बदलता ऑस्कर

1806

सोमवारी सकाळी, यावर्षीचे ऑस्कर पुरस्कार घोषित झाले तेव्हा मी एबीपी माझाच्या न्यूज बुलेटीनवर लाईव विश्लेषणासाठी गेलो होतो. ला ला लॅन्ड ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार नुकताच घोषित झाला होता. हा विजय थोडा अनपेक्षित होता, पण अशक्य नव्हता. मी त्यांना तो का मिळाला असेल यावर बोलायला लागलो, तेवढ्यात वृत्तनिवेदिकेने मला थांबवलं, ‘काहीतरी बदल झालाय, ला ला लॅन्डला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला नाही, मूनलाईट ला मिळालाय’ , मला क्षणभर वाटलं, की बातमी कळण्यात काही घोळ झालाय आणि चॅनलवरच चुकीचं अनाउन्स झालं असं सांगतायत, पण घोळ झाला होता तो चॅनलवर नाही, तर प्रत्यक्ष पुरस्कार समारंभातच …

ऑस्कर पुरस्कारांचे अंदाज करणं सोपं असतं. या पुरस्कारांना एक प्रकारचा बिल्ड अप असतो. जानेवारीच्या सुरुवातीला गोल्डन ग्लोब पुरस्कार जाहीर होतात तिथून या बिल्ड-अपला सुरुवात होते. या वेळपर्यंत ऑस्करची नामांकनंदेखील जाहीर झालेली नसतात, आणि भारतात तर यातले बरेचसे चित्रपट आलेलच नसतात. पण गोल्डन ग्लोब पुरस्कारांकडे पाहून आणि त्याबद्दल व्यक्त होणारी मतं वाचून आपल्याला ऑस्कर पुरस्कारांमधे काय होईल याचा प्राथमिक अदाज यायला लागतो. पुढल्या दीड महीन्यात चित्रपट पाहून, त्याविषयी वाचून बोलून आपले ठोकताळे बनत जातात. प्रत्यक्ष ऑस्कर समारंभाची वेळ होईपर्यंत पुरस्कार कसे विभागले जातील हे पुरेसं स्पष्ट झालेलं असतं. यावेळीही तसा अंदाज आलेला होता, आणि दोन चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी तुल्यबळ ठरणार असा अंदाज होता. ला ला लॅन्ड आणि मूनलाईट.

चित्रपट हे निव्वळ करमणुकीचं माध्यम समजणाऱ्यांसाठी डेमिअन चजेल दिग्दर्शित ला ला लॅन्ड हा एक उत्तम व्यावसायिक चित्रपट होता. १४ विभागात त्याला नामांकनं होती, आणि कथा साधीच, म्हणजे चित्रपटउद्योगाच्या पार्श्वभूमीवरची  प्रेमकथा असूनही पटकथेपासून दिग्दर्शनापर्यंत प्रत्येक भागातच या चित्रपटाची कामगिरी वाखाणण्यासारखी होती. याउलट बॅरी जेन्कीन्सने दिग्दर्शित केलेला मून लाईट हा अतिशय गंभीर, व्यक्तीचित्रात्मक पण गरीब वस्तीतल्या कृष्णवर्णीयांच्या आयुष्याचं गडद चित्रण करणारा होता. तो समांतर वळणाचा चित्रपट होता, आशयघन पण पारंपरिक करमणूक नसलेला! आताआतापर्यंत ऑस्करमधे सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शक हे दोन्ही पुरस्कार एकाच चित्रपटाला मिळण्याचा प्रघात होता. पण गेल्या काही वर्षात असं दिसलं की जर दोन चित्रपट तुल्यबल असले तर एकाला दिग्दर्शन आणि दुसऱ्याला चित्रपट अशी पारितोषिकं दिली जातात. एकच पुरस्कार विभागून दोघांना दिला जात नसल्याने हीच विभाजनाची पद्धत आहे. जेव्हा असं होतं, तेव्हा अधिक प्रायोगिक चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरवलं जातं. गेल्यावर्षी रेवेनन्ट आणि स्पॉटलाईट असा सामना असताना स्पॉटलाईटला चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता, त्याआधी दोन वर्षांपूर्वी १२ इयर्स ए स्लेवला सर्वोत्कृष्ट चित्रपट मिळून ग्रॅव्हिटीला दिग्दर्शनाचा पुरस्कार गेला होता. या हिशेबाने पाहिलं, तर यावर्षी मूनलाईट हा चित्रपटासाठी पहिला संभाव्य विजेता होता, तर डेमिअन चजेल हा ला ला लॅन्डच्या दिग्दर्शनासाठी. पण चित्रपटासाठीही ला ला लॅन्डची घोषणा झाली आणि सगळाच गोंधळ झाला.

ऑस्करसारख्या अतिशय प्रतिष्ठेच्या आणि अत्यंत काळजीपूर्वक आखलेल्या समारंभात चुकीचं अवॉर्ड अनाऊन्स होणं , तेही सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचं, हे नक्कीच पुढे काही वर्ष चर्चेत आणि स्मरणात राहिल. त्याला कोण जबाबदार याची चौकशी सुरुच आहे, पण त्यात ला ला लॅन्ड आणि मूनलाईट या दोन्ही टीम्सचं एक मोठं नुकसान झालं. ला ला लॅन्डच्या निर्मात्याना आभाराच्या भाषणानंतर पुरस्कार परत करावा लागणं ही त्यांच्यासाठी अपमानास्पद गोष्ट होती, आणि मूनलाईटला त्यांच्या विजयाचा क्षण हवा तसा अनुभवता आला नाही ही त्यांच्यासाठी. दोघांचा फायदा असा की गेल्या वर्षी कृष्णवर्णीयांना डावलल्याच्या पार्श्वभूमीवर, या वर्षी अत्यंत नाट्यपूर्ण पद्धतीने गोऱ्यांच्या हातून पुरस्कार काढून घेऊन कृष्णवर्णीयांकडे सोपवणं हेच मूनलाईटसाठी एक अविस्मरणीय हॅपी एंडींग ठरलं, आणि ला ला लॅन्डच्या निर्मात्यांनी मंचावरुन जे उदार दृष्टीकोनाचं दर्शन घडवलं, ते निश्चितच त्यांची प्रतिमा उजळ करणारं झालं.

दुर्दैवाने, क्लायमॅक्सला कमालीचं धक्कातंत्र असलेला एखादा चित्रपट केवळ शेवटाने स्मरणात राहून त्याचा एकूण परिणाम विसरला जातो, तसच काहीसं या एकोणनव्वदाव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याबद्दल होण्याची शक्यता आहे. त्याच्या शेवटाला झालेला गोंधळ, त्याची बाकी गुणवत्ता पुसूनही टाकू शकतो. त्यामुळे या गुणवत्तेबद्दल आताच काही नोंद घेतलेली बरी.

गेल्या वर्षीची ऑस्कर नामाकनं फारच वादग्रस्त ठरली, त्यांच्या ‘ ऑल व्हाईट ‘ असल्यामुळे. एकूणातच आजवर कृष्णवर्णीयांची वर्णी ऑस्कर विजेत्यांमधे अत्यल्प प्रमाणात आहे. याला कारणंही आहेत, बरीचशी त्यांच्या मतदानप्रक्रियेशी संबंधित. सभासदांची प्रचंड संख्या, लहान कमिट्यांऐवजी सर्वांच्या मतदानातून होणारी विजेत्यांची निवड, सभासदांमधली कृष्णवर्णीयांची संख्या, सभासदत्वाचा काळ वगैरे गोष्टींशी त्याचा संबंध आहे. गेल्या वर्षीचा गोरा निकाल खूपच वादग्रस्त ठरला आणि त्याविरोधात तडकाफडकी पावलं उचलली गेली. नियमात बदल केले गेले, सभासदत्वाचे निकष बदलण्यात आले, इतरही काही. यातल्या काही नियमांचा परिणाम हा २०२० च्या आसपास दिसायला लागेल असं मानलं जातं. पण या वर्षीच्या निकालावरुन लक्षात येतं, की एकूण मानसिकतेत आणि प्रक्रियेत लक्षात येण्यासारखा बदल घडलेला आहे, दिशा योग्य आहे.

यावेळच्या नामांकनात अनेक कृष्णवर्णीय होते, तसंच निकालातही त्यांना स्थान होतं. मूनलाईट हा सिनेमाच त्यांच्या जगण्यावर होता, जो सर्वोत्कृष्ट ठरला. बॅरी जेन्कीन्सचा दिग्दर्शकाचा पुरस्कार हुकला, तरी त्याची आधारित पटकथा विजेती ठरली, तसच मेहरशाला अली हा कृष्णवर्णीय  मुस्लीम नट सहाय्यक भूमिकेसाठी विजेता ठरला. याबरोबरच फेन्सेस चित्रपटासाठी वायोला डेव्हिस हीदेखील  सहाय्यक भूमिकेसाठी विजेती ठरली. हे पुरस्कार  कृष्णवर्णीयांना जरुर होते, पण  मागे २००२ मधे स्त्री पुरुष अभिनय (हॅली बेरी-डेन्झेल वॉशिंग्टन )  आणि अभिनयाचा एकूण योगदानाचा पुरस्कार ( सिडनी पाँईटर ) एकाच वर्षी देऊन टाकून ऑस्करने कृष्णवर्णीयांवर उपकार केल्याचा परीणाम साधला होता, तसं यंदा झालं नाही. ही पारितोषिकं खरंच योग्यतेनुसार दिली गेली.

हा जो समतोल होता, तो केवळ या एका बाबतीत नाही, तर एकूण निवडीतच दिसला. ला ला लॅन्डला चौदा नामांकनं असली, आणि त्यांचा निकालावर प्रभाव राहिलाच असला, तरी बेनहर, टायटॅनिक सारखे ११ पुरस्कार मिळवून तो एकटाच मोठा विजेता ठरला नाही. मॅंचेस्टर बाय द सी सारख्या अतिशय वास्तववादी कथा मांडणाऱ्या चित्रपटालाही स्वतंत्र पटकथा ( केनेथ लोनरगन) – सर्वोत्कृष्ठ अभिनेता ( केसी अॅफ्लेक) असे महत्वाचे पुरस्कार मिळाले. हॅकसॉरिज सारख्या इतर काही चित्रपटांनाही पुरस्कार मिळाले.

कृष्णवर्णीयांचा सहभाग आणि पुरस्कारांमधला एकूण समतोल, याबरोबर तिसरी महत्वाची गोष्ट होती, ती म्हणजे राजकीय टिका. ऑस्कर, हे वाद आणि राजकारण यांच्यापासून दूर राहण्यासाठी प्रसिद्ध आहे. मागे बोलिंग फॉर कोलम्बाईन या माहितीपटासाठी ऑस्कर स्वीकारताना मायकेल मूरने राष्ट्राध्यक्ष बुश यांच्या धोरणाबद्दल टिका केली होती. तेव्हा प्रेक्षकांमधूनच निषेधाचा सूर आला होता. आता मात्र ट्रम्प यांच्या अचाट कारभारामुळे इतकं अस्थिर वातावरण पसरलय, की कलावंताना बाजू घेणं भाग पडावं. याआधीही मेरिल स्ट्रीप, जोडी फॉस्टर, यांनी ट्रम्पविरोधात मोकळेपणाने बोलायला सुरुवात केलीच होती. तो सूरही या समारंभात पुढे लागला. सूत्रधार जिमी किमेलच्या बोलण्यात तर ही टीका होतीच पण चित्र सर्वात स्पष्ट झालं, ते या आधी अ सेपरेशन साठी परभाषिक चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या असगर फरहादीना त्यांच्या द सेल्समन चित्रपटासाठी पुन्हा एकदा हाच पुरस्कार देण्याच्या निर्णयावरुन. काहींचं असंही मत आहे, की टोनी एर्डमन या जर्मन फिल्मचं कौतुक सुरु असताना तिला वगळून सेल्समनला निवडणं हीच एक राजकीय कृती आहे. निवडीत आहे का नाही हे जरी बाजूला ठेवलं, तरी असगर फरहादीनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मुस्लीमविरोधी भूमिकेचा निषेध म्हणून ऑस्कर पुरस्कार समारंभावर उघडपणे बहिष्कार घातला असताना तो पुरस्कार त्यांना देणं आणि त्यांची भूमिका मंचावरुन वाचून दाखवणं, याला तरी नक्कीच राजकीय विधान मानता येईल.

एका वर्षापूर्वी ज्या पुरस्काराच्या भूमिकेवर जुनाट, परंपरावादी म्हणून टिका केली गेली, त्यांनी  झटक्यात स्वत:मध्ये घडवलेला हा बदल, त्यांच्या काळाबरोबर रहाण्याच्या क्षमतेचा पुरावाच म्हणता येईल. आपल्याकडले किती पुरस्कार अशी सामाजिकक आणि राजकीय जागरुकता दाखवू शकतील?

गणेश मतकरी