लता मंगेशकर आणि डी. एन. मधोक

778

तुम्ही म्हणाल की, आजचा सलग तिसरा लेखही एका विस्मृतीत गेलेल्या गीतकाराबद्दलच आहे …..
पण जेव्हा अनिलदांच्या लेखात ” तराना ” आणि ” अनोखा प्यार ” या चित्रपटांचा उल्लेख आला, तेव्हाच ठरवलं होत की, कैफ इरफानी, झिया सरहदी आणि डी. एन. मधोक यांचे लेख सलगपणे द्यायचे ….
कारण ह्या तीनही गीतकारांच्या गाण्यांनी लताला त्या सुरुवातीच्या काळात जम बसवायला खूप मदत केली आहे ….

लाहोरमध्ये रेल्वेत नोकरीला असलेले डी. एन. मधोक यांना चित्रपटांची ओढ होती आणि हीच ओढ त्यांना सिनेसृष्टीच माहेरघर असलेल्या मुंबईमध्ये खेचून घेवून आली.
त्यांनी अनेक सुरस गीते तर लिहिलीच पण, अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहून त्याचं दिग्दर्शनही केले आहे.

सैगलचं एक अतिशय सुमधुर गीत ” मधुकर शाम हमारे चोर ” मुळे मला प्रथम डी. एन. मधोक हे नाव कळलं ….
“तानसेन ” मधलं सैगलने गायलेलं अजरामर गीत ” झगमग झगमग दिया जलाओ ” आणि डी.एन. मधोक यांनीच लिहिलेलं आहे.
त्याचं आणखीन एक मला आवडणार गाणं म्हणजे ” घटा घनघोर घोर मोर मचावे शोर मोरे सज्जन आजा”  खुर्शीद या त्याकाळच्या सुप्रसिद्ध गायिकेने गायलेलं हे अतिशय गाजलेलं गाणं.

त्यांची गाणी एकेकाळी इतकी लोकप्रिय होती की, चाळीसच्या दशकात ” महाकवी मधोक ” ह्या नावाने ते ओळखले जायचे.
हिंदी सिने संगीताच्या अगदी सुरुवातीच्या म्हणजे पहिल्या पिढीतल्या तीन पहिल्या गीतकारांपैकी ते एक होते ….
दुसरे दोन गीतकार होते कवी प्रदीप आणि केदार शर्मा …

सुप्रसिद्ध संगीतकार नौशादला हिंदी सिनेसृष्टीत सर्वप्रथम आणण्याचं श्रेय डी.एन. मधोक यांनाच जातं.
दोघांनी मिळून केलेला १९४३ सालातला ” रतन ” त्याकाळचा सुपर हिट ठरलेला चित्रपट.

लता सर्वप्रथम त्यांच्यासाठी १९५० मध्ये आलेल्या ” अनमोल रतन ” मध्ये गायली ….. तराना, सैय्या, बाराती, उटपटांग, रसिया, राजारानीमध्ये देखील डी.एन. मधोकनी लतासाठी अनेक सुरेल गाणी लिहिली आहेत ….
१ ) नुकतीच लागलेली तारुण्याची चाहूल…. हृदयात होणारी गोड कालवाकालव आणि मनात फुललेला वसंत ….
पाणी भरायला म्हणून विहिरीवर आलीये खरी, पण जीव कुठेय थाऱ्यावर ?
कुणाला तरी शोधणारी, काही तरी लपवणारी, इथे तिथे भिरभिरणारी चोरटी चंचल नजर ….
आपल्यात होत असलेले हे बदल कुण्णाकुणाला कळू नये म्हणून काळजी घ्यावी तर तेवढ्यात पपीहाने पीहू पीहू करून छेड काढावी आणि अख्ख्या जगाला ओरडून ओरडून आपली मनस्थिती सांगावी ….
अशावेळी कुठे लपू आणि काय करू ?
जीव नको नको होवून जातो अगदी

” हाये कोई कहदे पपिहे से जाके
बैरी काहे छेडे पीहू पीहू गाके
ऋत सावन की मुख पर आये क्यूँ
झुमती घटा में कोई आग लगाये क्यूँ
मेरे पास आये वो तो , काहु समझा के
बैरी काहे छेडे पीहू पीहू गाके ” ….

अभिनेत्री चांद उस्मानी वर चित्रित झालेलं हे “बाराती” मधलं गोड गाणं लिहिलंय डी.एन. मधोक यांनी आणि संगीत दिलय रोशन यांनी.

२) हा वर जो पपीहा छेड काढत होता ना तो उगीचच नाही बर का ?
त्याला सगळं माहीत होतं …. तिचं त्याच्यात गुंतलेलं मन ओळखण्यात पटाईत आहे तो …..
तिला भेटलाय तिच्या स्वप्नातला राजकुमार …..
एकमेकांना लपून छपून भेटण्यातलं आकर्षण आणि कुणाला आपलं हे चोरून भेटणं कळू नये म्हणून ती घेत असलेली काळजी
किती सावधपणे यावं लागत तिला त्याच्या एका भेटीसाठी
आणि तो ? तो एकदम बेफिकीर …. त्याला मात्र तिच्या या मेहेनतीचं काहीच वाटत नाहीये. तिची छेड काढून तिला सतावत बसला आहे …
पण आपली नायिका मधुसुद्धा काही लेची पेची नाहीये
” प्रियकर असलास म्हणून काय झालं ? एवढा आटापिटा करून तूला भेटायला येतेय मी, विसरलास तर खबरदार ” अशी प्रेमळ पण सज्जड धमकी देतेय ती …
” यूँ छुप-छुप के चुपके-चुपके मेरा आना
याद रहे भूल न जाना
हमको सताओगे बड़ा दुख पाओगे
लग जायेगी मेरी हाय
हाय सताये हाय जलाये
कहीं भी जाओगे कल ना आये
हँसेगा सारा ज़माना
याद रहे भूल न जाना
यूँ छुप-छुप के चुपके-चुपके मेरा आना ” ….

” तराना ” मधलं हे माझं आवडत गीत …. लताच्या लाडिक तक्रारीचा आणि प्रेमळ धमकीचा दिलीपकुमारवर काही असर पडला असेल अस मात्र मला अजिबात वाटत नाहीये.

३) प्रेम एक नैसर्गिक सहज सुंदर अनुभूती ….

सर्वच जण करतात प्रेम …. अहं करत नाहीत तर प्रेमात पडतात , कारण प्रेम करणं आपल्या हातात नसतंच मुळी ….
पण प्रेमात पडणं जेवढ सहज न तेवढंच ते निभावणं कठीण. ज्याला आपण विश्वासाने आपलं सर्वस्व समर्पण करतो तो कधीकाळी आपल्यापासून दूर गेला तर ?
ज्याच्या सहवासात अनेक रात्री जागवल्या, फुलवल्या …. आता मात्र एक रात्रही त्याच्याविना जाता जात नाही.
जो अंधार तो असताना हवाहवासा वाटायचा तोच आता जीवाचा थरकाप उडवतो, एकाकी पाहून गिळू पाहतो. चुकीच्या माणसावर जीव जडवला तर त्रास तर होणारच ना ?
तिची निवड खरंच चुकली होती का? की तो ही तिच्यासारखाच नियतीच्या हातचा शिकार बनला होता ?
डोळ्यात विफलतेचे अश्रू आणि साथीला आहेत त्याच्या कासावीस करणाऱ्या आठवणी. ह्या काळ्याकुट्ट रात्री त्यांचीच काय की सोबत आहे ज्या धीर देत आहेत.
पण प्रेमात सफलते पेक्षा विफलातच जास्त मिळते …..

” काली काली रात रे दिल बडा सताये
तेरी याद आये तेरी याद आये
झूटों से प्यार किया है क्या किया
सारे जहाँ का दुःख ले लिया
अब रो रो सावन जाये
तेरी याद आये तेरी याद आये ” …..

” सैय्या ” मधलं परत एकदा मधुबाला वरच चित्रित झालेलं हे आर्त विरहगीत … संगीतकार आहेत सज्जाद .

४) आधी त्याच्या विरहात रात्र जाता जात नव्हती पण आता मात्र दिवस कंठण देखील जड जावू लागलंय. कशावरच आता वासना उरली नाहीये.
उध्वस्त झालेल्या मनाला दिवस काय आणि रात्र काय, दोन्ही सारखेच.
जेव्हा प्रिय व्यक्ती जवळ नसते ना तेव्हा आयुष्याचे संदर्भच बदलतात …
ज्या चंद्र ताऱ्यांच्या दुधाळ चांदण्याची जादू दोघांनी मनसोक्त लुटली तेच आकाशीचे चंद्र तारे आज मात्र निस्तेज वाटत आहेत.
आयुष्याचा सूरच जिथे बेसुरा लागला आहे तिथे आता जगून तरी काय करायचं ?

” न तो दिन ही दिन वो रहे मेरे
न वो रात रात मेरी रही
न तो चाँद पे वो निखार है
न वो चाँदनी में बहार है
न वो जोश पासी-ए-इश्क़ में
न वो जिस्म ही में तड़प रही
न तो दिन ही दिन वो रहे मेरे … ”

” दर्द ए दिल ” मधलं आर. सी. बोराल यांनी संगीत दिलेलं आणि डी.एन. मधोक यांनी लिहिलेलं हे करुण गीत ऐकताना मन नेहमी खिन्न होतं.

५) आणि जेव्हा अशाच एका रात्री दोघेही एकत्र असतात तेव्हा ?
विरहात असताना तो नाही म्हणून तिला झोप येत नाही तर एकत्र असताना तिला पाहून त्याची झोप कुठल्याकुठे पळाली आहे.
तिने त्याला झोपवायचा कितीही प्रयत्न केला तरी समोर असं स्वर्गीय सौंदर्य असताना कोण वेडा झोपेल ? त्याच्या बेईमान डोळ्यांना ती सतत समोर हवी आहे

” बेइमान तोरे नैनवा नींदिया ना आये
टुक सोये जा की रात कहीं भागी न जाये
बेइमान तोरे नैनवा नींदिया ना आये ” …..

ती म्हणतेय ” बैठी हूँ यहीं मैं ना घबरा ”
आता तिला कोण समजावणार की बाई गं, तू जवळ बसलीयेस ना म्हणूनच त्याची झोप उडालीये, संपूर्ण रात्रभर तुझ्या आरस्पानी सौंदर्यात त्याला नहायचंय ….

” ले मूंद ले अँखियाँ तनिक ज़रा
बैठी हूँ यहीं मैं ना घबरा
रात जाये पलक तोसे झपकी न जाये ” ….

त्याच्या पेंगुळलेल्या नजरेतील अनोखे भाव पाहून खरं तर तीच संभ्रमात पडली आहे आणि तिचा उडालेला गोंधळ पाहून तो मात्र मजेत हलकेच गालात हसतोय …

” आधे सोये आधे जागे
साँची कहूँ मोहे यूँ लागे
जैसे मन में भरम एक आये एक जाये ” ….

डी.एन. मधोक याचं ” तराना ” मधलं अनिल विश्वास यांनी संगीत दिलेलं आणि दिलीपकुमार आणि मधुबालावर चित्रित हे सदाबहार गीत ….

नयना पिकळे