Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'काही गुंतागुंतीचा मी उलगडा करू इच्छित नाहीये!' - रणबीर कपूर 

'काही गुंतागुंतीचा मी उलगडा करू इच्छित नाहीये!' - रणबीर कपूर 

काही गुंतागुंतीचा मी उलगडा करू इच्छित नाहीये! - रणबीर कपूर 
X

पृथ्वीराज कपूर - राज कपूर - ऋषी कपूर आणि आता रणबीर कपूर ! बॉलिवूडमधील सर्वाधिक प्रसिद्धी आणि तितकेच सप्ततारांकित झगमगते ग्लॅमर लाभलेले कपूर खानदान. त्यांच्या चौथ्या पिढीतील देखणा, चॉकलेट बॉय आणि शिवाय अभिनय संपन्न रणबीर कपूर याची कारकीर्द सध्या जोरात आहे. रणबीरच्या अभिनय कारकिर्दीला १० वर्षे पूर्ण झालीत. २००७ मध्ये त्याचा पहिला 'सांवरिया' चित्रपट प्रदर्शित झाला होता. रणबीर आणि कटरिना कैफ ही रोमँटिक जोडी पडद्यावर आणि पडद्याबाहेर देखील गाजू लागली. गम्मत अशी की, अनुराग बासूने रणबीर-कटरिनाला त्याच्या 'जग्गा जासूस' सिनेमासाठी ४ वर्षांपूर्वी साईन केले आणि सदर 'जग्गा जासूस' बद्दल सामान्य प्रेक्षकांना खूप उत्सुकता वाढली ! आता तब्बल ४ वर्षांनी 'जग्गा जासूस' येत्या १४ जुलै रोजी रिलीज होतोय ! हॉट पेयर म्हणून गाजणारी ही जोडी विभक्त होऊन वर्ष होऊन गेलं आणि सारं होत्याचं नव्हतं झालं ! रणबीर कपूरशी 'जग्गा जासूस' खेरीज तो अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावरचा सिनेमा ('बायोपिक') करतोय. अशा काही मुद्द्यांवर गप्पागोष्टी झाल्या ! त्या गप्पांचा हा काही ठळक भाग -

'रणबीर, घोषणा ते निर्मितीपासून गाजणारा तुझा 'जग्गा जासूस' सिनेमा आता १४ जुलै रोजी रिलीज होतोय. खूपदा असंही ऐकलं होतं की 'जग्गा जासूस' डब्ब्यात गेला, बंद झाला, तुझ्या काय भावना आहेत ?

रणबीर - 'जग्गा जासूस' फिल्म की प्रॉब्लेम्स एक के बाद एक लगातार चलती रही ! अडचणींचा पाढा वाचण्यात काही अर्थ नाही कारण त्या अनंत होत्या. 'जग्गा जासूस' च्या पूर्ण टीमला वेळोवेळी असं वाटत राहिलं की ही फिल्म आता डब्बा बंद होतेय ! काही महिन्यांच्या गॅपनंतर पुन्हा दादाचा (बंगाली मध्ये 'दादा' असं आदरार्थी संबोधन वापरण्याची पद्धत आहे - इथं दादा म्हणजे दिग्दर्शक अनुराग बसू ) फोन यायचा आणि तो शूटिंगसाठी कधी 'रि-शूटिंग'साठी बोलावून घ्यायचा. सिनेमा जरी रखडला असला तरी तो पर्फेक्ट असावा. सर्व सामान्य प्रेक्षकांना आवडावा अशी दादाची प्रामाणिक इच्छा होती आणि त्याला विरोध करणं मला शक्य नव्हतं. मग तर 'जग्गा जासूस' शी निगडित अनेकांनी फिल्ममधला रस काढून घेतल्याचे जाणवले. प्रिंट, टीव्ही माध्यमात आमचा हा सिनेमा बंद झालाय म्हणून अनेकदा अफवा पसरल्या होत्या.

मला तर गेली ३-४ वर्षे अनुभव सिन्हा उर्फ आमचा दादा याने वेळी-अवेळी शूटिंगला बोलावलं असल्याने अगदी झोपेतही भास व्हायचा की, दादा शूटिंगला बोलावतोय. फक्त कॅटरिना मात्र ठाम होती. तिच्या दांडग्या इच्छाशक्तीमुळेच 'जग्गा जासूस' पूर्णत्वाला गेला ! सिनेमा रिलीज होईल असं कुणालाही वाटलं नसतांना कॅटरिनाने अनुभव सिन्हाच्या मागे लागून हा सिनेमा तडीस नेला. डबाबंद होणारा सिनेमा शेवटी रिलीज होतोय आता हे देखील एक स्वप्न वाटतंय. थँक्स टू कॅटरिना !

दुसरं असं की, गेल्या चारेक वर्षांमध्ये मी 'जग्गा जासूस' सोडून अन्य फिल्म्स केल्या. कॅटरिनाने देखील इतर सिनेमे केलेत. पण एकटा बिचारा अनुभव सिन्हा 'जग्गा जासूस'ला कवटाळून बसला ! 'जग्गा जासूस' आमच्या दादाचे स्वप्न होतं आणि कॅटच्या प्रयत्नांमुळे का होईना सिनेमा रिलीज होतोय याचा आनंद आहे. खरं म्हणजे 'बर्फी' सारखा नितांत सुंदर सिनेमा अनुराग बसूने मला दिला आणि मी मनाने त्याचा बांधिल झालो.

सिनेमा लेट झालाय हे खरंय, पण सर्वसामान्य प्रेक्षकांवर त्याचा प्रभाव मुळीच जाणवणार नाही. सिनेमाला विलंब झाला की, त्यातील पॅशन संपते हे खरे. पण लहान थोरांपासून सगळ्यांना आवडेल असे स्वच्छ मनोरंजन यात आहे. माझा प्रत्येक सिनेमा रिलीज होतांना मी हवालदिल असतो. सिनेमा रिलीज झाला की ३-४ दिवसात त्याचे भविष्य समजते. माझा सिनेमा अपयशी ठरला तर मी शांतपणे बसून वेळ मिळेल तसा त्यावर विचार करतो. माझी मेहनत कुठेही कमी पडू नये, अभिनयाची ऊंची कमी होऊ नये, माझ्याकडून टुकार काम होऊ नये यात मी दक्ष असतो. फिल्म चालणे अथवा न चालणे हे माझ्या किंवा कलाकारांच्या हाती नाही. पण भूमिकेत जीव ओतणे हे माझे काम नक्की आहे.

'रणबीर, 'जग्गा जासूस' २०१३ च्या पूर्वार्धात सुरु झाला, तेंव्हा तू आणि कॅटरिना रिलेशनशिपमध्ये होतात. 'जग्गा जासूस' आता रिलीज होतोय आणि तुम्ही विभक्त झालात. प्रेक्षक कितपत रिलेट होतील तुमच्या 'ऑन स्क्रीन' केमिस्ट्रीमध्ये ? विभक्त झाल्यांनतर तुम्ही दोघांनी सिनेमा पूर्ण करण्यास सहकार्य केलं नाही असं ही ऐकलं !'

रणबीर - 'मी जसं म्हटलं, माझ्यापेक्षा कॅटरिनाने अनुरागच्या मागे तगादा लावून हा सिनेमा पूर्ण करवून घेतला. आम्ही दोघांनी असहकार केला असता तर सिनेमा पूर्ण झालाच नसता ! हल्लीची पिढी आपलं प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ यात कुठेही गल्लत करत नाही ! दे आर व्हेरी क्लियर. त्यामुळे कॅटरिना आणि मी व्यक्तिगत जीवनात विभक्त झालो असलो तरी त्याचा प्रभाव आमच्या सिनेमाच्या कारकिर्दीवर पडू देणार नाही हे नक्की !

दीपिका आणि मी पूर्वी विभक्त झालो आणि त्यानंतर आमचा २०१५ मध्ये 'तमाशा' चित्रपट प्रदर्शित झाला. पण आमच्यातील 'सेपरेशन इफेक्त्त' आम्ही दोघांनी जरासुद्धा जाहीर होऊ दिला नाही. असो, दीपिका असो कॅटरिना या दोघी माझ्या जीवनात होत्या, दीर्घ काळ होत्या. आम्ही विभक्त झालो. काही अशी कारणं - खरं म्हणजे गुंतागुंत आहे. ज्यांचा मी उलगडा करू इच्छित नाही. व्यक्तिगत कारणं ही व्यक्तिगतच राहिली पाहिजेत. खरं सांगतो, पूर्वी मी प्रेक्षकांना, मीडियाला घाबरून असे, मोठं दडपण होतं माझ्यावर. माझे २४ तास, ३६५ दिवस स्कॅनिंग होतंय असं वाटायचं. मी जसा इथे ह्या क्षेत्रात मूरत गेलो, मला हे कळून चुकलं की, सर्वसामान्य प्रेक्षकांना स्टार्सच्या एकत्र असण्यात किंवा विभक्त होण्यात फारसा काही रस नसतो. फिल्म शुड बी वर्थ फॉर देम, बी कॉज दे स्पेन्ड ऑल मोस्ट थाऊजंड बक्स ! गॉसिप लिहिणारे थोडे दिवस लिहितात, मग सगळ्या चर्चा थांबतात. लोंगो की मेमरी शॉर्ट है, किसी को कोई बात बहुत दिनो तक याद नहीं रहती. गेली २-४ वर्षे मी माझ्या पर्सनल लाईफविषयी लिहिणाऱ्या चर्चांकडे पाहत नाही. आय डोन्ट टेक सिरियसली ! '

'रणबीर, रोमँटिक रिलेशनशिप्समध्ये तू किती ग्रो झालास ?'

रणबीर - 'ह्या अलम दुनियेत मी माझ्या आईचा डाय हार्ड भक्त आहे. स्वतःला ममाज बॉय म्हणवून घेण्यात मला कमीपणा नाही, उलट अभिमानच आहे. पण माझ्या आईखेरीज मी कॅटरिनाच्या सहवासात खूप ग्रो झालो. मी तिचा मनापासून ऋणी आहे. दुर्देवाने आमची रिलेशनशिप लग्नापर्यंत गेली नाही. हा माझ्या दुर्देवाचा भाग. पण जगायचं कसं, नकारात्मकता मनावर न घेता आपल्या आयुष्यात पुढे कसं जावं असे अनेक गुण ह्या मुलीकडे आहेत. कॅटरिनाने मला खूप सुधारलं. खूप बदल घडला माझ्यात आणि हे श्रेय मी कॅटरिनाला देतो '

'तुझ्या कपूर कुटुंबाकडून तुझ्यावर लग्नाचे दडपण नाही का ?'

रणबीर - ' हो, माझे ३४ वय झाले आहे. लग्नाचे वय आहे म्हणण्यापेक्षा उलटून चाललंय. पण मी माझ्या मॉम-डॅडकडे बघतो, तेंव्हा असं वाटतं, यांच्या लग्नाला ३७ वर्षे झालीत, तरी यांच्यातील समीकरण कायम आहे. माझ्यावर प्रेम करणारी आणि मी तिच्यावर प्रेम करणारी कुणी भेटावी आणि माझं लग्न हे प्रेमविवाह व्हावा. अर्थात माझ्या मॉमने जरी एखादी माझ्यासाठी मुलगी आणली तरी माझी हरकत नसेल. मलाही लग्न करावसं वाटतं, पण अजून तरी योग आलेला नाही. मला घरातील सगळेच लग्नासंदभार्त विचारतात, पण माझी आजी देखील माझ्यावर प्रेशर करत नाही. योग्य आणि योग येईल तेंव्हा लग्न करेन. कधी ते माहित नाही ! '

'तुझ्या कपूर कुटुंबीयांशी तुझी रिलेशनशिप कशी आहे ? तुझं विशेष सख्य कुणाशी आहे ?'

रणबीर - 'माझी चुलत बहीण बेबो (करीना कपूर-खान)शी माझं विशेष सख्य आहे. वेळ मिळाला की आम्ही नेहमीच लंच, डिनरला भेटत असतो. सैफशी माझी खूप दोस्ती आहे. गप्पा, वाचन वरचेवर चालतं. बेबो-सैफचा मुलगा म्हणजे माझा भाचा तैमूर जगातील सर्वात गोंडस बाळ आहे !

माझी आई म्हणते मी तिचा श्रावण बाळ आहे. आपल्या फिल्म इंडस्ट्रीतील अमिताभ ते जितेंद्र, शशी कपूर -रणधीर-ऋषी कपूर सगळ्यांची नायिका बनून तिने केवळ आपला नवरा आणि मुलासाठी तिच्या करियरवर पाणी सोडलं. तिने माझ्या वडिलांशी संसार केला. जे तितके सोपे नव्हते. कपूर घराण्यातील प्रत्येक सदस्यांशी तिचे निकोप संबंध आहेत. ती सगळ्यांची लाडकी आहे. आजच्या काळात निकोप स्नेहसंबंध सांभाळणे नक्कीच सोपे नाही. याचं श्रेय मी मॉमला देतो. माझे वडील ऋषी कपूर यांच्याशी माझं नातं मैत्रीचं नाही. मी त्यांचा आदर करतो. त्यांच्याशी संवाद शक्यतो घडत नाही, घडलाच तर तो मॉममार्फत होतो. जगातील हँडसम आणि उत्तम डान्सर हिरोमंध्ये माझ्या डॅडचा नंबर फार वरचा असेल.

माझी आजी, कृष्णा राज कपूर. शी इज माय बेस्ट फ्रेंड ! २०१६ मध्ये आजी खूप आजारी पडली आणि डब्बू अंकल (रणधीर कपूर) नी तिला चेंबूर नर्सिंग होममध्ये ऍडमिट केले. तिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी ९ महिने तिच्या चेंबूरच्या बंगल्यात राहायला होतो. माझ्या जीवनातील हा काळ खूप अविस्मरणीय होता. तिच्याशी खूप गुजगोष्टी झाल्या माझ्या. माझ्या मनातील सगळ्या भावभावना मी तिच्याकडे बोललो. तिने त्यावर तिची मतं मांडली. आमचं जबरदस्त मेतकूट आहे. माझ्या दादीला काही केल्या हे पटत नाही, की रोटी, नान, तूप विरहित खाता येतं. हल्लीची फिटनेस व्याख्या तिच्या पचनी पडत नाही. घरी तयार केलेलं साजूक तूप, पेशावरी नान, लाहोरी मटण, खिमा, बटर चिकन, शाही बिर्याणी असे अनेक एक से एक पदार्थ तिने मला स्वतः हाताने रांधून वाढलेत.

'तुस्सी कितना सुख कर कांटा हो गये हो' हे पालूपद तिचं चालू होतं. मी तिला समजावलं, अगं बीजी (आजी) आपल्या कपूर खानदानाची 'साईज' बघ, कसे सगळेच गोलमटोल आहेत. त्यासाठी फिट राहणे गरजेचे आहे. पण माझ्या लाडक्या दादीला फिटनेस फॅड वाटतं. दिवसांतून एकदा तरी मी तिच्याशी फोनवर बोलतोच. दादीने अनेक भल्याबुऱ्या प्रसंगाना धीरोदात्तप्रमाणे तोंड दिलं. सन्मानाने जगली आणि जगतेय. आमच्या कुटुंबाचा शिरपेच आहे ती. मानबिंदू ! माझ्या लग्नाची ती वाट पाहतेय, पण मला तिने लग्नाची भूणभूण केली नाही. '

'असो, 'जग्गा जासूस' शूटिंगसह तू संजय दत्तच्या जीवनावर आधारित फिल्म करतोस. त्याचं कुठवर आलंय? संजय दत्तसारख्या वादग्रस्त प्रतिमा असलेल्या अभिनेत्याच्या जीवनावरचा चरित्रपट आपण करावा असं तुला का वाटलं ?'

रणबीर - 'संजूबाबावरचा हा चरित्रपट उर्फ बायोपिक कुणाही परफॉर्मरसाठी पर्वणी असणार आहे. संजय दत्त मला वयाने खूप जेष्ठ असला तरी तो फ्रेंडली आहे. गेली कित्येक वर्षे आम्ही एकमेकांचे शेजारी (पाली हिल) आहोत. त्यामुळेही ही आस्था आहे. संजूबाबाची आई नर्गिस दत्त आमच्या आर के बॅनरची एके काळची प्रमुख अभिनेत्री. तिचे आणि आजोबांचे (राज कपूर) सिनेमे खूप गाजलेत. ह्या सगळ्या कारणांखेरीज हे सत्य कुणी नाकारू शकणार नाही, संजयच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक वादळं सतत घोंगावत राहिलीत. तरीही हा माणूस जीवनाला हसत खेळत सामोरा गेलाय.

संजूबाबाचे जीवन पडद्यावर साकारणे हे आव्हान आहे. ही ऑफर मला राजू हिरानी यांनी दिली म्हणून मी त्यांचा आभारी आहे. संजय दत्तची प्रतिमा वादग्रस्त असली तरी तो अभिनेता म्हणून आजही लोकप्रिय आहे. त्याच्या जीवनावरच्या फिल्ममध्ये त्याचं आजवरचं जीवन जसेच्या तसे दाखवायचे असा हेतु ह्या सिनेमाचा असून त्याचं आजवरचं आयुष्य वलयांकित करणे हा सिनेमाचा हेतू नाही. एक अभिनेता म्हणून मी संधी घेतली अन्यथा कोणत्याही इतर हिरोंनी घेतलीच असती.

'ही म्हणजे संजय दत्तची भूमिका साकारण्यासाठी तुझा होमवर्क काय होता ?'

रणबीर - 'मी राजू हिरानी यांना अनेकदा भेटत राहिलो, मग संजयला भेटलो अनेकदा. त्याच्याकडून त्याचं आयुष्य समजावून घेतलं. त्याची आई न्यूयॉर्क कॅन्सर हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजत असताना तो त्याच्या पाली हिलच्या बंगल्यात ड्रग्सचा आस्वाद घेत होता. त्याला कसलंही भान नव्हतं. टाडा कोर्टात, ठाणे तुरुंगातलं त्याचं जीवन, असे अनेक प्रसंग त्याच्या आयुष्यात घडलेत, जे अशक्य भासावेत. त्याच्या भावना मी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. माझे हे वाढलेले केस संजू बाबाचा लूक आहे.

त्याने मला त्याचे अनेक लेदर जॅकेट्स, महागडे पर्फ्युम्स शूटिंगच्या निमित्ताने दिलेत. संजूबाबा एक अजब रसायन आहे खरं. मी त्याच्या खऱ्या चरित्राला पडद्यावर न्याय द्यायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय, त्याचं उद्दात्तीकरण नाही हे लक्षात घ्या. '

'नेक्स्ट काय ?'

रणबीर - आलिया (भट) सोबत 'ड्रॅगन' फिल्म करेन इम्तियाज अली बहुतेक 'रॉक स्टार -२' सुरु करेल असा त्यांचा मानस आहे. पाहू काय ते. '

Updated : 29 Jun 2017 6:37 PM GMT
Next Story
Share it
Top