Home > मॅक्स ब्लॉग्ज > असे करा चार वेळा मतदान...

असे करा चार वेळा मतदान...

असे करा चार वेळा मतदान...
X

पॅनल पध्दतीची निवडणूक म्हणजे थोडक्यात बहुसदस्यीय प्रभाग पध्दती

याचाच अर्थ एका प्रभागात ( वार्डात ) एकापेक्षा अनेक नगरसेवक.

वार्डाला पॅनल म्हणणं हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे.

एकसदस्यीय वार्ड पध्दतीत एका वार्डात एकच नगरसेवक असतो, तर बहुसदस्यीय वार्ड पध्दतीत वार्डाचा आकार वाढवला जातो व एका वार्डात अनेकांना नगरसेवक बनण्याची संधी दिली जाते.

एकसदस्यीय वार्ड पध्दतीत एखादं आरक्षण पडलं तर इतरांना प्रतिनिधित्वाची संधी मिळत नाही. पण बहुसदस्यीय वार्ड पध्दतीत एका वार्डात एकाच वेळी विविध प्रवर्गातील उमेदवार निवडणूक लढवू शकतात. एससी, एसटी, ओबीसी, महिला आणि सर्वसाधारण यापैकी किमान चार जणांना सद्याच्या पध्दतीत संधी देण्यात आली आहे.

या प्रभागात आरक्षित व अनारक्षित जागांना अ, ब, क, ड असे क्रमांक दिलेले आहेत. प्रत्येक जागेसाठी वेगळ्या रंगाची मतपत्रिका असणार आहे. अ जागेसाठी पांढऱ्या, ब जागेसाठी गुलाबी, क जागेसाठी पिवळ्या व ड जागेसाठी निळ्या रंगाची मतपत्रिका आहे.

आपल्याला चार मतांचा अधिकार आहे. चारही मतपत्रिकांवर मतदान करणे जरूरी आहे. प्रत्येक रंगाच्या मतपत्रिकेतून कोणाला तरी एकाला मतदान करायचे आहे. प्रत्येक रंगाच्या मतपत्रिकेतून निवडून येणारा प्रत्येकजण त्या वार्डाचा नगरसेवक असणार आहे. असे एका वार्डाला चार नगरसेवक लाभणार आहेत. त्या चारही नगरसेवकांचा एकच वार्ड असणार आहे. अ, ब, क, ड ही फक्त निवडणूकीसाठी निर्माण केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. अ, ब, क, ड हे वार्ड नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

राजकीय पक्षांकडे चारही जागांसाठी एकच निशाणी असते. त्यामुळे त्यांना चारही जागांवर एकाच निशाणीवर मतदान करा, असं मतदारांना सांगणं सोपं जातं. पण मतदारांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन काही पक्ष मतदारांची दिशाभूल करतात. चारही मशिनवर एकच निशाणी दाबावी लागते, वेगवेगळ्या निशाणीवर बटन दाबल्यास मतदान बाद होतं, असं सांगून मतदारांना घाबरवलं जातं. पण असं काहीही नाही. प्रत्येक मतदार त्यांच्या पसंतीप्रमाणे प्रत्येक मशिनवरील पांढऱ्या, गुलाबी, पिवळ्या, निळ्या मतपत्रिकेवर प्रत्येकी एक अशा वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या चिन्हावर चार वेगवेगळ्या उमेदवारांना मतदान करू शकतो. अट एकच...एका मतपत्रिकेवर फक्त एकच बटन दाबता येवू शकते. चारपैकी ज्या मतपत्रिकेवर एकही उमेदवार पसंत नसेल, तर तिथे NOTA चे बटनही दाबता येऊ शकते.

पॅनल पध्दतीत आपल्याला हव्या त्या पक्षाचे हवे तसे उमेदवार निवडता येतात. याचा फायदा घेऊन राजकीय पक्षांच्या मनमानीला, घराणेशाहीला पायबंद घालता येऊ शकतो. केवळ आपल्याला आवडणाऱ्या राजकीय पक्षाचा उमेदवार आहे, म्हणून अशिक्षित, अल्पशिक्षित उमेदवारांना अजिबात मतदान करू नका. ज्यांना यापूर्वी किमान दोनदा संधी मिळालीय त्यांना घरी बसवा. दुसऱ्या पक्षाच्या नव्या कार्यकर्त्यांना संधी द्या. एकाच कुटुंबातील दोन किंवा अनेक व्यक्ती निवडणूक लढवत असतील, तर त्यातील एकाच कोणातरी सक्षम व्यक्तीला निवडून द्या. इतर जागांवर दुसऱ्या उमेदवारांना संधी द्या. एकाच कुटुंबातील अनेक उमेदवार निवडून देणं म्हणजे लोकशाही दृष्टीकोनातून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं. आपणच आपले पर्याय मोडीत काढणं.

तेव्हा विवेकाने मतदान करा. मतदानाचा अधिकार राजकीय पक्षाचे किंवा कार्यकर्त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी नसून आपले स्वतःचे भवितव्य घडवण्यासाठी आहे, हे लक्षात असू द्या. जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने मतदान केले पाहिजे. अगदीच कोणी लायक उमेदवार नसतील तरी राजकीय उदासीनता बाळगायचं कारण नाही. NOTA वर दिलेलं मतसुध्दा आपली राजकीय भूमिका स्पष्ट करतं व लोकशाहीचा कौल अधिक सुस्पष्ट होतो. तेव्हा तुमचं जे आणि जसं राजकीय मत असेल त्याची नोंद करण्याचा एकमवे मार्ग म्हणजे मतदान...ते वेळात वेळ काढून नागरिकत्वाचं मुख्य कर्तव्य म्हणून करायलाच हवं.

राज असरोंडकर

9850044201/7666644201

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ

Updated : 20 Feb 2017 3:09 PM GMT
Next Story
Share it
Top