पर्यावरणपूरक उत्पादनांचे भविष्य

विरोध हा आपल्याकडील स्थायीभाव आहे. सुक्षिक्षित असो किंवा अक्षिक्षित, ग्रामीण असो किंवा शहरी, स्त्री – पुरुष प्रत्येक जण कुठल्याही नवीन गोष्टीला पहिल्यांदा विरोध करतात. मुंबई- पुणे सारख्या आधुनिक शहरांमधूनदेखील चाळीस वर्षांपूर्वी गॅसच्या शेगड्यांना विरोध झाला होता. तसाच विरोध २००५ साली निर्धूर चुली, शेगड्या तयार केल्यावर आम्हाला झाला. “समुचित एन्व्हायरो टेक”  या  कंपनीच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण महिलांच्या आरोग्यासाठी तसेच पर्यावरण रक्षणासाठी उपयुक्त अशा निर्धूर चुली, शेगड्या व स्वच्छ जैव इंधनांचा तयार करतो. त्यावेळी आम्हाला आमच्याच काही सहकाऱ्यांकडून बऱ्याच विरोधाचा सामना करावा लागला. ग्रामीण जनतेच्या उपयोगाची साधने पुरवणे किंवा पर्यावरण संरक्षणासाठीची कामे करणे ही साधारणतः शासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांनी सेवाभावी वृत्तीने करायची कामे असा तेव्हा समज होता. अशा साधनांचा आणि तंत्रांचा वापर करून यातून पैसे कमवू पहाणे, म्हणजे काहीतरी अनैतिक कृत्य असे मानले जात होते. लोकांच्या आणि पर्यावरणाच्या फायद्याची तंत्रे आणि साधने दीर्घकाळपर्यंत व चांगला दर्जा टिकवून लोकांपर्यंत पोहचायला हवी असतील, तर व्यावसायीकरणाला पर्याय नाही, हे वास्तवही सर्वांना दिसत होते, पण जुन्या धारणा सोडायला मने धजावत नव्हती. अशा संभ्रमित आणि प्रतिकूल परिस्थितीत मी काम सुरू केले, आणि अनेक टक्केटोमणे खात तग धरून राहिले.

या संघर्षात एक गोष्ट अशी लक्षात आली की, केवळ पर्यावरणपूरक असणे हे एखादे उत्पादन बाजारात यशस्वी होण्यासाठी पुरेसे नाही. ज्या ग्राहकांनी ते उत्पादन वापरावे अशी अपेक्षा आहे, त्यांना त्यातून उपयुक्त सेवा मिळणेही आवश्यक आहे. पर्यावरणपूरकतेसाठी लोकांनी गैरसोय सहन करावी ही अपेक्षा गैरवाजवी आहे. उदा. सुधारित चूल केवळ निर्धूर आहे, म्हणून कोणी विकत घेणार नाही, तर त्यावर पुरेशा सहजतेने स्वयंपाक करणे शक्य असेल, तरच तिला बाजारात प्रतिसाद मिळतो. जोपर्यंत शासकीय योजनांमधून किंवा दानशूरांच्या देणगीतून अशी साधने गरजूंना वाटली जातात, तोपर्यंत या बाबीकडे लक्ष दिले जात नाही. घेणारी व्यक्तीही फुकट मिळणारी वस्तू आनंदाने स्वीकारते, आणि देणाऱ्याला वाईट वाटू नये म्हणून स्तुतीही करते. प्रत्यक्षात ती वस्तू किती वापरात येते, याचे मूल्यमापन होत नाही. पण गरजू व्यक्ती जेव्हा ग्राहक म्हणून पुढे येते, तेव्हा तिचा दृष्टिकोन वेगळा असतो, आणि वस्तू पुरवठादार आणि ग्राहक हे नातेही दाता आणि गरजू यांपेक्षा जास्त समानतेचे असते. त्यामुळे वापरणाऱ्याच्या नेमक्या अपेक्षा पुढे येतात, आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी आणखी संशोधन करून वस्तूत बदल करणे भाग पडते. हे करताना मूळच्या पर्यावरणपूरकतेला धक्का लागणार नाही, ही काळजीही घ्यावी लागते. तेव्हा अशी उत्पादने तयार करताना पर्यावरणपूरकतेबरोबरच उपयुक्ततेलाही महत्व दिले पाहिजे, हा एक महत्वाचा धडा मी या काळात शिकले.

दरम्यानच्या काळात व्यवसायाच्या स्वरूपातही मी बदल करत गेले. आज केवळ ग्रामीण जीवनशैलीसाठीच नाही, तर शहरी जीवनशैलीसाठीही उपयुक्त अशी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पर्यावरणपूरक साधने आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो आहोत, त्याशिवाय कुंटुंबाची जीवनशैली किंवा संस्थांची कार्यपध्दती पर्यावरणपूरक कशा करता येईल याबाबत सल्ला व मार्गदर्शनही देत आहोत. हा व्यवसाय करणे खूप कठीण होते आहे. काही वर्षांपूर्वी कंपनी बंद करावी लागते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. माझ्या मते सेवाभावी संस्था म्हणून केवळ दानशूरांच्या मेहरबानीवर मी जे काही करू शकले असते, त्यापेक्षा निश्चितच जास्त काम मी गेल्या विशेषतः पाच-सहा वर्षांत या कंपनीच्या माध्यमातून करू शकले आहे.

या व्यक्तिगत अनुभवाच्या पलिकडे जाऊन २०१० नंतर मला आजुबाजूच्या परिस्थितीतही खूप फरक पडलेला दिसतो. आज मला वेगवेगळ्या पर्यावरणपूरक तसेच समाजोपयोगी सेवा आणि उत्पादने पुरवणाऱ्या अनेक व्यावसायिक संस्था अतिशय परिणामकारकरित्या काम करताना दिसतात. बहुतेक तरूण मंडळींनी हे व्यवसाय सुरू केले आहेत, व अतिशय कल्पकतेने विविध आव्हानांना तोंड देत नावारूपालाही आणले आहेत. यात सौरऊर्जेची आणि इतरही नूतनक्षम ऊर्जेवर आधारित साधने, ऊर्जाबचत करणारी विविध साधने, पाण्याची बचत करण्याची साधने, पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीची साधने, सांडपाण्याच्या पुर्नवापराची साधने, कचऱ्यातल्या पदार्थांपासून बनवलेल्या आकर्षक व उपयुकत वस्तू, सेंद्रीय कचऱ्यावर विविध प्रकारे प्रक्रिया करण्याची साधने, प्लॅस्टिकच्या वापरा आणि टाकून द्या पध्दतीच्या वस्तूंना सेंद्रीय पर्याय, सेंद्रीय पध्दतीने पिकवलेला भाजीपाला, इतर शेतमाल व त्यावर आधारित उत्पादने, बागांसाठी किंवा लॅंडस्केपसाठी स्थानिक परिसंस्थेतल्या वनस्पतींच्या बिया व रोपे, धातूच्या वस्तूंना पर्यायी बांबूसारख्या जैविक पदार्थांपासून बनवलेल्या वस्तू, इ. अनेक प्रकारची पर्यावरणपूरक साधने आज बाजारात उपलब्ध आहेत. पर्यावरणपूरक साधने ही एकेकाळी फक्त गरिबांसाठी किंवा फक्त ग्रामीण भागासाठी बनवली जात, ती मानसिकताही आज बदलली आहे. त्याचबरोबर वस्तूची किंमत कमी ठेवण्यापेक्षा दर्जा चांगला ठेवणे, आणि खऱ्या अर्थाने उपयुक्तता वस्तूंमध्ये असणे जास्त महत्वाचे मानले जाते. गरिबांना दर्जेदार वस्तू घेता याव्यात यासाठी वेगवेगळ्या कल्पक पध्दतींनी आर्थिक मदत केली जाते, आणि या पध्दतीने किमतींच्या अडचणींवर मात केली जाते.

आज आवर्जून पर्यावरणपूरक उत्पादनांची प्रदर्शने भरतात, आणि लोकांची त्याला गर्दी होते. पर्यावरणपूरक उत्पादनांचीच विक्री करणारे आमच्यासारखे इतर व्यावसायिक  आहेत आणि या ठिकाणी लोक मुद्दामहून भेट देतात, व भरभरून खरेदी करतात. आम्ही पर्यावरणपूरक वस्तू वापरतो, हे समाज माध्यमातून वरून प्रसृत करण्यात आज शहरी तरूण वयोगटातील लोकांना विशेष अभिमान वाटतो. या सर्वच गोष्टी पर्यावरणपूरक उत्पादनांचे भवितव्य उज्ज्वल आहे, याचेच द्योतक आहेत. पर्यावरणपूरक उत्पादनांचे व्यावसायिक काही प्रचंड नफा कमावताहेत असे नाही, पण त्यांना आज समाजात मान मिळतो आहे. सेवाभावी कामाचा धंदा करत असल्याचा आरोप कोणी आज त्यांच्यावर करताना दिसत नाही. किंबहुना आज बऱ्याच स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने व आशिर्वादाने अशा उत्पादनांची निर्मिती व विक्री करणारे व्यवसाय उभे राहिले आहेत, असेही चित्र पहायला मिळते.

अर्थात, लोकांच्या मानसिकतेत हा बदल अचानक झालेला नाही. आपल्या जीवनशैलीचे पर्यावरणावर अनिष्ट परिणाम होत आहेत, ही जाणीव शहरी मध्यमवर्गीयांमध्ये केल्या काही दशकांपासून हऴूहऴू जागी होऊ लागली आहे. शाळांमध्ये पर्यावरण हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्यावर शहरी नागरिकांमध्ये ही जाणीव जास्त तीव्र झाली, असा माझा अनुभव आहे. आपल्या पाल्यांच्या पर्यावरण विषयाच्या प्रकल्पांच्या निमित्ताने पालकांचा अभ्यास सुरू झाला आणि त्यातून ही जाणीव वाढीला लागली असावी. पण विशेषतः गेल्या पाचेक वर्षांत विविध पध्दतीने पर्यावरणाच्या हानीच्या परिणामांचे चटके आता आपल्याला बसू लागले आहेत, त्यामुळे ही जाणीव अधिक तीव्र होते आहे, हेही महत्वाचे. हवेचे प्रदूषण, रस्त्यावर वारंवार होणारी वहातूक कोंडी, कचऱ्याच्या विल्हेवाटीतील समस्या, सांडपाण्यामुळे दूषित झालेले नद्यानाले, दरवर्षी एकीकडे येणारे पूर आणि पावसाळ्यानंतर वर्षभर जाणवत रहाणारी पाणीटंचाई, समुद्रकिनाऱ्यांची आणि इतर निसर्गरम्य स्थळांची कचऱ्यामुळे होणारी हानी, दगडांच्या खाणी तसेच अनिर्बंध वृक्षतोडीतून होणारा टेकड्यांचा ऱ्हास, इ. गोष्टी आता केवळ सांगोवांगीच्या न रहाता आपल्या रोजच्या अनुभवाचा भाग बनल्या आहेत. जागतिक वातावरणबदलाचा आपल्या देशातील पर्जन्यचक्रावर झालेला परिणाम गेल्या काही वर्षांपासून आपण सारेच अनुभवतो आहोत. या साऱ्याचा प्रतिसाद म्हणून पर्यावरणरक्षणाच्या चळवळीही सामान्य नागरिकांमधून उभ्या रहात आहेत, आणि यात ऑनलाइन पिटिशन आणि सोशल मिडियाद्वारे जनजागृतीपासून प्रत्यक्ष कृतीपर्यंत विविध प्रकारे लोक सहभागी होऊ लागले आहेत. यातूनच आपल्या जीवनशैलीला पर्यावरणपूरक वळण देण्याचाही जाणीवपूर्वक प्रयत्न होतो आहे  आणि अशा प्रयत्नांमध्ये उपयोगी पडणाऱ्या उत्पादनांना आणि सेवांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. समाजात पर्यावरणपूरकतेची मान्यता जशी वाढत गेली आहे, तसे पर्यावरणपूरक उत्पादनांसाठी संशोधनातील आव्हाने, तसेच अशा उत्पादनांच्या निर्मिती आणि विपणन प्रक्रियेतील आव्हाने अनेक प्रतिभावान तरूण-तरूणींना आकर्षित करताना दिसतात. गेल्या कित्येक वर्षांत अशा अनेक तरूणांनी मार्गदर्शनासाठी, सल्लामसलतीसाठी माझी भेट घेतली आहे, आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांनी आणि आर्थिक व व्यावसायिक जोखिम पत्करणाच्या तयारीने मी थक्क होऊन गेले आहे.

अशा पध्दतीने लोकांच्या बदललेल्या मानसिकतेतून पर्यावरणपूरक उत्पादनांच्या बाजारपेठेला आज टेकू मिळतो आहेच. पण ही केवळ तात्कालिक भावनिक लाट किंवा अल्पकाळासाठीची फॅशन रहाणार नाही, तर भविष्यात शासकीय धोरणांमधूनही अशा उत्पादनांना पुढावा मिळेल अशी चिन्हे दिसतात. 2015 हे या दृष्टीने एक फार महत्वाचे वर्ष होते, असे म्हणावे लागेल. या वर्षी जागतिक पातळीवर झालेल्या काही घडामोडींचे पडसाद पुढच्या काही दशकांत पडत रहातील  आणि त्यातून जागतिक पातळीवर विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक व्यवसायांना चालना मिळेल, अशी लक्षणे दिसतात.

2015 सालची पहिली महत्वाची घटना म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने पुढच्या तीस वर्षांसाठी जागतिक पातळीवर शाश्वत विकासाची सतरा ध्येये मान्य केली. जगातील सर्व देशांनी या ध्येयांना मान्यता दिलेली आहे  आणि या ध्येयांची पूर्तता होईल या पध्दतीने आपापल्या देशातील धोरणांची आखणी करण्यासाठी सर्व देश वचनबध्द आहेत. ही सतरा ध्येये व त्यांखालची 169 उद्दिष्टे पाहिली, तर जगातील सर्व देशांना केवळ आर्थिक विकासाच्या मार्गावर एकमेकांशी शर्यत करणे सोडून आपापल्या नागरिकांच्या सामाजिक उन्नतीसाठी, समाधानी आयुष्यासाठी आणि आपल्या देशातल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठीही नेटाने प्रयत्न करणे भाग पडेल. 2016 ते 2030 या कालावधीत ही ध्येये साध्य करायची आहेत. यापूर्वी 1990 ते 2015 या कालावधीत मिलेनिअम डेव्हलपमेंट गोल्सच्या माध्यमातून जागतिक पातळीवर शासकीय धोरणांना वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. तो काही शंभर टक्के यशस्वी झाला असे जरी म्हणता येणार नसले, तरी बऱ्याच देशांना या ध्येयांनी विकासाची योग्य दिशा दाखवली, आणि त्यामुळे जागतिक पातळीवर आठ मिलेनिअम डेव्हलपमेंट गोल्सची ध्येये बऱ्याच अंशी गाठली गेली. या प्रयोगातील उणीवा दूर करून शाश्वत विकासाच्या ध्येयांचा प्रयोग आता होतो आहे, तो नक्कीच मागच्यापेक्षा अधिक परिणामकारक ठरेल.

2015 साल संपता संपता घडलेली दुसरी महत्वाची घटना म्हणजे जागतिक वातावरणबदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व देशांनी संमंत केलेला पॅरिस करार. या करारानुसार जागतिक तापमानवाढ नियंत्रित ठेवण्याचे या शतकातले ध्येय गाठायचे असेल तर पेट्रोलियम इंधनांवरचे अंवलंबित्व मोठ्या प्रमाणावर कमी करायला लागणार आहे. या कराराची अंमलबजावणी 2020 सालापासून सुरू होईल, आणि त्याखाली प्रत्येक देशाने दिलेला कार्यक्रम दर पाच वर्षांनी सुधारत न्यायचा आहे. हा एक दीर्घकालीन करार आहे.  जगातल्या प्रत्येक देशाला त्यात आपला स्वतः ठरवून घेतलेला वाटा उचलायचा आहे. जर योग्य पध्दतीने अंमलबजावणी होत गेली, तर 21वे शतक संपेपर्यंत या कराराची तत्वे लागू रहातील. भारताने या करारांतर्गत जी वचने दिलेली आहेत,  त्यादृष्टीने आपले भविष्यातले ऊर्जाधोरण जास्तीत जास्त नूतनक्षम ऊर्जास्रोतांकडे तसेच स्थानिक संसाधनांच्या वापराकडे जाणारे असावे लागेल.

या सर्व जागतिक करारांचा देशांतर्गत परिणाम म्हणून पर्यावरणपूरक उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल. पर्यावरणपूरक उत्पादनांचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ती बहुतेकदा स्थानिक संसाधनांचा वापर करून बनवली जातात. यामुळे अशा वस्तूंच्या उत्पादनाचे व्यवसाय हे लघुउद्योग किंवा मध्यम आकाराचे उद्योग इतपतच मर्यादित आकाराचे असतात. जगडव्याळ अशा बहुराष्ट्रीय कंपन्या कोणतीच उत्पादननिर्मिती पर्यावरणपूरक पध्दतीने करू शकत नाहीत. त्यामुळे सामाजिक न्याय, स्थानिक रोजगार निर्मिती आणि प्रदूषण कमी करणे असा तिहेरी फायदा पर्यावरणपूरक उद्योगांमधून साध्य होणार असतो. त्यामुळे शाश्वत विकासाची ध्येये गाठतानाच जागतिक वातावरणबदलात कमीत कमी भर घालणे साध्य करण्यासाठी अशा व्यवसायांना प्राधान्य देणे, प्रोत्साहन देणे, हे एक हुशारीचे धोरण ठरू शकते.

एकंदरीत ही सर्व परिस्थिती पहाता बॉटम-अप आणि टॉप-डाऊन या दोन्ही मार्गांनी पर्यावरणपूरक व्यवसायांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे, असे दिसते. त्यामुळे पर्यावरणपूरक उत्पादनांचा आणि पर्यावरणपूरक सेवा पुरवणाऱ्या व्यवसायांचा भविष्यकाळ पुढच्या पंचवीस वर्षांसाठीच नाही, तर या संपूर्ण शतकासाठी उज्वल आहे, याबद्दल मला अजिबात शंका वाटत नाही.

 

प्रियदर्शिनी कर्वे

समुचित एन्व्हायरो टेक, पुणे