Home > मॅक्स ब्लॉग्ज > स्पेशल रिपोर्ट : अभयारण्यात भय

स्पेशल रिपोर्ट : अभयारण्यात भय

स्पेशल रिपोर्ट : अभयारण्यात भय
X

परदेशी पक्षांचं माहेरघर असलेलं जायकवाडीचं आंतरराष्ट्रीय पक्षी अभयारण्यं, धरणाच्या पाणथळ जमिनीवर झालेल्या शेतीच्या अतिक्रमणामुळे संकटात सापडलंय. दरवर्षी लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या परदेशी पक्षांनी यावर्षी मात्र जायकवाडीकडे पाठ फिरवलीय. शेतीचं अतिक्रमण, वृक्षतोड, रासायनिक खतांचा वापर, अनावश्यक पाण्याचा उपसा आणि बेसुमार मासेमारी या कारणांमुळे जायकवाडीचं पक्षी अभयारण्य आता नामशेष होतं की काय, अशी भीती निर्माण झालीय.

आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख असेलेलं जायकवाडी धरण. शेकडो किलोमीटरपर्यंत पसरलेलं विस्तीर्ण पाणी. उंचच उंच झाडं, असंख्य पाणवठे आणि अत्यंत पोषक पाणथळ जमीन. त्यामुळेच देशी-परदेशी पक्षांचं हे हक्काचं माहेरघर. दरवर्षी थंडीच्या काळात याच धारण परिसरात लाखो परदेशी पक्षांचा चिवचिवाट सुरु असतो. पण यावर्षी मात्र शांतता पसरलीय. त्याची कारणं याच परिसरात दडली आहेत. हा धरण परिसरात फिरताना ही कारणं लगेचंच लक्षात येतात. जी प्रचंड अस्वस्थ करणारी आहेत.

हा आहे जायकवाडीच्या पाणथळ जमिनीचा परिसर...ज्या पाण्याच्या उथळ परिसरात लहान लहान माश्यांची दाटी, आणि त्यांना मटकावणाऱ्या पक्ष्यांची गर्दी असायला हवी. पण, इथे मात्र शेकडो एकरावर उभा आहे तो ऊस. ( फोटो)

जायकवाडी परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी, बॅक वॉटर परिसरात शेकडो एकर जमिनीवर अतिक्रमण करून शेती सुरु केलीय. परिणामी पक्षांची हक्काची जमीन हिरावली गेलीय. पाणथळ जमिनीवर सूर्यकिरणं जमिनीपर्यंत पोचतात. त्यातून शेवाळ निर्मिती होते. त्याला खाण्यासाठी माश्यांची दाटी आणि पर्यायायने पक्षांची गर्दी होते. पण, इथे मात्र ऊस उभा असल्याने, पक्षांची ही अन्नशृंखलाच मोडीत निघालीय.

शेतीच्या अतिक्रमणाबरोबरच इथे आणखी एक संकट घोंगावतंय ते रासायनिक खतं आणि किटकनाशकांचं. ऊसाचं भरमसाठ उत्पादन घेण्यासाठी इथल्या जमिनीवर शेकडो क्विंटल खतं आणि किटकनाशकांचा मारा केला जातोय. ज्याचे विषारी घटक पाण्यात मिसळून जैवविविधेचा नाश करत आहेत. किटकनाशकांचा तर इथे अक्षरशः पाऊस पाडला जातोय. शेतातलं तन जाळण्यासाठी राऊंडप सारखं अत्यंत विषारी रासायनही फवारलं जातंय. ज्यामुळे फक्त तणच नाही तर सूक्ष्म जीवांचे असंख्य बीजकोश सुद्धा नष्ट होताय आहेत. ज्याचा विपरीत परिणाम पक्ष्यांवर होतोय.

इंग्लंड, फ्रान्स, रशिया, दक्षिण अफ्रिका, भूतान, लडाख, बलुचिस्तानसह अनेक देशांमधून या ठिकाणी पक्षी येत असतात. त्यात मुख्यतः स्पून बिल, व्हाइट आयबीज, ग्लासी आयबीज, पोचार्ड, स्पॉट बिल, गोल्डन डक, कुट, गल, बार हेडेड, गुज, किंगफिशर, पाइड किंगफिशर, स्मॉल ब्ल्यू, व्हाइट थ्रोट, फ्लेमिंगो या पक्षांचा समावेश आहे.

परदेशी पक्षी हे लाखो किलोमीटरचा प्रवास करत भारतात येतात, यात त्यांचा प्रमुख उद्देश असतो तो म्हणजे प्रजननाचा. जायकवाडी धरणावर मात्र या पक्षांना प्रजनन करता येईल, अशी परिस्थितीच दिसत नाहीय. कारण, पाणथळ जमिनीवर शेतीचं अतिक्रमण झाल्यामुळे अंडी घालण्यासाठी आवश्यक असणारी झाडं झुडपं तोडली गेलीयेत. मानवी वावर वाढलाय. त्यामुळे पक्षी या भागात थांबतच नसल्याचं समोर येतय. गेल्यावर्षापर्यंत याठिकाणी येणाऱ्या पक्षांची संख्या ही अडीच लाखांच्या आसपास होती. यंदा मात्र ती ८० ते १ लाखापर्यंत खाली रोडावल्याचं अभ्यासक सांगत आहेत.

इथं होणारी बेसुमार मासेमारी सुद्धा आहे त्या पक्षांच्या मुळावर उठलीय. जायकवाडीच्या बॅकवाटर परिसरात फिरताना इथं पारंपरिक मासेमारी करणाऱ्या "कहार" समाजाच्या असंख्य वस्त्या पाहायला मिळतात. जे लोक रोज मोठ्याप्रमाणात मासेमारी करतात. जायकवाडी धरणाचे नियमित निरीक्षक दिलीप भगत सांगतात “जयकवाडीतून रोज ट्रकच्या ट्रक झिंगे विक्रीसाठी जातात. झिंगे हेच तर पक्ष्यांचं प्रमुख खाद्य असतं आणि त्याचीच जर अशी लूट होत असेल तर, हे अभयारण्य कस काय टिकेल?”

हे असंच सुरू राहीलं तर मात्र जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या कथा पुढच्या पिढीला पुस्तकातूनच वाचाव्या लागतील.

- दत्ता कानवटे

Updated : 25 Jan 2017 10:57 AM GMT
Next Story
Share it
Top