माघी एकादशी

463
308210_140917164401765

लिओनार्डो दा विन्ची the last supper रंगवतोय आणि काही वर्षे ते चित्र पूर्णच होत नाहीये. तो रोज त्या चित्राकडे वेगवेगळ्या कोनातून बघतोय. कधी तासंतास ते रंगवत बसेल, कधी ब्रश चा एखादाच फटकारा मारेल तर कधी काहीच न करता नुसताच बघत बसेल. का? कारण त्याचं समाधानच होत नाही.

परवा इकडून पंढरपूर ला जाताना एकादशी होती हे बस स्टैंड वर गेल्यावर कळले. साधी सुधी नाही माघी एकादशी! वारकारीच वारकरी!

बस थाम्बायलच तयार नाहीत. एवढा राग आला! चिड़चिड़ चिडचिड.. कशाला जात असतील हे म्हातारे कोतारे एवढी यातायात करुन? देव तर नसतोच! मग?

शेवटी एका बस मधे शिरण्यापुरती व्यवस्था झाली. दारात लटकत प्रवास सुरु झाला. त्यांची चर्चा चालली होती.. दर्शन बारी पंढरपुरच्या बाहेर 12 km गेली होती. म्हणजे ते सात मजली लाइन असणारे हॉल भरून बाहेर 12 km.

 बाप रे!!

 म्हणजे आज लाइन मधे उभे राहिले तर कमीत कमी 72 तासांनी दर्शन होइल. त्यातही हाल हाल.. माझा भाऊ म्हणायचा की साक्षत पांडुरंग  प्रसन्न होऊन दर्शन देणार असता तरी मी एवढा वेळ थांबलो नसतो.

जोक्स अपार्ट, पण दर्शन झाले तरी एक दोन सेकंद सुद्धा त्या मूर्तिला नीट बघता येत नाही. पोलिस अक्षरशः खेचून बाहेर काढ़तात एकेकाला. मग तर माझे डोकेच फिरले.. का?

 विचारलेच त्यातल्या एकाला.. दर्शन तर एकादशी दिवशी होणारच नाही, मग का जायचं? म्हातारा चांगला होता बिचारा, म्हणाला समाधान मिळते आम्हाला!

 समाधान?

कसले समाधान? हे बस मधे असे लटकत उभे राहून जायचे.. तिथे मठात जागा मिळेल तिथे झोपायचे..मग सकाळी चन्द्रभागेतल्या अतिशय घाण आणि प्रदूषित पाण्याने आंघोळ करायची.. आपल्यासारख्याच लोकांच्या प्रचंड गर्दीत धक्का बुक्की करत फ़क्त कळसाचे दर्शन करायचे आणि परत जायची गाडी पकडायची. पुन्हा लटकत लटकत घरी जायचं. आणि ह्यातून त्याना समाधान मिळते! ??

करायचा ना देव देव, मग घरी बसून करा ना. हे असे हाल-अपेष्टा सहन करण्यात काय अर्थ आहे? आणि बऱ्याच वेळा शरीराला त्रास दिला की देव लवकर प्रसन्न होतो असा समज आहेच लोकांच्यात! ही आणखी एक अगम्य गोष्ट.

वाद घातला मी.. पण उपयोग शून्य. त्याचे मला आणि माझे त्याला कळेना. शेवटी स्टॅंडवर उतरलो दोघेही. मी सांगितले की मी नास्तिक आहे म्हणून. त्यालाही गम्मत वाटली. पण म्हातारा जाताना मला नमस्कार करुन गेला. माउली माउली!!!

 मी माझा उलट नमस्कार करेपर्यंत गर्दीत नाहिसा झाला होता. असो.. हे सवयीनच होत असावे.

एकदा अनुभव म्हणून मी ही जायचं ठरवलं. कोजागिरी पोर्णिमेला तुळजपूर ला यात्रा असते मोठी. लोक कोजागिरीच्या रात्री सोलापूर हुन तुळजापूर पर्यन्त चालत जातात. अंतर 45 km.. एका रात्रित! लाखो लोक असतात. पूर्ण रस्ता भरलेला असतो. मी पहिल्यांदा तो लोकांचा लोंढा पाहिला तेव्हा मला एवढं आकर्षण वाटलं त्याचं । I CONFESS। I wanted to join them at that moment. Something like a mass hysteria. अचानक त्या लोन्ढ़यांत स्वतःला झोकून द्यायची एवढी तीव्र इच्छा निर्माण झाली. तेव्हा तर मला ते लोक कोण आहेत कुठून आलेत आणि कुठे चाललेत हे ही माहिती नव्हतं. मग पुढच्या वर्षी माहिती काढून जायचं ठरवल आणि गेले. गर्दीतले एक असण्याची जाणीव. आणि फ़क्त जाणीव नाही त्याच्या पुढचं काहीतरी. acceptance of the fact that you are just one of many.

आणि त्या माणसांच्या प्रवाहासोबत चालत राहायचे. चालयाची सवय तर नाहीच. यापूर्वी 10km म्हणजे डोक्यावरून पाणी असं माझे चालणे. 45 km म्हणजे वेडेपणाच होता. सुरुवात केली तेव्हा खरच गम्मत वाटत होती. आणि कोजागिरिची पूर्ण रात्र बाहेर एवढ्या अनोळखी लोकांसोबत हे एक मध्यमवर्गीय मुलगी असल्या कारणाने थ्रिल सुद्धा होतं. मनात भीती सुद्धा होती. पण काही वेळात ती पूर्ण नाहीशी झाली. एवढ्या गर्दीत घाबरण्याचे काहीच कारण नव्हते. खरे म्हणजे सगळ्यांच्या सोबत चालणे मला शक्य होत नव्हते. आजुबाजूची माणसं क्षणाक्षणा ला बदलत होती. रत्यावरून अक्षरशः नदीच्या पाण्यासारखी माणस वाहत होती. एका माणसाचं बोलणं ऐकून मजा वाटली. तो त्याच्या सोबताच्या माणसाला सांगत होता की,

” माझ्या बापानं सांगितलं मला ही वारी करायला. एवढं एकच पुण्याचे काम. मग वर्षभर पाप केलं तरी चालतं”

आहे की नाही गम्मत!

रस्त्याने ‘आई भवानी ऊधो ऊधो’ चा गझर चालला होता. आणि तो one way होता. माझे लवकरच लोकांना विचारणे सुरु झाले अजून किती वेळ? किती अंतर राहिलय? अरे आता तर फ़क्त 15 km झाले? अजून भरपूर जायचं आहे। म्हणजे खूप.. आणि one way असल्यामुळे मागे जायचा option पण नव्हता. आणि त्या रस्त्या वरचा पब्लिक ट्रांसपोर्ट पूर्ण बंद करुन टाकला होता पोलिसांनी. एकहि वाहन नाही. आणि पोलिसही दिसत नव्हते. 25 km नंतर एक कैंप लागला तेवढेच.

मला राहून राहून तानाजी मालुसरे आठवायला लागले.मागे जायचे दोर कापून टाकलेले..

म्हणजे मी पुण्य वगैरे कमवायला गेले होते असे नव्हतेच् ना.. नास्तिक आहे मी!

आता पाय ओढल्या सारखे वाटायला लागले होते. पुढच्या प्रत्येक दोन km नंतर मी ब्रेक घेऊ लागले. लोक माझ्या शेजारी येऊन बसत आणि पुन्हा लोन्ढ्यात हरवून जात.

“काही काळजी नाही. “,”अजिबात पाय दुखणार नाहीत”,”आई भवानी आहे की काळजी घ्यायला”…

हम्म..माझे पाय दुखत असताना एक सत्तरितली म्हातारी मला सांगत होती. तिचे पाय दुखत असावेत की नासावेत आई भवानीच जाणे..

पुढे पुढे मी प्रत्येक 500 m नंतर फतकल

मारून बसू लागले. एक मात्र होतं.. खाण्यापिण्याची चंगळ. इतके लोक इतके काहीबाही वाटत होते. पुण्य करणाऱ्या लोकांना पुण्य न करू शकणाऱ्या लोकांकडून फुकट! आणि जे फुकट ते पौष्टिक हे आमचे ब्रीद वाक्य!

पण हे चालणारे लोक, ह्यांना पत्रावळ्या नीट फेकून देता येऊ नयेत? काही ठिकाणी रस्ते फ़क्त कचर्याने भरले होते. आणि अन्नाची प्रचंड नासाड़ी.. बघवत नव्हती.

कोजागिरीची एवढी सूंदर रात्र पण चंद्राकडे कुणी ढुंकून बघत नव्हते। कोजागिरीला रात्री म्हणे लक्ष्मी को जाग्रति को जाग्रति असे विचारत फिरत असते. आणि जो जागा असतो त्याच्या घरी मुक्काम करते. त्या रात्रि उजाडेपर्यंत मी टक्क जागी होते आणि चालत होते. पण लक्ष्मी आमच्या हातात यथा तथाच.

25 एक km संपल्यावर मला समजले की माझी कैपेसिटी संपली आहे. आणि एका ठिकाणी बसून चौकशी केली. मागे जायचे म्हणजे 25 km पुढे 20 km. वाहनाशिवाय जायचे म्हणजे पुढे जाणेच शहाणपणाचे होते.

कसे बसे चालणे सुरु केले.

I was constantly wondering though.. what keeps all of them moving? The ultimatum? Compulsion? कशाचे? कशासाठी?

 प्रचंड पाय दुखत असताना निदान ह्या वेळी तरी कोणताच पर्याय नसल्याने मी चालत होते. पण ही वेळ मी माझ्यावर पुन्हा येऊ देणार नव्हते. मी आपणहून ह्या यात्रेला पुन्हा जाणार नाही असे मी तिथेच ठरवून टाकले. पण बाकीच्यांचा प्रश्न होताच.. का? काही लोक तर.. काही कशाला बरेच लोक अनवानी चालत होते. ह्यातले बरेच लोक पुन्हा पुन्हा येतात यात्रेला. लहान लहान मुलं रडत फरफटत त्याना चालवलं जात होतं. कशासाठी? समाधान मिळत? मग मला का नाही मिळत?

अगदीच खरे संगायचे तर एक अविश्वास सुद्धा होता.. की खरेच चालतात का लोक? म्हणजे मला चालण्याचा अनुभव तर घ्यायचा होताच पण हे लोक खरेच चालतात की नाही ह्याची खात्री पण करून घ्यायची होती.

ह्यातले बरेच लोक कष्टकरी होते. रोजची सवय असेल त्याना.. अशी मनाची समजूत काढली. पण तरीही.. हे खुप होत होतं. थकलेली आणि थकणारी माणसं दिसतच होती की मला. मधेच एक एम्बुलेंस यात्रेतल्या क्रिटिकल पेशेंट ला घेऊन गर्दीत हॉर्न वाजवत रस्ता काढत सोलापूर च्या दिशेने जायची. म्हणजे ब्रेकडाउन होइपर्यंत चालयचे लोक!

मार्क्स आठवला “धर्म ही अफू ची गोळी आहे!” नक्कीच! नशाच तर होती ही. जी मला चढ़ली नाही.

आणि तम्बाखुची दुकान.. कितीतरी किलो तम्बाखू विकली गेली असेल.

पुढे मेडिकल कैम्प्स होते. तिथेही भयंकर गर्दी.. मी ही माझ्यासाठी painkillers घेतल्या. तेही फुकट होतं. पुण्याचे काम. डॉक्टर माझ्याकडे बघुन छद्मिपणे हसला असे मला उगीच वाटले. मला त्याला ओरडून सांगावेसे वाटले मी ह्यांच्यातली नाही रे. वेगळी आहे मी. चुकून आले इकडे.

painkillers खाल्यावर माझा चालण्याचा वेग बराच वाढला. पुढचे सात आठ किलोमीटर्स मी असेच उठत बसत चालले. पण पुढे होइनाच्.. पाय बधीर झाले. आता खरच मलाच एम्बुलेंस लागते की काय असे वाटु लागले. जीव घाबरा झाला. आणि रड़ कोसळलं.

त्यात मी एकटी होते. काही बरं वाइट झालच तर? चला मोक्ष बिक्श असलं काही असेलच तर ह्याच मार्गावर मिळून जायचा.

तरीही अजून 10-12 km राहिले होते. काय करावे सुचेना. आणि मला गीता आठवली. म्हणजे त्यातले विशेष काही कळतं अस नाही पण ह्या क्षणी कृष्णा ने अर्जुनाला काय सांगितले असते.. चालत रहा. मागे जायचे दरवाजे बंद झालेत. इथेच मरून गेलास तर डायरेक्ट स्वर्ग.

हम्म.. मीच माझा कृष्ण आणि मीच माझा अर्जुन. पण त्याचे काये ना.. स्वर्ग बिर्ग काही नसतं. त्यातही मला हसु आले. मी अजूनही नास्तिकच होते आणि आहे. पर्याय च नसताना बिचारा कृष्ण तरी काय सांगणार?

असो, असेच दोन-दोनशे मीटर करत दोन किलोमीटर संपले. आणि मला कुणीतरी सांगितले की आता डोंगर सुरु होणार आहे. आणि ह्याच्या पैरेलल रोड वर डोंगरावर जायला रिक्शा मिळतील. नुसते ऐकूनच माझा जीव भांड्यात पडला. आणि जेव्हा खरोखर एक रिक्शा मिळाली तेव्हा तो भांड्यातून परातीत आला. तरीही काही उपदेश देणारे भेटलेच “अग्ं एवढं चाललीस, आता थोडच राहिलय, कर चालून पूर्ण. आम्ही मदत करतो.”

आई गं!! सांगणारा साक्षात कृष्ण जरी असता तरी मी चालले नसते. आणि ह्या लोकांनी मला उचलून जरी नेले असते तरी मी गेले नसते. that was the limit. I think 40 something. मला आता एकच गोष्ट पाहिजे होती. माझं बेड.

मी परत जायला गाडया कुठे मिळतील ते विचारायला सुरुवात केली. पण गडावर जावेच लागणार होते. रीक्षात बसल्यावर पाय थरथर कांपत होते. आणि शेवटच्या पाच km चे मी तब्बल 70 रुपये मोजले. गम्मत म्हणजे माझ्या रिक्षात मी एकटिच बाई माणूस, बाकी सगळे पुरुष. का? धार्मिक बाबतीत बायका जास्त मुर्ख असतात म्हणून की त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून?

पण इथेही समाधान मिळालेच नाही. त्यानंतर दोन दिवस आजारपणात गेले.

कदाचित समाधान मिळवणे हे एखाद्याच्या वृत्तितच असावे.

आमचे एक सर सांगायचे, की समाधान दोन प्रकारचे असते. एक म्हणजे तुमच्याकडे जेवढे आहे त्याच्यात समाधान मानणे आणि दुसरे म्हणजे जे तुमच्याकडे नाहिये, जे तुम्हाला हवय ते मिळवून समाधान मिळवणे . त्यावेळी हा विचार प्रचंड आवडला होता.

पण मला ह्या दोन्ही प्रकारतले समाधान मिळत नाही. कारण काय असावे काय माहिती.. कदाचित मला नक्की काय हवे आहे तेच समजत नाही त्यामुळे.

 माझी एक रूम मेट होती. दहावी ला बोर्डात आलेली. प्रचंड हुशार असावी. म्हणजे IQ तरी चांगलाच असावा. एवढ्या स्पर्धेतून दहाविला बोर्डात येणे म्हणजे चेष्टा नाही. आपण तिच्याकडे बघताना एकदम आदराने बघायचो. पण बारावी नंतर ती आर्ट ऑफ़ लिविंग साठी जायला लागली आणि नंतर माझ्या मते ती वाया गेली. कारण काहीच career केलं नाही तिने. बाराविला फर्स्ट क्लास आला. नंतर कंप्यूटर च्या कसल्या कोर्स ला एडमिशन घेतलं पण सोडून दिलं तिने ते. आर्ट ऑफ़ लिविंग साठी वाहून घेतलं तिने स्वतःला. तिथलाच नवरा केला. आणि आता बंगलौर ला आश्रमातच राहते.

मागे आमची एक कॉमन मैत्रीण भेटली आणि तिचा विषय निघाला. आणि मी बोलले तिला की ती वाया गेली. एवढी हुशार मुलगी मनात येईल ते केलं असतं तिने. पण हे काय..?? हो, मनःशांती वगैरे मिळत असेल ठीक आहे. पण ह्याचा फ़ायदा काय? तिचा मेंदू, त्याची क्षमता समाजाच्या दृष्टीने वायाच नाहीं का गेली?

ती बिचारी मैत्रीण चांगली होती. मला म्हणाली

“अग्ं तू असा विचार का करतेस? ती जे काही करतेय त्यात ती खुष आहे. What in the world one seeks for? Hapiness! Isn’t it?”

“जर तिला ती जे काही करतेय त्यातून आनंद मिळत असेल तर ती गोष्ट आपल्या दृष्टीने वेडे पणाच का असेना.. आपल्या मताला अर्थ नाही.”

“मला सांग तू आज एवढे पैसे मिळावतेस, तू आहेस का तिच्या इतकी आनंदी? “

मी नकारार्थी मान हलवली, निरुत्तर झाले

आणि आम्ही निघालो.

अजून एक मित्र असाच भेटला होता. बोलता बोलता दुसऱ्या एका मित्राचा विषय निघाला. हा दूसरा मित्र न्यूमेरोलॉजि आणि ते माणिक मोती वगैरे च जे शास्त्र आहे याच्या मागे वेडा झाला होता. माझ्या मते ती दगड़ालोजी.. अजून एक वेडेपणा. तो खळखळ् उ न हसला आणि मग नंतर मला सांगायला लागला की मी ‘The Secret’ हे पुस्तक वाचायलाच पाहिजे.. ‘Law of attraction’

हे जग म्हणे ह्या एकाच गोष्टीवर चालते. तो हाच Law. प्राचीन काळी लोकांना हे माहिती होतं पण त्यानी पुढच्या पिढ़याना सांगितलं नाही.

“अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में जुट जाती है। “

 त्या दुसऱ्या मित्राचा वेडेपणा कसा Law of attraction मधे बसतो हे मला माझ्या समोरचा मित्र सांगत होता. आणि हा ख़ास त्याचा वेडेपणा .

आणि कोणतेच वेड स्वतःला चिकटू न देण्याचा माझा वेडेपणा..

पण Law of attraction नुसार मलाही माझा वेडेपणा सापडेलच कधीतरी.

                                       -स्नेहलता जाधव

[email protected]