Home > मॅक्स ब्लॉग्ज > ड्रॅगनची वाढती भूक 

ड्रॅगनची वाढती भूक 

ड्रॅगनची वाढती भूक 
X

निर्ढावलेला मस्तवाल गुन्हेगार आपला गुन्हा कधीही कबूल करत नाही. तो सदैव दुसऱ्यावर आरोप करत राहातो. डोकलाम प्रश्नी याचाच प्रत्यय येत आहे. दोन महिने उलटूनही या प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी परिस्थिती चिघळवत ठेवण्याकडे चीनचं अधिक लक्ष लागलंय. गेल्या सात दिवसात तर भारत-चीन वाग्युद्धात परस्परांवर चांगलीच आगपाखड झाली.

सोविएत संघाच्या विघटनानंतर चीनने आशिया खंडात दादागिरी करण्याचा सतत प्रयत्न चालवला आहे. या विघटनानंतर निर्माण झालेल्या सर्वच देशांबरोबर चीनचे सीमावाद होते. आपण हे सीमावाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याची भूमिका ठेवली, असे चीन म्हणत असतो पण प्रत्यक्षात आपल्या सीमा दररोज विस्तारत राहाण्याची चीनची सवय आजही संपलेली नाही.

डोकलाम वाद या विस्तारवादी भूमिकेतूनच चीननं उकरून काढला आहे. अगदी १९५९ पर्यंत भूतानशी चीनचा सीमावाद नसल्याचं जाहीरपणे सांगणारा चीन आता १८९०च्या कराराचा आधार घेत डोकलामवर अधिकार सांगत आहे. वास्तविक १८९० सालचा करार चीन आणि ब्रिटीशकालीन भारत यांच्या दरम्यान झाला होता. भूतानचा त्यात काहीच संबंध नाही ही बाब सोईस्कररीत्या बाजूला सारत चीन हा वाद चिघळवत ठेवत आहे.

या वादाचं मूळ चुंबी खोरं हे आहे. निसर्गाच्या सुंदरतेनं नटलेलं हे खोरं व्यापारी मार्गाकरिता प्रसिद्ध आहे. अनेक शतकं या मार्गाने रेशमाचा व्यापार झाला आहे. हे खोरं वर्चस्व गाजवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं, मोक्याचं स्थान आहे. चुंबी खोरं चीनच्या हाती लागल्यास भारताचा ईशान्य भाग घशात घालण्यास चीनला फारसा अवधी लागणार नाही. अरुणाचल प्रदेशवर चीन गेल्या अनेक वर्षांपासून आपला हक्क सांगत आहेच. त्याचबरोबर चीन आणि भारताला जोडणाऱ्या या मार्गावरदेखील चीन कब्जा करू इच्छित आहे. चीनचा हा डाव सफल झाल्यास भूतानला देखील चीनच्या जुलमी सत्तेस स्वाधीन होण्यापासून काहीच पर्याय उरणार नाही. डोकलामचा मुद्दा भारतानं सोडून दिल्यास सिलीगुरी हे आणखी एक मोक्याचं ठिकाण देखील गमवावं लागेल.

डोकलाम पठार सहज आपल्या हाती लागेल असा अंदाज बांधून चीननं हा फास बुद्धीबळाच्या पटावर टाकला असण्याची शक्यता आहे. हा फासा टाकताना फारतर भूतान या गोष्टीला विरोध करेल, काही प्रमाणात आरडाओरड करेल असा अंदाज चीननं बांधला असावा. पण डोकलामवर पाऊल ठेवताच भारताकडून एवढा प्रखर विरोध होईल या अंदाज बहुदा चीनला नसावा. याच कारणास्तव चीननं भारत भूतानच्या सार्वभौमत्वाचा अपमान करत असल्याची आरोळी ठोकली होती. त्याचा फारसा परिणाम न झाल्यानं चीननं भारताला धमकावण्यास सुरुवात केली आहे.

या धमक्या देताना चीननं अनेकदा १९६२च्या युद्धाची आठवणही भारताला करून दिली. पण हे वक्तव्य करताना १९६२ च्या आणि २०१७च्या भारतातील बदलाचा विचार केल्याचं बिलकुल दिसत नाही. चीनच्या काही तज्ज्ञांनी याची आठवण चीनला अलीकडेच करून दिली. चीननं मांडलेला डाव रडीचा आहे असं देखील या तज्ज्ञांनी सांगितलंय्. पण ऐकेल तो चीन कसला. तज्ज्ञांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत चीनच्या अध्यक्षांनीच भारताचं नाव न घेता धमकावण्यास सुरुवात केली. चिनी लष्कराधिकाऱ्यांच्या एका कार्यक्रमात अध्यक्ष शी जिनपिंग यांनी “चीनच्या अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्यांना सोडणार नाही. सैन्यानं त्यांना चोख उत्तर देण्यास सज्ज राहावं” असं आवाहान केलं. सत्ता विस्ताराची किती ही लालसा असंच म्हणावं लागेल.

चीनच्या प्रसारमाध्यमांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर देखील टीका करून बघितली. ही टीका करण्यामागे चिनी माध्यमांनी भारतीय राजकीय पक्षांमध्ये मतभेद निर्माण करून येथील परिस्थिती अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेस पक्षाचा एक उच्चपदस्थ नेता चिनी माध्यमांच्या या प्रचाराला बळी पडला आणि मग काँग्रेसला सरवासराव करावी लागली. मात्र चीनच्या या दादागिरी विरोधात भारत सरकारनं उचललेलं पाऊल अत्यंत योग्य आहे असंच म्हणावं लागेल. डोकलाम प्रश्नी भारताला जगातील अनेक देशांचा पाठिंबा मिळाला आहे. चीनचा खोटारडेपणा जगासमोर आलाय. चीननं भारताच्या सीमेलगत उभारलेल्या रस्त्यांमुळे सैन्याचं दळणवळण अत्यंत सोपं झालं आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं चीनला विरोध न करणं चुकीचं आणि जोखमीचं ठरलं असतं.

या सर्व प्रकारात चीनची परिस्थिती आता बिकट झाली आहे. सैन्य मागे घेऊन रस्त्याचं काम थांबवणं त्यांना भागच आहे पण त्याचबरोबर आपली राजकीय कारकीर्द कायम राखण्याकरिता अध्यक्ष शी जिनपिंग यांना माघार घेणंही महागात पडणार आहे. दक्षिण आणि अग्नेय आशियावर आपलं वर्चस्व काय राखण्याकरिता चीननं माडलेल्या या बुद्धीबळाच्या पटावर सध्या तरी चीनची वाटचाल असफलतेकडे होताना दिसतेय. रडीच्या मार्गानं चीननं खेळी खेळल्यास १९६७ सालाची आठवण करून देण्याची क्षमता भारतात निश्चितपणे आहे.

माघार न घेण्याच्या भारतीय धेरणामुळे आग्नेय आशियातील चीनविरोधी राष्ट्रांना काही प्रमाणात बळ आलं असण्याची शक्यता आहे. डोकलाम चीनच्या हाती पडलं असतं तर संपूर्ण प्रदेशात चीनचा दबदबा निर्माण झाला असता. चीनची राजकीय गणितं चुकली आणि आता डाव त्यांच्यावरच उलटला आहे. यामुळे नैराश्याच्या भावनेतून चीन जीभ उचलून टाळ्याला लावत आहे, असंच म्हणावं लागेल.

- कौस्तुभ कुलकर्णी

Updated : 4 Aug 2017 6:06 AM GMT
Next Story
Share it
Top