निखिल वागळेंना अंकुश काकडेंचे उत्तर

1515

श्री शरदराव पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आणि आमचे मित्र जेष्ठ पत्रकार श्री निखिल वागळे यांनी त्यांचे ब्लॉग वर त्यांचे मत व्यक्त केले त्यांना का दुःख झाले हे समजू शकले नाही.

‘पद्मविभूषण पवारांचं काय करायचं?’हा आपला लेख वाचनात आला. मागे एकदा वाट्स अप वर विषाणूग्रस्त (viral) झालेली आडीओ क्लीप ऐकण्यात आली होती. प्रबोधनकारांच्या लेखणी इतकाच आपल्या वाणीने पलीकडील प्रतिगामी व्यक्तीचा समाचार घेतला होता. आपला दांभीकवृत्तीवरील राग,त्वेष मला भावला होता. आपणास बद्धकोष्ठता अथवा अतिसाराचा त्रास आजवर मला कधीही जाणवला नाही परंतू आपले पित्त मात्र त्यावेळी खवळले होते. आपण बेधडक सरळ बोलणाऱ्यांपैकी आहात केवळ कुणाविषयी बदनामीची अथवा नकारात्मकतेची गरळ ओकणारे नाहीत हे मी जाणतो. आपण पवारांचे विरोधक निश्चीत नाहीत तर चिकित्सक आहात हे ही मानतो. आपण पवारांविषयी तटस्थपणे लेख लिहिलात. नव्हे तसेच लिहावयास हवे .कारण पवारांनी जर वाचले तर ते ही वैयक्तीक न घेता तितक्याच तटस्थपणे लेखाकडे पाहतील व खरंच कुठे दुरूस्तीची आवश्यकता आहे का याचा विचार करतील. कारण दूसऱ्याला शहाणपण शिकवण्यापेक्षा सतत शिकत राहणे हा त्यांचा स्थायीभाव आहे.

पद्म पुरस्कारांविषयी आपणास तिटकरा आहे. कारण पुरस्कारांनी सन्मानीत झालेले सर्वच सन्मानयोग्य असतातच असे नाही. पण पुरस्कारांचं आपणाप्रमाणे पवारांना अप्रुप नाही, तशी धडपड त्यांनी कधीही केली नाही हे आपणास खाजगीत मान्य करावे लागेल. मोदी जरी वक्तव्यात पवारांना गुरूस्थानी मानत असले अथवा पवारांचा सल्ला घेत असल्याचे उघडपणे (संघाची भिडभाड न बाळगता !)म्हणत असले तरी त्यात मोदींची मुत्सद्देगीरी की पवारांविषयी आदरभाव याची शहानिशा जाणकारांनी करावयास हवी. गौतम अदानींची मोदींशी ओळख पवारांनी करून दिली असं आपण म्हणालात. पण आम्हा अडाण्यांना प्रश्न पडतो की, गौतम अदानींना मोदींशी जवळीक साधण्यासाठी जवळचा रस्ता सोडून अहमदाबादहून मुंबई-बारामतीचा मार्ग पत्करावा लागला ? अदानींचं कार्यक्षेत्र प्रामुख्याने गुजरात असेल तर मोदी मुख्यंमंत्री असताना त्यांची थेट ग्रेट-भेट झाली असेलच की. ज्यांचा १३ दिवसांचे वाजपेयी सरकार पाडण्यात हात होता त्यांचीच नेमणूक वाजपेयींनी आपद्ग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी केली याचे विश्लेषण कसे कराल ? राजकारणाबाहेर जाऊन मैत्री जपण्याची हातोटी आणि सत्तेत असताना विरोधकांची देखील कामे करण्याची पवारांची दिलदार वृत्ती हे कारण सांगीतलं तर त्याला आपण पवारांचा स्तुतीपाठ म्हणू नये. पवार स्टेट्समन असल्यानं पद्मविभूषणानं त्यांचा सन्मान झाला असं म्हणणं वावगं ठरू नये. नशीब ! तारीक अन्वरांना एखादे पद्म मिळाले नाही अन्यथा ही गुरूदक्षिणा नसून पवार,संगमा आणि अन्वरांनी काँग्रेस फोडल्याचं बक्षीस आहे असा जावईशोध जाणकारांनी लावला असता.

पवारांच्या सार्वजनिक जीवनातील पन्नाशीला व शेतकऱ्यांविषयी केलेल्या कामाबद्दल हा पुरस्कार देण्यात आल्याचं समर्थक सांगताहेत यात वस्तुस्थिती नाही का ? इथे आपला तटस्थपणा घरंगळतो असे मला वाटते.  महाराष्ट्राची पुरती वाट लागली असं काहीतरी वैषम्य आपल्या लिखाणातून जाणवतं. उत्तरेतील सुजलाम-सुफलाम राज्यांपेक्षा दगडा-कुसळांचा महाराष्ट्र कितीतरी पुढे आहे आणि पवारांच्या काळात होता त्यामुळे इतक्या लवकर आशावाद करपून देऊ नका.

पवारांच्या कर्तृत्वाला मर्यादा पडण्याची अनेक कारणं देता येतील. आपले राज्य खरेच पुरोगामी राज्य आहे. दक्षिणे सारख्या नट-नट्यांच्या लाटा येथे आल्या नाहीत. उत्तरेसारखी बाहूबली प्रथा , बंगालसारखी साम्यवादी व गैरसाम्यवाद्यांची कडवी व टोकाची राजकीय शत्रूता येथे नाही. पवारांनी पश्चीम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र ,बराचसा कोकण प्रभावक्षेत्राखाली आणला मात्र मुंबईवरील बाळासाहेबांची पकड आणि विदर्भात इंदिरा गांधीना मानणारी मतदारांची संस्कृती ह्या गोष्टी कारणीभूत आहेत. पवारांनी राजीव गांधींच्या हत्तेनंतर दिल्लीकडे मोर्चा वळवला नसता तर चित्र वेगळे दिसले असते. खरे तर पवारांच्या दिल्ली जाण्यानं महाराष्ट्राचं  नुकसान झालं. महाराष्ट्रात राहून जातीय वा प्रांतीक अस्मीतेच्या नावाखाली तसेच त्यांना आपली बाजू अधिक भक्कम करता आली असती. काँग्रेसचा देशावरील एकछत्री अंमल कमी होत चालला आणि प्रादेशिक पक्षांची सद्दी वाढली. त्या जोरावर माया, ममता, जया अनेकांना तेथील जनतेने बहूमताने सत्तेत आणलं पण पवारांना  दिल्ली खुणावत राहिली.

इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर काँग्रेस पक्षात दिल्लीतील हायकमांडला कुर्नीसात घालण्यात धन्यता मानणारी पुढारीमंडळी जनमाणसापासून दूरावत गेली आणि विदर्भ भाजपाकडे गडकरी-फडणवीसांमुळे हळूहळू ओढला गेला हे नाकारत नाही. इंदिरा व राजीव गांधीच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली पोकळी भरण्याकरीता पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ताकदीची नेतृत्वफळी उभी राहिली नाही या उलट मोजक्या नेत्यांतली दूफळी राष्ट्रवादीला दुबळी करत गेली हे ही मान्य करावे लागेल.

आपण  हितेंद्र ठाकूर-पप्पू कलानी,दाऊद प्रकरणाचा विस्ताराने उहापोह केला. पण गो.रा.खैरनारांना ट्रकभर काय पण टीचभर पुरावा देता आला नाही याने तरी लांछन पुसावयास हवं. १९९३ च्या मुंबई बाँम्बस्फोटात याच दाऊदच्या हस्तकांचा हात होता व त्यांचा छडा लावण्याचं काम पवार मुख्यमंत्री असतानाच झालं. दिल्लीच्या विज्ञानभवनात पवारांच्या पंचाहत्तरीचा जो सत्कार समारंभ झाला त्या प्रसंगी दस्तूरखुद्द पंतप्रधानांनी मुंबईतील गुन्हेगारी संपवण्याचं श्रेय पवारांना दिलं. महामहिम राष्ट्रपतींनी सलाम मुंबई -सलाम पवार असं पवारांना गौरवलं. हे उस्फूर्त होतं. त्याचा राजकीय खेळी न समजता राजकारणाच्या पलिकडे जाऊन विचार करायला हवा. आपण लेखात तथाकथीत गुन्हेगारी विश्वाशी असणाऱ्या संबंधावर विस्तारानं लिहिलं मात्र पवारांचे कृषि , महिला , आपत्ती व्यवस्थापन , कामगार , क्रीडा , पर्यटन या क्षेत्रांतील योगदान एक-दोन वाक्यातंच उरकलं.  इथे लेखणीला का लगाम का घातला ते समजलं नाही. मी याला आकस म्हणणार नाही पण  लिखाणात खिलाडूवृत्तीचा अभाव होता असं जरूर म्हणेन.

पवारांना क्रोनी कॅपीटॅलीस्ट म्हटलं जातं तर त्यांच्या अंबानी-अदानी आणि मल्यांसारख्यांशी संबंध असण्यानं. पवारांचे अंबानींशी मधूर संबंध असण्याची माहितीच निराधार आहे. माध्यमांतून चर्चीले जाणाऱ्या अथवा बदनाम उद्योगपतींशी असणारे पवारांचे सख्य यावर प्रकाश टाकताना सायरस पुनावाला सारखा नावाजलेला उद्योगपती पवारांचा सर्वाधिक जवळचा आहे याकडे मात्र जाणकार कानाडोळा करतात. उद्योग जगतास दररोज स्पर्धा करावी लागते. धोका पत्करून मोठमोठे निर्णय घ्यावे लागतात. यात चुकीला माफी नसते. त्यांनी नफा कमविला तर तो आपत्तीच्या काळात कुशनींगचे काम करतो. त्यामुळे ‘उद्योग जगला तर कामगार जगेल’ असे व्यवहार्य धोरण पवार अवलंबत आले आहेत.  दत्ता सामंताच्या दूराग्रहामुळे मुंबईतल्या गिरण्या बंद पडल्या, पश्चिम बंगालात डाव्यांनी उद्योगपतींना कायम शोषक मानलं परिणामी  कामगारांच्या मोर्चे-आंदोलंनामुळे उद्योगांना पोषक वातावरण राहिलं नाही. बंगाल  बकाल आणि कंगाल बनला. पवारांना उद्योजकधार्जीने म्हणताना शेतकरी-शेतमजूर, हमाल-माथाडी कामगार, एसटी कामगार, ऊसतोडणी कामगार यांच्याकरीता घेतलेल्या धोरणांकडे दुर्लक्ष देऊन चालणार नाही. आपण या घटकांशी संवाद साधून  लेखणीतून मांडणी करावयास हवी होती. एकीकडे पवारांवरील मुंबईतील भुखंड घोटाळ्यांचा आक्षेप मांडला. पण सीडको-एम.आय.डी.सी. प्रकल्पात गेलेल्या जमीनधारकांना साडेबारा टक्के पक्का भुखंड देण्याचा धोरणात्मक निर्णय पवारांमुळे झाला याकडे दूर्लक्ष केले. तसेच माथाडींच्या घरांसाठी वाढीव एफ.एस.आय. देणारे ही पवारच पहिले हे ही अवधानाने विसरले. नवीन भुसंपादनाचा कायदा पास झाला त्यात जमीनीच्या किंमतीच्या चौपट मोबदला देण्याचा निर्णय ज्या अधिकारप्राप्त मंत्री समितीने घेतला त्याचे अध्यक्ष शरद पवारच होते हे ही आपण मांडावयास होते.

पवारांच्या बदनामीचं लवासा हे एक हत्यार विरोधकांकडून कायम उपसलं जातं. पवारांनी त्याचा खुलासा आत्मचरित्रात व वेळोवेळी मुलाखतींतून केलेला आहे. विरोधकांनी एक विचार करायला हवा. लवासा हे ठिकाण पुणे-मुंबईच्या दरम्यान नाही. तर ते मुंबईच्या उलट्या दिशेला पुण्यापासून ६० कि.मी. अंतरावर आहे. आज लवासामुळे सह्याद्रीच्या कडयाकपाऱ्यांत लपलेला दूरस्थ-निर्जन प्रदेश नावारूपाला आला. लवासामुळे पुणे ते लवासा दरम्यानच्या जमीनींचे दर वधारले. त्या संपुर्ण भागाचा कायापालट झाला. प्रकल्पात गेलेल्या जमीनींचं म्हणाल तर इतक्या रिमोट ठिकाणी कुणी विकत घेतल्या असत्या का ? हाच प्रश्न पडतो. प्रकल्पसाठी जमीनी विकत घेताना तत्कालीन दर तपासले तर हिंदूस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने पिळवणूक केली नसेल या धारणेला पुष्टी मिळेल.आज उभा राहिलेला प्रकल्प पाहून प्रांरभीक अवस्थेशी सापेक्ष तुलना कशी करता येईल ? अनियमीतता, गैरप्रकाराचे कुणीही समर्थन करणार नाही पण  बऱ्याचदा एवढे मोठे संपादन करताना तपासणी-पर्यवेक्षणात त्रूटी राहू शकतात. एका सातबाऱ्याचा सर्च घ्यायचा झाला तरी फार जिकिरीचे असते. हिंदूस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला देखील बऱ्याच मध्यस्थांवर, सल्लागारांवर अवलंबून राहावे लागले असेल. पवारांनी लवासाच नाही तर मगर पट्टा , बालेवाडी स्टेडीयम , गहूंजे क्रिकेट स्टेडीयम या विकासांच्या माँडेल्सला प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्या भागांचे अर्थकारण बदलले. समृध्दी आली. पण श्रेय- यश दूसऱ्याचं आणि  रोष व दोष पवारांवर  हे न्याय्य आहे का याचा ही विचार झाला पाहिजे.

पवार फारसे देवळात जात नाही, जनता-जनार्दनात ते अधिक रमतात हे आपणास ठाऊक आहे. अंधश्रद्धा, कर्मकांडांचं स्तोम याच्या ते विरोधात आहे हे ही सर्वज्ञात आहे. दाभोळकर – पानसरेंची हत्या पुरोगामी महाराष्ट्रात झाली याचा संताप त्यांनी संभाषणांतून व्यक्त केला आहे. पण सत्तेतून दूर झाल्यानंतर याच प्रतिगामी शक्ती अधिक बळकट झाल्या याचा दोष कुणाला द्याल ? शरद पवारांनी पक्ष सत्तेत आल्यानंतर सत्ता स्वयंकेंद्रीत ठेवली नाही. स्वतः दिल्लीत असताना राज्यातील दैनंदिन कारभारात लक्ष घातले नाही. राज्यातील शिलेदार काम करण्याची मोकळीक दिली. प्रशासकीय बाबतीत , निर्णयप्रक्रियेत कधी ढवळाढवळ केली नाही. केंद्रातील मंत्र्यांच्या बाबतीत ही हेच धोरण ठेवले. विकेंद्रीकरणाच्या तत्वाचे चांगले-वाईट परिणाम झाले असतील पण त्याचा अर्थ पवारांनी वाममार्गाचा अवलंब केला अथवा घोटाळेबाजांना संरक्षण दिले असा होत नाही. आर.आर.पाटलांसारख्या स्वच्छ प्रतिमेच्या नेतृत्वाला पुढे आणणारे देखील पवारच होते. त्या आर.आर.पाटलांनी डान्सबार बंदी, ग्रामस्वच्छता अभियान यासारखे महत्वपुर्ण निर्णय घेतले. आपण याचा उल्लेख न करता त्याकाळात दाभोळकर हत्या झाली याचा दोष मात्र थेट पवारांपर्यंत पोहोचवलात.

इतर पद्म पुरस्कारार्थी सन्मान मिळाल्याबद्दल आनंद साजरा करीत असताना प्रसार माध्यमांनी पवारांना पद्मभुषण पुरस्कार जाहिर झाल्याबाबतचे अभिनंदन न करता त्यांचे  मुल्यमापन (की अवमुल्यन ?) करावयास नको होते. लेख लिहिताना आपले पित्त खवळले नव्हते हे स्पष्ट आहे. पण महाराष्ट्र फार मागे गेल्याची , अगदी भ्रमनिरास झाल्याची नकारात्मक छटा त्या लेखात होती. आपण वेदना प्रकट केलीत पण पवारांनंतर महाराष्ट्राचं काय ? ह्याची चिंता देखील अप्रत्यक्षपणे व्यक्त व्हावयास हवी होती. पण आपले पवारांविषयी भाव ‘नावडतीचे मीठ अळणी’ या उक्ती सारखे असल्याचे  लेखात जाणवले. पवारांच्या कर्तृत्वाची अधून-मधून दखल घेतली म्हणून आपले आभार !  नाहीतर लेख ही काहीसा अळणी वाटला असता.