Home > गोष्ट पैशांची > फ्युचर व्यवहार म्हणजे काय?

फ्युचर व्यवहार म्हणजे काय?

फ्युचर व्यवहार म्हणजे काय?
X

मागच्या लेखामध्ये आपण शेअर मार्केटचे प्रकार आणि शेअर्सबद्दल माहिती घेतली या आठवड्यात आपण त्याच संदर्भातील उर्वरित गोष्टीवर चर्चा करणार आहोत.

सेकंडरी बाजाराचे विविध प्रकार :

रोख बाजार (Cash Market) : कमी किमतीमध्ये शेअर्स विकत घेऊन भाव वाढल्यानंतर विकावे किंवा जोपर्यंत भाव वाढत नाही तोपर्यंत स्वत:जवळ ठेवून नंतर विकावे, असा एक पारंपरिक प्रकार आहे. या व्यवहाराला रोखीचा व्यवहार म्हणतात आणि या बाजाराला रोख बाजार म्हणतात. या व्यवहारामध्ये संपूर्ण रक्कम गुंतवावी लागते.

उपलब्धी बाजार (Derivative Market) : रोखीच्या भावावरून त्या शेअर्सचे भविष्यामध्ये काय भाव असतील किंवा पुढील एक, दोन, तीन, महिन्यांमध्ये काय भाव असतील याचा अंदाज घेऊन जेथे व्यवहार करता येतात, त्या बाजाराला उपलब्धी बाजार म्हणतात. या बाजाराला सट्टा बाजार किंवा वायदा बाजार असेही म्हणतात. या बाजारातील सर्वात लोकप्रिय प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

भविष्यकालीन बाजार (Futures Market) : फ्युचर्स बाजाराचा इतिहास फार जुना असून जवळपास तीनशे वर्षांपूर्वी हा बाजार जगामध्ये प्रथमत: अमेरिकेमध्ये वस्तू विनिमयाचा बाजार (Commodity Market) म्हणून जन्माला आला. गहू उत्पादन करणारे शेतकरी व कणकेपासून ब्रेड बनवणारे कारखानदार या दोघांनाही बाजारामध्ये किमतीची अनिश्चितता व संभ्रमता सतावत होती. १८४० दरम्यान अमेरिकेचे शिकागो हे शहर व्यावसायिक केंद्र म्हणून उदयास आले. अनेक प्रांतांतले शेतकरी जास्त पसे मिळतील या आशेने शिकागो येथे गहू आणत.

परंतु व्यापारी योग्य भाव देत नसत. पुढे शेतकऱ्याजवळ गहू नसताना परंतु काही महिन्यांनी गव्हाचे उत्पादन होणार असल्याने तो भविष्यकालीन व्यवहार करून स्वत:च्या मालाला योग्य किंमत देणारे कारखानदार निश्चित करायचा. त्याचप्रमाणे गव्हाच्या उत्पादनाबद्दल व गव्हाच्या किमतीबद्दल भीती असल्याने कारखानदार योग्य भावात गहू देणारा शेतकरी निश्चित करायचा. थोडक्यात शेतकरी व कारखानदार या दोघांनाही सोयीचे व्हावे या हेतूने फ्युचर्स बाजाराचा जन्म झाला. त्यात भविष्यामध्ये विशिष्ट कालावधीमध्ये व विशिष्ट भावामध्ये गहू व पैसे यांची देवाणघेवाण होऊ लागली. त्यामुळे शेतकऱ्याला भविष्यामध्ये किती पैसे मिळतील हे समजायचे व कारखानदाराला किती खर्च येईल हे समजायचे. हे करार (Contracts) लिखित व्हायचे. पुढे हे करारपत्र सर्वमान्य होऊन ज्यांच्याजवळ हे करारपत्र आहेत ते दुसऱ्याला व दुसरा तिसऱ्याला याप्रमाणे या करारपत्राची खरेदी-विक्री होऊ लागली. गहू उत्पादक शेतकरी आणि कारखानदार नसलेले लोकही या व्यवसायामध्ये उतरले व करारपत्रांची खरेदी-विक्री करून सट्टा सुरू झाला.

भारतामध्ये १९९५ मध्ये ऑप्शन्सवर १९६९ पासूनची असलेली बंदी उठवण्यात आली. १९९९ ला ऑप्शन्सला ‘सिक्युरिटीज्’च्या परिभाषेत समाविष्ट करण्यात आले व २०००-०१ पासून ऑप्शन्स वा फ्युचर्सचे निर्देशांक वा शेअर्समध्ये खरेदी-विक्री व्यवहार रीतसर सुरू करण्यात आले.

गुंतवणूकदारासाठी अभ्यास हा महत्त्वाचा असतो. शेअर बाजारात प्रामुख्याने दोन प्रकारे अभ्यास करून गुंतवणुकीचा निर्णय घेतला जातो.

१) मूलभूत विश्लेषण (Fundamental Analysis) : या प्रकारच्या अभ्यासामध्ये जागतिक, राष्ट्रीय तसेच त्या त्या उद्योग क्षेत्राच्या आणि विशिष्ट कंपनीच्या ताळेबंदाचा अभ्यास करून निर्णय घेतला जातो. परंतु बाजार झालेल्या घटनांपेक्षा येणाऱ्या घटनांमुळे प्रभावित होत असल्याने हा अभ्यास अचूक निर्णयासाठी फारसा फलदायी ठरतोच असेही नाही.

मूलभूत विश्लेषण या पद्धती मध्ये खालील गोष्टींचा अभ्यास महत्वाचा असतो.

अर्थव्यवस्थाचे विश्लेषण :

या मध्ये अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूचा अभ्यास केला जातो. महागाईचा दर ,एकूण देशांतर्गत उत्पादन, अर्थव्यवस्थेमधला ट्रेन्ड विचारात घेतला जातो. इंटरेस्ट रेट, सरकार तर्फे कोणत्या पॉलिसी राबिवल्या जात आहेत त्याचा विचार करणे, दुसऱ्या देशांमधील गुंतवणूक, सरकारची गुंतवणूक यावरून आपण ठरवू शकतो की एखादया देशाची अर्थव्यवस्थां उद्योगांसाठी पूरक आहे की नाही.

कंपनीचे विश्लेषण :

सिक्युरिटीजचे मूल्यांकन करण्यासाठी कंपनीच्या प्रोफाइलशी संबंधित माहिती गोळा करणे आणि उत्पादने व सेवा तसेच नफा या बद्दलचा अभ्यास हे 'मूलभूत विश्लेषण' म्हणून ओळखले जाते. कंपनीच्या विश्लेषणमध्ये कंपनीबद्दल मूलभूत माहिती समाविष्ट असते. जसं कंपनीच्या मिशनचे विधान आणि उद्दिष्टे, मूल्ये लक्षात घेतले जाते. कंपनीच्या विश्लेषणाच्या प्रक्रियेदरम्यान एखाद्या गुंतवणूकदाराला कंपनीच्या इतिहासाचा विचार करण्यात येतो. ज्यामुळे कंपनीला आकार देण्यास मदत झाली आहे.

तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) : या प्रकारामध्ये बाजाराची दिशा, भावरेषा, आधार-प्रतिरोध, इंडिकेटर्स, व्हॉल्यूम, इत्यादीचा अभ्यास करून निर्णय घेतला जातो. हा अभ्यास चार्ट द्वारे केला जातो. वरील दोन्ही प्रकारांमध्ये मर्यादा असल्याने बाजारातले परदेशी गुंतवणूकदार, बँकर्स, म्युच्यूअल फंड इत्यादी मोठे गुंतवणूकदार यांची भिस्त ही ट्रेडर्सच्या चालींवरून खरेदी-विक्री करण्यावर असते. ही पद्धत योग्य प्रशिक्षकाकडून समजून घेतली तर व अनुभवाने आत्मसात केली तर जास्त उपयोगाची आहे.

ऑनलाइन ट्रेडिंग करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चार्ट बघणे, तो वाचता येणे आणि समजणे. अतिशय तीक्ष्ण नजर असणे सतत आणि भरपूर सराव केला तर चार्ट समजून घेता येणे ही अजिबात अवघड गोष्ट नाही.

चार्ट म्हणजे एखाद्या विशिष्ट वेळेत शेअरच्या किमतीची शृंखला वा मालिका क्रम संख्याशास्त्रीय पद्धतीने ठरावीक अथवा वेगवेगळ्या कालावधीत नोंद करणे. ज्यांच्या किंमतीची माहिती उपलब्ध आहे असे कोणत्याही रोख्यांची ती माहिती वापरून वेगवेगळ्या कालावधीनुसार चार्ट आखता येतात. उदाहरणार्थ २९ फेब्रुवारी २०१६ रोजी निफ्टी ६९८७ ला बंद झाला आणि २० मे २०१६ रोजी ७७४९ ला बंद झाला. या कालावधीत ज्या किंमतीच्या पातळीमध्ये निफ्टी फिरत होता त्याची माहिती एनएससीच्या वेबसाइटवर उपलब्ध असते, त्याचे संख्याशास्त्रीय पद्धतीने पृथक्करण करून त्या कालावधीचा चार्ट काढू शकता. म्हणजेच ज्या रोख्याच्या किंमतीची माहिती उपलब्ध आहे त्याचा चार्ट आलेखन करू शकता.

चार्टचे मुख्यत्वे चार प्रकार असतात, लाइन चार्ट, बार चार्ट (OHLC), जापनीज कॅण्डलस्टिक्स आणि एरिया चार्ट. बार चार्ट आणि कॅण्डलस्टिक चार्ट समजून घेण्यास आणि त्याची सवय होण्यास वेळ लागतो. त्या मानाने लाइन चार्ट समजायला थोडा सोपा. चार्टवर कोणत्या गोष्टी प्रामुख्याने बघाल, तर कल (ट्रेंड), मुव्हिग अ‍ॅव्हरेज क्रॉस करतोय का?, आधार आणि विरोध पातळी, पॅटर्न, आर एस आय कितीवर आहे आणि एमएसीडी (MACD) कोणत्या घरात आहे ते पाहावे .

‘मराठी माणसाने आता शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळणे आवश्यक आहे. शेअर बाजार पाहून किंवा वाचून लक्षात येऊ शकत नाही, तर त्याचे गमक हे गुंतवणूक करूनच कळू शकते. अगदी छोटय़ा रकमेपासूनही गुंतवणूक करता येते. तरूण वयातच गुंतवणुकीची शिस्त लावून घेणे सुरक्षित भविष्यासाठी गरजेचे आहे.

कमलेश भगत

(लेखक गुंतवणूक सल्लागार म्हणून हाईपॉइंट सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कार्यरत आहे )

Updated : 9 Jun 2017 10:11 AM GMT
Next Story
Share it
Top