सोशल मीडिया, सायबर गुन्हे आणि आपण

5423

सध्या डिजिटल इंडिया संकल्पनेतून सुरू झालेले कॅशलेस व्यवहार आणि सोशल मीडियाचा वाढता वापर यामुळे ऑनलाइन गुन्हे वाढू लागले आहेत, ओळख लपवून इंटरनेटवर गंभीर गुन्हे सहज करता येतात. पासवर्ड हॅक करून ऑनलाईन बॅंकिंग आणि जॉब फ्रॉड, लॉटरी, एटीएम स्कीमिंग, नायजेरियन फ्रॉडसारखे ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे गुन्हे, सोशल नेटवर्किंग साईट्‌सच्या माध्यमातून देव-देवता, महापुरुषांचे विडंबन, महिलांचे बनावट प्रोफाईल तयार करणे, मॉर्फिंग, अश्‍लील फोटो वेबसाईट्‌सवर टाकणे अशा गुन्ह्यांचा तपास करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. फेसबुक, ट्विटर, लिंक्‍ड इन, व्हॉट्‌सऍपसारख्या सोशल मीडियावर देवी-देवता व महापुरुषांसंबंधी बदनामीकारक मजकूर टाकल्याने सामाजिक शांतता धोक्‍यात येत आहे. यासंबंधीतच सायबर नेट, सायबर क्राईम, सायबर सिक्युरिटी असे शब्द आपण सर्रास ऐकतो. पण, याबाबींची तीव्रता आपल्याला माहिती नसते. त्याच बाबींवर आपण प्रकाश टाकणार आहोत.

सायबर सिक्युरिटी : – संगणकावर होणारा गुपचूप हल्ला किंवा अनधिकृत घटकांकडून झालेली संगणकप्रणालीची अतोनात हानी आणि त्याचेच संरक्षण म्हणजे सायबर सेक्युरिटी(Cyber Security) होय.

सायबर गुन्हा : –  सायबर गुन्हा हा पारंपारिक गुन्ह्याप्रमाणेच असतो फक्त तो सायबर स्पेसमध्ये इलेक्ट्रॉनिक व संगणकीय वातावरणात केलेला असतो. म्हणून त्याला सायबर गुन्हा (Cyber Crime) म्हणतात.

 

सायबर गुन्ह्यांचे प्रकार

सॉफ्टवेअर पायरसी (सॉफ्टवेअरची चाचेगिरी) : संगणक वापरासाठी संगणकासाठी तयार केलेले कायदेशीर सॉफ्ट्वेअर म्हणजेच लायसन्स सॉफ्ट्वेअर वापरावयाचे असते. परंतु काहीजण अशी लायसेन्स सॉफ्टवेअर वापरत नाहीत. बेकायदेशीरपणे सॉफ्ट्वेअरची कॉपी करून वापरण्यास सॉफ्ट्वेअरची चाचेगिरी म्हणतात. कॉपी केलेल्या सॉफ्ट्वेअरला पायरेटेड सॉफ्ट्वेअर म्हणतात.

हॅकिंग : हॅकिंग म्हणजे नियमांचे उल्लंघन करणे अथवा बेकायदेशीर पध्दतीचा अवलंब करणे. सायबर गुन्ह्यामध्ये संगणाक, संगणक नेटवर्क अथवा वेबसाईटची सुरक्षितता भेदणे व त्यामधील माहिती बदलणे, चोरणे किंवा संगणक प्रणाली खराब करुन त्यामध्ये बिघाड करणे, याला हॅकिंग म्हणतात.

सायबर स्टॉकिंग : यामध्ये एखाद्याची माहिती मिळवून त्याला धमक्या देऊन व मेल पाठवून जेरेस आणतात. फोन करुनही त्रास देतात.

डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक : (सुविधा नादुरुस्त करणे) यामध्ये नेटवर्कची सुविधा बंद करण्यासाठी नेटवर्कची बॅन्ड विड्थ फ्लड करतात. असंख्य व फार मोठे मेल पाठवून (स्मॅम मेल) मेल बॉक्स भरुन टाकतात. यामुळे नेटवर्कमधील ट्रॅफिक जॅम होते व कम्युनिकेशन थांबते.

व्हायरस डेसीमिनेशन :  व्हायरस म्हणजे संगणकबाह्य सूचना संगणाकात प्रवेश करुन बिघाड करतात, माहितीची नासधूस करतात. अशा संगणक प्रोग्रॅमला व्हायरस म्हणतात. हे प्रोग्राम  संगणक प्रणाली दूषित करून हेतूपूर्ण नुकसान घडवतात.

आय.आर.सी.क्राईम (IRC Crime Internet Realy Chat): इंटरनेटवर सध्या चॅटरूम उपलब्ध आहेत. यामध्ये चॅट करणारी व्यक्ती खोटी माहिती सांगून दुसऱ्याला फसवू शकते. अशा चॅटरुममध्ये खोटी माहिती देऊन इतरांना फसविण्याचे प्रकार वाढले आहेत. या गुन्हेगारीला आय.आर.सी.क्राईम असे म्हणतात.

क्रेडीट कार्ड फ्रॉड : यामध्ये क्रेडीट कार्डचा बेकायदेशीर वापर करुन खरेदी करण्याचे गुन्हे केले जातात.

नेट एक्स्ट्रॉरशन : कंपनीचा गोपनीय व महत्त्वाचा डाटा चोरी करुन त्यापासून पैसे मिळविले जातात किंवा कंपनीकडूनच पैसे मागितले जातात.

पिशिंग (Phishing) : यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेल पाठवतात व लोकांची पर्सनल माहिती मिळवतात. अनावधानाने मेलला उत्तर देताना बॅक अकाऊंट नंबर, पासवर्ड पाठवला जातो. नंतर गैरवापर करतात.

चाईल्ड पोर्नोग्राफी :  लहान मुलांना फसवून त्यांना बीभत्स चित्र, वाडमय, चित्रफित पाठविल्या जातात. यामध्ये लहान मुलांचे मेल ऍड्रेस मिळवितात. चॅटमध्ये खोटी माहिती सांगून त्यांचा विश्वास संपादन करतात. त्यांना मेलद्वारे बीभत्स गोष्टी दाखवून समाजामध्ये सगळे असेच करतात असे त्या मुलाला सांगून त्याची पूर्ण फसवणूक करतात. त्याचा विश्वास बसल्यानंतर त्याला घराबाहेर भेटण्यास सांगतात. अशा भेटीमध्ये मुलांचा आणखी विश्वास संपादन करुन त्याच्याकडून अनैतिक लैंगिक गोष्टी करवून घेतात.

प्रतिबंधात्मक उपाय:

1) सोशल मीडियावर फेसबुक, ट्विटरसारख्या संकेतस्थळांवर कोणत्याही नेत्याच्या, धर्माच्या किंवा इतर संवेदनशील बाबींवर आपत्तीजनक पोस्ट/कमेंट करू नका. याने सामाजिक सलोखा बिघडतोच पण भादंवि कलमनुसार तुम्ही तुरुंगात जावू शकता व दंडात्मक कारवाईसुद्धा होऊ शकते.

2) कॅशलेस व्यवहारांमुळे सातत्याने वापरत येणारे payटीएम, भीम सारख्या अॅप्लिकेशन वापरत असताना पासवर्ड दुसर्‍यांना समजणार नाही याची काळजी स्वतच घ्यायची आहे.

3) तुम्ही एखाद्याचे नक्कल करणारे बनावट आयडी बनवून त्या व्यक्तीचे नक्कल करणारे किंवा आक्षेपार्ह पोस्ट सतत टाकले व मूळ व्यक्तीने सायबर विभागाकडे तक्रार केली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते म्हणून अशा बाबी आपण कटाक्षाने टाळाव्यात.

4) आर्थिक व्यवहार सायबर कॅफेमधून किंवा दुसऱ्याच्या संगणकावरून करू नका.

5) अनोळखी संकेतस्थळांना भेटी देण्याचे टाळा.

6) चॅट करताना कुठलीही महत्त्वाची माहिती टाइप करू नका. वेब कॅमेरा काम झाल्यावर बंद करा किंवा झाकून ठेवा.

7) संगणक वापरताना जागरूक राहा. अनोळखी व अनावश्यक गेम्स व प्रोग्रॅम लोड करू नका.

8) स्पायवेअर व वायरस यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये चांगला अँटी व्हायरस आणि अँटी स्पायवेअर प्रोग्रॅम बसवून घ्या.

9) दर दोन किंवा तीन दिवसांनी संगणकाच्या वापरामुळे जमा झालेली तात्पुरती डाउनलोडेड माहिती व जुनी वेब पेजेस कायमस्वरूपी काढून टाकत चला.

10) पासवर्ड असे ठेवा की जे सहज ओळखायला कठीण राहतील.

11) ज्या वेबसाईटच्या माध्यमातून पेमेंट करावयाचे आहे, तिची सुरक्षाव्यवस्था तपासा.

12) फोन क्रेडीट/ डेबीट कार्ड व ई-बॅकिंगची माहिती अनोळ्खी लोकांना देऊ नका.

13) डेबीट/ क्रेडीट कार्ड गहाळ झाल्यास ते रद्द करण्यासाठी तात्काळ अर्ज करा व संबंधित संस्थेला त्याची माहिती द्या.

14) काही ई-मेल अनोळखी व्यक्ती अथवा संस्थाकडून येतात. ते काळजीपूर्वक वाचा. ऍटचमेंटबरोबर व्हायरस येऊ शकतो. असे ई-मेल माहितीची विचारणा करतात. तेव्हा महत्त्वाची गोपनीय माहिती, पासवर्ड, फोन नंबर देऊ नका.

15) अश्लील ई-मेल बघू नका, येणाऱ्या लिंकवर क्लिक अजिबात करू नका, दुर्लक्ष करा.

16) नियमितपणे ई-मेल, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामच्या अकाऊंटचा पासवर्ड बदला.

17) वायरलेस इंटरनेट राऊटर खिडकी किंवा दरवाज्याजवळ नको. त्याची योग्य जागा म्हणजे हॉलच्या मध्यावर असावी.

18) रेंज निवडताना, इमारत व परिसराचा योग्य विचार करावा. यामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या निम्या क्षेत्रापर्यतच इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल अशी रेंज असावी म्हणजे बेकायशीर वापर करता येणार नाही.

19) इंटरनेट वापरात नसेल तर बंद करावे.

20) फक्त सुयोग्य व्यक्ती व ऍथोराईजड लॅपटॉपचा वापर होत आहे की नाही हे नेहमी तपासून पहावे.

21) महत्त्वाच्या फाईल्स, फोल्डर्स व गोपनीय माहिती ही फक्त ऍक्सेस असणाऱ्यांना वापरुन द्या. यामध्ये इतर कोणी बेकायदेशीर उपयोग करत नाही यावर लक्ष ठेवावे लागते.

22) लॉग डाटा म्हणजे कोणी कोणता संगणक वापरुन इंटरनेट अथवा इन्ट्रानेटचा वापर केला याची नोंद हा लॉग डाटा दररोजच्या दररोज हार्डडिस्कवर बॅक घ्यावा.

23) संगणकामधील महत्त्वाचे माहिती नष्ट किंवा खराब करण्यासाठी व्हायरसचा उपयोग करतात. यापासून सुरक्षा म्हणून चांगल्या प्रतीचे व सतत अपडेट करता येईल असे ऍन्टी व्हायरस प्रोग्रॅम संगणकावर नेहमीच लोड करावे.

24) महत्त्वाच्या डाटाचा बॅकअप संगणकामधील हार्डडिस्कवर ठेवावा तसेच सी.डी. रॉमवरही ठेवावा.

25) संगणक व नेटवर्कचा ऍडमिनिस्टरचा पासवर्ड कोणालाही देऊ व तो सतत बदलत रहावे.

26) इंटरनेट वापरातून व्हायरस येण्याची शक्यता असते अशा वेळी काळजी घ्यावी. Antiviras चा वापर करावा.

27) दुस-या संगणकाकडून पेन ड्राईव्ह अथवा स्टोरेज उपकरणातून वापरावयाच्या फाइलचे व्हायरस स्कॅनिंग करुन मगच वापराव्यात.

28) फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर वावरत विशेषतः चॅटिंग करताना गोपनीय माहिती उघड करू नका ही बाब अंगलट येऊ शकते!

क्रमशः
( पुढच्या आठवड्यात आपण यासंदर्भातील कायदे जाणून घेणार आहोत)

-गोपाल मदने, संगणक अभियंता
[email protected]
Twitter: @madanegopal
९९६०२७९३१०/७०२०५५४४८२