Home > मॅक्स ब्लॉग्ज > चीनचा भगतसिंग : ल्यु झिआबो

चीनचा भगतसिंग : ल्यु झिआबो

चीनचा भगतसिंग : ल्यु झिआबो
X

चीनने अल्पावधीत थक्क करणारी आर्थिक प्रगती केली. अमेरिका, युरोपियन युनियननंतर चीन जागतिक महासत्ता म्हणून वेगाने पुढं येत आहे. मात्र नागरिकांच्या मानवी अधिकारांचा आणि स्वातंत्र्याचा गळा घोटून चीनने केलेली ही प्रगती साध्य केली आहे याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतो. 1989 मध्ये बिजिंगमध्ये तियेनमान चौकात लोकशाहीसाठी निदर्शने करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना चीन सरकारनं रणगाड्याखाली चिरडून टाकलं. त्यांनतर सुरु झालेली कम्युनिस्ट सरकारची दडपशाहीने आता अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलंय.

जसा जसा चीन आर्थिक, लष्करी महासत्ता म्हणून उदयास येत आहे , त्याच वेगाने दडपशाही वाढत चालली आहे. लोकशाहीसाठी चळवळ करणाऱ्या, आग्रह धरणाऱ्या हजारो विचारवंत, लेखक, मानवी अधिकार कार्यकर्त्यांची चिनी सरकारने जेलमध्ये रवानगी केली. त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा छळ चालवला गेलाय. कित्येकांना फासावर चढवलं गेलंय. याचं परंपरेतील लोकशाहीसाठी आग्रह धरणारे विचारवंत, लेखक असलेल्या ल्यु झिआबो यांना जेलमध्ये मरण आलं आणि चिनी दडपशाहीच एक वर्तुळ पूर्ण झालं. ल्यु झीआबो जन्माने कम्युनिस्ट होते. मात्र विचारांने परीपक्व होताच त्यांना चिनी सरकारच्या ध्येय धोरणावर प्रश्न पडायला लागले. देश ज्या गतीने मुक्त आर्थिक व्यवस्थेकडे वाटचाल करतोय त्या गतीने लोकशाही संदर्भातल्या सुधारणा का होत नाही ? असे प्रश्न ते उपस्थित करायला लागले. लोकशाही विचारसरणी हा चीनमधला सर्वात मोठा गुन्हा म्हणजे राष्ट्रद्रोह समजला जातो.

1989 मध्ये तियेनमान चौकात विद्यार्थ्यांच आंदोलन सुरु झालं तेव्हा ल्यु अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापिठात अध्यापन करत होेेते. आंदोलनाबद्दल ऐकताच या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी ते बिजिंगमध्ये दाखल झाले. खरं तर ल्यु हात राखून म्हणजे अमेरिकेतून या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देऊ शकत होते. मात्र आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालो नाही तर लोकशाहीबद्दल बोलण्याचा आपल्याला कुठलाच नैतिक अधिकार नाही असं ल्यु यांचं स्पष्ट मत होतं. या आंदोनादरम्यान समजदार भूमिका घेत, लष्करी अधिकाऱ्यांशी बोलणी करत, त्यांनी कित्येक विद्यार्थ्यांना, जखमींना सेफ पॅसेज मिळवून दिला आणि त्यांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. सरकारच्या दडपशाहीविरोधात त्यांनी 3 दिवस तियेनमान चौकात उपोषण केलं. या आंदोलनानंतर चीन सरकारनं ल्यु यांचा समावेश बंडखोरांच्या यादीत केला समावेश केला त्यांना ब्लॅक हॅन्ड असं टोपण नाव देण्यात आलं आणि सुरु झाली ल्यु यांच्यावर सरकारी अत्याचाराची कहाणी.

3 वर्षाच्या तुरुंगवासानंतर ल्यु यांनी लोकशाहीच्या लढ्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. कित्येक पुस्तकं लिहिली. या सर्व पुस्तकांवर चीनी सरकारने बंदी घातली, मात्र ही पुस्तकं परदेशात प्रकाशित झाली. चीन सरकारने ल्यु यांच्यावर कायम पाळत ठेवली. वेळोवेळी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं, परदेशात जाण्यास बंदी घातली गेली. या परिस्थिती त्यांनी लोकशाहीचं चार्टर ड्राफ्ट केलं. चीनमधल्या नागरिकांच्या अधिकाराची ही सनद होती. या चार्टरवर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी ल्यु यांनी बिजिंग शहर पालथं घातलं. सुरुवातीला केवळ 300 नागरिकांनी भीत भीत स्वाक्षऱ्या केल्या. शेवटी या मोहिमेला यश आलं आणि जवळपास 5 हजार लेखक, विचारवंतांनी या चार्टरला आपला पाठिंबा दिला. स्वाभाविकच या मोहिमेसाठी 2008 मध्ये चीन सरकारे ल्यु यांना 11 वर्षाची शिक्षा सुनावली. खटल्याच्या सुनावणीदरम्यान ल्यु यांना बोलण्यासही मज्जाव करण्यात आला होता. मात्र या काळात लिऊ चीनमधल्या बंडखोरीचे सर्वात जिवंत प्रतिक झाले होते.

तुरुंगात असताना ल्यु यांना नोबेल पारितोषिक जाहीर झालं. मात्र चीन सरकारने नोबेल स्वीकारण्यासाठी त्यांंना तुरुंगातून सोडायला ठाम नकार दिला. या उलट हा पुरस्कार दिल्याबद्दल टिकाच केली. ल्यु यांच्या पत्नीला पुरस्कार स्वीकारण्याची परवानगी नाकारण्यात आली. पुरस्कार सोहळ्यात ल्यु यांची खुर्ची रिकामी ठेवून नोबेल समितीने त्यांचा यथोचित सन्मान केला आणि चीनचे वाभाडे काढले. एवढा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याची कल्पना ल्यु यांना नव्हती. तुरुंगात भेटायला गेलेल्या त्याच्या पत्नीने ही बातमी त्यांना सांगितली, त्यावेळी तियेनमान चौकात लोकशाहीकरिता लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हा पुरस्कार समर्पित करतो असे लिऊ म्हणाले.

काही महिन्यांपूर्वी त्यांना यकृताचा कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं, तरीही त्यांची सुटका करण्यास किंवा त्यांना परदेशात उपचार घेऊ देण्यास सरकारने स्पष्ट नकार दिला होता. अखेर सरकारच्या देखरेखीखाली ल्यु यांच्यावर थातुरमातुर उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांना भेटायला बंदी होती, त्यांच्या पत्नीला घरी नजरकैदेत ठेवण्यात आलं होत. आपल्या नवऱ्याच्या उपचाराबद्दल कुणासोबत बोलण्यासही त्यांना मनाई करण्यात आली होती. मात्र जगभरातून लिऊ यांच्या प्रकृतीबाबत विचारणा होत होती. त्यामुळे एका व्हीडिओच्या माध्यमातून ल्यु यांच्या आजाराबद्दल त्यांनी अशा प्रकारे त्रोटक माहिती दिली होती," Can’t operate, can’t do radiotherapy, can’t do chemotherapy.”

ल्यु यांच उभं आयुष्य संघर्षात गेलं. एका अजस्त्र यंत्रणेशी, अंत नसणारी लढाई ते लढत होते. मात्र लिऊ यांनी शेवटच्या क्षणापर्यंत गुडघे टेकवले नाही. त्यासाठी हाल अपेष्टा, छळ सहन केला. या सर्व लढ्यात त्यांच्या पत्नीने त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. ल्यु यांचं आपल्या पत्नीवर खूप प्रेम होतं. आपला अंत जवळ आला असं झिआबो यांना जेव्हा कळलं, तेव्हा पत्नीवर प्रेम व्यक्त करतांना ते म्हणाले, “Even if I am crushed into powder, I will embrace you with ashes,” “Dearest, with your love, I will calmly face the impending trial, with no regrets for my choices, and will look forward with hope to tomorrow.”

आतापर्यंत इतिहासात दोन नोबल पुरस्कार विजेत्यांचा शिक्षा भोगतांना तुरुंगातच मृत्यू झाला. 1938 मध्ये फॅसिसमला विरोध करणाऱ्या जर्मनीच्या कार्ल वाँन हा नोबेल पुरस्कार विजेता जेलमध्येच खितपत मरण पावला. त्यानंतर लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या ल्यु झिआबो यांचा अशाच मरणयातना सहन करतांना मृत्यू झाला. काही वर्षांनंतर जेव्हा चीनचा इतिहास नव्याने लिहिला जाईल, तेव्हा ल्यु कदाचित चीनचे भगतसिंग म्हणून पुढे येईल...कदाचित त्याचं लोकशाहीचं स्वप्न प्रत्यक्षात उतरेल...

विनोद राऊत, मुंबई.

99300 21448

Updated : 14 July 2017 1:00 PM GMT
Next Story
Share it
Top