वैद्यकीय प्रॅक्टीस सुरू करताना…

blog_170117_1

माझ्या लेखणीकरीता हे नवीनच असेल कारण माझ्या लेखणीला फक्त आजार आणि औषधांची नावं लिहीण्याची सवय आहे. असो मी स्वत:ची स्वतंत्र्य प्रॅक्टीस सुरु केली ती अपघातानेच. माझ्या ओळखीचे डॉक्टर झुंजारराव यांच्याकडे एक पेशंट लॅकन लॅननची तक्रार घेऊन आला. तो या आजारासाठी ऍलोपॅथीक आणि लाईट ट्रिटमेंट घेऊन थकलेला होता. त्यांनी मला दुरध्वनी करून ताबडतोब दवाखान्यात येण्यास सांगितले. ते माझं पहिलं प्रिस्क्रिप्शन. त्या रूग्णाला  चांगला गुण आल्यानं 16 दिवसांतच डॉक्टरांनी मला क्लिनीकची किल्ली दिली आणि आजपासून तुझा दवाखाना इथे सुरु कर असे सांगितलं.

त्या दिवशी मी दोन रूग्ण तपासले. मी होमियोपथिची प्रॅक्टीस करत असल्यामुळे मला ब-याच अडचणींचा सामना करावा लागला. मुख्यत: होमियोपथिचा गुण उशिरा येतो हा गैरसमज लोकांच्या मनातून काढणे हे पहिलं आव्हान होतं. दुसरं आव्हान म्हणजे होमियेपथिचे डॉक्टर खूप प्रश्न विचारून भंडावून सोडतात त्याविषयी लोकांना सज्ञान करणं. मला अजूनही आठवत एक रूग्ण माझ्याकडे डोके दुखीची तक्रार घेऊन आला होता. मी आमच्या शास्त्राच्या पद्धतीनुसार त्याला कशा प्रकारच्या वेदना होतात असा प्रश्न केला. तर तो म्हणाला हा काय प्रश्न आहे? जसं सगळ्यांचं डोकं दुखतं तसंच माझं दुखतं. मग त्याला समजावावं लागलं की प्रत्येकाची वेदना वेगगवेगळी असते. ती वेदना वाढण्याची आणि कमी होण्याची कारणं देखील वेगवेगळी असू शकतात. त्या वेदनेचा त्याच्या वागण्याबोलण्यावर पडणारा फरकही वेगवेगळा असू शकतो. उदाहरणच द्यायचं झाल्यास काही जणांना डोक जड झाल्यासारखं वाटतं काहींना ठणकल्यासारख तर काहीचं आवाजानं डोकं दुखतं. काहींना आवाजाने काहीही फरक पडत नाही. काहींना डोकदुखीमुळे चिडचिड होते मग त्याचा राग ते इतरांवर काढतात. काहींना डोकेदुखीमध्ये शांत रहावसं वाटतं. होमियोपथिच्या दृष्टीने तुम्ही तुमच्या वेदना कशा प्रकारे जाणून घेता आणि त्यांना कशाप्रकारे प्रतिक्रिया देता यावर तुमचं औषध ठरतं.

होमिओपॅथी deal with person not with disease or disease pathologically हे आणि उपचारांमुळे रोग मुळासकट नष्ट केला जातो हे लोकांना समजावून सांगणं खूप मोठं आव्हान असतं नव्यानं प्रॅक्टीस सुरू करतांना.

पण जसजसा लोकांना गुण यायला लागला तसंतसं मग इतर जनरल आजारांसाठी सुद्धा लोकं येऊ लागले. उदा सर्दी, खोकला, तीव्र ताप, टॉन्सिल्सला सूज. मग त्यांना जेव्हा 2-3 दिवसांत ठिक झाल्याचा अनुभव येऊ लागला तेव्हा होमियोपॅथी उशीरा परिणाम करतं हे त्यांचं मत देखील बदललं.

अजून खूप मोठी परिक्षा म्हणजे त्वचेच्या कोणत्याही रोगाचा उपचार करणे. होमियोपॅथिमध्ये त्वचारोग मुळासकट काढायचा असल्यास तो पहिल्यांदा ऍग्रेसीव्ह होतो. त्यामुळे रूग्ण आणखीनच घाबरतो. तेव्हा त्याला रोग पूर्णपणे बरा होण्याची ही चाहूल आहे. हे समावून सांगणं खूप कठीण असतं. बाहेरून मलम लावून किंवा अँन्टी अॅलर्जीक औषध घेऊन त्वचा रोग बरे झालेत अशा प्रकारची पेशंटची हिस्ट्री असते. पण तो रोग फक्त तात्पुरता त्वचेवरून नाहीसा झालेला असतो, पण तो मुळासकट शरीरातून गेलेला नाही हे  पेशंटला पटवून द्यावं लागतं. मग त्यानं होमिओपॅथीचं औषध सुरू केलं की त्वचेवरून नाहीसा झालेला पण शरीरात लपलेला त्वचारोग उफाळून बाहेर पडतो. खरं तर तो रोग शरीरातून पूर्णपणे बाहेर फेकण्याची ती प्रक्रीया असते. अशावेळी पेशंटला समावून सांगणे तसंच ट्रीटमेंस सुरू ठेवण्यासाठी कनविन्स करणं ही खरचं तारेवरची कसरत असते.

जसजशी वर्षे उलटत गेली तसं लक्षात आलं की डॉक्टर आणि रूग्ण हे नातं सुद्धा ही बदलत चाललंय. रूग्णांना आजकाल किती काळात बरं वाटणार याचं चोख उत्तरही पाहिजे असतं. 90% हून जास्त रूग्णांना पूर्णपणे बरे होऊ याची 100% गॅरन्टी हवी असते. होमिओपॅथिच्या पूर्वीच्या प्रॅक्टीस नुसार लॅबोरेटरी टेस्टना फार महत्त्व दिलं जातं नव्हतं. त्यामुळे आजही लोकं दोन-दोन वर्षांपूर्वीची सोनोग्राफी घेऊन येतात आणि त्यानुसार उपचार करायला सांगतात. 2 वर्षात  शरीरात अनेक अंतर्गत बदल झालेले असू शकतात हे सांगूनही लोकांना कित्येकदा पटत नाही. डॉक्टर गरज नसताना परत परत रिपोर्ट काढायला लावतो असा शेरा मारून ते मोकळे होतात. आज डॉक्टरांविषयी कृतज्ञता सोडाच पण साधा आदरही उरला नाहीये. एकदा दिलेल्या फीच्या बदल्यात डॉक्टर कोणत्याही परिस्थितीत आपलं आरोग्य निरोगी ठेवायला बांधिलचं आहेत, मग आपणं कितीही कुपथ्य केलं तरी चालेल अशी भावना रूग्णांची झालीय. त्यामुळे खूप वाईट वाटतं.

तुम्ही एखाद्या कंपनीकडून मशिन किंवा एखादं गॅजेट विकत घेता तेव्हा ती कंपनी सुद्धा ते मशिन कायम व्यवस्थित कार्यरत राहिल याची जबाबदारी घेत नाही. मानवी शरीर मशिनपेक्षा कितीतरी सुक्ष्म आणि जटील असतं. डॉक्टर हा त्याचा निर्माता नाही तर तो फक्त अभ्यासक आहे हे साधं लॉजीक रूग्णाला कळू नये. रूग्ण अनेकदा डॉक्टरांना इतर धंदेवाईकाप्रमाणे वागवतात आणि मग डॉक्टरी पेशा हा धंदा झालाय असं स्वत:च म्हणतात.

अशी ही परिक्षा गेले सहा वर्षे चालू आहे म्हणूनच मी वैद्यकीय व्यवसाय न म्हणता प्रॅक्टिसच म्हणते.

 

डॉ. स्वाती पटवर्धन

श्री क्लिनिक, ओम दत्त हाईट्स बेलवली बदलापूर पश्चिम