Home > मॅक्स ब्लॉग्ज > जस्टिस अभय ओक निष्पक्षच!

जस्टिस अभय ओक निष्पक्षच!

जस्टिस अभय ओक निष्पक्षच!
X

जस्टीस अभय ओक , खरंच डॅशिंग व्यक्तिमत्व! भाषेवर प्रचंड प्रभुत्व , कुठलाही विषय नीट समजून घेऊन मगच त्यावर निर्णय देणार पण निर्णयाला अजिबात उशीर होणार नाही याची नेहमीच खबरदारी घेणारे निस्पृह न्यायाधीश. ओक यांच्या कोर्टरूममध्ये कोर्ट स्टाफची किती धावपळ होत असते ते तिथं प्रत्यक्ष हजर असणाऱ्यांनाच माहिती, जस्टीस ओक नाव ऐकताच वकिलांना घाम फुटतो. ओक यांच्यासमोर सुनावणीत अजिबात टाईमपास नाही की, विषय सोडून एक अक्षरदेखील तोंडातून निघणार नाही. त्यांचे वागणेच असे शिस्तबद्ध आहे की वातावरणात आपोआप शिस्त येते.

मी आयुष्यात सर्वप्रथम उच्च न्यायालयात उभे राहिलो ते नेमके त्यांच्याच समोर. त्यांचा दरारा ऐकून हिंमत होत नव्हती म्हणून अॅड. शंतनू चंद्राते या मित्राला बरोबर उभे राहण्याची विनंती केली. शंतनू आला देखील. माझ्या खटल्यात प्रतिपक्ष खुद्द भारत सरकार होते समोर त्यांचे तीन निष्णात वकील असल्यामुळे माझ्यावर दडपण होते. अॅड शंतनू मला म्हणाला आपल्या केसमध्ये मेरीट आहे, हे साहेब मेरीट बघूनच ऑर्डर करतात. कधीच कसलाही पक्षपात करत नाहीत, मी घाबरत हळूहळू युक्तिवाद सुरु केला. जस्टिस अभय ओक आणि जस्टिस मृदुला भाटकर असे बेंच होते. विनाकारण असे वाटत होते की कोणत्याही क्षणी साहेब माझे ब्रीफ फेकून देतात की काय, पण स्वत: न्यायमूर्ती अभय ओक यांनी माझी बाजू थोडक्यात समजून घेतली आणि समोरच्या वकिलांना ते कसे चुकीचे वागत आहेत हे समजावून सांगितले. एवढंच नाही तर 24 तासात माझ्या अशिलाला न्याय देण्याचा आदेश दिला आणि ताबडतोब केस हातावेगळी केली आणि आम्ही दोघे ओब्लाइज युवर ऑनर असे म्हणत बाहेर पडलो.

हा प्रसंग मला नेहमीच आठवत असतो, त्यावेळी मला मी नवीन अथवा कनिष्ठ असल्याचे जाणवले देखील नाही, कारण जस्टिस ओक यांचा माझ्याकडे आणि दुसऱ्या वकिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी समान होता. मी पहिल्यांदा उभा राहतोय हे त्यांच्या नजरेमुळे मीच विसरून गेलो होतो. फार आनंद झाला आणि छाती भरून आली होती, बाहेर आल्याबरोबर शंतनू मला म्हणाले "देखा समीर भाई मैंने बोला था ना साहब सिर्फ मेरीट देखते है " मी आनंदाने त्यांची गळाभेट घेतली,. अशीलदेखील खूश होता. मोठमोठे वकील ओक यांच्यासमोर अदबीने वागतात , त्यांच्या ज्ञानाचे कौतुक आणि आदर उच्च न्यायालयातला प्रत्येक वकील करतो. त्यांच्या कामाचा उरकही अतुलनीय आहे

अशा निष्णात, निःपक्षपाती न्यायाधीशांवर पक्षपातीपणाचा आरोप करणे हा धक्कादायक प्रकार आहे. सत्ताधा-यांकडून न्यायव्यवस्थेत ढवळाढवळ करण्याचा आणि न्यायालयावर दबाव आणण्याच्या या प्रकाराचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये !

अॅड. समीर शेख

Updated : 25 Aug 2017 3:08 PM GMT
Next Story
Share it
Top