Home > मॅक्स ब्लॉग्ज > इस्लाम वाढतोय.. धोका वाढतोय..

इस्लाम वाढतोय.. धोका वाढतोय..

इस्लाम वाढतोय.. धोका वाढतोय..
X

२०५० मध्ये भारत हा मुस्लीमांची सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश असेल. इतर कुठल्याही धर्मापेक्षा इस्लाम जास्त गतीने वाढणारा धर्म बनलाय. ही गती पाहता २०७० नंतर इस्लाम हा जगातील नंबर एकचा धर्म असेल. सध्या इंडोनिशिया मुस्लीम लोकसंख्येत नंबर एकचा देश आहे. हे सर्व अमेरिकेच्या प्यू रिसर्च संस्थेने जारी केलेल्या पाहणी रिपोर्टचे निष्कर्ष आहेत. मुस्लीमांची वाढती लोकसंख्या हा सध्या चिंतेचा आणि चर्चेचा विषय बनत चालला आहे. तसं बघायला गेलं तर जगाचीच लोकसंख्या वाढत आहे, पण त्यात मुस्लीमांच्या लोकसंख्येवर साहजिकज सर्वांची बारिक नजर आहे.

मुस्लिम लोकसंख्येचा स्फोट होणार असं हा रिपोर्ट सांगतो. त्याचवेळी जगाच्या कानाकोपऱ्यात मुस्लिम अतिरेक्यांच्या कारवायांच्या बातम्याही येत असतात. विविध ठिकाणी इस्लामी कट्टरपंथी टोळक्यांनी जारी केलेले नवनवे फतवे कानी येत असतात. खास करून महिलांवर, त्यांच्या वागण्या-बोलण्यावर,पेहरावांवर निर्बंध आणले जातायत. मुस्लिमांची लोकसंख्या फक्त जैवीक लोकसंख्या वाढ नसून कट्टर धार्मिक लोकसंख्या वाढ आहे, असा जगभरातील अनेक तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे. सर्वच मुसलमान कट्टरपंथी नसले तरी कट्टरपंथीयांच्या कारवायांवर त्यांचा आवाज क्षीण का असतो हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्यातूनच जागतिकीकरणाचे तोटे झेलून झाल्यानंतर राष्ट्रवादाकडे वळत असलेले देश, साहजिकच राष्ट्रवादासोबत मुस्लीम विरोधी भूमिका ही घेत आहेत. ज्या ज्या देशांत राष्ट्रवादाची कल्पना प्रबळ होतेय, त्या त्या देशांमध्ये आपल्याला मुस्लीम विरोधही प्रबळ होताना दिसतोय.

भारतासारख्या देशात, जिथे धर्मनिरपेक्षतेच्या, सहिष्णुतेच्या पायावर देशाची उभारणी झालीय, तिथेही मुस्लीमांविषयी कट्टर विद्वेषाची भावना वाढलेली आपल्याला दिसते. सेक्युलरीजम सारखा महान विचार थट्टेचा विषय बनत चाललाय, याला ही जागतिक परिस्थिती कारणीभूत आहे. मुस्लीमांसंदर्भातआपल्याला आता केवळ भारताच्या सीमेत राहून विचार करता येत नाही, हे वास्तव आता स्वीकारलं पाहिजे. भारतीय मुसलमान हा राष्ट्रभक्त मुसलमान आहे, यात तीळमात्र शंका नाही. पण इस्लाम आता देशांच्या सीमांच्या चौकटी तोडून जगभर पसरतोय. इस्लामची शांततेची, त्यागाची शिकवण ही कट्टरपंथीयांकडून केवळ बचावासाठी वापरली जातेय.

प्रत्यक्षात मात्र ती अंमलात आणताना दिसत नाही. अशा वेळी भारतातील राष्ट्रभक्त मुसलमानांचं अचानक कवचात निघून जाणं, भूमिका न घेणं, यामुळे सध्या आपण पाहतोय ती विचित्र परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली दिसतेय. मुसलमानांना त्याचमुळे सतत आपण राष्ट्रभक्त आहोत हे सिद्ध करावं लागतंय, किंवा त्यांनी राष्ट्रभक्ती सिद्ध करावी यासाठी वंदे मातरम, भारत माता की जय, अशा नवनवीन प्रश्नपत्रिका त्यांना दिल्या जाऊ लागल्यायत. जागतिक परिस्थिती पाहता, भारतीय मुस्लीमांनाही यापुढच्या काळात मोठ्या अग्निदिव्यातून पार पडावं लागणार आहे असं दिसतंय.

वाढत्या लोकसंख्येसोबतच मुस्लीमांचं जीवनमान ही खालावत चाललंय. मध्यंतरी, अनेक मुस्लीम वस्त्यांना भेटी दिल्या. तिथल्या मुस्लीमांशी बोललो. परंपरेने कौशल्याची कामं करूनही मुस्लीम समाज मुख्य प्रवाहाशी जोडला जात नाही याची खंत अनेकांनी व्यक्त केली. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीतील भेदभावापासून, बहुसंख्यांच्या अनामिक भीती आणि कट्टरपंथीय मुसलमानांच्या फतव्यापर्यंत अनेक घटकांच्या दबावाखाली इथला मुस्लीम आहे. वाढती महागाई आणि जागेची कमतरता यामुळे बहुपत्नीत्वाचं प्रमाण ही कमी झालंय. खासकरून मुलींना शिकवण्याकडे कल वाढलाय. जन्मानेच दोन हात आणि एक पाय नसलेल्या शिरीन तबस्सूमला तिच्या आई-वडलांनी उच्च शिक्षण देण्यासाठी स्वतः कष्ट उपसले. अशा अनेक शिरीन मुस्लीम समाजात शिकतायत. त्यांना त्यांच्याच समाजात विरोध होतोय. औरंगाबादच्या एक प्रोफेसर मध्यंतरी भेटल्या होत्या. त्या सांगत होत्या की सोशल मिडीयावर फेक नावाने अकाऊंट उघडून त्यांना वावरावं लागतं. त्याना जे व्यक्त व्हायचंय ते त्यांच्या मूळ नावानं करता येत नाही,बोलता येत नाही. ही काही उदाहरणं आहेत.

इस्लाम वाढतोय, म्हणजे नेमकं काय होतंय. हे समजून घेतलं पाहिजे. इस्लाम हा शांतीचा धर्म आहे, तो वाढला आणि जगभरात शांतता प्रस्थापित होणार असेल तर मला नाही वाटत की याला कुणाचा विरोध असेल. ख्रिश्चन आणि इस्लाम हे दोनच धर्म जगभर आपला प्रसार करतायत. त्यामुळे या दोन धर्मांमध्ये संघर्ष काही लपलेला नाही. मध्यंतरी मी नेदरलँड्सला गेलो होतो. तिथे तर मशीदी विकत घेऊन त्यांचं चर्चमध्ये रूपांतर करणं सर्रास सूरू आहे. इतकंच काय काल परवा झालेल्या निवडणूकांमध्ये एक राजकीय पक्ष अधिकृतपणे इस्लामविरोधी भूमिका घेऊन निवडणूकीत उतरला होता. त्याची पीछेहाट झाली हा भाग वेगळा. अमेरिकेतही मुस्लीमांबद्दल द्वेष आहे. युरोप मध्येही आहे. भारतासारख्या देशात ही आहे. याची मिमांसा करताना मुस्लीम नेते दिसत नाहीत. उलट या द्वेषाच्या कहाण्या सांगून भारतीय मुसलमानांना सतत पेटवत ठेवण्याकडेही अनेकांचा कल आहे. मुस्लीमांना भारतात व्होटबँक समजलं गेल्याने ती बँकच कशी राहिल याकडे जास्त लक्ष दिलं गेलं. यामुळेसुद्धा भारतीय मुसलमानांचं जास्त नुकसान झालं आहे. त्याचमुळे मुस्लीम धर्मियांमध्ये जागरूकता, सुधारणा याबाबत बोललं गेलं नाही. टुकार मुल्ला मौलवींना महत्व देऊन त्यांचं महत्व सतत वाढवत ठेवलं गेलं.

इस्लाम वाढतोय, तो असाच वाढणार असेल तर तो अधिक जबाबदारीनं वाढला पाहिजे. सुधारणांना स्वीकारत वाढला पाहिजे. कट्टरतावादाला, रक्तपाताला,हिंसाचाराला तिलांजली देऊन वाढला पाहिजे, सहिष्णुता ही वाढली पाहिजे. बदल आणि सुधारणांना विरोध करत आणि धर्माच्या मूळ तत्वांना नाकारत इस्लाम वाढत असेल तर मग जगाला खरोखरच चिंता करण्याची गरज आहे. पण याला उत्तर अधिक कट्टरवादी बनून विरोध करणं नसून बदलांची प्रक्रीया सुरू करणं हे आहे.

भारता पुरतं बोलायचं झालं तर राजकीय पक्षांच्या गुलामीतून बाहेर पडून मुसलमानांनी सुधारणांची चळवळ सुरू केली पाहिजे. कट्टरतावादाशी आपला संबंध जाहीरपणे नाकारला पाहिजे. बुद्धीवादी, विवेकवादी चळवळी उभारल्या पाहिजेत. न्याय आणि समतेसाठी लढा दिला पाहिजे. महिलांना माणूस म्हणून अधिकार दिले पाहिजेत. राज्यघटेनेची चौकट स्वीकारली पाहिजे.

जो पर्यंत मुस्लीम समाज हे करत नाही, धर्मनिरपेक्षतावादाचा पुरस्कार करणारे कार्यकर्ते जो पर्यंत सुधारणांसाठी लढत नाहीत तो पर्यंत बहुसंख्यांक समाजबहुमताच्या जोरावर करत असलेल्या राजकारणा समोर शरणागती पत्करण्या शिवाय गत्यंतर राहणार नाही. भारतीय मुसलमानांसाठी युपीच्या निवडणूका एक मोठा धडा आहे. सुधारणांबाबत आवाज उठवून एक मोठ्या पक्षाने राजकारणाची पारंपारिक चौकट मोडून काढली, पण त्याचबरोबर प्रतिनिधीत्व नाकारून आवाज ही दडपून टाकला आहे. लोकशाहीत या पेक्षा आणखी मोठा धडा आणि धोका काय असू शकतो.

भारतीय मुसलमानांना आता सुधारणा हव्या आहेत. त्याला प्रतिनिधीत्व ही हवं आहे, तो फक्त व्होटबँक नाहीय. तो जगातील इतर मुसलमानांसारखा ही नाहीय. जगातील इतर मुसलमानांसारखं सुधारणांना कट्टर विरोध ही इथे होत नाही. जगातील मुसलमानांची लोकसंख्या वाढत असताना हा बागुलबुवा दाखवून अनेक राजकीय पक्ष यापुढचं राजकारण करतील, पोलरायझेशनही करतील. घाबरवतील, बहुसंख्यं हिंदूंना पेटवतीलही. त्या सर्वांसाठी जाता जाता…

२०५० मध्ये ब्रिटन आणि फ्रान्स मध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षाकमी होईल, अमेरिकेत प्रत्येक ५० लोकांमध्ये एक मुसलमान असेल, युरोप मध्ये मुस्लीमांची संख्या १० टक्के झालेली असेल, भारत हा जगातील नंबर एकचा मुस्लीम लोकसंख्या असलेला देश बनण्यापासून २० वर्षे मागे असेल,मात्र तेव्हाही भारतात हिंदूंची संख्या जास्तच असणार आहे.

Updated : 17 March 2017 9:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top