Home > गोष्ट पैशांची > ‘निर्लेप’ आणि ‘बजाज’च्या निमित्ताने...

‘निर्लेप’ आणि ‘बजाज’च्या निमित्ताने...

‘निर्लेप’ आणि ‘बजाज’च्या निमित्ताने...
X

‘निर्लेप’चे 80 टक्के शेअर्स ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’ला विकले जात असल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली. अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. एका मराठी ब्रँडचा अस्त, वगैरे शब्दप्रयोगही कानावर आले. यातील ममत्वाची भावना तेवढीच महत्त्वाची होती. या पार्श्वभूमीवर ‘बजाज’शी हातमिळवणीचा ‘निर्लेप’चा निर्णय महत्त्वाचा म्हणावा असाच आहे. एक तर हा भारतीय ब्रँड आहे. घरोघरी पोहोचलेला आहे आणि केवळ ‘किचन अप्लायन्सेस’मध्ये काम न करता घराला लागणार्‍या सर्व प्रकारच्या उपकरणांमध्ये काम करणारा आहे. पंखे, गॅस शेगड्या, ओव्हन, मिक्सरपासून बल्ब - ट्यूबपर्यंत अनेक उत्पादने या उद्योगाने भारतभर रुजविली आहेत. त्यांच्या याच बळाचा वापर ‘निर्लेप’चा ब्रँड अधिक ताकदीने वाढण्यासाठी होणार आहे. मुळात ‘निर्लेप’ हा ‘बजाज’चा स्पर्धक ब्रँड नव्हता. त्यामुळे मार्केटमध्ये अतिशय चांगले गुडविल असलेला नवा ब्रँड मिळवून ‘बजाज’ने नव्या मार्केटची पायाभरणी केली आहे, असेच म्हणावे लागेल. हा ब्रँड अधिक ताकदीने विस्तारण्याची क्षमता त्यांच्यात आहे, त्यामुळे हा ब्रँड केवळ जिवंतच राहणार नाही तर खूप मोठा होईल याची शाश्वती नक्कीच आहे. या कंपनीचा ‘मार्केट अ‍ॅक्सेस’ निर्लेपपेक्षा मोठा असल्याने त्यांचा फायदा या ब्रँडच्या विस्तारासाठीच होणार आहे. भारतातील ‘नॉनस्टिक’चे मार्केट साधारण 400 कोटी रुपयांचे आहे. निर्लेपची आजची विक्री 50 कोटींची असली तरी त्याचे ‘मार्केट व्हॅल्यूएशन’ 90 कोटींचे आहे. त्या आधारावर विचार केला तर चार वर्षांपूर्वीची 100 कोटींची निर्लेपची उलाढाल ताज्या आर्थिक वर्षात 50 कोटींवर आली असली तरी आजही निर्लेपकडे सुमारे 25 टक्क्यांचा मार्केट शेअर आहेच. भारतीय बाजारपेठेत आजही कुठल्याही ‘नॉनस्टिक’ला ‘निर्लेप’ म्हणूनच ओळखले जाते... ही या ब्रँडची खरी ताकद आहे. त्याचा उपयोग ‘बजाज’ला करून घेता येणार आहे...

साधारण फेब्रुवारीतील गोष्ट. माझ्या ‘गोईंग ग्लोकल’मधील लेखासाठी मी भोगले उद्योगसमूहाचे अध्यर्यू श्री. रामचंद्र भोगले यांच्याशी चर्चा करीत होतो. चर्चा या उद्योगसमूहातील अन्य उद्योगांबरोबरच ‘निर्लेप’बद्दलही सुरू होती. या आधीही, 2005-06 मध्ये माझ्या ‘झेप’च्या तयारीच्या वेळी ‘निर्लेप’ची संपूर्ण वाटचाल मी शब्दबद्ध केली होती. पण या वेळी चर्चा करताना काहीतरी ‘मिसिंग’ वाटत होते. पाठोपाठ, मे मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत ‘निर्लेप’चा सुवर्णमहोत्सव साजरा झाला, तेव्हाही त्या आनंदोत्सवात सहभागी होताना पाचेक वर्षांपूर्वी साजर्‍या झालेल्या भोगले परिवाराच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीच्या आणि त्याच वेळी मराठवाड्याच्या औद्योगिकरणाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याची आठवण मनात ताजी होती. हा सोहळा ‘निर्लेप’चा ‘निरोप समारंभ’ असावा, अशी शंकाही मनात आली नव्हती, पण काहीतरी वेगळे घडते आहे याची जाणीव अंतर्मन देत होते.

काल सर्वत्र ‘निर्लेप’चे समभाग ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’कडे जात असल्याची बातमी वाचली आणि माझ्याच अंतर्मनाला साक्षी ठेवत मी स्मृतींचे सारे जुने तुकडे जोडू लागलो. मी आणि सारा मराठवाडाच भोगले परिवाराकडे आदर्श उद्योजक म्हणून पाहतो. त्यांची वाटचाल, त्यांचे निर्णय, व्यवहारातील पारदर्शकतेचा - सचोटीचा आग्रह, काळाप्रमाणे त्यांनी केलेले व्यवसायाचे डायव्हर्सिफिकेशन या सार्‍याच गोष्टी अभ्यासण्याजोग्या आहेत. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मिळविलेला मान आणि विश्वासार्हता देवदुर्लभ आहे. या पार्श्वभूमीवर ‘परिवाराची ओळख’ असलेल्या उद्योगातून 80 टक्के समभाग अन्य उद्योगाला विकणे ही गोष्ट धक्कादायक पण तरीही काहीशी अपेक्षित वाटावी अशीच ठरली.

या निर्णयाकडे मी थोडा वेगळ्या नजरेतून पाहतो. आपल्या घरात कुपोषित होत असलेल्या मुलाला मरणासन्न सोडायचे की संपन्न घरात दत्तक देऊन त्याच्या भरभराटीत आनंद मानायचा, हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा प्रश्न असतो. उद्योगाच्या बाबतीत हा संदर्भ आणखी वेगळा असतो. विशेषतः मेंदूपेक्षा हृदयाच्या आदेशानुसार चालणार्‍या मराठी उद्योजकांच्या बाबतीत तर तो खूपच वेगळा असतो. पण अशा कुठल्याही भावनिक गुंत्यात न अडकता भोगले परिवाराने घेतलेला ही निर्णय मला त्यामुळेच दिशादर्शक वाटतो. भोगले आणि निर्लेप हे अद्वैत आहे. अशा स्थितीत हा निर्णय घेताना हे लोक कोणत्या मानसिक संघर्षातून गेले असावेत, याची कल्पना आपण कदाचित करू शकणार नाही. पण हा निर्णय ‘निर्लेप’च्या भरभराटीसाठी अतिशय पूरक ठरू शकेल, असे मात्र निश्चितपणे सांगता येईल.

बरोबर 50 वर्षांपूर्वी रुजुवात झालेल्या ‘निर्लेप’वरील मालकी ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’कडे पुढील 2 वर्षांत टप्प्याटप्प्याने हस्तांतरीत होत आहे. ढोबळ विचार करायचा तर ‘निर्लेप’चे 80 टक्के शेअर्स ‘बजाज’ने विकत घेतलेले आहेत. 20 टक्के शेअर्स भोगले परिवाराकडे आहेत. ‘बजाज’ची उलाढाल साधारण 3 हजार 800 कोटींची आहे तर ‘निर्लेप’ साधारण 100 कोटी रुपये उलाढालीची कंपनी आहे. अर्थात मागील 3 वर्षांत उलाढालीचा हा आकडा उतरता आहे. ही कंपनी हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया साधारणपणे पुढील 2 वर्षे चालणार आहे. या काळात सध्या या कंपनीची जबाबदारी सांभाळणारे श्री. मुकुंद भोगले हेच कंपनीचे कामकाज सांभाळतील. पुढे गरजेप्रमाणे उर्वरित 20 टक्के शेअर्सबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

‘एका मराठी उद्योगाचा अस्त’ वगैरे चर्चा काही ठिकाणी रंगते आहे. मला या चर्चेत फारसा अर्थ वाटत नाही. औद्योगिकरणाच्या प्रक्रियेत तो उद्योग जिवंत राहणे, त्यांचे मार्केटमधील अस्तित्व वर्धिष्णु असणे आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांचे रोजगार सुरक्षित राहणे महत्त्वाचे ठरते. मागील तीन ते चार वर्षे सातत्याने घसरता आलेख असणार्‍या उद्योगाला प्रतिष्ठेचा विषय करत बुडविण्याऐवजी गुंतवणुकीची योग्य संधी शोधत तो ब्रँड जिवंत ठेवण्याचा व्यावसायिक विचार गरजेचा होता. श्री. राम भोगले यांच्या नेतृत्वाखालील या उद्योगसमूहाने तोच विचार केला आणि भोंगळ मराठी मानसिकतेत न अडकता संपूर्णतः व्यावहारिक विचार करीत त्यांनी परिस्थितीवर मार्ग काढला.

यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘भोगले ग्रुप’मध्ये ‘निर्लेप अप्लायन्सेस’वगळता इतर कंपन्यांची मिळून उलाढाल ‘निर्लेप’च्या किमान 10 पट आहे. म्हणजेच, सुमारे 600 कोटींची उलाढाल नोंदविणार्‍या उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नुकसानीत जाऊ लागलेल्या उद्योगाबाबत भोगले परिवाराने परिस्थितीसापेक्ष व्यावहारिक विचार केला आणि एक उद्योग जिवंत ठेवण्यात यश मिळविले.

ही आव्हाने नेमकी कोणती? श्री. राम भोगले यांनी या बाबत 3 मुद्दे स्पष्ट केले.

1) ‘निर्लेप’ज्या विषयात काम करते आहे त्या क्षेत्रात मागील 5 ते 6 वर्षांत अनेक मोठे उद्योग आले. त्यांची गुंतवणूक हजार कोटींपेक्षा अधिक आहे. अशा कंपन्यांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तशाच सक्षम कंपनीशी युती करणे गरजेचे होते.

2) चिनी बाजारपेठेच्या आव्हानांची चर्चा आपण ऐकत असतो. भारतातील काही उत्पादक तिकडून अत्यंत कमी किमतीत ही सामुग्री बनवून आणून भारतात विकत आहेत. त्याला तोंड देण्याची ताकद मिळवायची तर तुमच्यात मोठी गुंतवणूक क्षमता हवी. ती ‘निर्लेप’मध्ये नव्हती.

3) भोगले परिवारातील तिसरी पिढी या उत्पादनात फारसा रस घेण्यास उत्सुक नव्हती. त्यांनी आपले संपूर्ण लक्ष ‘एआयटीजी’अंतर्गत उद्योगांवर केंद्रित केले आहे.

मागील दोन वर्षांत कंपनीची स्थिती अधिक बिकट झाली त्याला परदेशातील उत्पादनांचा बाजारपेठेतील मोठा व तुलनेत स्वस्तात उत्पादने देण्याचा विषय जसा कारणीभूत होता तसाच व्यापारी वर्गाच्या ‘जीएसटी’नंतरच्या अडचणींचा विषयही कारणीभूत ठरला. अर्थात ‘जीएसटी’चा विषय तात्कालीक होता आणि त्या धक्क्यातून हा उद्योग सावरत होताच. पण परकीय आव्हान पेलणे अवघड दिसत होते. मागील 5 वर्षे यावर विचारमंथन सुरू होते. त्यातून पूर्णतः भारतीय कंपनीलाच हा ब्रँड हस्तांतरीत करण्याचा निर्णय भोगले परिवाराने घेतला. हा व्यवहार पार पडलेला असला तरी हा उद्योग, यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ औरंगाबादेतच राहणार आहे.

चांगले मूल्य पदरात पाडून घेण्यासाठी कुठल्याही बहुराष्ट्रीय कंपनीला आपले समभाग विकण्याऐवजी ‘निर्लेप’ने घेतलेला ‘बजाज’शी हातमिळवणीचा निर्णय महत्त्वाचा म्हणावा असाच आहे. एक तर हा पूर्णतः भारतीय ब्रँड आहे. घरोघरी पोहोचलेला आहे आणि केवळ ‘किचन अप्लायन्सेस’मध्ये काम न करता घराला लागणार्‍या सर्व प्रकारच्या उपकरणांमध्ये काम करणारा आहे. पंखे, गॅस शेगड्या, ओव्हन, मिक्सरपासून बल्ब - ट्यूबपर्यंत अनेक उत्पादने या उद्योगाने भारतभर रुजविली आहेत. त्यांच्या याच बळाचा वापर ‘निर्लेप’चा ब्रँड अधिक ताकदीने वाढण्यासाठी होणार आहे.

मुळात ‘निर्लेप’ हा ‘बजाज’चा स्पर्धक ब्रँड नव्हता. त्यामुळे मार्केटमध्ये अतिशय चांगले गुडविल असलेला नवा ब्रँड मिळवून ‘बजाज’ने नव्या मार्केटची पायाभरणी केली आहे, असेच म्हणावे लागेल. हा ब्रँड अधिक ताकदीने विस्तारण्याची क्षमता त्यांच्यात आहे, त्यामुळे हा ब्रँड केवळ जिवंतच राहणार नाही तर खूप मोठा होईल याची शाश्वती नक्कीच आहे. या कंपनीचा ‘मार्केट अ‍ॅक्सेस’ निर्लेपपेक्षा मोठा असल्याने त्यांचा फायदा या ब्रँडच्या विस्तारासाठीच होणार आहे. भारतातील ‘नॉनस्टिक’चे मार्केट साधारण 400 कोटी रुपयांचे आहे. निर्लेपची आजची विक्री 50 कोटींची असली तरी त्याचे ‘मार्केट व्हॅल्यूएशन’ 90 कोटींचे आहे. त्या आधारावर विचार केला तर चार वर्षांपूर्वीची 100 कोटींची निर्लेपची उलाढाल ताज्या आर्थिक वर्षात 50 कोटींवर आली असली तरी आजही निर्लेपकडे सुमारे 25 टक्क्यांचा मार्केट शेअर आहेच. भारतीय बाजारपेठेत आजही कुठल्याही ‘नॉनस्टिक’ला ‘निर्लेप’ म्हणूनच ओळखले जाते... ही या ब्रँडची खरी ताकद आहे. त्याचा उपयोग ‘बजाज’ला करून घेता येणार आहे.

या पार्श्वभूमीवर ‘भोगले परिवारा’चे पुढे काय होणार, याची चिंता अनेकांना लागली आहे! अर्थात यातील कुणीही या उद्योगसमूहाला जवळून ओळखत नाही, त्यांना या उद्योगविश्वाचा विस्तार माहिती नाही पण मराठी उद्योजकांविषयीच्या ममत्वातून त्यांना ही चिंता लागली असावी, हे स्पष्ट आहे. वरच नमूद केल्याप्रमाणे हा ग्रुप आज सुमारे 600 कोटी रुपयांची उलाढाल करतो. ‘भोगले ग्रुप’ म्हणून ओळखता येईल अशा सात कंपन्या आज कार्यरत आहेत. ‘ड्युरावेअर प्रा. लि.’ आणि ‘सिल्व्हरलाईट प्रा. लि.’ या दोन नावांनी सुरू असलेले काम आता एकत्रितपणे ‘निर्लेप अप्लायन्सेस प्रा. लि.’ या नावाने सुरू झाले आहे. त्याच बरोबर ‘उमासन्स स्टील फॅब प्रा. लि.’ ‘भोगले कोटिंग्ज अँड पेन्टस् प्रा. लि,’ अशा कंपन्या ‘निर्लेप ग्रुप’मध्ये काम करतात, तर ‘मराठवाडा ऑटो कॉम्पो’, ‘उमासन्स ऑटो काम्पो’, ‘भोगले ऑटोमोटिव्ह प्रा. लि.’ या ऑटोमोटिव्ह आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील कंपन्या ‘एआयटीजी’च्या छत्राखाली एकत्र आल्या आहेत. त्यामध्ये विविध ऑटोमोबाईल कंपन्यांना कौशल्यपूर्ण व दर्जेदार सुटे भाग बनवून देण्यापासून ‘ओरोबोरस’ हा स्वतःचा सायकल ब्रँड आणि बॅटरी संचालित विविध कृषिपूरक उत्पादने ही निकट भविष्यातील या ग्रुपची प्रमुख बलस्थाने ठरणार आहेत.

थोडे विस्ताराने सांगायचे तर 2016 मधील एक प्रसंग सांगता येईल. सन 2016 च्या डिसेंबरमध्ये औरंगाबादेत एका कृषि प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला. एक एक स्टॉल पाहत पुढे जात असताना एका स्टॉलवर श्री. राम भोगले त्यांच्या सहकार्‍यांसह दिसले. त्यांची ओळख ‘निर्लेप’ अशी, पण या वेळी सर्वांच्या शर्टवर ‘एआयटीजी’चा लोगो... मी उत्सुकतेने तिकडे खेचला गेलो तर स्टॉलवर वेगळेच उत्पादन. माहिती घेतली तेव्हा लक्षात आले की ते ‘कापूस वेचणी यंत्र’ आहे...! श्री. भोगले म्हणाले - ‘हे आमचे नवे प्रॉडक्ट’.

कपाशी वेचणीत शेतकर्‍यांना होत असलेल्या त्रासाबद्दल ऐकून होतो. आजकाल शेतीत मजूरच मिळत नाहीत, ही परिस्थिती आहे. शिवाय, कपाशी वेचताना कडक बोंडामुळे बोटे रक्ताळतात, ही मजुरांची तक्रार जुनीच आहे. हे काम सहजतेने होण्यासाठी त्यांनी केलेले हे सुंदर संशोधन...! ‘श्रीजय 380 कापूस वेचणी यंत्र’ या नावाने 2018 मध्ये ते बाजारातही आले आहे. जेमतेम 1100 ग्रॅम वजनाचे, केवळ 12 व्होल्ट डीसीवर चालणारे हे छोटेखानी यंत्र एका छोट्या बॅटरीवर चालते. कापूस बोंडातून अलगद बाहेर ओढला जातो, तो या यंत्रातून मागे खेचला जातो. पाठीवर लावलेल्या पिशवीत तो जमा होत राहतो. पिशवी भरली की मोकळी करायची, काम पुढे चालू. एकदा बॅटरी चार्ज केली की 7 ते 8 तास काम चालू राहते. कुणी डोकेबाज शेतकरी असेल तर तो सोलर पॅनल लावूनही काम करू शकेल...! 8 तासांत एक यंत्र 60 ते 80 किलो कापूस वेचू शकते. महत्त्वाचे म्हणजे त्यात इतर पालापाचोळा खेचला जात नाही. कापूस स्वच्छ राहतो. जेमतेम 6 ते 7 हजारांत हे यंत्र त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. मग माहिती मिळविण्याचा माझा प्रयत्न सुरू झाला. ‘अप्लाईड इनोव्हेशन टेक्नॉॅलोजी ग्रुप’च्या (एआयटीजी) अंतर्गत ‘उमासन्स ऑटो कॉम्पो’ची ही निर्मिती. ऑटो कॉम्पोनंट क्षेत्रातील कामे करत असतानाच संशोधनात्मक उत्पादनांची निर्मिती करून स्वतःचे ब्रँड प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ‘एआयटीजी’ची स्थापना झाली.

श्री. राम भोगले सांगतात, “इंजिनिअरिंग उत्पादनात आम्ही अन्य उद्योगांना गुणवत्तापूर्ण उत्पादने पुरवीत आमचे वैशिष्ट्य जपले. पण त्याशिवाय थेट समाजापर्यंत पोहोचणारे इंजिनिअरिंग उत्पादन असले पाहिजे, या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू होते. त्यातूनच ‘कापूस वेचणी यंत्रा’ची निर्मिती झाली. आमच्या नव्या नावातच ‘इनोव्हेशन’ला ‘अप्लाईड’ या विशेषणाची जोड दिलेली आहे. या क्षेत्रात आम्हाला फक्त इनोव्हेशन सिद्ध करायचे नाही तर त्याची उपयोजितता, उपयुक्तताही प्रत्यक्षात उतरवायची आहे. त्या दृष्टीने हे उत्पादन आम्ही भारतात प्रथमच आणले...

“नवी दिशा ठरवताना आम्ही शेतीचा विचार डोळ्यांसमोर ठळकपणे ठेवलेला आहे. कृषिप्रधान मानल्या जाणार्‍या भारतात शेतीसमोर आज असलेली आव्हाने सोडविण्यात आम्ही आमचे योगदान दिलेच पाहिजे, या विचारातून आम्ही ही उत्पादने आणत आहोत. कापसाची वेचणी ही शेतकर्‍यांसमोर मोठी समस्या असते. ती सोडविण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वीपणे केला. आता पुढील काळात शेतकर्‍यांना अत्यंत उपयुक्त ठरेल असे जमिनीचा पोत मोजणारे वेगळे यंत्र आम्ही बाजारपेठेत आणत आहोत. जमिनीतील ओल, त्यातील सामू (पीएच), त्यातील इतर घटक मोजणारे आणि त्याची आकडेवारी तात्काळ देणारे हे यंत्र शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल, असे आमचे भाकित आहे. त्या आधारावर पिकांना पाणी, खते व अन्य पूरक द्रव्ये कधी, कशी व केव्हा द्यायची हे ठरविणे शेतकर्‍याला सोपे जाईल. त्याची इतरांवरील अवलंबिता कमी होईल आणि तो वेगाने प्रगती करू शकेल असे आम्हाला अपेक्षित आहे...

“शेतकर्‍यांसाठीच आम्ही आणखी एका यंत्राची निर्मिती करीत आहोत. हे स्वयंचलित ‘ट्रिमिंग मशीन’ आहे. विशेषतः फळशेतीच्या क्षेत्रात, म्हणजे डाळिंब अथवा संत्र्यांच्या बागांमध्ये वा अशा प्रकारच्या अन्य शेतींमध्ये हे यंत्र उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येक मोसमाआधी अशा रोपांची छाटणी करणे गरजेचे असते. ही एक किचकट आणि कौशल्यपूर्ण प्रक्रिया असते. हाताने छाटणीत बर्‍याचदा एकसमानता नसते अथवा रोपांच्या फांद्या नीटपणे कापल्या जात नाहीत. रोपांची साल सोलवटली गेली किंवा त्यात योग्य प्रकारे छाटणी झाली नाही तर तेथे बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि फळबाग धोक्यात येते. हे सारे या यंत्रामुळे टळते आणि नेमकेपणाने छाटणी होऊन शेतकर्‍यांना त्याचा फायदा होतो...

“सन 2012-13 पासून शेतीपूरक उपकरणांवर आमचे संशोधन सुरू झाले आहे. 2015-16 मध्ये आम्ही चाचणीसाठीची यंत्रे विकसित केली आणि 2017 च्या उत्तरार्धात कापूस वेचणी यंत्र बाजारात आणले. आता अन्य यंत्रे क्रमाक्रमाने बाजारात येतील. या उत्पादनांच्या डिझाईन-डेव्हलपमेंटसाठी आम्ही ‘आय इन्व्हेंट लॅब्ज’ ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली आहे.”

आंतरराष्ट्रीय क्षेत्रात शंभराहून अधिक वर्षांपासून उभे असलेल्या ‘फॅमिली बिझनेस’च्या यशकथा आपण वाचतो. भारतात त्या तुलनेत शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ टिकलेल्या उद्योगांची संख्या बरीच कमी. या पार्श्वभूमीवर ‘भोगलें’सारख्या उद्योजकीय कुटुंबाची काळानुरूप स्वतःत बदल घडवून सातत्यपूर्ण प्रगतीच्या पथावरील घोडदौड भारतीय मनाला नक्कीच समाधान देणारी असते. या परिवाराचे वैशिष्ट्य असे की तो केवळ उद्योगात रमला नाही आणि पैशाभोवती फिरला नाही. त्यांनी सामाजिक भान राखले.

आजही औरंगाबादच्या उद्योगजगताचा आणि समाजविश्वाचा निर्विवाद चेहरा म्हणून भोगले परिवाराला, या परिवाराचे प्रमुख म्हणून श्री. राम भोगले यांना समाजमान्यता आहे. हे लक्षणीय आहे. उद्योगविश्वातील मंदी, व्यावसायिक आव्हाने यांना तोंड देत हा समतोल राखणे ही कसोटीच असते. ती हा परिवार मागील अर्धशतकापासून पार करीत आला आहे.

प्रसंगपरत्वे, भावनेच्या गुंत्यात न अडकता योग्य वेळी योग्य निर्णय घेत जुन्या वाटा बदलत नव्या वाटा शोधणे हे खर्‍या उद्योजकाचे लक्षण असते. भोगले परिवार हेच करतो आहे. नव्या वाटा शोधताना, नवी, अभिनव, समाजाभिमुख उत्पादने बाजारपेठेत आणताना नजिक भविष्यात हा ग्रुप आणखी काही मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवणार आहे, मोठ्या सहकार्यातून मोठी उलाढाल मराठवाड्यात होणार आहे, हे माझे निरीक्षण.

या ग्रुपच्या वाटचालीला शुभेच्छा.

- दत्ता जोशी, औरंगाबाद

Updated : 17 Jun 2018 10:46 AM GMT
Next Story
Share it
Top