Home > मॅक्स कल्चर > चित्रकला – समाज घडवण्याचे प्रभावी माध्यम

चित्रकला – समाज घडवण्याचे प्रभावी माध्यम

चित्रकला – समाज घडवण्याचे प्रभावी माध्यम
X

चित्रकला हे बहुजनांकडून दुर्लक्षित केलं गेलेलं किंबहुना अभिजनांनी प्रयत्नपूर्वक दूर ठेवलेलं क्षेत्र वाटतं. चित्रकला क्षेत्रात भारतातच नव्हे तर जगभरात मोठाल्या, अर्थपूर्ण चळवळी झाल्या, बंड झाली. पण बहुजनांना त्याची कधी दखल घ्यायची संधी नाही मिळाली. मुळात चित्रकार चित्र का काढतो याचंच उत्तर बहुतांश समाजाला मिळालेलं नाही असं वाटतं. सुंदर रंगसंगती, अलंकरण, निसर्गचित्र, हुबेहूब नक्कल किंवा वास्तववादी चित्रण याही पलीकडे कला काय असू शकते हे समजून घेणं फार आवश्यक आहे. तसंच लहान मुलं त्यांच्या वयाप्रमाणे विविध वाढीच्या टप्प्यांमध्ये कशी चित्र काढतात याचे काही जागतिक आयाम अभ्यासले गेले आहेत, तेही समजून घेतले पाहिजेत. नाहीतर पाच - सहा वर्षाच्या मुलांचा हात धरून आकारांमध्ये रंग भरायला लावून, गिरवून आणि फक्त हुबेहूब चित्रणासाठी प्रोत्साहन देऊन माणसातली खरी चित्रकलेची अभिव्यक्ती कधी बाहेरच येऊ शकणार नाही.

नैसर्गिकपणे मूल जे चित्र काढतं ते समजून घेणारे अजूनही फक्त मूठभरच लोक आहेत. पहिला शब्द बोलण्याआधी जर मूल चित्र काढू लागतं तर त्या अभिव्यक्तीला समजून घेण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय याची जाणीव झाली, तर ती उणीव भरून काढण्यासाठी काही प्रयत्न आपण पालक, शिक्षक, समाज म्हणून करू शकू. पुण्यातील सार्वजनिक भिंतींवर मागे ५० मुलांना सोबत घेऊन आम्ही बालसुलभ चित्र काढली. चित्रांतून जणू आपल्या शहरातील लहानग्यांचं प्रतिनिधित्व करणारी निर्मळ, निरागस चित्र जवळ जवळ १५० फुटी लांबीच्या भिंतीवर उमटली. प्रत्येक मुलाची आपापल्या चित्रामागची काही एक कथा निर्माण झाली. एका चिमुकल्याने हातात ब्रश घेऊन फक्त एक दोन फटकारे भिंतीवर मारले आणि आजही तिथून जाताना त्याला आठवण होते की इथे मी ब्रश हातात घेतला होता. पाच पोरींनी मिळून स्वतःच्या आकाराहून मोठं इतकं सुरेख चित्र तयार केलं की येणारे जाणारे त्या चित्राच्या पार्श्वभूमीवर स्वतःचे फोटो घेऊ लागले. पन्नास मुलं आपापल्या गोष्टींनी त्या भिंतीशी जोडली गेली. स्वतःचं शहर, ती जागा आवडण्याचं या मुलांना आणि त्यांच्या नातेवाईकांना एक सुरेख कारण मिळालं ते या समूहचित्रातून. साधारण सहा महिन्यांनी अचानक एक दिवस त्या सुरेख भिंतींवर आकाशी रंग मारून त्यावर उपदेशपर लिखाण केलेलं आढळलं. एकसुरी पानाफुलांनी त्या भिंतींची आधीची उत्स्फूर्त गंमत घालवून टाकली.

यात दोन गोष्टी घडल्या. एक तर सौंदर्य लहान मुलांच्या उत्स्फूर्त रंगीबेरंगी चित्रात नसून, एकसुरी आणि कंटाळवाण्या चित्रांत आहे, हा विचार लादला गेला. सुमार दर्जाची रसिकता जोपासायला खत पाणी घातलं गेलं. आणि दुसरं म्हणजे ज्या मुलांना आपली चित्र भिंतींवर उमटल्याचा आनंद वाटत होता, शहराशी अतिशय वेगळ्या नात्याने जोडलं गेल्यासारखं वाटत होतं, त्या ५० मुलांना आणि त्यांच्या ५०० नातेवाईकांना वाटणारा अभिमान पायदळी तुडवला गेला. शासनकर्त्यांनी भावी नागरिकांचा विश्वास आत्ताच गमावला.

असं घडू नये यासाठी अनेक स्तरांवर काम करण्याची गरज आहे. निर्णय घेणाऱ्यांपासून, प्रत्यक्ष रंगवणाऱ्या रंगाऱ्यांपर्यंत कोणालाही वाटलं नसेल की ही चित्र झाकून टाकायला नकोत? मुलांना काय हवंय, समाजाला काय हवंय याचा विचार सार्वजनिक ठिकाणी तर आवर्जून केला जायला हवा. इथेच संबंध येतो तो सौंदर्यदृष्टी, सौंदर्य जाणीव कमकुवत असण्याचा. आणि हे अगदी शालेय पातळीपासून बदललं जायला हवं. केवळ आकारात रंग भरण्याच्या पलीकडे, रंग रेषांची भाषा मूल कशी वापरतं? बोलून सांगता न येणाऱ्या कुठल्या गोष्टी मूल चित्रातून व्यक्त करू शकतं? आणि चित्र काढण्याच्या प्रक्रियेतून मूल किती मोकळं होतं, आनंदी होतं, समाधानी आयुष्य जगू शकतं याची समज येईल, अनुभूती येईल अशा प्रकारे चित्रकला हाताळली गेली पाहिजे, शिकवली गेली पाहिजे. केवळ तंत्र सुधारण्यावर भर दिल्याने अनेकांचा लहानपणापासून असा गैरसमज करून दिला जातो की त्यांना चित्र काढता येत नाहीत. जणू काही रंगांत खेळणं हा गुन्हाच असावा. चित्र काढण्याच्या प्रक्रियेत समरसून जाणं आणि त्यातून चित्र तयार करणं अगर न करणं यातून शरीरात जे शांततेचे, समाधानाचे, आनंदाचे आणि सृजनाचे रस पाझरतात त्याचा आयुष्यभर फायदा होत राहतो. केवळ विज्ञान आणि गणित येऊन आयुष्य आनंदी होऊ शकत नाही हे समजून घेण्याची वेळ आली आहे. कलेची अशी जोड जर लहान थोर सर्वांनी आपल्या आयुष्याला दिली तर राग-लोभ दूर सारून आनंदी, समाधानी आयुष्य जगणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढेल, याची खात्री वाटते.

येत्या २५ वर्षांत जर समाजात कला जाणिवा रुजवण्यासाठी काही प्रयत्न करायचे असले तर अगदी शालेय पातळीपासून व्यावसायिक पातळीपर्यंत सर्व समाज घटकांना डोळ्यासमोर ठेवून आराखडा आखायची गरज आहे. यांत अनेक गोष्टी करण्याजोग्या आहेत. राष्ट्रगीत हे संगीतातील उदाहरण पाहूया. ते सर्वांना परिचित आहे आणि सर्वांना म्हणता येतं तसं राष्ट्रीय चित्र असायला हवं. त्यासाठी समूहगान या संकल्पनेप्रमाणे समूहचित्र ही संकल्पना अनेक ठिकाणी अनेकांनी राबवायला हवी. लोककलांमध्ये समूहचित्र हा विचार अनेक वर्षांपासून जपला गेला आहे, त्याचं केवळ बाजारीकरण न करता त्याची जनसामांन्यांवरील परिणामकारकता लक्षात घेतली पाहिजे. सार्वजनिक भिंती घाण करणं बंद तर व्हावंच आणि त्या भिंतीविषयी आपुलकी वाटावी यासाठी त्या त्या भागातील सामान्य माणसांच्या समूहाने त्या भिंतीवर सुंदर चित्र काढली पाहिजेत. ती जतन व्हावीत याकरता जनता आणि शासन दोंघेही तेवढेच बांधील हवेत. कोणीतरी बाहेरचा चित्रकार येऊन चित्र काढून गेला तर त्या भिंतीशी बघणाऱ्यांना नातं वाटत नाही, पण या चित्रात मी हे हे काढलंय असं म्हणताना त्या भिंतीची, चित्राची काळजी प्रत्येकजण घेतो. सामान्य माणसाची कलाविष्काराची खरी ताकद अजून अजमावलेलीच नाही, ती यातून समजेल.

हान मुलांसोबत काम करणारे शिक्षक आणि मुलांचे पालक यांच्यामध्ये चित्रकलेविषयी भान येण्यासाठी कार्यशाळांचं नियोजन केलं पाहिजे. १ वर्षाचं बाळ, ४ वर्षाचं मूल, ९ वर्षाचं मूल आणि १२ वर्षाचं मूल कुठल्या प्रकारची चित्र काढतं हे अभ्यासकांकडून समजून घेण्याच्या या कार्यशाळा असाव्यात. त्यात विशिष्ट वयातील मुलांची समज आणि गरज लक्षात घेऊन चित्र काढण्यासाठी कोणती साधनं उपलब्ध करून द्यावीत, काय करावं आणि काय अजिबात करू नये याबाबत जागृती करण्यावर भर असावा. अशा कार्यशाळा आत्तापर्यंत मी ज्या पालक आणि शिक्षकांसाठी विविध ठिकाणी घेतल्या त्यातून मुलांच्या चैत्रिक गरजा जास्त ठळकपणाने समजू लागल्या आणि मुलांना चित्रकलेची गोडी लागली आणि ती टाकूनही राहिली असा अनुभव आहे. चित्र काढायला जमत नाही किंवा आवडच नाही असं शंभरात एखादं मूल असू शकतं. त्याला जे आवडतं त्यातून चित्र निर्मितीचा आनंद घेण्यास मदत करता येते. पण जबरदस्ती कधीच करून नये. तसंच तुला चित्र जमतच नाहीत म्हणून कधी हिणवूही नये.

अजून एक महत्वाची गोष्ट करायला हवी, ती म्हणजे सर्वांची सौंदर्यदृष्टी घडवणं. काहींना उपजत देणगी असते आणि काहींचं सौंदर्य भान खरंच जास्त चांगलं असतं. पण सौंदर्यदृष्टीची जोपासना आणि मशागत दोन्हीही करणं अगदी शक्य आहे. यासाठी आर्ट अप्रिसिएशन सारखे खास उपक्रम शालेय अभ्यासक्रमातूनच शिकवण्यास सुरुवात झाली पाहिजे. एखाद्या कलाकृतीकडे तुम्ही कसं बघता, त्यातील आशय कसा समजून घेता, त्यातील रंग-रेषा तुम्हाला भावतात का, एखादी कलाकृती तुम्हाला का आवडत नाही, रंगातून काही भावना व्यक्त होतात का, इथपासून ते एखाद्या विशिष्ट रंगाचेच कपडे तुम्हाला का घालायला आवडतात, विशिष्ट रंगाचेच पडदे तुम्ही का निवडता, एकूणच आजूबाजूला दिसणाऱ्या रंगांना तुमची प्रतिक्रिया काय असते पर्यंत सर्व निर्णय समजून घेणं म्हणजेच आर्ट अप्रिसिएशन. यातूनच आपली सौंदर्य दृष्टी प्रतिबिंबित होत असते आणि घडतही असते.

या सौंदर्यदृष्टीला अजून अर्थपूर्ण आकार यावा यासाठी काही उपक्रम शाळाशाळांतून तसंच कामाच्या ठिकाणी राबवले तर समाजात चांगलं सौंदर्यभान निर्माण होईल अशी आशा वाटते. त्यातील एक उपक्रम अगदी पहिलीच्या लहानग्यांपासून वयस्क माणसांपर्यंत सर्वांनी करावा असा मी घेते. त्यात एखादाच चित्रकार निवडून त्याची/ तिची शंभरेक चित्र सर्वांनी एकत्र बघायची. चित्र बघताना त्या चित्रकाराचं आयुष्य समजून घ्यायचं, गोष्टी सांगायच्या. चित्रांत काही समान धागे आहेत का, काही ठराविक विषय आहेत का, एखादं चित्र काढताना त्याची मनस्थिती काय असेल, चित्रातील रंगसंगतीतून काही ठोकताळे मांडता येतात का, त्या चित्रकाराची ऐतिहासिक, भौगोलिक, राजकीय पार्श्वभूमी काय आणि त्याचा किती प्रभाव चित्रकारावर झाला होता. अशा असंख्य गोष्टींविषयी चर्चा करायची. एखादं चित्र पाहून आपल्याला काही म्हणावंसं वाटत असेल तर तेही जरूर सांगायचं, प्रश्न विचारायचे, उत्तरं शोधायची. आणि नंतर त्यातील काही चित्रांचे रंगीत प्रिंटस् घेऊन त्याचे लहान तुकडे कापून एका कोऱ्या कागदावर एक तुकडा याप्रमाणे प्रत्येकास देऊन त्या तुकड्यावरून स्वतःला हवं तसं परंतु अभ्यासलेल्या चित्रकाराच्या शैलीचं चित्र काढायचं. यातून रंग, रेषा, पोत, छायाप्रकाश, रचना या चित्रकलेतील मूलतत्वांचा अभ्यास होतो. आणि चित्रकार आपल्याला समजू लागतो. एखादा चित्रकार समजणं ही आयुष्यभराची प्रक्रिया आहे त्याची ही अतिशय चांगली सुरुवात होते. सौंदर्यशास्त्राचा पाया असा अतिशय सोप्या, सहज पद्धतीने रचता येऊ शकतो.

आत्तापर्यंत अनेक ठिकाणी घेतलेल्या या उपक्रमाचे परिणाम अतिशय आशादायी निष्पन्न झाले आहेत. चित्र समजण्यासाठी आणि काढण्यासाठी खूप मोठा आत्मविश्वास यातून अनेकांना मिळाला. चित्रकलेची गोडी निर्माण झाली. सुंदर आणि असुंदर यातील फरक करता येऊ लागला. आपणहून अनेक चित्र सुचू लागली आणि काढूनही पाहिली गेली. चित्रकाराचं आयुष्य किती अर्थपूर्ण आणि आशादायी असू शकतं हे समजल्यामुळे काहींना चित्रकार व्हावं असं वाटू लागलं. शास्त्रज्ञ होऊन अणूबॉम्ब बनवण्यापेक्षा चित्रकार होऊन शांती निर्माण करण्याची आजच्या अस्वस्थ जगाला जास्त गरज आहे.

आभा भागवत

Updated : 2 Feb 2017 7:14 PM GMT
Next Story
Share it
Top