वेट-लॉस तमाशा ( वाघाचा !)

एकदा अकबर बादशहाने बिरबलाला प्रश्न केला, “माझ्याकडे एक शेळी आहे. तिला मी खूप खूप खाऊपिऊ घालणार आहे. हिरव्यागार गवताच्या लुसलुशीत कुरणात बागडू देणार आहे. तिच्या मनाला त्रास होईल असे काही घडणार नाही. फक्त तिचे वजन वाढता कामा नये, अगदी एक किलोनेही!बिरबल म्हणाला, “जी हा खाविंद, हो जायेगा.
हे कसे  शक्य आहे?
महाराज ! तुम्ही माझ्यावर सोडा, मी करून दाखवतो.
बिरबला, ती शेळी माझ्या निगराणीखाली असेल.
चालेल महाराज, बिरबल उत्तरला.
पुढे त्या शेळीला उत्तम आहार देण्यात आला. हिरव्यागार कुरणामध्ये ती दिवसभर बागडत असायची, खूप आनंदी वाटायची. एक महिना गेला. परीक्षेची वेळ आली. सर्व दरबार भरलेला होता. शेळीला पेश केले गेले. शेळीचे रीतसर वजन करण्यात आले. महिन्याभरात येवढा सकस आहार देऊनही तिचे वजन एक किलोनेही वाढलेले नव्हते, उलट ते कमी झालेलेच आढळले.
“मान गये बिरबल, तू पैज जिंकली आहेस. पण मला आता हे सांग की, वजन का वाढले नाही?
त्यावर बिरबल म्हणाला. महाराज, मी फक्त एकच काम केले. शेळीला आपण रात्री ज्या गोठ्यात बांधतो तिथे एक वाघाची तसबीर आणून ठेवली. वाघाची तसबीर बघून शेळी फार घाबरायची. तिला तसबीर आणि खरा वाघ यातला फरक कसा कळणार? तिला वाटायचे  वाघ आपल्यावर कधीही झडप घालेल. त्या धसक्याने ती रात्रभर झोपायची नाही. त्यामुळे तिचे वजन कमी झाले.
दरबारातल्या सर्वांनी हात उंचावून बिरबलाचे कौतुक केले.
आता सद्य परिस्थितीत अशीच एक घटना घडली. यावेळी मात्र काम फार अवघड होते. कारण ज्या वाघामुळे शेळीचे वजन वाढणे थांबले त्याचेच वजन कमी करायचे होते!
दिवसभर वाघाला भरपूर खाऊ पिऊ द्यायचे, पण वजन मात्र वाढता कामा नये हे विचित्रच आव्हान होते . राजाने दरबारातील सर्वांना प्रश्न केला, “काय करता येईल?” काही उत्साही लोकांनी अंजली मुखर्जीचे नाव कन्सलटंट म्हणून सुचविले. काहीना हा ‘वेट लॉस’ ऐवजी ‘वेट कंट्रोल’ तमाशा वाटल्याने त्यांनी ऋजुता दिवेकर यांचा सल्ला घ्यावा असे सुचविले. पण त्यावर महाराज म्हणाले, नाही. खाण्यावर बंधन नकोच. त्याला हवे तेवढे खाऊ पिऊ द्यायचे आहे. तसेच फिरण्यावरही बंधन नको.”
तुम्हाला आपली जुनी गोष्ट आठवते का ? महाराज म्हणाले.
तसे काही करता येईल का?
पण इथे तर साक्षात वाघाचेच “वजन” कमी करायचे आहे, तेही सगळे एकट्यानेच खाऊ देवून. त्यांच्या सल्लागार कक्षातील सल्लागार रवी उद्गारला मिडीयात  बातम्या पेरूया. आपले कौतुभ मण्याप्रमाणे तेज झळकावीत दुसरा सल्लागार म्हणाला, सोशल मिडियाचा वापर केला पाहिजे. तर अमाप निधी जमा करणारी तिसरी एक सल्लागार उद्गारली, “वेगवेगळे  विडीओ करून ते वायरल केले पाहिजे.” चौथ्या एका प्रिय पात्राने मिडिया कॅम्पेनिंगची संकल्पना सुचविली.
सरकारी यंत्रणांवर विसंबू नका. बाहेरच्या यंत्रणांचा वापर करा. महाराजांनी फतवा काढला. खूप चर्चेनंतर आणि वादावादीनंतर असे ठरले की, वाघाला भीती दाखविण्यासाठी सिंहाचा विडीओ करावा. पण वाघ आणि सिंह हे मुळात मित्र पक्षच असल्याने ती कल्पनाही अखेर बारगळली.
शेवटी लक्षात आले की वाघाला घाबरवणारी गोष्ट म्हणजे वार्ध्यक्य ! एक त्याला जराजर्जर झालेले दाखवायचे. त्याचे दात पडून गेल्यामुळे बिळातले उंदीरही त्याच्या अंगाखांद्यावर खेळताहेत. कुणाला त्याचा धाकच राहिलेला नाही. असा विडीओ फायनल करायचं ठरले. शूटिंगही घेण्यात आली. तेवढ्यात एका सनदी अधिकाऱ्याने सुचविले, एवढ्यानेच वाघाचे वजन कमी होईल असे वाटत नाही. आपण एक रिंगमास्टर आणू या आणि वाघाला सर्कशीत काम करावे लागते असे दाखवू या. ज्या शेळीची तो शिकार करत होता त्या शेळीबरोबरच त्याला एका ताटात जेवायला लावू या, आणि हरिणांबरोबर लपंडाव खेळायला सांगू या. हे जर त्याने केले नाही, तर सर्कशीचा रिंगमास्टर त्यांच्यावर मिठाने भिजविलेला कोरडा ओढेल. चाबकाने फोडून काढेल आणि त्यावेळी त्याला कोणीही मदत करणार नाही.
सर्कस आणि रिंग मास्तरचा विडीओ तयार झाला आहे म्हणे, आणि तो आता वाघाच्या डोळ्यासमोर सतत दिसत असतो. त्याचे फेसबूक, ट्वीटर, व्हॉट्स अॅपवर सारखे विडीओ दिसतात.
वाघाचे “वजन” कमी झाले की नाही, हे बघण्यासाठी मात्र काळच जावा लागणार आहे.
 
 
ताजा कलम :-   नुकत्याच  मुंबई  महानगरपालिकेच्या  निवडणुका  झाल्या.  सत्तेमध्ये भागीदार असलेले भाजप आणि शिवसेना एकमेकाच्या  विरोधात  उभी राहिली.  प्रचारात  खूप   गरळ  दोघांनी ओकली.  दोन्ही पक्षाला  बहुमत मिळाले नाही.  दोघांनी महापौर  आमचाच अशा वल्गनाही केल्या.  पण शेवटी भाजपने सपशेल माघार घेतली.  एक वेगळीच खेळी केली.  महापौर पदासाठी  भाजपाचा  उमेदवार नसेल.  पण मुंबईच्या  विकासावर लक्ष  ठेवण्यासाठी एका उप लोक आयुक्तांची नेमणूक मात्र करण्यात येणार आहे.
 
आता मी वर सांगितलेल्या  कथेत जर काही  साम्य  आढळले  तर तो निव्वळ  योगायोग समजावा.  कथेतील  सर्व पात्रे  काल्पनिक आहेत
 
श्रद्धा  बेलसरे  खारकर