Home > मॅक्स ब्लॉग्ज > उन उन खिचडी अन सत्तेचे तूप

उन उन खिचडी अन सत्तेचे तूप

उन उन खिचडी अन सत्तेचे तूप
X

उन उन खिचडी साजूक तूप

वेगळे राहायचे भारीच सुख.

कवी श्री. मो. दा. देशमुखांची कविता ही आमचे मित्र श्री विसुभाऊ बापट त्यांच्या “कुटुंब रंगलय काव्यात” या त्यांच्या लोकप्रिय कार्यक्रमात मोठ्या ठसक्यात सादर करतात. एकत्र कुटुंबात राहणारी सासुरवाशीण वेगळे राहण्याचे स्वप्न बघते. ती नवऱ्याला समजावून सांगते की आपण दोघे वेगळे झालो तर किती सुख मिळेल. मी गरम गरम खिचडीवर जास्त तूप वाढू शकेल वगैरे.

आज ही कविता आठवण्याचे कारण वेगळेच आहे. सध्या मुंबई, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत. इतके दिवस कुरबुरी करतकरत का होईना भाजप आणि शिवसेनेचा संसार सुरु होता. भांड्याला भांडे लागत होते. पण लोकांना दाखवायला संसार मात्र सुरु होता. १९९५ ला युतीची सत्ता आली त्यावेळी शिवसेनेचे मुख्यमंत्री होते त्यांनी भाजपच्या मंत्र्यांना फारच अपमानाची वागणूक दिली. पण प्रमोद महाजनांसारखे धुरंधर मध्यस्थ असल्याने त्यांनी दुरावा निर्माण झाला रे झाला की लगेच मातोश्रीवर जावून मोठ्या साहेबांची समजूत वेळोवेळी काढली अन संसार वाचला.

आता मात्र भाजप वरचढ झाला आणि सत्तेत सामील होणाऱ्या सेनेला त्यांनी उपमुख्यमंत्रीपदही दिले नाही. आम्हाला नको नको म्हणत सेनेलाही सत्तेचा मोह काही सुटला नाही. रडतपडत संसार चालला आहे. अधूनमधून मातोश्रीवरचे धाकटे साहेब डरकाळ्या फोडतात. पण इकडे भाजपवालेही मुळीच घाबरत नाहीत उलट आगीत तेल ओततात.

तुमच्याआमच्यासारख्या सामान्य माणसाला मात्र सरकार कोसळते की काय याची धास्ती वाटते. आणि राजकीय विश्लेषकांना रोज रात्री नऊ वाजता दूरचित्रवाणी वाहिन्यांवर चर्चा करायला खमंग विषय मिळतो. काही महिन्यांपूर्वी कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीत हेच चित्र आपण पहिले होते. मुख्यमंत्र्यांनी तर शाळकरी वक्तृत्व स्पर्धेच्या आवेशात

वाघाच्या जबड्यात

घालूनी हात,

मोजतो दात !

अशी भाषणेही केली होती. निकाल लागला आणि एका पक्षाला सत्ता स्थापन करता येत नाही हे समजल्यावर मग महिनाभर प्रचाराच्या दरम्यान जे आरोपप्रत्यारोप झाले होते ते रात्रीच्या भांडणासारखे विसरून पुन्हा सेना भाजपने एकत्र सत्ता स्थापन केली. सामान्य माणसे मात्र शांतपणे बघत राहिली.

आजही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्षातील दिग्गज एकमेकांवर आरोप करतात, युती तुटली, आता परत युती नाही, असे म्हणतानाच दुस-या सभेत सबुरीचा सल्ला देतात. मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरतात. पण देत नाहीत. दुसरीकडे सत्तेत असलेले दोन्ही पक्ष आपण एकत्र सत्ता भोगली हे विसरून एकमेकाविरुद्ध बोलत सुटतात. “या सत्तेत माझा जीव रमत नाही” असे म्हणत सत्तेच्या वळचणीला पडून राहतात. यात फक्त माध्यमांनाच मात्र दर तासाला चर्चेसाठी वेगळा विषय मिळतो. ज्यादिवशी सेनापक्षप्रमुख सांगतात की आता युती कदापि नाही, त्याच दिवशी भाजपाचा जेष्ठ मंत्री मात्र आपल्याला बरोबर काम करायचे आहे तेंव्हा दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी सांभाळून बोलावे असा सल्लाही देतात.

उनउन खिचडी साजूक तूप, या कवितेतली नायिका एकत्र कुटुंबातून वेगळी होते, वेगळे राहण्याचे सुख अनुभवताना तिला त्या सुखाची किंमत कळते. शेवटी रोज मुलाबाळांचे करणे कमी पैशात भागविणे, जबाबदारी एकटीनेच पेलणे, या सगळ्या गोष्टीना कंटाळून ती नवऱ्याला म्हणते, ‘ “मला वाटले तेवढे काही सोपे नाहीये. यापेक्षा तर एकत्रच संसार चांगला असतो. कवितेचा शेवट असा नाही,

“उन उन खिचडी साजूक तूप,

वेगळे राहण्यात नाहीच सुख.”

तर बघू या निवडणुकीच्या उन उन खिचडीवर कुणाला सत्तेचे साजूक तूप मिळतेय ते...

-श्रद्धा बेलसरे खारकर

Updated : 16 Feb 2017 6:40 PM GMT
Next Story
Share it
Top