फडणवीस तुम्ही सुद्धा?

1444
14908241_1014276358682033_2344691894512461654_n

भाजप सरकार सत्तेत आल्यापासून ( याला युती सरकार म्हणणं मनातूनच पटत  नाहीय ) विधानसभेतील किंवा विधानपरिषदेतील भाषणात  सर्वच विरोधी  पक्षातील  नेत्यांनी  भाषणांमध्ये  देवेंद्र  फडणवीस  यांची  तारीफ  केलीय.  फडणवीस  चांगले आहेत, पण सरकार नीट काम करत नाही अशीच बहुतेक सर्वांची टीका असते.

वैयक्तिकरित्या मी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना आतापर्यंतच्या कामासाठी १० पैकी ६ मार्क दिले असते. पण निवडणूकांच्या  राजकारणात  त्यांनी  जो  भ्रष्टाचार  अवलंबला  आहे  त्यावरून मी आता त्यांना १० पैकी ४ मार्क देईन.

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असल्यापासून सरकारचे अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले. सातत्याने सरकारवर हल्ला सुरू ठेवला. किरीट सोमय्या आणि अंजली दमानिया यांनीही सुरू ठेवलेल्या हल्ल्यांमुळे देवेंद्र फडणवीस यांची ताकत वाढली. विरोधी पक्षात असताना थेट वर्षावरूनच त्यांना रसद मिळत होती, दारूगोळा मिळत होता. हाच दारूगोळा वापरून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा किल्ला जमीनदोस्त केला  आणि थेट वर्षावर विजय मिळवला. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस सरकार नीट चालवू शकतील की नाही?  पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार अशा महत्वाकांक्षी नेत्यांना ते कसे वेसण घालणार? असे अनेक प्रश्न होते. त्यातच सरकार आल्या-आल्या एकेक मंत्र्यांचे कारनामे बाहेर येऊ लागले. फडणवीस यांनी अत्यंत हुशारीने परिस्थिती हाताळली. पक्षांतंर्गत विरोधकांना धक्क्याला लावतानाच देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ क्लीनचीटचं काऊंटरच उघडून टाकलं. फडणविसांकडे क्लीनचीटची सिंगल विन्डो पद्धतच आहे. नागपूरात गुन्हे वाढले, मर्डर झाले, त्यांच्या जवळच्या लोकांनी सामान्य लोकांना धमकवलं, त्यांची गाडी जाळली पासून चिक्की खाल्ली, भूखंड खाल्ला, पूर्वीच्या सरकारप्रमाणे वारेमाप सुप्रमा दिल्या (या सुप्रमा म्हणजेच सुधारित प्रशासकीय मान्यतांना मागच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार मानलं गेलं होतं) या व अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी फडणवीसांच्या लाँड्री मध्ये धुतल्या जाऊ लागल्या. ठीक आहे, इतक्या वर्षांचे सहकारी आहेत. सत्ता आल्यावर थोडं इकडे तिकडे होणारच, म्हणून लोकांनी तुम्हाला माफ केलं. कदाचित याचाच गैरअर्थ काढून देवेंद्र फडणवीसांचा धीर चेपला असेल.

राज्यात विविध ठिकाणी निवडणूका झाल्या. या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळालं. एकदा का यशाची चटक लागली की माणूस, संस्था, पक्ष याला सरावतो. त्यात कसेही करून यश मिळालंच पाहिजे अशी भावना असेल तर मग पथभ्रष्ट होतो. सध्या भारतीय जनता पक्षाचं तसं सुरू आहे. भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचारी नव्हता अशातला भाग नाहीय. एकूणच राजकीय पक्षांमध्ये असेलेले सर्व गुणदोष या पक्षात आहेत. सध्या तर मागचेबरे होते असं म्हणायची पाळी आलीय इतके काही भाजपने केलंय.

असो, असं असलं तरी देवेंद्र फडणवीस यांची जनमानसातील प्रतिमा चांगलीच आहे. तशी ती कुणी काहीही म्हटलं तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही होती. पण प्रश्न आहे, या चांगल्या प्रतिमांचं लोणचे घालायचंय काय?  सध्या देवेंद्र फडणवीसांनी जे काही आरंभलेले आहे ते महाराष्ट्रासाठी घातकच आहे. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची सुरूवात शरद पवारांपासून झाली असं सांगतात. आपल्या काळात याला कळस चढवण्याचा प्रयत्न दिसतोय. विविध भागांतील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना भाजप जवळचा वाटू लागलाय. हे पक्षाचं धोरण म्हणून सोडून देता येत नाही कारण देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत सोबत गृहमंत्रीही आहेत. या राज्यातील गृहमंत्र्याच्या स्टेजवर कुणी अनोळखी माणसाने येऊन पुष्पगुच्छा दिलेल्याचे फोटो वापरून देवेंद्र फडणवीस यांनी गदारोळ उडवून दिलेला आहे. त्यामुळे आपण कुणाकुणाच्या गळ्यात पक्षप्रवेशाचे हार घालतो याचा हिशोब फडणवीसांनी दिलाच पाहिजे.

भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या केल्याच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असलेल्या पप्पू कलानी आणि कंपनीला भाजपने देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने रेड कार्पेट अंथरले. पप्पू कलानीला आजन्म जन्मठेप आहे. तरी निवडणुकीच्या काळात पप्पू कलानीला पॅरोलवर बाहेर काढण्याचं आश्वासन देवेंद्र मंत्रिमंडळातील एक मंत्री देतो काय, तलवारनाचवत ओमी कलानी स्टेजवर येतो काय या कशाचंच काही देवेंद्र फडणवीस यांना वाटत नाहीय. यावरून फडणवीसांची कातडीही गेंड्याची होऊ लागलीय हेच दिसून येतं.

“राष्ट्रवादी काँग्रेसला गुंडांची पार्टी म्हणणारे फडणवीस,  नॅच्युरल करप्ट पार्टी असं नामांतर करणारे फडणवीस,  दिवाळीपर्यंत राष्ट्रवादीच्या गुंडांना जेलमध्ये टाकू असं म्हणणारे फडणवीस अचानक उन्नीस-बीस कसं काय करायला लागले? नेमकं काय घडलं असं की राष्ट्रवादीचे नेते जेलमध्ये जाण्याऐवजी भाजपमध्ये जायला लागले? “

देवेंद्र फडणवीसांच्या काळात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनेकांना फोनवरून त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती देण्यात येते, पुढील दहा वर्षे हे सरकार काही जात नाही तेव्हा विचार करा असा धमकीवजा सल्ला देण्यात येतो हे काय सुरू आहे? कोण करतंय हे? हे काही देवेंद्र फडणवीसांच्या अपरोक्ष होत असेल असंही नाही! मग हा सत्तेचा, गृहखात्याचा दुरूपयोग नाहीय का?  सर्वांत महत्वाचं म्हणजे गुन्हेगारांचे हे मुक्तप्रवेश संघालाही चालले याचाच अर्थ संघाला ही याचा काही विधिनिषेध नाही. हा त्यांच्याच प्लानचा भाग आहे. मग शूचितेचं हे नाटक कशाला?

नोटबंदीच्या काळात भाजपच्या नेते कार्यकर्त्यांकडेच नोटा सापडल्या,  भाजपच्या नेत्याचा कुंटणखाना पकडला गेला,  टक्केवारीवर देवेंद्र फडणवीसांची किती तरी दिव्य भाषणं मी ऐकलीयत. एकदा ही टक्केवारीची भाषण दलाली करणाऱ्या भाजपच्या नवएजंटांनाही मुख्यमंत्र्यांनी ऐकवली पाहिजेत. एकटे फडणवीस तरी काय करणार असं फडणवीसांच्या जवळचे कार्यकर्ते सांगतात. ही हतबलता इतक्या लवकर आली असेल तर हे जास्त घातक आहे. पुण्या-पिंपरी चिंचवडमधल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना प्रवेश देताना देवेंद्र फडणवीस यांना यातना झाल्या नाहीत यावरूनच त्यांचा कळसाकडे सुरू असलेला प्रवास स्पष्ट होतो.

रवींद्र आंबेकर