पुन्हा दहशतवादी हल्ला

542

लंडनमध्ये बुधवारी झालेला दहशतववादी हल्ला म्हणजे आगीत तेल ओतण्याचा प्रकार आहे. इस्लामिक स्टेटच्या खालिद मसूद या ५२ वर्षांच्या दहशतवाद्यानं रस्त्यावरून वेडीवाकडी गाडी चालवत लोकांना जखमी केलं, आणि सुऱ्यानं हल्ले केले. त्यामध्ये एका महिलेसह तीन नागरिक आणि ब्रिटीश संसदेच्या सुरक्षेवर असलेला पोलीस अधिकारी मारला गेला, त्याबरोबरच जवळपास ४० जण जखमी झाले. लंडनला दहशतवादी हल्ले नवीन नाहीत. अगदी १९८०च्या दशकापासून आयरिश आर्मीच्या अतिरेक्यांनी लंडनमध्ये अनेकदा नागरिकांवर हल्ले केले. हे हल्ले स्थानिक राजकारणातून होत असल्याने ब्रिटनबाहेर फक्त चर्चा व्हायची, त्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर पडसाद उमटत नसत. आता परिस्थिती वेगळी आहे. इस्लामिक दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विषय आहे, त्यामुळे या हल्ल्याची चर्चा पुढे काही दिवस होतच राहणार.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये युरोपमध्ये इस्लामी दहशतवादाविरोधातला रोष वाढत्या प्रमाणात इस्लामधर्मीयांकडे वळला आहे. फ्रान्स, जर्मनी आणि इतर युरोपीयन देशांमध्ये इस्लामला वाढत्या विरोधाचा फायदा घेऊन उजव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांनी सत्ता हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंत त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नसलं तरी दहशतवादाचा धोका स्पष्टपणे उभा ठाकलेल्या मतदारांना किती काळ धीर धरता येईल हा प्रश्न आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर आता युरोपमध्येही असेच नेते सत्तास्थानी पोहोचतील अशी भीती व्यक्त केली जात होती. पण तसं झालं नाही. सरसकट इस्लाम, किंवा अन्यधर्मीयांचा द्वेष हे युरोपीयन नागरिकांचं वैशिष्ट्य नाही. मात्र, इस्लामिक स्टेटसारख्या संघटनांनी युरोपकडे वळवलेलं लक्ष, इराक आणि सिरीयामधून येणारे निर्वासितांचे लोंढे, ब्रिटन आणि फ्रान्समध्ये वाढती मुस्लीम लोकसंख्या (त्यामध्ये स्थलांतरितांचं प्रमाण लक्षणीय), फ्रान्समध्ये हिजाबला मान्यता द्यावी म्हणून निघणारे मोर्चे अशा वातावरणात नागरिकांमध्ये मुस्लिमांविरोधात आधी भीती आणि त्यानंतर द्वेषभावना निर्माण करणं हळूहळू का होईना पण शक्य आहे. मात्र, मतदारांचा कल उजव्या विचारांकडे झुकणे उद्याच्या युरोपला परवडणारं आहे का हा प्रश्नही आहेच.

लंडनमधल्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटनं घेतली आहे. मात्र हा हल्ला करताना संघटनात्मक पातळीवर फार मोठं नियोजन झाल्याचं दिसत नाही. हल्लेखोर दहशतवादी मसूद खालिद एकटाच असल्याचं प्रथमदर्शनी दिसतं. हल्ल्यापूर्वी त्यानं गाडी भाड्यानं घेताना स्वतःचा व्यवसाय शिक्षकी पेशा असल्याचं सांगितलं. तपासादरम्यान ते खोटं असल्याचं उघड झालं. मसूदवर यापूर्वी निरनिराळे गुन्हे दाखल झाले आहेत. वयाच्या १९व्या वर्षी त्याचा पहिला गुन्हा सिद्ध झाला होता, तर २००३ मध्ये सुरी बाळगल्याप्रकरणी त्याला कोर्टानं दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नाही. तसेच त्याचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचाही पोलिसांना कधीच संशय नव्हता. खालिद मसूदचा जन्म केंट परगण्यात झाला. तो जन्मतः मुस्लीम नव्हता, एड्रियन रसेल एजेओ असं त्याचं मूळ नाव. त्यानं मुस्लीम धर्म कधी स्वीकारला, धर्म बदलण्याचं कारण निव्वळ धार्मिक होतं की अन्य काही, त्याचा इस्लामिक स्टेटशी संबंध कधी आणि कसा आला, आयएसच्या कारवायांमध्ये तो कितपत गुंतलेला आहे आणि त्यानं दहशतवादी हल्ला करण्यामागचं नेमकं कारण (ट्रिगर) काय होतं हे प्रश्न अनुत्तरित आहेत, त्याची उत्तरं शोधली जातीलच.

अशा दहशतवादी हल्ल्यांनंतर सगळ्याच जास्त अडचण होते ती स्थानिक मुस्लीम समाजाची. ज्या लंडनमध्ये दहशतवादी हल्ला झाला, त्याचे मेयर सादिक खान गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये निवडून आले आहेत. युरोपमध्ये विशेषतः शेजारच्या फ्रान्समध्ये इस्लामविरोध वाढत असताना लंडनच्या नागरिकांनी मात्र, मेयर निवडताना त्यांच्या धर्माकडे लक्ष न देता ‘लोकशाही धर्म’ पाळला होता. हा विश्वास कायम राखण्याची जबाबदारीही तिथल्याच राज्यकर्त्यांची आहे.

निमा पाटील