Home > मॅक्स ब्लॉग्ज > उदारमतवादाचा पुरस्कर्ता

उदारमतवादाचा पुरस्कर्ता

उदारमतवादाचा पुरस्कर्ता
X

गोविंदराव तळवलकर या नावाचा दराराच काही अजब होता. आणीबाणीनंतर राजकीय जाणीवा जागृत होऊन वाचायला लागलेल्या पिढीचा मी प्रतिनिधी. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वर्तमानपत्राने आणि तळवलकरांच्या व्यासंगी लिखाणाने या पिढीवर उदारमतवादाचे संस्कार केले. आणीबाणी उठली आणि ‘चुकलो, क्षमा’ असा अग्रलेख तळवलकरांनी लिहिला. त्यानंतर तळवलकरांचा अग्रलेख वाचायचा राहिला असं कधीच घडलच नाही. डावे आणि अति उजवे यांच्या उन्मादाला तळवलकरांनी सतत ठोकून काढलंआणि मध्यममार्गी उदारमतवादाची कास धरली. त्यांचाआर्थर कोस्लर वरचा अग्रलेख, कार्ल मार्क्स च्या जन्मशताब्दीच्या वेळी १९८३ मध्ये लिहिलेला अग्रलेख आणि असे इतर अनेक अग्रलेख वाचकांच्या मनावर अक्षरशः कोरले गेले. कधी उपहासगर्भ होऊन तळवलकर कोणाला अग्रलेखांत धारेवर धरतील यांचा नेम नसे. त्यातून शरद पवार, अंतुले यासारखे राजकारणीही सुटले नाहीत. तसेच गंगाधर गाडगीळ यांच्यासारखे साहित्यिकही. त्याच्या प्रचंड व्यासंगातले नमुने अग्रलेखात चपखलपणे येत आणि त्या त्या विषयाचं परिमाणच बदलून जात असे. अशीच एकदा लक्ष्मण माने, अरुण कांबळे यांनी लंडनमध्ये दलित साहित्य संमेलन भरवण्याची कल्पना काढली होती. त्यावर ‘आता लंडनमध्ये दलित’ अशा शीर्षकाखाली तळवलकरांनी अग्रलेख लिहिला. त्यात ‘लंडन हे काही काळ परागंदा क्रांतिकारकांचे माहेरघर होते. मार्क्स तिथे होता. लेनिनही होता’ असा संदर्भ देत तळवलकरांनी लिहिलेला अग्रलेख खुमासदार झालेला होता. आणि त्याच्यात द्वेषाचा लवलेशही नव्हता. पत्रकारितेत प्रवेश करू पाहणारे आम्ही सारे जण महाराष्ट्र टाइम्सध्ये जाण्यासाठी केवळ उत्सुकच नव्हे तर उतावीळ होतो.

तळवलकरांसारखे व्यासंगी संपादक हे त्याचे प्रमुख कारण होते. प्रवेशही सोपा नसे. मी जेव्हा सकाळमध्ये होतो तेव्हाची गोष्ट. १९८६-८७ साल असावं. सीमाप्रश्नावर नेहमीप्रमाणे एक आंदोलन झाले आणि विरलेदेखील. त्यावर संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे एक अध्वर्यू कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची मी मुलाखत घेतली. डांगे यांनी ‘आता हा वाद मिटवून टाका’ असे सांगून या आंदोलनाच्या विरोधात या मुलाखतीत भूमिका मांडली होती. ‘सकाळ’मधल्या त्या मुलाखतीवर दुसऱ्याच दिवशी तळवलकरांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये अग्रलेख लिहिला आणि माझ्या अंगावर मूठभर मास चढलं. काही दिवसातच ‘मटा’ मधील एक ज्येष्ठ पत्रकार स्व. अशोक आचार्य यांनी मला निरोप दिला: ‘तळवलकरांनी तुला भेटायला बोलावलं आहे’…. ! त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं. पण त्यांना प्रत्यक्ष भेटायचं आहे याचं प्रचंड दडपण आलं. भेट झाली आणि मी ‘मटा’मध्ये दाखल झालो.

तळवलकर कोणाशी फारसे बोलत नाहीत. ते, त्यांचे लिखाण आणि त्यांचे वाचन . बस्स ! अशीच त्यांची प्रतिमा होती. पण ‘मटा’त गेल्यावर लक्षात आले की प्रत्यक्षातले तळवलकर वेगळे आहेत. अग्रलेख लिहून झाले की दुपारच्या जेवणानंतर तळवलकर अनेकदा आमच्यात येऊन बसत. बाहेरच्या जगात काय काय चाललं आहे, याचा अनेकदा वार्ताहरांकडुन कानोसा घेत. लेखनातल्या वस्तुनिष्ठतेला त्यांच्या लेखी अनन्यसाधारण महत्व असे. त्याचं व्यासंगी व्यक्तिमत्व, मितभाषीपणा आणि शिस्त यामुळे संपादकपदाला एक वेगळ वलय प्राप्त झालं होतं. “नुसतं पद मिळालं की कोणी मोठं होत नाही; त्या पदाला मोठं करण्यासाठी आधी तुमची moral authority प्रस्थापित व्हावी लागते”, असं एकदा तळवलकर माझ्याशी बोलताना म्हणाले होते. त्यांच्या बाबतीत हे शंभर टक्के सत्त्य होतं. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये असतानाच १९९१ साली तळवलकरांनी मला ‘विशेष प्रतिनिधी’ म्हणून दिल्लीला पाठवलं. त्यांच्या या निर्णयाने माझं विश्वच पालटून गेलं. तोपर्यंत विद्यापीठ, न्यायालय आणि पुढे राजकीय घडामोडींचं वार्तांकन मी करत असे. “दिल्ली वेगळी आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचं ते महत्वाचं केंद्र आहे . खूप शिकायला मिळेल”, असं ते म्हणाले होतेआणि ते खरंच होतं. भारताच्या एकूण धोरणविषयक बाबीचं दिल्ली हे फक्त केंद्रस्थानच नव्हे तर एक intellectual capital देखिल होतं. दर सहाएक महिन्यातून एकदा तळवलकर दिल्लीत येत. त्याच्या महिनाभर आधी कोणाकोणाला भेटायचं आहे, याची यादी माझ्याकडे पाठवत. त्यात मधू लिमये, अटलबिहारी वाजपेयी, विठ्ठलराव गाडगीळ, शंकरराव चव्हाण, पी.व्ही. नरसिंहराव, प्रणव मुखर्जी, अर्जुनसिंग, डाॅ.मनमोहनसिंग यांच्याबरोबरच ब्रिटन, अमेरिका आदी देशांच्या भारतातील राजदूतांचाही समावेश असे.

हे देश भारतातील घडामोडींकडे कसे बघतात, हे समजून घेणं हा या भेटीमागचा हेतू असे. मधु लिमये, गाडगीळ, मनमोहनसिंग, प्रणव मुखर्जी यांच्याबरोबर त्यांच्या भेटीगाठी होत. ती एक बौध्दिक मेजवानीच असे. हे चारही नेते व्यासंगी होते. त्यांच्याशी राजकारणाव्यतिरिक्त वाचलेल्या पुस्तकांविषयी तळवलकरांची चर्चा होई. तळवलकर महाराष्टातील वर्तमानपत्राचे संपादक. दिल्लीतील सत्तेच्या वर्तुळात तिथल्या इंग्रजी वर्तमानपत्रांच्या संपादकांचा दबदबा. पण तळवलकरांच्या बाबतीत सर्वत्र एक अपार आदर होता. आणि त्याचं व्यासंगी व्यक्तिमत्व त्याला कारणीभूत होतं. यापैकी कोणत्याही नेत्याची त्यांच्यासाठी वेळ मिळवायला कधीच फारसे प्रयत्न करावे लागत नसत. तळवलकरांचा व्यासंगी वावर दिल्लीत असा लीलया चालत असे. दिवसभर भेटीगाठी झाल्या की ते जिथे उतरत त्या ‘India international centre मध्ये त्यांचे कोण ना कोणाबरोबर डिनर ठरलेले असे.त्यांच्याबरोबर ते आम्हा सहकाऱ्यांना आवर्जून नेत. त्यांच्याबरोबरच्या या गप्पा ही एक वेगळीच मेजवानी असे. शामलाल, प्रभाष जोशी, दिलीप पाडगावकर, हिंदुस्तान टाइम्सचे संपादक एच. के.दुआ, अरुण शौरी, ‘मेनस्ट्रीम’चे संपादक निखील चक्रवर्ती अशा जाणत्या व्यासंगी पत्रकारांसोबत तळवलकरांच्या गप्पांच्या मैफली रंगत.असेच एकदा खुशवंतसिंग यांच्याकडेही तळवलकर मला घेऊन गेले. ती संध्याकाळ तर केवळ अविस्मरणीय.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे संपादक दिल्लीत जरूर येत;मराठी वर्तुळापलिकडे जात नसत. पण अशी विविधांगी भेट देणारे तळवलकर एकमेव होते. या भेटीत अनेक धोरणविषयक तसेच राजकीय बाबींविषयीच्या माहितीने समृद्ध होऊन ते मुंबईत परतत. आणि नंतरच्या त्यांच्या लिखाणात या साऱ्या चर्चांचे प्रतिबिंब पडलेले जाणवत असे. त्यामुळे ‘तळवलकर कोणात मिसळत नाहीत, माणूसघाणे आहेत’ असं मी तरी कधी पाहिलं नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की. त्यांच्यातला संपादक हा त्यांच्या लिखाणातून प्रकट होई. भाषणबाजी किंवा भपक्यातून नव्हे! आणि ते त्यांनी अतिशय जपलं होतं. त्याचं व्यक्तिमत्वच तसं होतं. आणि याची दखल दिल्लीतल्या वर्तुळात योग्य ठिकाणी घेतलीच जायची

डॉ. मनमोहनसिंग अर्थमंत्री असतानाची गोष्ट. १९९१ सालची. अर्थविषयक पत्रकारांची एक conference दरवर्षी दिल्लीत घेतली जाते.देशभरातील वर्तमानपात्रांचे अर्थविषयक पत्रकार त्याला हजेरी लावतात. आर्थिक घडामोडींशी संबंधित सर्वच मंत्रालयाचे मंत्री, ज्येष्ठ अधिकारी त्याला हजेरी लावतात. या परिषदेत एके दिवशी डाॅ. मनमोहनसिंग यांनी सर्वांशी वार्तालाप केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसाठी भोजनही आयोजित केलं होतं. मटामधील एक सहकारी व मी असे दोघे तेव्हा डॉ. सिंग यांना भेटलो. मटाचे प्रतिनिधी अशी ओळख करून देताच, “How is Mr Talwalkar…? “ असा प्रश्न डॉ. सिंग यांनी विचारला. एकूण, गोविंदराव तळवलकर हे राष्ट्रीय स्तरावर आदरयुक्त मान्यता असलेले एकमेव मराठी संपादक होते. त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळणही सोपं नसे. आणि चुका केल्यावर संतापणारे तळवलकरही पाहायला मिळत. त्यामुळे तळवलकर नाराज होणार नाहीत, याची काळजी ‘मटा’मधील प्रत्येक जण घेत असे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा दराराच असा होता. निवृत्त झाल्यावर ते अमेरिकेत ह्युस्टनला स्थायिक झाले. अधूनमधून मुंबईत आले की आम्ही ‘मटा’मधले काही सहकारी त्यांना भेटत असू. पुढे मी दूरचित्रवाणी माध्यमात गेलो आणि त्या माध्यमात स्थिरावलो. तो निर्णय त्यांना फारसा आवडला नव्हता. मी ‘झी मराठी’ चा प्रमुख असताना ‘नक्षत्रांचे देणे’ हा कार्यक्रम आम्ही केला होता आणि तो खूपच गाजला.

एकदा तळवलकर मुंबईत आले असताना नेमका विंदा करंदीकर यांच्यावरील ‘नक्षत्रांचे देणे’चा भाग सादर होणार होता. मी गोविंदराव तळवलकर व माधव गडकरी या दोन्ही ज्येष्ठ पत्रकारांना या कार्यक्रमाला बोलावलं. ‘नक्षत्रांचे देणे’ या मालिकेतला सर्वात सुंदर भाग होता तो. विंदांनी आपल्या बहारदार कविता वाचनाने त्या दिवशी ‘नक्षत्रांचे देणे’ मध्ये धमाल उडवून दिली होती. कार्यक्रम संपल्यावर तळवलकर म्हणाले, “हे तुम्ही फार चांगलं काम करता आहात… “ तळवलकरांचे हे शब्द माझ्या मनात सतत गुंजत राहतात. त्यांनी मला त्यांच्यासोबत काम करण्याची केवळ संधीच दिली नाही, तर माझ्यासारख्या अनेकांचं भवितव्य तळवलकरांमुळे घडलं. उदारमतवादी विचारांच्या विश्वाची सफरच तळवलकरांनी आम्हा सर्वांना घडवून आणली. उन्माद, मग तो डाव्यांचा असो अथवा उजव्या धर्मवाद्यांचा, तळवलकर त्यावर परखडपणे लिहित. हा देश मध्यममार्गावरच राहिला पाहिजे, त्यावरच त्याचं भवितव्य अवलंबून आहे, यावर तळवलकरांचा दृढ विश्वास होता. विचार-व्यक्तिस्वातंत्र्य, सहिष्णुता आणि सामाजिक न्याय, हे तळवलकरांच्या लेखनाचं कायम सूत्र होतं. वाचक तसंच सहकारी म्हणून उदारमतवादाचा हा संस्कार तळवलकरांनी आमच्यावर सतत घडवला. त्याबद्दल मी तळवलकर यांचा सदैव ऋणी राहीन.

Updated : 24 March 2017 6:39 AM GMT
Next Story
Share it
Top