Home > मॅक्स ब्लॉग्ज > ...आणि दादरच्या पुलावर सीमा नाडकर्णी तुडवली गेली

...आणि दादरच्या पुलावर सीमा नाडकर्णी तुडवली गेली

...आणि दादरच्या पुलावर सीमा नाडकर्णी तुडवली गेली
X

एल्फिन्स्टन ब्रिजवर चेंगराचेंगरी झाल्याची बातमी वाचून लेखक दिनानाथ मनोहर यांना ३५ वर्षापूर्वी ग्रंथालीनं प्रकाशित केलेल्या 'सीमांत' या त्यांच्या कादंबरीचा पहिलं प्रकरण आठवलं. त्या प्रकरणातील दोन पानं त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत........................

पुन्हा एकदा माणसं पुढे सरकू लागली... पावले फरफटत, शरीरे ओढत. अडखळलेला प्रवाह पुन्हा पुढे सरकू लागला. असंख्य पायांची ती ओंगळ अळी, ती केसाळ लिबलिबीत काळी अळी, शरीराला झटके देत पुढे सरकू लागली आणि परत थांबली. उलट दिशेनं येणारा प्रवाह, ह्या प्रवाहाशी झगडत होता, रेटारेटी चालू होती, फटीफटीतून माणसं आपले हात, पाय, डोकी खुपसून पुढे घुसण्याची धडपड करीत होती. दोन्ही प्रवाह समोरासमोर येऊन थांबल्यासारखे झाले होते. तरीही प्रचंड हालचाल चालू होती, प्रत्येकजण धडपडत होता, कोलाहल वाढत होता, पण कुणीच पुढे सरकत नव्हते.

मागील बाजूची माणसं अस्वस्थ होऊन, माना लांबवून पुढे पहाण्यासाठी धडपडत होती. काय झालंय? आपण पुढे का सरकत नाही? विलक्षण असहाय्यतेची भावना तिच्या शरीरात आकार घेऊ लागली. तिनं आपले दोन्ही हात छातीशी आणले, आपले पोट आत खेचून आपलं शरीर भिंतीकडे वळवण्याचा प्रयत्न केला, आपली पावलं हलवली. डाव्या बगलेखाली, ब्लाऊजच्या कडेशी कुणाच्या तरी बोटांचा स्पर्श होतोय, गिळगिळीत, चिकट गोगलगाय छातीच्या दिशेनं सरपटतेय. उजव्या हाताच्या फटकाऱ्यानं तिनं ती बोटं झटकली. झटक्यात ती पुढं सरकली, पण तिच्या आजुबाजूनं, सर्व अंगांनी घामट शरीरांची अभेद्य भिंत उभी होती. आजूबाजूच्या गर्दीवरून नजर फिरवताना ती एकदम शहारली. आपल्या पोटात खोल...खोल खड्डा पडला आहे, ह्या खड्डयात आपली छाती.. आपली फुफ्फुसं आत आत...आत कोसळत आहेत, असं वाटलं तिला. मनाच्या तळाशी खोल खाली दडपून टाकलेली भीती उसळून वर आली.

त्या भीतीनं तिचा ताबा घेतला. तिचे हृदय वेगानं धडधडू लागलं, सर्व शरीर थरथरू लागलं. कानांजवळून घामाच्या धारा वाहू लागल्या. असंख्य हातांच्या, ह्या विक्राळ प्राण्यानं आपल्याला वेढलं आहे, गुरफटलं आहे. आपण गुदमरत आहोत. पृष्ठभागाकडे येण्यासाठी ती धडपडत होती, पण कुठल्यातरी मजबूत पंजांनी तिला पायाखाली घट्ट दाबून धरलं होतं.

पापण्या घट्ट मिटून तिनं आपलं डोकं हलवलं. ती स्वतःशीच झगडत होती. ही भीती अनाठायी आहे, इरॅशनल आहे. तिची नजर वेगानं आजुबाजूच्या माणसांवरून फिरली. मख्ख चेहऱ्यांची ती गर्दी, ते भावनाशून्य चेहरे, थिजलेले डोळे, पण त्यांची शरीरे मात्र धडपडत होती, पुढे सरकण्यासाठी. एकमेकाला बाजूला सरकवण्यासाठी हलत होती. पण त्यांच्या पाषाणी चेहऱ्यांवर ते काय करत होते, ह्याची निशाणी दिसत नव्हती. जणूं त्यांचे हात, त्यांचे पाय, त्यांची शरीरं ह्य प्रवाहाचा भाग आहेत हेच समजत नव्हतं त्यांना.

माणसंच आहेत ही. आपल्यासारखी साधीसुधी माणसं. तिची नजर एकाएकी पिसाळल्यासारखी, वेडावल्यासारखी, वेडीवाकडी, आडवी तिडवी धावली. त्या गर्दीत ती एकटीच सापडली होती, फसली होती, सापळ्यात अडकली होती.

खांदे उंचावून, डोकं पुढे ढकलून एक जोरदार मुसंडी मारावी, असा विचार तिच्या मनात उमटला, पण लगेच जागीच विरला. ह्या मख्ख चेहऱ्यांच्या गर्दीसमोर ती अबला होती. एकटी होती. तिच्या शरीरातील उरली सुरली ताकद ओघळून गेली. काही उपयोग नाहीये. तिचे सर्व अवयव ढिले पडले, एखाद्या हवा निसटून गेलेल्या फुग्याप्रमाणे आपण जमिनीवर पडणार, ह्या भीतीने तिच्या शरिराचा ताबा घेतला.

' मारो धक्का, मारो..चलो..अरे चलो" कुणीतरी ओरडले आणि एकाएकी बांध फुटल्यासारखा तो प्रवाह वाहू लागला. पुढील भागाकडून आलेली लाट तिच्या अंगावरून मागं सरकत गेली. ती ओंगळ अळी एकदम शरीराला झटके देत पुढे सरकू लागली.

तिनं त्या लोखंडी बीमला घट्ट लटकून राह्यचा प्रयत्न केला. ' पुढं जायचं नाहीये मला. मागंही नाही जायचं. ह्या गर्दीतून बाजूला व्हायचंय मला. कुठंही नाही जायचं मला. व्हा तुम्ही पुढं. जायचंय ना तुम्हाला. मी इथंच राहीन. सोडा मला.' पण आपली ही धडपड वांझ आहे हे तिला माहीत होतं. ती पुढं ढकलली गेली. मूळासकट उपटून प्रवाहात वहात जाणाऱ्या झूडपासारखी फरफटली गेली.

एकमेकाला ढकलत, रेटत, बाजूला सरकवत ती माणसं पुढं धावली. रोंरावत, फूफाटत, उन्माद चढल्यासारखी, वाटेत येईल त्या अडथळ्याला बाजूला ढकलीत, उपटत, तुडवत तो प्रवाह वाहू लागला. पुलाच्या दुसऱ्या टोकाशी किंचित अडखळून तो प्रवाह जिन्यावरून खाली कोसळत होता. तिच्या पावलांनी जमीन सोडली होती, तिच्या पोटावर, पाठीवर, कंबरेवर, असह्य धक्के बसत होते, शरीरावर प्रचंड दाब वाढत होता. श्वासोच्छ्वास करण्यासाठी ती धडपडत होती, पायऱ्यांवर पाय टेकण्यासाठी धडपडत ती अर्धी जीना खाली खेचली गेली होती. एकाएकी तिच्या पोटातून एक विलक्षण तीव्र वेदनेची काळोखी कळ घोंघावत डोक्याकडे धावली, सरसरत जाऊन खडकावर आदळली, फुटली, खाली कोसळली. तिच्या हातांची बोटं आधारासाठी वेड्यासाठी चाचपडत धावली. हवेतच काहीतरी पकडण्यासाठी तडफडली. जोरात किंचाळण्यासाठी तिनं तोंड उघडलं, असंख्य किंचाळ्यांचा तिच्या मेंदूत स्फोट झाला. आकाशातून एक प्रचंड काळाकूट्ट ढग तिच्या अंगावर झेपावला. त्या ढगाचे असंख्य अणकूचीदार सुळे तिच्या मस्तकात, छातीत, पोटात, मांड्यांत घुसले. लक्कन एक जाणीव तिच्या मनात चमकून गेली, शेवटच्या क्षणाला. ती स्वतःच हरली होती, प्रतिकाराचा प्रयत्नही न करता. मग.. मग त्या काळोखानं तिला आपल्या कवेत घेतलं होतं.

दादर स्टेशनच्या पुलावर सौ. सीमा अनंत नाडकर्णी गर्दीच्या पायांखाली तुडवली गेली होती.

(दिनानाथ मनोहर यांच्या फेसबुक वॉलवरून साभार)

Updated : 30 Sep 2017 11:00 AM GMT
Next Story
Share it
Top