Home > मॅक्स ब्लॉग्ज > गुजरातच्या निमित्तानं…

गुजरातच्या निमित्तानं…

गुजरातच्या निमित्तानं…
X

गुजरातमध्ये काँग्रेस निवडून येईल, असं सुरुवातीला कुणालाच वाटत नव्हतं. दीडशे जागा जिंकण्याचा दावा करून गुजरातला काँग्रेसमुक्तीच्या जवळपास नेणार असल्याचा अहंकार अमित शहा यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. म्हणजे निवडणुकीचा निकाल जवळपास ठरला आहे, निवडणूक ही केवळ औपचारिकता आहे, असेच चित्र निर्माण करण्यात आले होते. अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधी यांनी बदलून टाकलेले वातावरण हा या निवडणुकीतला ट्विस्ट होता.

विकास वेडा झाल्याची मोहीम राहुल गांधींच्या मदतीला आली. सोबत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर या बंडखोर तरुणांची साथ मिळाली आणि बघता बघता गुजरातमधलं वातावरण बदलून गेलं. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पुढे-मागे घडलेला एक प्रसंग आठवतो. राहुल गांधी यांनी काहीतरी विधान केलं होतं, त्यावर अमित शहा यांना एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हे सद्गृहस्थ म्हणाले होते की, राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देत नसतो. त्यावर आमचे प्रवक्ते बोलतील.अहंकार कुठल्या पातळीवर पोहोचला होता बघा. वर्षभराच्या आत अमित शहांसह त्यांचे बॉस नरेंद्र मोदी यांनाही राहुल गांधींच्या नावाचा सतत जप करावा लागला. हेच काँग्रेससाठी गुजरात निवडणुकीचं यश आहे.

मोदी-शहा यांच्यासमोर देशाच्या पातळीवर कुणीतरी ठामपणे उभं राहतं आणि त्यांच्या नजरेला नजर भिडवून आव्हान देतं ही लोकशाहीसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. एकीकडे मोदी औरंगजेब, शहाजहानपासून ते पाकिस्तानपर्यंत विखारानं भरलेली भाषणं करीत असताना राहुल गांधी मात्र, मोदीजी आम्ही तुम्हाला न रागावता, प्रेमानं हरवणार आहोत, असं सांगत होते तेव्हा दोन नेत्यांमधला आणि त्यांच्या संस्कृतींमधला फरक जाणवत होता.

राहुल गांधींनी जानवं घालू दे नाहीतर करदोडा बांधू दे, त्यांनी भगवा टिळा लावू दे नाहीतर मोदींनी नाकारलेली मुसलमानी टोपी घालू दे, त्यांनी चर्चमध्ये जाऊ दे, मंदिरात घंटा बडवू दे नाहीतर मशिदीमध्ये नमाज पडू दे…. राजकारणात सगळ्यांना सगळं माफ असतं. ते जोपर्यंत राजकीय स्वार्थासाठी माणसांमाणसांमध्ये विद्वेषाच्या भिंती उभ्या करीत नाहीत तोपर्यंत त्यांच्या कृतीला आक्षेप घेण्याचं कारण नाही.

निवडणुकीत हार-जीत होत असते. गुजरातचा निकाल काही तासांवर आला आहे. सुरुवातीला एकशे पन्नास जागांचा दावा करणारा भारतीय जनता पक्ष तिथं पुन्हा जिंकेल, असे एक्झिट पोलचे अंदाज आहे. काँग्रेसला चांगली परिस्थिती असल्याचं वातावरण मतदानाआधी होतं, परंतु एक्झिट पोलचे अंदाज त्याला छेद देणारे आहेत. एक्झिट पोल म्हणजे निकाल नव्हे. निकालापर्यंत वाट पाहायला हरकत नाही. चमत्कार घडला किंवा नाही घडला तरी काही फरक पडत नाही.

गुजरात निवडणुकीनं काँग्रेसला राहुल गांधी यांच्यासारखा खंबीर अध्यक्ष दिला, हे या निवडणुकीचं योगदान. निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोटारडेपणाबरोबरच रडीखाऊपणाचेही दर्शन देशाला घडले. निवडणुकीतील यशासाठी किंवा प्रत्येक निवडणुकीतील यशाबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःची आणि पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा खालावत चालले आहेत. आपण कोणत्याही पातळीवर जाऊ शकतो, हे त्यांनी या निवडणुकीत दाखवून दिले आहे, त्यामुळे काँग्रेसलाही भविष्यातील रणनीतीसाठी चांगला धडा मिळाला आहे.

गुजरातमध्ये काय होतंय, ते सोमवारी कळेलच !

Updated : 16 Dec 2017 1:29 PM GMT
Next Story
Share it
Top