Home > मॅक्स ब्लॉग्ज > डॉक्टरांना मारा पण...

डॉक्टरांना मारा पण...

डॉक्टरांना मारा पण...
X

वर्ष दोन वर्षापूर्वीचा काळ असेल, ‘डॉक्टर ना झोडपून’ काढण्याच्या घटना भारत भर घडत होत्या. बहुतेक डॉक्टर ‘लायनीवर’ आले असावेत. कारण मधील काही काळ या घटना घडल्याचे ऐकिवात नव्हते. आता पुन्हा डॉक्टर ‘लाईन सोडून’ वागत असावेत. एरवी महाराष्ट्रात सर्व प्रगतीशील गोष्टी पुण्यात चालू होतात आणि भारतात त्या बंगालमध्ये होतात असे एक बंगाली डॉक्टर म्हणाले होते. पण हा मान २०१७ मध्ये नाशिक विभागाकडे जातो. धुळे आणि नाशिक इथून डॉक्टर ना पुन्हा ‘लायनीवर’ आणण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. समाज माध्यमातून याला जोरदार पाठिंबा मिळतो आहे. धुळे इथे डॉ रोहनला बेदम मारहाण झाली. त्याची चित्रफीत सामाजमाध्यमांवर विषाणूगत झाली. त्यावर पुरोगामी, प्रतिगामी, सिव्हिल सोसायटी, मानवाधिकार आणि मध्यमजागृत कोणीही जोरदार निषेध नोंदविला नाही. उलट बहुतेक प्रतिक्रिया “मारहाण करणे बरोबर नाही पण डॉक्टर हल्ली फार पैशाच्या मागे लागलेत, माणुसकी विसरलेत. आपण मारहाण करणार्‍यांचा निषेध करतो पण त्यांची मानसिक स्थिती समजून घेतली तर मग ती मारहाण पण बरोबर वाटू लागते” या अशा प्रकारच्या होत्या. काही दिवसापूर्वी भिवंडीला रिक्षांनी ऐन दहावीच्या परीक्षेच्या दिवशी संप पुकारला. पोलिसांनी डॉक्टर संघटनेला विनंती केली आणि सर्व डॉक्टरनी आपापली वाहने घेऊन सर्व परीक्षर्थीना केंद्रावर पोचवले. ही बातमी मी बऱ्याच ग्रुपवर शेअर केली. एरवी माझ्या घरात फुललेले तगरीचे फूल असा फोटो टाकला तरी त्याला अनेक वर केलेले अंगठे येतात. पण, याला फारच थोड्यांनी प्रतिसाद दिला. उलट ते ठीक आहे हो पण, डॉक्टर कसे लुटतात, औषध कंपन्यांकडून कसे पैसे घेतात या बद्दल पोस्ट्स चा भडिमार झाला.

https://youtu.be/LxpDcev4jKI

मग मी रुग्णाच्या नातेवाईकांच्या भूमिकेत जावून विचार करू लागलो. माझ्या कुणा जवळच्या माणसाला रस्त्यात मोठा अपघात झाला. त्याला डोक्याला मार लागला आहे. त्याची शुध्द गेली आहे. मी त्याला इस्पितळात घेऊन गेलो. तिथे डॉक्टरने बघताक्षणी सांगितले “इजा फार गंभीर आहे. याला लागणार्‍या तपासण्या आणि उपचार इथे होणार नाहीत. याला लवकरात लवकर मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेउन जा. मी त्याला सांगतोय तुम्हीच काहीतरी करा. हे बोलताना रुग्णाची प्राणज्योत मालवते. मला प्रचंड दु:ख होते. आपण काही करू शकलो नाही म्हणून राग येतो. डॉक्टरने काही केले नाही म्हणून रागाचा अतिरेक होतो आणि तो राग डॉक्टरवर निघतो. वड्याच तेल वांग्यावर असे होते. आता वांगे समोर होते म्हणून तेल वांग्यावर निघाले. मग पुन्हा मी डॉक्टर च्या भूमिकेत शिरलो आणि मला साक्षात्कार झाला. मला लक्षात आले डॉक्टर जो मार खातो तो काही फक्त त्याच्या वाट्याचा नसतो. इतर अनेकांच्या वाट्याचा तो मार असतो.

रुग्ण दगावला तर नातेवाईक मारणारच. पण आपण आपल्या वाट्याचा मार किती असावा हे लोकांना पटवून देत नाही आणि या मारातील वाटेकरी दाखवून देत नाही ही कम्युनिकेशन गॅप राहते. त्यामुळे सगळा मार आपण खातो. मी आता सर्व दवाखान्यात लावण्यासाठी एक पोस्टर तयार केले आहे. त्याचा मथळा आहे

‘डॉक्टर ना मारा पण, बरोबरीने या सर्वांना पण मारा’

त्यातील दोन सूचना

अपघात: वाहन चालक, दोन वाहने असतील तर दोन चालक, खराब रस्त्यांची जबाबदारी ज्यांची आहे ते सर्व कामगार, इंजिनिअर, ते काम पास करणारे सरकारी अधिकारी आणि या सर्वांवर दिवसाची रात्र करून लक्ष ठेवणारे आपणच निवडून दिलेले लोकसेवक. तुटपुंज्या सुविधा असलेली रुग्णालये, जर दारू पिऊन अपघात झाला असेल तर दारू विकणारा आणि ती विकू देणारा. हे सर्व होऊनही त्याचा तपास त्रुटीसह करणारे पोलीस, कायद्याच्या कचाट्यातून त्यांना सोडविणारे वकील आणि सर्व समोर दिसत असूनही ‘फक्त समोरच्या पुराव्याचा विचार करणारी अंध न्यायदेवता’.

हृदयरोग: गेली अनेक वर्षे अयोग्य आहार घेण्यास भाग पडणारे, रोजचा व्यायाम करता येणार नाही अशी जीवनशैली लादणारे, आणि मानसिक ताणताणाव वाढवणारे सर्व.

अशी वेगवेगळ्या पद्धतीने मरणाला कारण ठरणार्‍या कारणांची यादी आणि त्यातील डॉक्टरांचे भागीदार अशा सर्वाना रुग्णाच्या मृत्युनंतर चोप द्यायलाच हवा. तसेच हल्ली पूर्वीसारखे सर्वज्ञ डॉक्टर तयार न करणारी विद्यापीठे. त्याचे कुलगुरू, कुलपती इत्यादी.

‘मोले घातले रडाया; नाही आसू, नाही माया’ अशा शब्दांची आपल्याकडे परंपरा आहेच. तसे मृत्यूनंतर सर्व संबंधितांना मारणाऱ्या एजन्सी तयार व्हायला हव्यात. म्हणजे त्यांच्याकडे मारामारीचे काम सोपवून, कारणीभूत सर्व घटकांना मार देता येईल आणि नातेवाईक स्वस्थ मनाने अंत्यविधीकडे लक्ष देऊ शकतील.

- डॉ. नितीन पाटणकर

(9223145555)

[email protected]

Updated : 20 March 2017 6:19 AM GMT
Next Story
Share it
Top