नो लेफ्ट, राइट, सेंटर…!

516

सैन्यदलात कॅप्टन असलेले तिचे वडील युद्धात मारले गेले, तेव्हा ती अवघी दोन वर्षांची होती. ते युद्ध होतं, 1999 सालचं, कारगिलचं. परिणामी, पाकिस्तानचा द्वेष करीतच ती लहानाची मोठी झाली. सहा वर्षांची असताना तिनं एका बुरखा घातलेल्या महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. शेजारच्या शत्रुराष्ट्राचा इतका द्वेष तिच्या नसानसांत भिनला होता. आईनं समजावलं, की तिच्या वडिलांचा मृत्यू अशा कोणी विशिष्ट धर्माच्या व्यक्‍तींनी केलेला नाही, तर ते युद्धात हुतात्मा झाले आहेत. आता ती वीस वर्षांची आहे. दिल्लीतल्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये शिकतेय. काल-परवा ती अचानक देशभर, जगभर चर्चेत आली. कारण, भारतीय जनता पक्षाची विद्यार्थी आघाडी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांमधल्या संघर्षात कॉलेजेसमध्ये शिकणारी सामान्य मुलेमुली भरडली जाताहेत. विद्यापीठांचे परिसर अशांत टापू बनलेत. “स्टुडंटस्‌ अगेन्स्ट एबीव्हीपी’ चळवळ त्यातून उभी राहिलीय अन्‌ गुरमेहर कौर ही आपण जिची चर्चा करतोय ती कॅप्टन मनदीपसिंग या शहिदांची कन्या त्या चळवळीत अग्रेसर आहे.

गेल्या बुधवारी दिल्लीतल्या रामजस कॉलेजमध्ये एका चर्चासत्रासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातला वादग्रस्त नेता उमर खालिद याला निमंत्रित केल्याच्या मुद्‌द्‌यावर प्रतिस्पर्धी गटांमध्ये हाणामारी झाली. वीसेक विद्यार्थी, काही पोलिस जखमी झाले. सामान्य विद्यार्थ्यांवर तुफान दगडफेक झाली. मुलींनाही बेदम मारहाण करण्यात आली. त्यांचे कपडे फाडले गेले. बलात्काराच्या धमक्‍या देण्यात आल्या. हे कोणत्या विचारांच्या संघटनांनी केले हे महत्त्वाचे नाही. गेली दोन वर्षे देशाच्या कानाकोपऱ्यातल्या विद्यापीठांमध्ये जो धुडगुस सुरू आहे, त्याने आता सहनशीलतेची परिसीमा गाठल्याची ही चिन्हे आहेत. हैदराबाद, जेएनयू, जाधवपूर आदी विद्यापीठांमधल्या मालिकेत आता दिल्ली विद्यापीठही आलंय. रामजस कॉलेजमधल्या संघर्षानंतर अन्य विद्यापीठांमधलं वातावरणही ढवळून निघालंय. पुणे विद्यापीठातला शुक्रवारी रात्रीचा आखाडाही त्याचाच भाग आहे.

गुरमेहर कौर हिने सर्वशक्‍तिमान अभाविपविरोधात आवाज उठवल्यानंतर अनेक मुली, मुले पुढे येताहेत. हजारो, लाखोंच्या संख्येने “नेटिझन्स’ तिला पाठिंबा देताहेत, तर “सोशल मीडिया’वर “ट्रोल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही भक्‍तांनी तिच्यावर हल्ले सुरू केले आहेत. जिनं जन्मदाते वडील देशासाठी लढताना गमावलेत, तिलाही देशभक्‍ती शिकवण्याचा फालतू प्रकार सुरू आहे. “तुझे वडील शहीद झालेत, तू तर नाही ना’, असं विचारून तिच्या वडिलांच्या हौतात्म्याचा अपमान केला जातोय. तिच्यासारख्या अन्य मुलींच्या चारित्र्यावर जाहीरपणे शिंतोडे उडवले जात आहेत. डाव्या, उजव्या, मध्यममार्गी वगैरे कसल्या कसल्या विचारांशी ज्यांचा काहीही संबंध नाही, अशा निरपराध व सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बाजूने आता समाजातले मान्यवरही उभे राहताहेत. जे विरोधात बोलतील त्यांना मिथ्या राष्ट्रवाद अंगात आलेली मंडळी देशद्रोही ठरवताहेत. त्यावर, मध्य प्रदेशात भाजपच्या “आयटी सेल’चा कार्यकर्ता “आयएसआय’शी संबंधित निघाल्याबद्दल अभाविप का काही बोलत नाही, असा प्रश्‍न विचारला जातोय.
बलात्काराच्या धमक्‍यांमध्ये कसला आलाय राष्ट्रवाद?
“तुमची कसली विचारांची लढाई वगैरे असेल ती तुम्ही जरूर लढा; पण, निरपराध विद्यार्थ्यांवर हल्ले करून, मुलींच्या अंगावर हात टाकून कसले शौर्य गाजवताय’, असे प्रश्‍न उपस्थित करीत “सोशल मीडिया’वर ही चळवळ सुरू झालीय. “आपण अमक्‍या विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत अन्‌ एबीव्हीपीला घाबरत नाही’, असं लिहिलेले अनेक फलक “फेसबुक’च्या “डीपी’वर झळकताहेत. स्वत: गुरमेहर कौर हिने तर “”बलात्काराचा धमक्‍या, दगडफेक हा तुमचा राष्ट्रवाद असेल, माझा नाही”, अशा शब्दांत विद्यार्थी नेत्यांच्या वेषातल्या गुंडांना सुनावलंय.
“राजकीय पक्षांशी संलग्न विद्यार्थी संघटनांनी निर्माण केलेल्या दहशतवादाचे वातावरण थांबवायचे असेल तर धाडस करा, पुढे या व बिनधास्त बोला’, असं आवाहन तिनं देशभरातल्या विद्यार्थ्यांना केलंय. “”द स्टोन्स यू पेल्ट हिट अवर बॉडीज, बट फेल टू ब्रूज अवर आयडियाज”, हा तिचा निर्धार अन्‌ सर्वांत महत्त्वाचं म्हणजे “”नो लेफ्ट, राइट, सेंटर, स्टुडंट्‌स अगेन्स्ट एबीव्हीपी”, हे घोषणावजा वाक्‍य बरंच काही सांगून जाणारं आहे.
– श्रीमंत माने, संपादक, दैनिक सकाळ, नाशिक अवृत्ती
सौजन्य – दै. सकाळ