Home > मॅक्स ब्लॉग्ज > “…तू लेख का छापत नाय”

“…तू लेख का छापत नाय”

“…तू लेख का छापत नाय”
X

महाराष्ट्र टाइम्स ने पेज थ्री टाइप बदल केले तेव्हा त्यावर टीका करणारा ‘बाळशास्त्री जांभेकरांना अनावृत्त पत्र ‘ हा लेख मी लिहिला होता. तो राग डोक्यात ठेवून आजचे संपादक अशोक पानवलकर यांनी माझे लेखन महाराष्ट्र टाइम्स मध्ये छापणे बंद केले. या असहिष्णुतेवर चर्चा व्हायला हवी यासाठी त्यांना लिहिलेले पत्र मी सोबत जोडले आहे. राजकारण्यांना सहिष्णुता शिकविणारे हे संपादक यांनी असे अनेकांना लिहिणे बंद केल्याचे समजते. त्यांनी पत्राला उत्तरही दिले नाही.केवळ टीका करणारा लेख लिहिला म्हणून छापायचे नाही महाराष्ट्राच्या उदारमतवादी परंपरेला अशी वृत्ती घातक आहे ..

प्रिय अशोक पानवलकर,

हेरंब कुलकर्णीचा नमस्कार

यापूर्वी मी तुम्हाला २ पत्र किमान १० वेळा फोन व १० sms केले.. तुम्ही प्रतिसाद दिला नाही. पत्र फोन व sms याला तुम्ही प्रतिसाद देत नसल्याने हे शेवटचे पत्र मी लिहितो आहे. इतक्यावेळा केलेल्या पत्र फोनला प्रतिसाद न देणे हे माणूस म्हणून मला खूप अपमानकारक वाटले.

तुम्ही संपादक झाल्यापासून तुम्ही माझे लेखन छापत नाही. याबाबत तुम्हाला थेट विचारणा केल्यावर आता उत्तर ही देत नाही. शेतकरी मुलांची लग्न होत नाहीत या विषयावर ४५ गावामध्ये जाऊन तिथले मुलांच्या लग्नाचे वास्तव मांडणारा लेख तुमच्याकडे मी पाठवला.आज ग्रामीण महाराष्ट्रात ही गंभीर समस्या आहे. आमचा हेतु हा असतो की तुमच्या माध्यमातून हा विषय राज्याचे धोरणकर्ते,साहित्यिक ,विचारवंत यांच्यापर्यंत जावा आणि या प्रश्नाची कोंडी फुटावी. पण आम्ही इतके कष्ट घेवून हा विषय पुढे आणूनही तुम्ही जागा दिली नाही.त्याची बातमी करतो असे मला कळवले पण अशी बातमीही केली नाही. हा प्रकार नेमका काय आहे ? म्हणजे हे असले विषय तुम्हाला लेख सोडा तर बातमीच्याही लायकीचे वाटत नाहीत का ? एका एका गावात आज १०० मुले बिनलग्नाची आहेत आणि त्याची तुम्ही दखल ही घेणार नाही.

सकाळ या आमच्या अभ्यासावर अग्रलेख लिहिते.लोकमत पुरवणीचा मुख्य विषय करते. चॅनल चर्चा करतात आणि तुम्हाला बातमीचा ही विषय वाटत नाही ?? संपादक म्हणून तुमचा नाकारण्याचा नक्कीच हक्क आहे पण गेली अनेक वर्षे तुम्ही ज्याप्रकारे माझे लेखन नाकारत आहात त्या तुमच्या मानसिकतेचा माझ्याविषयीच्या आकसाचा हा मला भाग वाटतो. खरं तर तुमची माझी ओळख ही नाही. पण संपादक झाल्यापासून तुम्ही असे का वागता याचे कारण नंतर लक्षात आले.

महाराष्ट्र टाइम्स ने पेज थ्री कल्चर सुरू केले. चित्रपट,फॅशन,गणपती,नवरात्र साड्या हे सुरू केल्यावर त्याविरोधात मी ‘बाळशास्त्री जांभेकरांना अनावृत्त पत्र’ असा एक लेख लिहिला होता. खरे तर तुम्ही तो लावून घेण्याचे काहीच कारण नव्हते. तो धोरणावर टीका करणारा होता पण तो राग धरून संपादक झाल्यावर तुम्ही मला काळ्या यादीत टाकले. खरे तर टाइम्सने जे बदल केले ते तुम्हालाही खटकायला हवेत पण तुम्ही माझ्यावर राग काढलात.

काही मुद्दे लिहितो

१) एका संस्थेने माझ्या मुलांच्या प्रश्नावरचा लेख तुमच्याकडे पाठविला. तुम्ही स्पष्टपणे ‘त्यांचा लेख आमच्याकडे चालणार नाही’ असे सांगितले. त्या संस्थेने मला दुसरीकडे लेख देताना अगदी सहजपणे ही अडचण सांगितली. तेव्हा मला तुम्ही माझा तिरस्कार करता मला नाकारता आहात हे प्रथम कळाले.

२) ५ वर्षात किमान २० पेक्षा जास्त लेख व लिहिण्याचे विषय मी विविध तुमच्या सहकार्‍याकडे पाठविले. तुमचे सहकारी स्पष्ट बोलत नाहीत मला कारण सांगत नाहीत. ते लेख नाकारण्याचे कारण सांगू शकत नाहीत पण तुमचा माझ्याविषयीचा दृष्टिकोन माहीत असल्याने ते घेत नसावेत. त्यामुळे हा लेख मी थेट तुम्हाला पाठवला पण तो ही नाकारला तेव्हा माझा संशय खरा ठरला.

३) सर्वात वाईट वाटले ते, मी पुस्तक दिनानिमित्त राज्यातील मान्यवरांच्या जीवनावर प्रभाव टाकणारी पुस्तके अशी यादी मी तयार केली. सोशल मीडियातून ७०० जणांची मते घेवून स्वत: ५००० रुपये खर्च करून यादी प्रसिद्ध केली पण पाठपुरावा करून बातमी सुद्धा आली नाही. इतके कष्ट घेऊन साधी बातमी सुद्धा तुम्ही येवू दिली नाही. तेव्हा खूप वेदना झाल्या वाचनसंस्कृती वाढावी म्हणून आम्ही ग्रामीण भागात काही प्रयत्न करतो आणि तुम्ही व्यक्तिगत तिरस्कार करता.

४) यावर मी तुमच्याशी बोललो तेव्हा तुम्ही म्हणाला की मी कोणत्याही विषयात नव्या लोकांना संधी देतो. शिक्षणात हे मान्य आहे पण नव्यानेच लिहिण्याचा निकष लावला तर या निकषावर मी लिहिलेला शेतकरी प्रश्नावरचा लेख मी नव्यानेच लिहितो आहे. दारूबंदी विषयावर मी नव्याने लिहितो पण मग तिथे तुम्ही माझे लेख नवीन लेखक म्हणून का छापत नाही? म्हणजे केवळ मला टाळण्यासाठीच हे निकष सांगता असे वाटते.

५) मी लोकसत्तात लिहितो म्हणून घेत नसाल असे म्हटले तर दोन्हीकडे लिहिणारे मी अनेक नावे दाखवून देईन. आणि लोकसत्तात वर्षात जास्तीत जास्त २ ते ३ लेख माझे सध्या येतात म्हणून असे वागणार ?

६) आमची अडचण समजून घ्या. आपले नाव यावे ही प्रेरणा शेकडो लेख आणि ९ पुस्तके प्रसिद्ध झाल्यावर संपली आहे आता प्रत्यक्ष सामाजिक काम करताना काही प्रश्न पुढे न्यावेत यासाठी आम्ही लिहितो. एखाद्या धोरणात्मक विषयावर मंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही मुंबईच्या पेपरमध्ये लिहितो. चॅनलमध्ये विषय मांडतो. त्यामुळे आम्ही आग्रह धरतो. पण ती आमची कार्यकर्ता म्हणून तगमग तुम्ही लक्षात घेत नाही. लोकसत्ता,सकाळ,लोकमत आमची ही भावना समजून घेतात पण तुम्ही नाही.

एखाद्याचे लेखन छापायचे नाही असे ठरविणे ही असहिष्णुता आहे. आपण मोदीभक्तांना असहिष्णु म्हणणार आणि दुसरीकडे तुमच्या धोरणावर टीका करतो म्हणून आम्हाला दूर ठेवणार हे योग्य आहे का ? माणूस म्हणून तुम्ही कोणाशी कसेही वागू शकता पण संपादक म्हणून तुम्ही असा भेदभाव करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आमच्यावर टीका करता मग कशाला आमच्याकडे लिहिता असे म्हणत असाल तर ते चालणार नाही. टीका करण्याचा आणि अभिव्यक्तीचा दोन्ही अधिकार लेखक म्हणून असला पाहिजे... या न्यायाने मग कशावरच टीका करता येणार नाही.

तुम्ही छापले नाहीतर दुसरे कोणीतरी छापणार आहेच. लेखन छापले जाणे माझ्यासाठी समस्या नाही, तुम्ही नाकारल्याने काहीच फरक पडत नाही. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे व नियतकालिके अतिशय सन्मानाने माझे लेखन छापतात. पण मला काही लेखक असे दूर टाकणे, संपादक म्हणून उदार मनाचे नसणे आकस ठेवणे ही तुमची असहिष्णुता विलक्षण क्लेशदायक वाटते

कुमार केतकरांचे उदाहरण देतो. शरद जोशींशी मतभेद होते. जोशीच्या ७५ व्या वाढदिवसाला मी शरद जोशींची मुलाखत घेतली. केतकरांनी वाचक पत्र रद्द करून पूर्ण अर्धे पान ती छापली. हा उदारमतवाद तुम्ही शिकावा अशी तुमच्यापेक्षा लहान असूनही सांगतो. तुम्ही असे अनेकांशी वागत आहात. मराठी पत्रकारितेच्या उदारमतवादी परंपरेला तुम्ही असहिष्णु वळण देत आहात. आज माझे लेख न छापण्याचे समाधान तुम्हाला मिळेल पण माझ्यातला लेखक तुम्ही थांबवू शकणार नाही. तुम्ही उद्या निवृत्त व्हाल पण माझ्या मनात मात्र हे कायम राहील की एक संपादक आपल्याशी इतक्या वाईटरितीने वागले... मी सर्वत्र लिहितो पण गेल्या २० वर्षात असे संपादक मी प्रथमच पाहत आहे.

मी हा विषय अतिशय गंभीरपणे घेतला असून ही असहिष्णुता सांस्कृतिक आणि पत्रकारितेच्या, महाराष्ट्राच्यासमोर आणावी असे वाटते आहे. विनाकारण एखाद्याचा तिरस्कार तुम्ही का करता हे सांगितले पाहिजे. खरं सांगू पानवलकर, आपला कोणीतरी इतका तिरस्कार करते हे खूप वेदनादायक असते.

हेरंब कुलकर्णी (९२७०९४७९७१)

Updated : 12 Aug 2017 8:13 AM GMT
Next Story
Share it
Top