्हणून सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी असा सामना आता दिसू लागला आहे.

एकिकडे रामदास आठवले सत्तेचे प्रतिनिधीत्व करतात तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर सत्ताकांक्षेचे प्रतिनिधीत्व करतात. आठवले यांनी वैचारीक तडजोड करुन सत्ता मिळवली तर प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या सेक्युलर व समाजवादी तत्वांनुसार राजकारण सुरु केले. या दोन दिशांमध्ये महाराष्ट्रीय दलित राजकारण विभागले गेले आहे. प्रकाश आंबेडकर समाजवादी साम्यवादी आणि गांधीवादी कार्यकत्यांना सोबत घेऊन राजकारण करीत आहेत. तोडड मार्ग बरोबर आहे. त्याचेच प्रतिक म्हणून जिग्नेश मेवानी, उमर खालिद आणि कन्हैयाकुमार यांना त्यांनी महाराष्ट्रात बोलावले. आज अश्याच व्यापक समविचारी प्रागतिक विचारांची जोड घेणे आंबेडकरी जनतेला आवश्यक आहे. हिंदू राष्ट्राचे स्वप्न याच विचारांच्या पायावर नष्ट करता येते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस उघडपणे धर्म आणि जात यांचा राजकिय व्याप वाढवत आहेत. तिसरी शक्ती म्हणून आता प्रकाश आंबेडकर त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला वाटचाल करता येईल. आठवले यांना संघ परिवार फार काळ टिकू देणार नाही. त्यामुळं त्यांच्याबद्दलचा राग सत्ताधाऱ्यांवरचाच राग असल्याचे तरुण पिढीने दाखवून दिले. बाबासाहेबांचे राजकिय विचार संविधानात स्पष्ट म्हटलेले आहेत. संघ परिवार जय भीम म्हणत असला तरी जय संविधान म्हणत नाही. अनंद हेगडे हा केंद्रीयमंत्री उघडपणे संविधान बदलाची भाषा करतो अश्यावेळी जितके समविचारी सापडतील तितके सोबत घेऊन दलित राजकारण्यांनी आगेकूच केली पाहिजे.

दलित जातींमध्ये आता एक विचारी मध्यमवर्ग निर्माण झाला आहे. त्याने आत्मकेंद्रीत्व सोडून समविचारी कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग वाढवून तिसरी शक्ती बळकट करण्याची मोहिम हाती घेतली पाहिजे. गरीब व मागे पडलेले समुदाय त्यांना आपल्याजवळ केले पाहिजे. मग जी ताकद उत्पन्न होईल ती हिंदू राष्ट्राच्या पाठीराख्यांना या देशाचे हिंदूराष्ट्र करण्यास अडवू शकेल.

Updated : 5 Jan 2018 9:06 AM GMT
Next Story
Share it
Top