अंडीभक्षक

456
EGG3

साप हा तसा पूर्वीपासूनच माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. मी तासनतास साप बघण्यात व अभ्यासण्यात रमून जात असे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं सुरु केलेल्या अभियानाचे पर्यवसन सर्प अभ्यास करणाऱ्यांच्या गटात झालं होतं. वर्धा जिल्हा तसा सर्पमित्रांसाठी प्रसिद्धच त्यात मीही एक सर्पमित्र जो अगदी नियमित पणे लोकांच्या घरी निघालेले साप पकडून आणून ते निसर्गात मुक्त करण्याची निशुल्क सेवा द्यायचो. ऑगस्ट २००३ मध्ये असाच एका मित्राच्याच घरी साप निघाला, अगदी माझ्या घराजवळून हाकेच्या अंतरावर असलेल्या मनोज आरभी यांच्याकडे साप निघाल्याची वार्ता कानी पडली. मी लागलीच तो साप पकडायला निघालो. एका छोट्याशा कुंडीजवळ काळपट मातकट रंगाचा एक लहानसा साप तिथं गुंडाळी मारून बसला होता. साप अभ्यासण्याचा छंद जडलेला मी त्या सापाला पाहून काहीसा अचंभित झालो कारण हा साप मी आजवर कधी बघितलाच नव्हता. या लहानग्या सापाला लाल मुंग्यांनी चांगलेच फोडून काढले होतं. मी त्या सापाला एका प्लास्टिक च्या भरणीमध्ये टाकलं आणि घरी घेऊन आलो. हा पाहुणा घरात डेरेदाखल झाला होता. पण काही वेळातच त्या नाजूकसा दिसणाऱ्या पाहुण्याने प्राण त्यागले. वाईट तर वाटलेच पण या सापाची ओळख पटवायचीच हा निर्धार मनाशी करून कामाला लागलो.  त्यावेळी मी महात्मा गांधी विद्यालयात ११ वीचं शिक्षण घेत होतो, माझे गुरु आणि महात्मा गांधी विद्यालयाचे प्राध्यापक स्व. सुधाकर वडतकर सर यांना फोन केला. सापबाद्दलची माहिती दिली. तसंच या मृत सापाला संरक्षित करून ठेवायचे आहे म्हणून त्यासाठी लागणारं फार्मलीन नावाचं द्रव्य मिळवून देण्याची विनंती केली. सरांनी पण अगदी सुट्टीच्या दिवशी कॉलेज उघडायची व्यवस्था केली आणि फार्मलीन उपलब्ध करून दिलं. त्यावेळी उपलब्ध माहितीनुसार त्या मृत सापाला संरक्षित केलं. नंतर मी त्याची ओळख पटवायसाठी निरनिराळी पुस्तक शोधून ती वाचू लागलो. पण खूप प्रयत्न करूनही यश काही येत नव्हत. २००३ मध्ये तसा इंटरनेटचा वापर कमीच, म्हणजे नेट कॅफे वर जाऊन २५ रुपये तास प्रमाणे इंटरनेट वापरायला मिळायच. तेव्हा कसेबसे पैसे जमवून कॅफेवर जाऊन सापांबद्दल अधिकाधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत होतो. या सगळ्या गडबडीत शोध निबंध ( research paper)  हा प्रकार माहिती पडला. कारण तोवर कोणी सांगितलच नव्हत की आपण केलेला अभ्यास जगासमोर आणायचा असेल तर शोध निबंध लिहून तो प्रकाशित करावा लागतो.  तर असा एक ना अनेक प्रयत्न करून त्या सापाची ओळख पटवण्याची धडपड सुरु  होती. त्याचवेळी जे. बी. सायन्स कॉलेजच्या ग्रंथालयात एक पुस्तक मिळाल, ज्यात माझ्याजवळच्या सापसारख्याच सापाचं वर्णन काळडोक्या साप म्हणून दिले होते. या काळात मी थोडीफार पैश्यांची व्यवस्था करण्यासाठी फोटोग्राफी आणि विडीओग्राफीची कामं करत होतो. कारण वन्यजीव अभ्यासनाचा छंद पुरवायचा असेल तर पैश्यांची गरज तर होतीच. या सापाची अनेक छायचित्रे मी काढली आणि बऱ्याच अभ्यासकांशी संपर्क केला. अशातच MCBT ( मद्रास क्रोकोडाइल बँक ट्रस्ट ) चेन्नई इथून एक पत्र आलं. त्यात हा साप तस्कर सापाची कुठली तरी जात असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. शिवाय त्यांनी हे फोटो पुण्याचे प्रसिद्ध सर्पअभ्यासक अशोक कॅप्टन यांनाही पाठविल्याचं लिहिलं होतं. त्यानंतर मी या मंडळींना इमेल द्वारे संपर्क केला त्यातून अशोक कॅप्टन यांचा संपर्क मिळाला. अशोक कॅप्टन यांच्याशी फोनवर बोलणे झाल. पुण्यात भेटून समोरचं कार्य सुरु करायचं ठरलं. या माणसाला भेटून कळले की साप अभ्यासण्याच्या किती साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यात वैज्ञानिक पद्धतीनं केलेलाच अभ्यास कमी पडतो हे लक्ष्यात आलं. अशोक यांच्याकडे गेल्यावर त्यांनी मला स्मिथनं १९३२ मध्ये लिहिलेले पुस्तक फौना ऑफ ब्रिटीश इंडिया दाखवले. त्यातलं भारतीय अंडी भक्षक सापाचं वर्णन सुद्धा दाखविलं आणि माझा अंदाज खरा ठरल्याचं मला कळालं. पुढे त्या संकलित सापाचं अध्ययन बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटीला जाऊन करण्यात आले. नंतर तो नमुना BNHS ला देण्यात आला. एवढे करूनही प्रत्येक गोष्ट खूप खोलात जाऊन तपासण्याची सवय असलेल्या अशोक यांनी जर्मनीच्या फ्रँक तिलक आणि आंद्रेज गुम्प्रेंच या वैज्ञानिकांना संपर्क साधला त्यांच्याकडून लंडनच्या संग्रहालयात संग्रहित असलेल्या भारतीय अंडी भक्षक सापांच्या पहिल्या संकलित नमुन्यांची इत्यंभूत माहिती मिळविली. मग आम्ही चौघांनी मिळून या सापाचा पुनर्शोध आणि महाराष्ट्रातली प्रथम नोंद सिद्ध करणारा शोध निबंध लिहला. रशिअन जर्नल ऑफ हर्पेटोलॉजि या शोधनिबंध प्रकाशित करणाऱ्या पत्रिकेत तो २००५ साली प्रकाशित झाला. अशा पद्धतीनं १०० वर्षाहून जास्त काळ पडद्याआड असलेल्या भारतीय अंडी भक्षक सापाचा पुनर्शोध लागला.  मग पुढे मी ह्यामद्र्याद या शोधपत्रिकेत भारतीय अंडी भक्षक सापाच्या अंडी खाण्याच्या पद्धतीवर सखोल अध्ययन करून त्यावरचा शोधप्रबंध प्रकाशित केला.

संवर्धनाची गरज

विदर्भ हा भारतीय अंडीभक्षक सापाचा महत्त्वाचा अधिवास आहे. विदर्भातलं शेकडो एकर झुडपी जंगल आज अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. झुडपी जंगल संपुष्टात येत असल्यानच पक्ष्यांचे अधिवास संपुष्टात येत आहेत. परिणामी या पक्षांच्या अंड्यांवर गुजराण करणारा अंडीभक्षक साप पुन्हा एकदा काळाच्या पडद्याआड जाण्याची चिन्हं दिसत आहेत.

नुकताच २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या शोधनिबंधात मी आणि माझे मित्र डॉ. आशिष टिपले यांनी अंडीभक्षक सापाबद्दलची नव्यानं काही तथ्ये मांडली आहेत. भारतीय अंडीभक्षक सापाचा आढळ महाराष्ट्रातल्या ९ जिल्ह्यांमध्ये दिसू येतो. त्यातले ८ जिल्हे  हे विदर्भात आहेत. शिवाय, तेलंगाना राज्यातल्या बेलम्पल्ली इथं सुद्धा या सापाचं अस्तित्व दिसून आलं आहे. आम्ही  अभ्यासलेल्या ६६ अंडीभक्षक सापांपैकी ४० साप रस्त्यांवर वाहनाखाली चिरडून ठार झाल्याचं नोंदविण्यात आलं असून रस्त्यांवर या सापांचे मृत्यू होण्याचं प्रमाण अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे, या सापांची संख्या झपाट्यानं कमी होत असल्याचंही स्पष्ट झालं आहे. भारतीय अंडीभक्षक साप हा फक्त पक्ष्यांची अंडी खाऊनच आपली उपजीविका चालवितो. अंडी सोडून इतर कुठलेही भक्ष्य तो खात नाही. हा साप वन्यजीव संवर्धन अधिनियम १९७२ नुसार अनुसूची एक म्हणजेच वाघ असलेल्या सूचीमध्ये समाविष्ट आहे. या अनोख्या आणि विशेष सापाच्या संवर्धनाची आणि अध्ययनाची गरज आहे. सगळीकडे व्याघ्र संरक्षण आणि संवर्धनाला ऊत आला असतांना या सर्पाकडे  मात्र सपशेल दुर्लक्ष केल्या जात असल्याची खंत वाटते.

-पराग हेमचंद्र दांडगे

www.ratva.in