दलित महिलांची विवस्त्र क्रांती – एक इतिहास

10758

मद्रास हाय कोर्टाने अलीकडेच CBSE बोर्डाच्या ९ वीच्या सोशलसायन्स या विषयाच्या पाठ्यपुस्तकातून “कास्ट, कन्फ्लिक्ट ऍन्ड ड्रेस चेंज” हे प्रकरण हटवण्याचा आदेश दिला आहे.

स्वतःचं शरीर झाकण्याचा नैसर्गिक अधिकार आणि तो मिळवण्यासाठी दलित महिलांनी केलेली क्रांती कोर्टानं या निर्णयातून फेटाळली आहे. त्यातील ऐतिहासिक तथ्य आणि घटनाक्रमांमध्ये विसंगती आणि योग्य पुरावे नसल्याचा आधार कोर्टानं हा निर्णय देतांना घेतला आहे. पण, नेमका इतिहास काय आहे. त्यातील तथ्य काय आहेत याचा घेतलेला हा आढावा

नेमका इतिहास काय ?

या प्रकरणात उल्लेख होता तो एका महिलेचं रक्त उसळवनाऱ्या आणि लाजेने मान खाली घालायला लावणाऱ्या ऐतिहासिक सामाजिक प्रथेचा. त्या प्रथेचा संदर्भ आणि ती प्रथा नष्ट करण्यासाठी झालेल्या असामान्य रक्तरंजित क्रांतीचा इतिहास. जो आज काळाच्या पडद्याआड कुठेतरी गुडूप होण्याच्या माग्रावर आहे.

कर्नाटक ते केरळ या पट्ट्यात साधारण अठराव्या शतकापासून ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत (1719 ते 1949) एका अत्यंत लाजिरवाण्या प्रथेचं प्रचलन होते. या पट्ट्यात इझावा, शानर नादार, थिया या मागासवर्गीय जमाती नायर या तथाकथित उच्चवर्णीयांच्या अधिपत्याखाली शतकानुशतकं गुलामगिरीत राहत होत्या.

या जमातीतील स्त्री आणि पुरुषांना नायर समाजातील तथाकथित उच्चकुलीन राज्यकर्त्या पुरुषांचा आदर-सम्मान म्हणून कमरेवरील शरीराचा भाग निर्वस्त्र ठेवावा लागत असे.

जातीय व्यवस्थेवर आधारित सामाजिक उतरंडीत सर्वात हीन दर्जाची वागणूक मिळत असलेला तसंच लिंगाधारित वर्चस्वाखाली देखील पिचत असलेला सर्वात खालच्या पातळीवरील घटक म्हणजे ‘दलित स्त्री‘.

या स्त्रिया आयुष्यभर तथाकथित उच्चवर्णीय पुरूषांच्या वखवखलेल्या विखारी नजरांना झेलत आपल्या लाजेची लक्तर वेशीवर टांगून मेल्याहून जगत असतं. कमरेवरील शरीर निर्वस्त्र ठेवून त्यांना घराबाहेर निघाव लागत असे. मंदिरांमध्ये जातांना कमरेवरील भाग निर्वस्त्र ठेवण्याची ही प्रथा खरेतर एकजात सर्व महिलांसाठी होती. पण, कथित उच्चवर्णीय पुरुष आपल्या महिलांना सोयीस्करपणे यापासून दूर ठेवीत असत आणि कालांतराने ही प्रथा त्यांनी झुगारून लावली. पण दलित महिलांवर शतकानुशतके या प्रथेमुळे शारीरिक तसेच मानसिक अत्याचार होत राहिले. त्याकाळात तथाकथित  संस्कृती रक्षक ब्राह्मण एका लांब काठीला चाकू बांधून फिरत असत आणि जर कुठली स्त्री पूर्ण वस्त्रांमध्ये दिसली तर तिचे वस्त्र फाडून तिला नग्नावस्थेत झाडाला लटकवत.

राजघराण्यातील पुरुषांच्या शाहीसवारी समोर अर्धनग्नावस्थेत त्यांना रस्त्यांवर उभे राहून फुलांची उधळण करावी लागत असे.

त्याहूनही भयंकर म्हणजे जर नादर स्त्रियांना शरीर झाकायचे असल्यास त्याकरिता “मुलाक्करण“ नामक कर द्यावा लागत असे. “मुलाक्करण कर“  म्हणजे छाती झाकण्यासाठी द्यावयाचा कर . हा कर भरण्याची पद्धत ही अतिशय हिणकस आणि स्त्रियांकरिता लाजिरवाणी होती. जितके मोठे वक्ष तितका जास्त कर आकारण्यात येत असे.

टी. मुरली या चित्रकारानं चितारलेली नांगेलीची शौर्यगाथा

या प्रथेविरुद्ध बंड करणारी केरळातील चेरथला या खेड्यात राहणारी इझवा जमातीतील नांगेली नामक महिलेची कथा ही कथा नव्हे तर हेलावून सोडणारी व्यथा आहे. आजही ही कथा चेरथलाच्या गावकऱ्यांच्या मुखी आहे. ही नांगेली नावाची इझवा जमातीतील महिला संपूर्ण अंग झाकून लोकवस्तीत गेल्यामुळे कर अधिकारी तिला कर देण्याची जबरदस्ती करू लागला. आधीच राज्यकर्त्यांच्या विविध करांमुळे पिचलेली नांगेली आणि तिचा परिवार हा मुलाक्करण कर देण्यास असमर्थ होते. नांगेलीनं आपला विरोध आणि निषेध दर्शवण्यासाठी आपले स्तन कापून त्या अधिकार्यास केळीच्या पानामध्ये अर्पण केलं. अधिकारी घाबरून निघून गेला पण अति रक्तस्त्रावाने नांगेली मरण पावली. शोकाकूल अवस्थेत तिच्या चितेवर तिचा पती आपल्या प्राणप्रिय पत्नी नांगेली सोबत सती गेला. नांगेलीच्या हृदयद्रावक निषेधानंतर  वेगवेगळ्या जमातीतील स्त्रियांमध्ये या प्रथेविरुद्धचा असंतोष आणि क्रोध उफाळून आला. त्याची परिणती म्हणून या प्रथेविरूद्ध नंतरच्या काळात नादर जमातीतील स्त्रियांनी बरीच आंदोलन केली.

इंग्रजांनी कायदा बदलला. पण…

१८०० च्या दरम्यान तिथं इंग्रजांचं वर्चस्व वाढू लागलं. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास छाती झाकण्यास मिळेल असे प्रलोभन देऊन ख्रिस्ती मिशनऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडवले. या प्रथेविरुद्ध आणि एकूणच गुलामी प्रथेबद्दल असंतोष वाढत जाऊन पुढच्या पन्नासेक वर्षात तेथील गुलामी व्यवस्था देखील नष्ट होऊ लागली. ज्यातून उच्चवर्णीय आणि नादर जमातीमध्ये दंगली झाल्या. नादार जमातींची घर जाळली गेली. महिलांवर अत्याचार केले गेले. त्यामुळे पुढे जाऊन या  नादर जमातीनं श्रीलंका आणि तामिळनाडूत स्थलांतर केलं.  काही काळानंतर इंग्रजांकडून दलित महिलांना शरीर झाकण्यास परवानगी मिळाली. या आदेशानुसार दलित महिलांचं वस्त्र सवर्ण महिलांपेक्षा वेगळं असावं म्हणजे त्यांनी पारंपरिक वस्त्र न घालता इंग्रजांच्या ब्लाउज प्रमाणे घालावे असा वाटहुकूम काढण्यात आला.

मतांच राजकारण

हा इतिहास लाजीरवाणा आहे. विशिष्ट सवर्ण जातीची बदनामी करणारा आहे म्हणून तो आजच्या पिढी पासून लपवून ठेवावा का असा खरा प्रश्न आहे. खरे तर याबाबतीत दोन्ही बाजूंकडून अनेक याचिका अनेक वर्षांपासून मद्रास उच्च न्यायालयात प्रलंबित होत्या. मात्र जयललिता सरकार वोटबँकवर लक्ष ठेवून याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत होतं. AIADMK आणि DMK हे दोन्ही राजकीय पक्ष इतिहासातील ही ओंगळ पानं पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. बहुजन स्त्रियांनी उच्चवर्णीयांविरोधात आणि इंग्रजांविरोधात लढलेली ही क्रांतीगाथा भारतीय स्त्रियांचे हक्क आणि अधिकारांच्या लढ्यातील महत्वाचा टप्पा म्हणता येईल.