मी सुद्धा माणूसच!

देशातील वेगवेगळ्या राजघराण्यांमधून मी पहिलाच असा राजकुमार आहे ज्यानं उघडपणे स्वतः गे (समलैंगिक) असल्याचं जगापुढे मान्य केलं. खरंतर या दांभिक समाजाच्या साचेबद्ध मान्यतांच्या चौकटीमधून बाहेर पडून त्याविरुद्ध लढा देणे हे खूप मोठे दिव्य होते. पण, मी सांगतो समलैंगिकता विदेशातून आपल्याकडे आलेली नाही तर ती पुराणकाळापासून आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक राहिलेली आहे. मी तर म्हणेन की उलट आपल्या संस्कृतीकडून विदेशामध्ये समलैंगिकतेचा प्रसार झाला आहे. त्याचा सबळ पुरावा म्हणून आपल्याकडील प्राचीन ग्रंथ ‘कामसूत्रा’ कडे बघता येईल. हा ग्रंथ इसवी सनाच्या ५०० वर्ष अगोदर लिहिल्या गेला आहे.  ‘कामसूत्र’ या ग्रंथामध्ये समलैंगिकतेवर एक संपूर्ण प्रकरण लिहिल्या गेले आहे. पण सध्याच्या काळात एक गे म्हणून जगासमोर येणे किती कठीण असते हे मी अनुभवले आहे.

समलैंगिक या ओळखीसह समाजात वावरण्या अगोदर सर्वात प्रथम ‘समलैंगिक‘ म्हणून स्वतःचा स्वीकार करणे हे सर्वात महत्वाचे असते. भारतीय समाजाच्या दुटप्पी आणि दांभिक मानसिकतेमुळे समलैंगिक असणे हा भयंकर अपराध आहे. समाजाच्या मते समलैंगिकता म्हणजे महापाप आहे, अशी वागणूक समलिंगी व्यक्तींना दिले जाते. अशा प्रकारच्या संकुचित सामाजिक दृष्टिकोनामुळे समलैंगिक व्यक्ती आपली ओळख भीतीपोटी लपवतात. तसंच विरुद्धलिंगी व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण नसतानाही आईवडलांनी ठरवून दिलेल्या व्यक्तींशी लग्न करतात. आईवडलांशी नाजूक भावनिक नाते असल्यामुळे पालक त्याचा आधार घेऊन इमोशनल ब्लॅकमेलिंग करतात.  इच्छेविरुद्ध लग्न लावून देतात आणि कालांतराने मग त्याची परिणती घटस्फोटांमध्ये होते. मी सुद्धा हे सगळं भोगावं लागलं आहे. माझ्या पूर्व पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर मला माझ्या ओळखीची जाणीव व्हायला सुरवात झाली. राजघराण्याच्या सुरक्षित आणि कठोर नियमबद्ध संस्कृतीत माझं बालपण गेलं आहे. त्यामुळे बाहेरच्या जगासोबत माझा जास्त संपर्क नव्हता. लैंगिक आकर्षण निर्माण होण्याच्या वयापासून मी मुलांकडेच आकर्षित होत असे. पण, गे असणे म्हणजे नेमके काय याबद्दलची जाणीव बरीच उशिरानं झाली.

आपल्या समाजात समलैंगिततेबाबत बऱ्याच चुकीच्या धारणा आणि मान्यता आहेत. अनेक शिकलेल्या लोकांना तृतियपंथीय आणि समलैंगिक एकच वाटतात. पण तसं नाही आहे. तसंच लोकांना सर्व गे नपुंसक आहेत असं सुद्धा वाटतं. तसंच समलैंगिक लोकं ही फक्त गरीब समाजात असतात, श्रीमंतांमध्ये नसतात अशी फार मोठी धारणा समाजात आहेत. हीच धारणा तोडण्यासाठी गे म्हणून लोकांसमोर येण्याचा मी निर्णय घेतला. कारण मला माहिती आहे की माझ्या या पावलामुळे आपल्या समाजात या विषयावर चर्चा सुरू होईल. तसंच अनेकांना स्वतःचं सेक्शुअल ओरिएंटेशन जगजाहीर करण्याची हिंमत मिळणार आहे.

मी गे असल्याचं जाहीर करणं साहजिकच गुजराती वृत्तपत्रांची हेडलाईन बनली. एवढंच नाही देशाविदेशातल्या वृत्तपत्रांमध्ये ही बातमी छापून आली. लोकांनी माझे पुतळे जाळले. राजपिपाला या माझ्या मुळगावी माझ्याविरोधात निदर्शनं झाली. संस्थानाच्या राजकीय आणि सांस्कृतीक वारश्याला काळीमा फासल्याचा माझ्यावर आरोप झाला. माझं राजकुमार पद काढून घेण्याची मागणी झाली. मला बहिष्कृत करण्याची आरोळी ठोकली गेली. मी एक राजकुमार असल्यानं माझ्या वाट्याला हे सगळं येणं साहजिक होतं. पण, म्हणून मी लोकांना त्याचा दोष देत नाही. लोकांनी या विषयाकडे इतकी वर्ष दुर्लक्ष केलं त्यात खरा दोष आहे. त्यामुळे या सर्व लोकांना खरं काय आहे हे समजावून सांगणं हे माझं कर्तव्य असल्याचं मी मानतो.

सुरूवातीला इंग्रजी सोडून इतर वृत्तपत्रांनी माझ्याविरोधात नकारात्मक बातम्या छापल्या. पण कालातंरानं त्यांचा सुद्धा कल बदलला त्यांनी सकारात्कम भूमिका घेतली. माझ्या या संपूर्ण संघर्षात सर्व प्रकारच्या मीडियानं फार मोठी भूमिका बजावली आहे. मीडिया पब्लिसिटीमुळेच मी प्रसिद्ध ऑप्रा विन्फ्रेच्या शोपर्यंत पोहचू शकलो. 2007 मध्ये तिच्या शोमध्ये जाणारा मी तिसरा भारतीय ठरलो. तसंच तिच्या शोमध्ये आतापर्यंत तीन वेळा झळकणारा मी एकमेव भारतीय आहे. पण, हे सगळं यश मिळत असतांना माला माझ्याच कुटुंबाकडून अवहेलना सहन करावी लागली. माझ्या कुटुंबियंनी वृत्तपत्रामध्ये एक जाहिरात प्रसिद्ध करून मला वारसहक्क आणि कुटुंबातून बेदखल करून टाकलं.    कायद्याच्या भाषेत सांगातचं झाल्यास, केवळ सेक्शुअल ओरीएंटेशन वेगळं असल्याकारणाने वारसाहक्कानं मिळणाऱ्या प्रॉपर्टीतून कुणी कुणाला बेदखल करू शकत नाही. आईवडिलांनी मला वारसाहक्कापासून वंचित केल्यानंतरही मी त्या निर्णयाविरुद्ध गेलो नाही. त्यांच्या विरुद्ध कायद्याची लढाई देखील लढलो नाही. कारण की मला ठाऊक होते की शेवटी तेही याबाबत अज्ञानी आहेत. कालांतराने माझ्या वडिलांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देतांना खुलासा केला की त्यांनी पुराणमतवादी सामाजाच्या रोषाला बळी पडून संतापाच्या भरात हा निर्णय घेतला होता.

LGBT प्रश्नांवर गेल्या 20 वर्षांपासून माझे काम सुरु आहे. या दरम्यान आलेल्या अनुभवांच्या आधारे सांगतो की जास्तीजास्त समलैंगिकांना समाजात वावरतांना अनेक टप्प्यांवर भेदभावांचा सामना करावा लागतो. त्यांच्याबाबतीत मानवी हक्कांची पायमल्ली होत असते. कामाच्या ठिकाणी त्यांना पगारवाढ मिळत नाही, प्रमोशन्स रोखली जातात. हॉस्पिटल्समध्ये त्यांचा तिरस्कार केला जातो. एका सर्वेक्षणानुसार गे व्यक्तींवर लग्नांकरिता सामाजिक, कौटुंबिक दबाव टाकला जातो आणि अशा दबावाला बळी पडून जवळजवळ ८०% गे आपल्या मर्जीविरुद्ध भिन्नलिंगी व्यक्तींशी लग्न करतात.

HIV/AIDS या संसर्गजन्य रोगांच्या साथींचा भारतात प्रसार झाल्यामुळे एकप्रकारे समलैंगिक अधिकार चळवळीला चालनाच मिळालेली आहे. या आजारांच्या प्रसारानंतर सरकारला जाग आली आणि त्यांनी गे कम्युनिटीज एकत्र करून त्यांचे रजिस्ट्रेशन करायला सुरवात केली. HIV/AIDS  सारख्या आजारांना आळा घालण्याकरिता गे कम्युनिटीला फंड उपलब्ध करून देण्यास सुरवात झाली. कारण या रोगांचा प्रसार होण्यामागे LGBT कम्युनिटीकडे हाय रिस्क ग्रुप्स म्हणून बघितलं जातं. सध्याच्या स्थितीत सरकारकडे १६० LGBT संस्थांची नोंद आहे ज्यांची स्थापना गे, लेस्बियन आणि तृतीयपंथी लोकांनी एकत्र येऊन केली आहे. यातील बहुतांश संस्थांना सरकारचे फंडिंग मिळते.

सेफ सेक्सला चालना 

सुरक्षित सेक्सला चालना मिळावी या हेतूने माझ्या स्टाफ मेम्बेर्सनी कंडोम वाटप केले असता पोलिसांनी त्यांना होमो सेक्सूयॅलिटीचा प्रचार करतात म्हणून अटक केली. नुसती अटकच केली नाही तर त्यांना ब्लॅकमेल केलं. त्यांच्याकडून खंडणी वसूल केली, त्यांचे मोबाईल हिसकून घेतले इतकंच नव्हे तर जेलमध्ये डांबून त्यांच्यावर  जबरदस्ती असुरक्षित लैंगिक अत्याचार सुद्धा केलेत. तुम्हीच सांगा आता खरे अपराधी कोण आहेत? सुरक्षित सेक्स संबंधांकरिता प्रचार आणि जागृती करणारे गे अॅक्टीविस्ट की पोलीस? जे कलम 377 चा गैरफायदा घेऊन बळजबरीनं असुरक्षित सेक्स करतात.

काँग्रेसचे सरकार असताना तेव्हाचे यूनियन मिनिस्टर श्री.नम्बुद्रिपाद यांनी मेक्सिकोमध्ये झालेल्या HIV/AIDS अंतरराष्ट्रीय परिषदेत कलम 377 मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मान्य केले होते. कारण या कलमातील तरतुदीमुळे HIV/AIDS जन्य रोगांना आळा घालणे मुश्कील होत आहे. जुन्या निर्णयानुसार या कलमाद्वारे समलैंगिकता अपराध मानलं गेले आहे. त्याविरुद्ध आव्हानात्मक याचिका सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. कोर्ट त्यावर काय निर्णय देतं याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

थोडक्यात मी असे म्हणेन की हा वाद मानवतावाद विरुद्ध पाखंडवाद असा आहे. जर या समाजात थोडीशी मानवता शिल्लक असेल तर आम्ही जिंकू आणि पाखंडवाद रुजलेला असेल तर आमची हार होईल. शेवटी एकच सांगतो समलैंगिकतेचा अधिकार हा आम्हाला कोर्टाच्या निर्णयातून नव्हे तर समाजाच्या मानसिक परिवर्तनामुळे प्राप्त होणार आहे हे लक्षात घ्या.

  • प्रिन्स मानवेंद्र गोहिल