Home > मॅक्स ब्लॉग्ज > एक शापित गंधर्व

एक शापित गंधर्व

एक शापित गंधर्व
X

.... लगी आज सावन की वो फिर झडी है...! .

रुपेरी पडद्यावरच्या गंधर्वाचा हुरहूर लावणारा अंत.... विनोद खन्ना !

'लगी आज सावन की फार वो झडी है...'

यश चोप्रा यांच्या 'चांदनी ' सिनेमातील सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत प्रत्यक्ष पाहतांना विनोद खन्नाला पाहून प्रेक्षकांच्या उरी कालवाकालव होते... काळ्या नभांनी भरलेले आकाश, मुसळधार कोसळणारा अखंड पाऊस... विजांचा लपंडाव... आणि विनोद खन्नाचं नायिका चांदनी अर्थात श्रीदेवीविषयी अव्यक्त भावनांचा मनात झालेला चिंब वर्षाव! ते गाणं तेंव्हा पाहतांना वाटत राहिलं, नायक ऋषी कपूर ऐवजी सेकंड लीड असलेल्या विनोद खन्ना ('चांदनी 'मध्ये त्याची आई वहिदा रहमान आपल्या लाड्क्याला 'लाली' संबोधते !) ला चांदनी मिळावी... आणि पाचा उत्तराची ती प्रेमकहानी सुफळ संपूर्ण व्हावी !

पण पडद्यावर तसं घडत नाही ! गर्भश्रीमंत - देखण्या -रुबाबदार विनोद खन्नाला नायिका मिळत नाहीच !

प्रत्यक्ष जीवनातही विनोद खन्नाचं तसंच काहीसं झालं ! विनोद खन्ना या नावापुढे आजही देखणा किंवा 'मोस्ट हँडसम' असंच विशेषण त्याचे चाहते आणि सिनेविश्व लावतं ! पण राजसी व्यक्तिमत्व लाभूनही या गंधर्वाला अपेक्षित स्थान चंदेरी जगात लाभलं नाही!

त्याची नियती त्याच्याशी खेळ खेळतच राहिली! पण हा गंधर्व कायमच आपल्या कैफात जगला ! पित्ताशयाचा कॅन्सर जगाला कळू नये म्हणून त्याने काळजी घेतली! त्याचं वैयक्तिक दुःख त्याने त्याच्या कुटुंबापुरतं मर्यादित ठेवलं! हल्लीच साधारणत दोनेक महिन्यांपूर्वी त्याचा कृश झालेला देह आणि खंगलेला विनोद खन्ना जेंव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेंव्हा त्याच्या गंभीर आजाराची कल्पना आली. तरीही त्याने सूचना दिल्याप्रमाणे त्याचं कुटुंब त्याची प्रकृती आलबेल असल्याचं कळवत राहिलं!

अभिनेता ते स्टार आणि स्टार ते सुपर स्टार... सुपर स्टार ते एक योगी- संन्यासी! आणि मग पुन्हा स्टारडम... मग राजकीय क्षेत्रांत प्रवेश... खासदार - मंत्री - खासदार अशी पदं भूषवत दुसरीकडे अभिनयाचा प्रवास पिता आणि चरित्र अभिनेता असा चालला असतांना त्याला कॅन्सर झाल्याची बातमी येते! रुपेरी पडद्यावरचा हा पोलादी पकडीचा ऍक्शन हिरो जेंव्हा अतिशय कृश झाल्याचा फोटो सोशल नेटवर्किंग साईट्सवर व्हायरल होतो, तेंव्हा त्याच्या चाहत्यांना आरंभी ही दुर्देवी बातमी अविश्वसनीय वाटली. पण, सूर्य अस्ताला जाईपर्यंत विनोद खन्नाला पित्ताशयाचा कर्करोग झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले!

ही घटना मार्च महिन्यातील आणि त्या नंतर त्याच्या निधनाचे दुर्देवी वृत्त टांगत्या तलवारीसारखे भासत राहिले! आणि शेवटी परवा सकाळी ११.वाजून २० मिनटांनी विनोद खन्ना गेल्याचे अशुभ वर्तमान पुन्हा सर्वत्र पसरले ! !

पाकिस्तानच्या पेशावरमध्ये ६ ऑक्टोबर १९४६ रोजी किशनचंद आणि कमला खन्ना यांच्या पोटी जन्मलेला विनोद खन्ना तसा मनस्वी,कलंदर... पारंपारिक विचारांच्या जोखडातून त्याचे पालनपोषण होत असतांना भारत-पाकिस्तान फाळणीनंतर खन्ना कुटुंब भारतात दिल्लीत स्थायिक झालं... किशनचंद यांनी टेक्स्टटाइल्सचा व्यवसाय सुरु केला आणि आपल्या अपत्यानेही आपला बिझनेस सांभाळावा या हेतूने दिल्लीत विनोदवीर कॉमर्सला प्रवेश घ्यावा असा आदेश दिला. विनोदला कलेशी जवळीक वाटत होती, पण त्याचा नाईलाज होत होता... वाढत्या वयात विनोद खन्नाने 'मोगल ए आझम' हा के आसिफ यांचा भव्य -दिव्य सिनेमा पाहिला आणि तो थरारून गेला. स्वप्नांना उराशी कवटाळून त्याचे दिवस चालले होते, खन्ना कुटुंब त्यांनंतरच्या काळात मुंबईस स्थलांतरित झालं आणि या स्वप्नगरीत आल्यावर विनोदच्या अभिनयाच्या स्वप्नांना धुमारे फुटल्यास नवल नव्हतं!

विनोद खन्नाच्या आठवणींवर व्यक्त होताना संजय दत्त म्हणाला, “खरं म्हणजे विनोद खन्ना गेल्यानंतर या घटनेची उजळणी होतेय, पण हे सत्य मी पुन्हा आज मांडू इच्छितोय. माझे वडील सुनील दत्त स्वतः प्रस्थापित झाले आणि मग आपला धाकटा भाऊ सोमदत्त यालाही अभिनयात लाँच करण्यासाठी 'मन का मीत' सिनेमाची त्यांनी निर्मिती सुरु केली, त्या दरम्यान एका फिल्मी पार्टीत अभिनयात ब्रेक मिळावा म्हणून धडपडणाऱ्या विनोद खन्नाची भेट झाली. वडिलांनी (सुनील दत्त )विनोद खन्नाला निगेटिव्ह भूमिकेची ऑफर दिली. पठ्ठयाने तीही स्वीकारली. कारण त्याला बिझनेसपेक्षा अभिनयासारख्या सर्जनशील क्षेत्रात कारकीर्द घडवण्याची असोशी होती. हा मामला देखील गुपचूप होता. वडिलांच्या नकळत! 'तू अभिनयात गेलास तर बंदुकीला सामोरा जा' अशी धमकी त्यांनी दिली, परंतु आई कमला खन्ना यांनी लेकाला २ वर्षे त्याच्या मनासारखं करू देत अशी गळ घातली, अभिनय जमलं नाही तर पुन्हा बिझनेसकडे येईलच... 'मन का मीत' या सिनेमात खलनायकी करून विनोद खन्नाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. माझा काका सोमदत हिरो असून त्याचा काहीही प्रभाव पडला नाही आणि विनोद खन्नाने फ्लॉप ठरलेल्या या सिनेमा नंतर देखील तब्बल १५ सिनेमांचे करार खिशात घातले! आणि सोमदत्त माझा काका जवळ -जवळ पहिल्याच सिनेमानंतर अभिनयातून अस्तंगत झाला!”

खरंच ! विनोद खन्नाच्या नशिबाने अनेक वळणं घेतलीत...'मेरा गाव मेरा देश ' आणि अन्य सिनेमातून नकारात्मक भूमिका केलेल्या विनोदला त्याच्या देखण्या रुपामुळे आणि अभिनयातील कसबामुळे लवकरच चक्क हिरोच्या भूमिका मिळाल्या आणि तो बॉलिवूडचा शिखरावरचा अभिनेता-स्टार बनला. एक काळ असाही होता, जेंव्हा विनोद खन्नाचे मानधन अमिताभ बच्चनपेक्षा अधिक होते... या जोडीचे 'परवरिश' 'खून -पसिना' 'अमर-अकबर-अँथनी' 'हेरा-फेरी या हिट सिनेमांमुळे विनोद खन्ना चंदेरी दुनियेत हॉट केक ठरल्यास नवल नव्हतं! आपल्या मातेवर निरतिशय प्रेम असलेल्या विनोद खन्नाला कमला खन्नांच्या आकस्मिक मृत्यूने जबर धक्का बसला, त्यातच त्याच्या बहिणीचेही निधन झाले! आणि महेश भट्ट यांनी त्याला आचार्य रजनीश यांच्या आध्यत्मिक ज्ञानाचा मार्ग दाखवला! विनोद खन्नाने रजनीश यांच्या आश्रमाचा म्हणजे अमेरिकेचा 'मार्ग' धरला ! यशो-शिखरावर असलेल्या विनोद खन्नाच्या तडकाफडकी अमेरिकेला जाण्याने त्याची पत्नी गीतांजलीला मानसिक दुःख झालं. ज्या गीतांजलीशी विनोद खन्नाने प्रेमविवाह केला होता. राहुल आणि अक्षय या दोन मुलांचा पिता असलेल्या आणि रुपेरी कारकीर्द दृष्ट लागण्याजोगी चालली असतांना 'विनाशकाले विपरीत बुद्धी' विनोदला का झाली याचं उत्तर शोधेपर्यंत गीतांजली त्याच्या आयुष्यातून दूर झाली!

मानसिक शांतीच्या शोधार्थ निघालेला हा संन्यासी तब्बल ५ ते ६ वर्षे रजनीश उर्फ ओशो यांच्या आश्रमात कपडे धुण्यापासून ते झाडू मारण्यापर्यंत सगळी कामं करत व्रतस्थ जीवन जगू लागला! तू मायदेशी ये, तुला मी 'रि-लाँच' करेन अशी ग्वाही त्याला महेश भट्टने दिली आणि विनोद खन्ना भारतात परतला. तोपर्यंत होत्याचं नव्हतं झालं होतं! अमिताभ बच्चन हिंदी सिनेमाचा अनभिषिक्त सम्राट ठरला होता. तरीही विनोद खन्नाला 'जुर्मं ' सिनेमा देऊन महेश भट्ट यांनी त्यांचा शब्द पाळला. विनोद खन्नाचा पुनरागमन असेलला 'इन्साफ' आणि 'सत्यमेव जयते' ला यश लाभलं आणि संन्यासी झालेल्या विनोद खन्नाची कारकीर्द बहरत गेली...

पुनरागमन केलेल्या विनोद खन्नाची चाळीशी उलटली होती तरीही अभिनेत्री अमृता सिंग त्याच्या अशी काही प्रेमात पडली की त्याच्या मागे तिने लग्नाचा लकडा लावला ! ग्लॅमरस जगातील अनेक प्रसिद्ध तारका विनोद खन्नाला 'आपलंसं ' करू पाहत होत्या. ते त्याच्या मर्दानी-देखण्या आणि शिवाय सुसंस्कृत वागणुकीमुळे! त्याच्या जीवनात अनेक महिलांची ये-जा चालू राहिली तरी कुणाविषयी त्याने अपशब्द काढलेत किंवा दुय्यम वागणूक दिल्याचे ऐकिवात नाही! गीतांजली - पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर या 'सेक्सी संन्यासी' ला कौटुंबिक आयुष्याची आस लागली होती. कविता दफ्तरी या पंजाबी उद्योगपतीच्या लेकीने त्याच्यांशी लग्न केलं. या दाम्पत्याला साक्षी (मुलगा) श्रद्धा (मुलगी) अशी दोन अपत्यं झाली. चार मुलांचा पिता असलेल्या विनोद खन्नाने राजकारणात प्रवेश केला. गुरुदासपुरमधून वेळोवेळी निवडून आला.

या शापित गंधर्वानं चित्रपट सृष्टीतील अनेकांना अक्षरश लाखों रुपयांची मदत केली! तेही न मागता! मुकेश भट्ट हे आजचे आघाडीचे निर्माते आणि महेश भट्ट यांचे धाकटे बंधू. त्यांनी सांगितले, “मी विनोद खन्नाचा सेक्रेटरी म्हणून साडे सात वर्ष काम केलं, त्या काळात विनोदला नुसते कळण्याचा अवकाश तो आपलं कपाट उघडून याचकाला सांगे, लो भाई, जितना चाहिये, उतना पैसा उठाना! असे अनेक जण इथे सापडतील ज्यांना विनोद खन्नाने कायम सढळ हातांनी मदत केलीये! ज्याविषयी आजतागायत कुणाला फारसं ठाऊक नाही! कुणी पैसे न मागता देखील तो गरजूना मदत करायचा!” खराखुरा 'दयावान ' होता विनोद!

सिनेमा जगात त्याने सहाय्यक कलाकार ते पित्याच्या भूमिका रंगवण्यास सुरुवात केली! नियतीने त्याच्यासाठी आता कॅन्सर हे अखेरचं पान लिहून ठेवलं होतं! आणि शेवटी २७ एप्रिल रोजी या अभिनेत्यातल्या योग्याचा अशा तऱ्हेनं अंत व्हावा हे त्याच्या कुठल्याही चाहत्याला दुखावणारचं आहे! कल्पनेपेक्षा सत्य अघटित असावं असं आयुष्य विनोद खन्ना जगला! त्याने सिनेसृष्टीतील अनेक गरजवंतांना एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळलं नाही म्हणे!

विनोद खन्ना! एका वादळी संन्यस्त सुपरस्टार 'दयावान'चा शेवट पचवणं कठीण आहे! लगी आज सावन की फिर वो झडी है... असं आज अश्रू धारा सांगताहेत!

  • पुजा सामंत

Updated : 29 April 2017 8:19 AM GMT
Next Story
Share it
Top