Home > मॅक्स ब्लॉग्ज > जपान अण्वस्त्र निर्माण करणार?

जपान अण्वस्त्र निर्माण करणार?

जपान अण्वस्त्र निर्माण करणार?
X

अलिकडेच वॉल स्ट्रीट जर्नलच्या अंकातल्या संपादकीय लेखानं एक मोठा प्रश्न उपस्थित केलाय. असुरक्षितता वाढल्यानं जपान अण्वस्त्रनिर्मिती करेल काय? हे संपादकीय सुप्रसिद्ध राजकीय अभ्यासक वॉल्टर रसल्स यांनी लिहिलं होतं. उत्तर कोरिया किंवा चीनच्या विस्तारवादी धोरणाविरोधात अमेरिका निर्णायक भूमिका घेत नसल्यानं जपानपुढे अण्वस्त्र निर्मिती खेरीज पर्याय शिल्लक नाही राहाणार, अशी भूमिका वॉल्टर यांनी या संपादकीयाच्या माध्यमातून मांडली आहे. आशियाची सुरक्षा वाऱ्यावर टाकत अमेरिकेनं या प्रदेशातून परतण्याचं ठरवल्यामुळे आता आशियाचा वाली कोण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच बरोबर अण्वस्त्रधारी आशिया निर्माण करण्याचं डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाचं स्वप्न तर नाही, अशी शंका उपस्थित होते. जपानचं सुरक्षाछत्र अमेरिकेनं काढून घेतल्यास जपान खरोखर अण्वस्त्र निर्मिती करेल आणि दक्षिण कोरिया आणि तैवानला देखील जपानच्या पावलावर पाऊल ठेवण्यास मागे राहाणार नाही असं चित्र सध्या पूर्व आशियात निर्माण झालं आहे.

अण्वस्त्र तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता जपानकडे आहे. अगदी अल्पावधित जपानला अण्वस्त्र निर्माण करता येऊ शकतं. ही क्षमता असतानाही जपान या दिशेनं वाटचाल करेल? या प्रश्नाला संमिश्र उत्तर मिळण्याची शक्यता अधिक आहे.

त्यातही नाही म्हणणाऱ्यांची संख्या जास्त असेल. अगदी काही महिने किंवा एखाद वर्षात जपान अणुबॉम्ब सहज निर्माण करू शकेल. या बॉम्बचा राजकीय आवाज संपूर्ण आशियाच नव्हे तर जगाला कानठळ्या बसवणारा ठरेल यात शंका नाही. हा बॉम्ब प्रतिबंधक सिद्धांताच्या पातळीवर खरा उतरेल काय हा दुसरा प्रश्न निर्माण होतो. बहुतेक राष्ट्र या सिद्धांताला धरूनच अण्वस्त्र निर्मिती करता. भारताची अण्वस्त्रनिर्मिती देखील त्याच सिद्धांताला धरून आहे.

अण्वस्त्र निर्मितीनंतर जपानला वारंवार त्याच्या चाचण्या घ्याव्या लागतील. महासंगणकाच्या या युगात या चाचण्या सहज शक्य आहेत. पण त्या बॉम्बची क्षमता, विश्वासार्हता तपासण्याकरिता अनेक चाचण्यांची आवश्यकता भासणारच. या चाचण्याही झाल्या तर हा अणुबॉम्ब वायुदलात तैनात कसा करणार हा तिसरा प्रश्न आहे. जपानकडे तशा प्रकारची विमानं वायुदलात नाही. म्हणजे त्यांना विमान निर्मितीत देखील पैसा ओतावा लागणार.

आंतराळ तंत्रज्ञान हे जपानचं उत्तम विकसित क्षेत्र आहे. यामुळे त्यांना आण्विक क्षेपणास्त्र निर्माण करता येऊ शकतं. पण याकरिता देखील त्यांना शून्यातून सर्व काही उभं करावं लागणार आहे. कारण अंतराळात झेपावणारे रॉकेट आणि क्षेपणास्त्राचे रॉकेट यांच्यामध्ये बराच फरक असतो. नौदलामध्ये किंवा भूदलातही क्षेपणास्त्र तैनात केल्यास त्या प्रकारच्या पाणबुड्या निर्माण कराव्या लागतील किंवा मोकळी जागा शोधावी लागेल. जपान लहान देश आहे. त्यातून भूकंपप्रवण आणि दाट लोकवस्तीचा देश म्हणून ओळखला जातो. यामुळे भूदलात देखील अण्वस्त्र तैनात केलास त्या भागाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जनता देखील अशा अण्वस्त्रांच्या छायेत राहाण्यास विरोध करेल.

त्यातूनही मार्ग काढल्यास हे सर्व दिसतं तितकं सोपं जाणार नाही जपानला. कोट्यवधींची माया या सर्वाकरिता लागेल अगदी विकसित राष्ट्रांना देखील अशा सुरक्षा यंत्रणा उभारण्याकरिता अब्जावधी डॉलर मोजावे लागले आहेत. त्या पश्चात त्या अण्वस्त्रांच्या सुरक्षेवर देखील बराच पैसा खर्च करावा लागणार.

अण्वस्त्रांची सुरक्षा म्हणजे त्या संबंधीच्या सर्व पायाभूत सुविधांचा विकास करावा लागणार. अण्वस्त्रांची चावी कोणाकडे असेल या संबंधीचं धोरण आखावं लागेल. ही अस्त्रं चुकीच्या लोकांच्या हाती लागून विध्वंस होऊ नये म्हणून सहजगत्या न मोडता येणारी संगणकीय सांकेतिक प्रणाली निर्माण करावी लगेल. हे सगळं करताना अमेरिका काही मदत देईल असं वाटत नाही. ज्या प्रकारे कुठलीही निर्णायक भूमिका अमेरिकेनं आत्ता घेतली नाही त्याच प्रमाणे अमेरिका अण्वस्त्र निर्मिती करणाऱ्या जपानला साथ देणार नाही.

जपानी लोकांचा प्रतिसादही तेवढाच महत्त्वाचा ठरणार आहे. प्रखर राष्ट्रवादी असलेले काही लोक अण्वस्त्रनिर्मिती करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं समर्थन करतील पण असे लोक संख्येनं फार कमी आहेत. बहुतांश जपानी नागरिक अण्वस्त्रांच्या विरोधातच उभे राहातात. जपान म्हटलं की हिरोशिमा व नागासाकी हे व एवढंच आठवतं. पण ते अपिरहार्यही आहे. अण्वस्त्र म्हणजे सर्व नाशाच्या दिशेनं वाटचाल ही शिकवण जपानी नागरिकाला आजही दिली जाते. कारण आजही लोकांसमोर संहाराचे परिणाम स्पष्ट आहेत. यामुळे सरकारनं कितीही प्रयत्न केला तरी लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही. पण‘जपान एक अण्वस्त्र शक्ती’ ही कल्पना अगदीच अकल्पनीय आहे, असंही नाही. पण असं झाल्यास जगभरात राजकीय वादळ निर्माण होईल यात शंका नाही.

कौस्तुभ कुलकर्णी

Updated : 15 Sep 2017 2:40 AM GMT
Next Story
Share it
Top