Home > मॅक्स ब्लॉग्ज > कृतीतून बोलणारे खरे 'विकासपुरूष'

कृतीतून बोलणारे खरे 'विकासपुरूष'

कृतीतून बोलणारे खरे विकासपुरूष
X

आज आपण आपले जीवन विविध साधनांच्याद्वारे एवढे सुखकर केले आहे की,त्याविना आपण जगू शकत नाही. १ तास मोबाईलचे नेटवर्क फेल असेल तर, १ दिवस पेट्रोल नाही मिळाले तर ,२ ते ३ तास डिश किंवा सेट टॉप बॉक्स बंद पडला तर अथवा वेळेत घरी गॅस सिलेंडर नाही आले तर, काय होईल याची आपण कल्पना सुद्धा करु शकत नाही. गेल्या २० वर्षात भारतीय समाजातील आर्थिक स्तरात आमूलाग्र बदल झाला आहे. गरिबाचे मध्यमवर्गात आणि मध्यमवर्गाचे उच्च मध्यमवर्गात रूपांतर प्रचंड वेगाने झाले आहे .आज प्रत्येक मध्यमवर्गीयाकडे मोबाईल ,टीव्ही, एसी ,फ्रिज ,कूलर ,डिश ,कार ,कॉप्युटर ,इंटरनेट इ.सुविधा आहेत. छोट्या शहरातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती पुणे, मुंबई, बेंगलोरला आहे तर दर दहा घरापैकी एक व्यक्ती परदेशात आहे. कोणी केले हे सर्व ? हा कोणाच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे?

भारतातील परकीय चलनाचा कोष केवळ १ बिलियन डॉलर ( १ बिलियन =१०० कोटी रूपये ) एवढी असताना डॉ.मनमोहन सिंग हे अर्थमंत्री झाले. आज तोच कोष २८३ बिलियन डॉलर पर्यंत पोहचला आहे. १९९१ पूर्वी भारतात लाइसन्स राज होते ते संपवून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेकडून मोठ्या प्रमाणावर फंड्स घेऊन भारतात उदारीकरण, जागतिकीकरण आणि खासगीकरणाची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या या आर्थिक सुधारणांमुळे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरु झाली. आज भारत जागतिक बाजारपेठ काबीज करत आहे. अनेक इंटरनॅशनल व्यापारी संस्थांचा भारत सदस्य आहे. हा प्रचंड आणि नेत्रदीपक विकास डॉ. मनमोहन सिंग यांनी आणलेला आहे , हे स्वीकारावेच लागेल. देशात परकीय गुंतवणूक वाढली, व्यापार-उदिम वाढला ,निर्यात वाढून,बँकिंग, विमा यासारख्या सेवा उद्योगांनी भरारी घेतली .

मनमोहन सिंग यांनी देशात मनुष्यबळ आणि आरोग्य विषयक सुविधांमधून विकासाला मानवी चेहरा प्राप्त करून दिला. २००८ मधे भारत-अमेरिका अणू सहकार्य करार ही मनमोहन सिंह यांची भारताच्या विकासाच्या दृष्टीने केलेली सर्वात मोठी उपलब्धी आहे .मनमोहन सिंह यांच्या आर्थिक नीतीबद्दल ,अंमलबजावणी दरम्यान झालेल्या त्रुटींमुळे किंवा हवा तो अपेक्षित परिणाम न दिसून आल्यामुळे किंवा बदललेल्या जागतिक अर्थकारणाने झालेल्या परिणामामुळे इतरांची मते वेगळी असू शकतात . एक राजकीय व्यक्तिमत्व १० वर्ष सत्तेत असताना ती व्यक्ती राजकीय टीकेपासून अलिप्त राहणे अशक्य आहे . मात्र एक धुरंधर मुत्सद्दी म्हणून आणि रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर या पदापासूनच्या एकंदरीत कारकिर्दीचा विचार करता ,मनमोहन सिंह हे या देशासाठी एक उपलब्धी आहेत, हे मान्यच करावे लागते !

व्यक्तिगत जीवनात ते अत्यंत प्रेमळ , मितभाषी ,मृदु स्वभावाचे आहेत.त्यांचे वर्णन " the man who speaks through his action " असेच करावे लागेल. असे असून देखील पेट्रोल -डिझेलची किंमत बाजारावर निर्धरित करणे, गॅस सिलेंडरवरील सवलत कमी करणे, भारत- अमेरिका अणू करार यावेळी मात्र मृदु स्वभावाच्या सिंग यानी अतिशय कठोर भूमिका घेऊन निर्णय घेतले.

मनमोहन सिंग हे उच्च -विद्याविभूषित असून त्यानी केंब्रिज अणि ऑक्सफर्ड विद्यापिठात प्रपाठक म्हणून काम केले आहे. डॉ.सिंग हे १९८२ ते १९८५ या काळात RBI चे गव्हर्नर होते. केंब्रिज विद्यापिठाने त्यांच्या नावे शिष्यवृत्तीदेखिल सुरु केली आहे. २००४ साली त्यांना केम्ब्रिज विद्यापीठाचे मानाचे Adam smith Award दिले गेले .२००५ च्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तिंमधे टाइम्सने त्यांचा समावेश केला आणि २०१० साली त्यांना वर्ल्ड स्टेट्समन हे आंतरराष्ट्रीय अवॉर्ड देण्यात आले.

डॉ. मनमोहन सिंग यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास किती दांडगा आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी नोटाबंदीबाबत केलेल्या भाकिताकडे पाहावे लागेल. नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर ़सर्वत्र कौतुकाचे ढोल वाजवले जात असताना, ़मनमोहन सिंग यांनी मात्र ही मोठी चूक असल्याचं म्हटलं होतं. एरवी मृदु शब्दात प्रतिक्रिया देणारे मनमनोहन सिंग नोटाबंदीवर बोलताना अतिशय कठोर झाले होते. ही संघटित लूट असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्याच भाषणात त्यांनी इशारा दिला होता की नोटाबंदीनं जीडीपी २ टक्क्यांपर्यंत घसरेल. डॉ. सिंग यांचा हा इशारा तंतोतंत खरा ठरला आणि जीडीपी २ टक्क्यांनी घसरला. आजही जीएसटी घाईघाईने लागू करण्याच्या निर्णयावर त्यांनी टीका केली आहे. या निर्णयाचाही जीडीपीवर परिणाम होईल असं त्यांनी सांगितलं आहे. ़डॉ. मनमोहन सिंग यांच्या या इशाऱ्याकडे राजकारणाच्या पलिकडे जाऊन पाहण्याची गरज आहे.

देशाचा एवढा विकास करणारे,एवढी बुद्धिमत्ता असणारे ,उच्च-विद्याविभूषित असणारे ,प्रेमळ , प्रसन्न चेहरा असणारे आणि मृदु स्वभावाचे डॉ.मनमोहन सिंह हे खरे विकासपुरुष म्हणावे लागतील. पण एवढे असामान्य कर्तृत्व असूनही त्यांच्यात स्वतःचा बडेजावपणा नाही,मी हे केले ;मी ते केले ,अशी आत्मप्रौढी नाही की आत्मस्तुती नाही ,कोणाबद्दल राग अथवा द्वेष नाही, अहंभाव नाही ,चेहऱ्यावर माज नाही की विचारात उन्मत्तपणा नाही ,स्वभावात उर्मटपणा नाही ....... अतिशय विनम्र आणि सत्वगुणी राजकारणी ...

समर्थ रामदास यानी" दासबोध" या ग्रंथात सत्वगुणाचे वर्णन असे केले आहे...

शब्द कठिन न बोले।अतिनेमेसी चाले।

योगी जेने तोशविले। तो सत्वगुण ।।

लोक बोलती विकारी। तरी आदिक प्रेम धरी। निश्चय बाणे अंतरी। तो सत्वगत्यांची

सकलाशी नम्र बोले। मर्यादा धरून चाले।

सर्व जन तोशविले। तो सत्वगुण ।।

डॉ. मनमोहन सिंह यांना उदंड आयुष्य लाभो!!!!

राज कुलकर्णी

Updated : 26 Sep 2017 10:08 AM GMT
Next Story
Share it
Top