Home > मॅक्स ब्लॉग्ज > टीव्ही 'प्राईम टाईम' रिपोर्ट

टीव्ही 'प्राईम टाईम' रिपोर्ट

टीव्ही नाईन ( चावडी )

टीव्ही नाईनच्या चावडी या कार्यक्रमात मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी समाजात महिलांच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य केलं. महिलांनी महत्वाकांक्षी असायला पाहिजे. महिला मुळातच मल्टीटास्कींग असतात. पण, त्यांनी एखाद्या विषयावर फोकस करून काम केलं पाहीजे असं त्यांनी सांगितलं. छेडछाडसारखे प्रकार थांबवण्यासाठी महिलांनी स्वतः एवढं कणखर राहीलं पाहीजे की समोरच्याची छेड काढण्याची हिंम्मतच होणार नाही. असं अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या.

महाराष्ट्र वन ( आजचा सवाल )

महाराष्ट्र वनच्या आजचा सवाल या कार्यक्रमात अवैध गर्भपात आणि भ्रूणहत्या रोखण्यात सरकारला अपयश येतंय का? या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी भाजप प्रवक्त्या कांता नलावडे यांनी जिल्हा परिषद आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केलयं का हे पाहावं लागेल असं म्हंटलं. तसंच स्थानिक ग्रामपंचायतीलाही त्यांनी त्यासाठी जबाबदार धरलंय. सीमावर्ती भागात हे घडलं असल्यानं त्याचा गांभिर्यानं विचार व्हावा असंही त्यांनी म्हंटलं. त्यावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी म्हैसाळ मधल्या या घटनेची कल्पना आजूबाजूच्या लोकांना, यंत्रणा किंवा इतर कुणालाच नसेल यावर विश्वास बसत नाही असं म्हंटलं. अशा घटनांविरोधात सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. चर्चेत सहभागी झालेल्या अॅड. मनीषा तुळपुळे यांनी आरोग्य यंत्रणांसोबत नातेवाईक आणि समाजही अशा घटनांसाठी जबाबदार असल्याचं म्हंटलं. तर दै. पुण्यनगरीच्या मुख्य संपादक राही भिडे यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांवर बोट ठेवलं. तसंच अशा प्रकरणांमध्ये राजकारणी-डॉक्टरांची मिलीभगत असल्याचा संशय व्यक्त केला. काँग्रेस प्रवक्त्या निला लिमये यांनी महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या विकासाबाबत चर्चा करण्या ऐवजी म्हैसाळ सारख्या प्रश्नावर चर्चा करतोय ही खरचं दुर्देवाची बाब आहे असं मत मांडलं.

साम टीव्ही (आवाज महाराष्ट्राचा)

साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात मंगळवारी म्हणजेच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सभागृहातील 'ती' या विषयावर चर्चा करण्यात आली. सभागृहात जाऊन ही चर्चा करण्यात आली. २८८ आमदारांच्या विधानसभेत महिला आमदार फक्त २२, तर ७८ आमदारांच्या विधानपरिषदेत अवघ्या चार! या २६ पैकी आठ महिला आमदारांशी यावेळी संवाद साधण्यात आला. हुस्नबानो खलिफे, वर्षा गायकवाड, मनीषा चौधरी, डॉ. भारती लव्हेकर, सुमन पाटील, दीपिका चव्हाण, विद्या चव्हाण, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी हा संवाद साधण्यात आला. यापैकी अनेक महिला आमदारांना अश्लील मेसेज पाठवले गेले आहेत. म्हैसाळमधील घटनेचे सावट या महिला दिनावर आहे. आमदार प्रशांत परिचारक यांच्या विधानाने अस्वस्थता आहे. अशा या वातावरणात महिलादिन साजरा होत आहे. असे अनेक मुद्दे यावेळी महिला आमदारांनी मांडले.

Updated : 7 March 2017 5:54 PM GMT
Next Story
Share it
Top