मोदी २४ तास आणि ३६५ दिवस

1100

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात नरेंद्र मोदी यांनी एका सभेत नाट्यमयरीत्या घोषणा केली, “ ये दिल मांगे मोर.” मोदींचा हा सर्वोत्कृष्ट साऊंडबाईट होता. भाजपाच्या अंतर्गत जनमत चाचण्यांनी ही लाट त्यांनी ओळखली होती, पण पक्षाचे नेतृत्व करणारे मोदी आणि त्यांचे प्रमुख शिलेदार अमित शहा हे मात्र “ मिशन २७२” चा पल्ला ओलांडून त्रिशतक गाठण्यावर ठाम होते. त्यानंतरचा इतिहास तर सगळ्यांनाच माहीत आहे.

२२ महिन्यांनंतर, २०१७ च्या विधानसभा निवडणुकांनी हेच दाखवून दिले की, भाजपाची भूक मुळीच कमी झालेली नाही. जेंव्हा मोदींनी वाराणसीमध्ये रोड शो कम सभा असा तीन दिवसांचा एक जोरदार कार्यक्रम हाती घेतला, तेंव्हा काही लोकांना ते त्यांच्या उद्विगनतेचेच लक्षण वाटले. उत्तर प्रदेशातील जाती समुदायांच्या गुंतागुंतीच्या खेळात मोदींची सुसाट सुटलेली गाडी रोखली जाण्याची शक्यता बऱ्याच विश्लेषकांनी व्यक्त केली. प्रत्यक्षात मात्र भाजपाला, सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान झालेली शहरं आणि पूर्व उत्तर प्रदेशात, प्रचंड बहुमत मिळाले. ज्या गोष्टीकडे उद्विगनता म्हणून पाहिले जात होते, ते कदाचित प्रतिबिंब होते मोदी-शहा यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निवडणूक प्रचार तंत्राचे, जेंव्हा आघाडीवर असाल, तेंव्हा काहीही करुन प्रतिस्पर्ध्याचा संपूर्ण पाडाव करण्यासाठी जोरदार आक्रमण करा. असं हे तंत्र.

यश मिळविण्यासाठीची सातत्यपूर्ण भूक आणि इच्छाशक्ती यामुळे मोदी हे त्यांच्या आधी होऊन गेलेल्या स्टार राजकारण्यांपेक्षा वेगळे ठरतात. इंदीरा गांधी एवढ्याच लोकप्रिय आणि अधिकारवादी होत्या, मात्र त्याची तीव्रता कमी होती (त्यांना खरे म्हणजे राजकारणा पलीकडेही रस होता!).  भाजपाचे मुळ लखनौ पोस्टर बॉय अटल बिहारी वाजपेय यांचा करिश्मा जबरदस्त होता आणि ते अधिक चांगले वक्तेही होते, मात्र मोदींच्या व्यक्तिमत्वाचा भाग असलेल्या निष्ठुरतेची त्यांच्याकडे साफ कमी होती. अटल-अडवाणी युग हे सौम्य होते आणि ब्राह्मण-बनिया या उच्च वर्णीय प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी झगडत असलेला भाजपा हा सर्वसमावशकतेचा अभाव असलेला पक्ष होता. राम मंदिर आंदोलनाची पक्षाच्या राजकीय वाढीसाठी मदत झाली, खास करुन उत्तर प्रदेशमध्ये, पण आधुनिक भारतीयांच्या आशा आकांक्षांना पूर्णपणे सामावून घेण्याची संपूर्ण क्षमता त्यांना मिळविता आली नव्हती, कारण त्यांच्या नेतृत्वावरचे काँग्रेस-नेहरूवादाच्या वर्चस्वाचे भूत उतरले नव्हते.

याऊलट मोदी-शहा यांचे मॉडेल निवडणुकांचा इतिहास आणि वैचारीक धारणांचे पुनर्लिखाण करण्यावर ठाम आहे आणि साचेबद्ध न होण्याच्या दृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे. दिल्ली आणि बिहारमधील पराभवाने त्यांची पिछेहाट झाली, मात्र त्यामुळे काँग्रेस मुक्त भारत या महत्वाकांक्षी ध्येयापासून गुजरातची ही जोडगोळी तसूभरही हलली नाही. २०१४ मध्ये जेंव्हा शहा याबाबत पहिल्यांदाच बोलले, तेंव्हा ते एका मगरुर राजकारण्याचे शाब्दीक अवडंबरच वाटले होते, आता तेच जवळजवळ भविष्यसूचक वाटत आहे. सध्या देशामध्ये काँग्रेस केवळ साडेपाच राज्यांमध्ये सत्तेत आहे, तर दहाहून जास्त ठिकाणी भाजपा सत्तेत आहे. आता तो भारतीय राजकारणातील मुख्य खांब आहे. यावेळी उत्तर प्रदेशात एकही मतदारसंघ असा नव्हता जिथे भाजपाने लढत दिली नाही. पाच वर्षांपूर्वी या राज्यात केवळ ४७ जागा जिंकणाऱ्या पक्षासाठी ही कामगिरी उल्लेखनीयच म्हणावी लागेल. अगदी दूरच्या मणिपूरमध्ये सुद्धा भाजपाने लक्षणीय यश मिळविले – त्यांच्या भौगोलिक विस्ताराचा हा आणखी एक पुरावा….

या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे, व्यक्तिमत्व-केंद्रीत दृष्टीकोन, ज्याचे सर्वोत्तम वर्णन म्हणजे “मोदी ३६०”. जर २०१४ साली भारतातील दूरवरच्या खेड्यापाड्यात होलोग्राम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आभासी मोदींना पोहचविण्यात आले होते, तर आता त्यांना लोकांच्या कल्पनाविश्वात पोहचविले जाते ते सरकारने केलेल्या ‘कामगिरीच्या’ विविध माध्यमांमधून होणाऱ्या सातत्यपूर्ण मार्केटींगच्या सहाय्याने… स्टार्ट अप इंडीया ते मुद्रा योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ते सॉईल कार्ड योजना, बारा महिने चोवीस तास, सैदवी सक्रीय असलेल्या नेत्याचा संदेश, असा नेता जो क्वचितच झोप किंवा विश्रांती घेत असल्याचे प्रचार यंत्र सांगत असतात आणि तेच अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. ‘भ्रष्टाचार विरोधी’ निश्चलनिकरण आणि ‘आंतकवादाविरोधात कडक’ सर्जिकल स्ट्राईक्स, असे कोणतेही अवकाश नाही ज्यावर आपली मक्तेदारी सिद्ध करण्याचा प्रयत्न मोदी पंथ करत नाही. नोट बंदीचा त्रास सहन करण्यासाठी गरिब जनता तयार असण्यामागे  या विश्वासार्हतेचाही भाग आहे.

जसं बिनचेहऱ्याच्या संघ कार्यकर्त्यांनी निवडणुकांच्या काळात बुथ पातळीवर खरोखरच एक जबरदस्त जाळे विणले. जसं सोशल इंजिनिअरींग करून नविन जातींना बरोबर घेण्यात आलं आहे. तसंच कोणताही अपराधी भाव न बाळगता राजकीय हिंदुत्वाद्वारे ‘हिंदू राष्ट्रवाद’ ही ओळख बळकट करण्यात आली आहे. यापूर्वी देशात कधीही न दिसलेल्या अशा या आक्रमक राजकारणाच्या ब्रॅंडचे मोदी हे आता मॅस्कॉट आहेत. ५० आणि ६० च्या दशकात, जेंव्हा काँग्रेस एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकत होती, तेंव्हा नेहरु-इंदीरा नेतृत्वाखालील सामाजिक-राजकीय आघाडीचे छत्र आणि स्वातंत्र लढ्याची प्रतिष्ठा यामुळे त्यांचे वर्चस्व कायम राहीले होते. आता हिंदुत्व आणि व्यक्तिगत आकर्षण यांच्या मादक मिश्रणाभोवती उभारण्यात आलेली एक नविन प्रबळ शक्ती आपल्याकडे आहे. २०१७ ने हे सिद्ध केले आहे की २०१४ हा काही योगायोग नव्हता. तर एक विशिष्ट, निर्दयी राजकीय व्यवस्था उभारण्यात येत आहे.

राजदीप सरदेसाई